सावट (नलिनी भोसेकर)

nalini bhosekar
nalini bhosekar

वाणसामानाच्या दोन्ही पिशव्या भरल्यावर तिनं पैसे देत नेहमीच्या दुकानदाराला म्हटलं : ‘‘भाऊ, मी समोर लायब्ररीत जाऊन येते. तोवर पिशव्या इथंच ठेवू का?’’
‘‘चालेल ठेवा. या जाऊन’’ तो म्हणाला.
तिनं रस्ता ओलांडला. तिच्या छातीत धडधडू लागलं.
‘हे असं काय होतंय? का घाबरल्यासारखं वाटतंय आपल्याला? भगवंता, धैर्य द्या! माझी भीती नाहीशी करा...’ ती मनातल्या मनात म्हणाली.

तिनं कशीबशी न्याहारी उरकली. इच्छाच नव्हती खाण्याची! सकाळपासूनच मनाला हुरहूर लागली होती. तो विचार मनात आला की ती मान हलवत म्हणत होती : ‘नाही, असं नाही होणार! मानसी तशी नाही.’ तिचा मानेचा नकार मनातल्या विचारांना नकार देत होता. अस्वस्थ झाली होती ती. मनातल्या मनात म्हणत होती :‘आजचा दिवस असा कसा उगवला? भगवंता, तूच सांभाळ. काही अघटित होऊ देऊ नकोस...’ सकाळपासून तिचं हेच बोलणं भगवंत ऐकत होता! भाजी आणायला जायचं होतं. ती तयार झाली. भगवंताला
नेहमीसारखा हात जोडून नमस्कार करून ती घराबाहेर पडली. विचारांचा भुंगा घालवण्यासाठी बाजारात जाणं हा एक चांगला उपाय असतो! ती मंडईत शिरली. मनासारखी भाजी घेऊन फळवाल्याच्या गाडीकडे निघाली. दुसऱ्या पिशवीत फळं घेऊन रिक्षासाठी तिनं हात केला. मघाचा गप्प बसलेला मनातल्या विचारांचा भुंगा रिक्षात बसल्यावर पुन्हा गुंजारव करू लागला...
‘नाही, मानसी तशी नाही’ असं मनाशीच म्हणत तिनं मान झटकली. रस्त्यावरच्या रहदारीकडं तिनं लक्ष वळवलं आणि तिला एकदम वाटलं, ‘मानसीच्या लायब्ररीत जावं काय? पण नको...तिला काय वाटेल? ‘कशाला आलात?’ म्हणाली तर काय सांगायचं? नकोच! उद्या बघू. काहीतरी कारण शोधून जाऊ. आज नको.’ मनातले विचार तिनं उडवून लावले. पैसे देऊन ती रिक्षातून उतरली. कुलूप काढून घरात शिरली. तेवढ्यात मोबाईल वाजला. लगबगीनं तिनं फोन घेतला. मनातच म्हणाली : ‘माझ्या परागचा फोन.’
‘‘काय आई, कशी आहेस?’’ खळखळता स्वर.
‘‘खूप छान आहे मी, बच्चा!’’ ती हसत म्हणाली.
‘‘अगं, आता बच्च्याला बच्चा होईपर्यंत तू मला बच्चाच म्हणणार का?’’ तो जोरात हसत म्हणाला.
‘‘म्हणेन!’’ तिच्या गालभर हसू उगवलं! चेहऱ्यावर प्रसन्नता आली.
‘‘अगं आई, मी हे सांगायला फोन केलाय की या शनिवारी मी येत नाहीये. कंपनीची मीटिंग आहे. आम्ही दिल्लीला जातोय. पुढच्या महिन्यात दोन दिवसांची रजा जोडून घेऊन मी येईन. मानसी लायब्ररीत गेली असेल ना? दोघींना सॉरी!’’ पराग हसत म्हणाला.
‘‘मी सांगेन मानसीला. तूही फोन कर. तब्येत जप. खाण्याकडे दुर्लक्ष करू नकोस.’’
‘‘अगं आई, मी होस्टेलमध्ये नाहीय,’’ तो खळखळून हसला.
‘‘आई, ठेवतो फोन. इथूनच नमस्कार करतो तुला! वाकून हं!’’
‘‘सुखी भव... उदंड आयुष्य भव...’’ ती म्हणाली.
फोन बंद झाला.
‘सोन्यासारखं माझं लेकरू! बापामागं फारसे लाड नाही करू शकले मी त्याचे...पण आहे त्यात समाधान मानून आनंदित राहिलं माझं पाखरू. भगवंता, त्याला, त्याच्या संसाराला कुणाची दृष्ट न लागो...’ भुंगा पुन्हा गुणगुणू लागला!
ती बाहेरच्या खोलीत आली. ‘ही मृदुला सकाळीच कडमडली आणि माझ्या मनात हे संशयाचं पिल्लू सोडून गेली. काय करावं ते समजत नाही...’ मृदुलाचे शब्द तिच्या कानात परत गुणगुणले : ‘‘काकू, रागावू नका. मानसीताई तशी चांगली आहे; पण पुरुषाची जात वाईटच ना! लायब्ररीत दुपारच्या जेवणाच्या सुटीत कुणीतरी एक स्कूटरवरून येतो. दोघं बोलत असतात. मी पाहिलंय दोन वेळा; पण तुम्हाला सांगायला धीर झाला नाही. आज मात्र राहवेनाच.’’
हे सगळं सांगून मृदुला झटक्‍यात निघून गेली आणि तिचा दिवस झाकोळून गेला. मनावर सावट आलं. ते मनाला विळखा मारूनच बसलं...
‘पण माझी मानसी तशी नाही. ती लिहिते, कविता करते. परवा मासिकात आलेली कथा छानच होती तिची. गुणी आहे पोर. नवऱ्यावर जीव आहे तिचा. ही मृदुला... कशाला बाई सुखात बिबा घालण्यासारखं बोलली!’ विचार करत करत ती भाजी निवडत होती...‘मानसीला स्पष्ट विचारता येणार नाही. खरं काय, खोटं काय ते. बघू. शांतपणे विचार केला पाहिजे.’ तिच्या मनातले विचार नुसते पळत होते...‘पराग या वेळी येणार नाही असं त्यानं मघाशीच फोनवरून सांगितलं आहेच.. तेव्हा मानसी लायब्ररीत गेल्यावर वाणसामान आणण्याच्या निमित्तानं आपण बाहेर पडू. जाता जाता लायब्ररीकडेही डोकावता येईल...’ हा विचार मनात येताच ती शांत झाली...
संध्याकाळचा दोघींचा स्वयंपाक...भाजी करून ठेवायची... मानसी मग वरण-भात, पोळ्या करते...नंतर दोघी गप्पा मारत जेवतात. मग मानसी आवरून लिहीत बसते.
‘असं सगळं छान चाललं असताना हे मध्येच...’ तिनं परत मान झटकली!
भाजी तयार झाल्यावर गॅस बंद करून चहाचा कप तोंडाला लावला. तेवढ्यात मानसीची स्कूटर आलीच. कप टीपॉयवर ठेवून ती दाराशी आली.
‘‘हाय आई! दिवस कसा गेला?’’ मानसीनं विचारलं.
‘‘छान! तुझा चहा ठेवलाय. पी घेऊन’’ ती म्हणाली.
‘‘ओके! आलेच फ्रेश होऊन’’ मानसी घरात आली.
‘गोड पोरगी! चांगलीच आहे!’ मनातलं सावट दूर हटवत ती पाठमोऱ्या सुनेकडे पाहत मनात म्हणाली.
चहा पिऊन झाल्यावर मानसी स्वयंपाकघरात शिरली आणि ती टीव्हीसमोर बसली. दोघींची नऊ वाजता जेवणं झाली. नंतर ती जप करत बसली आणि मानसी लेखनात गुंतून गेली.
रात्री तिला चांगली झोप लागली. विचारांचा भुंगा पळून गेला होता. सकाळी स्वतःचं आवरून मानसी कामावर गेली. दुपारनंतर ती मानसीच्या लायब्ररीकडे जाऊन तिकडं डोकावणार होती! दोनच्या सुमाराला सर्व आवरून, वाणसामानाच्या पिशव्या घेऊन ती बाहेर पडली.
वाणसामानाच्या दोन्ही पिशव्या भरल्यावर तिनं पैसे देत नेहमीच्या दुकानदाराला म्हटलं : ‘‘भाऊ, मी समोर लायब्ररीत जाऊन येते. तोवर पिशव्या इथंच ठेवू का?’’
‘‘चालेल ठेवा. या जाऊन’’ तो म्हणाला.
तिनं रस्ता ओलांडला. तिच्या छातीत धडधडू लागलं.
‘हे असं काय होतंय? का घाबरल्यासारखं वाटतंय? भगवंता, धैर्य द्या! माझी भीती नाहीशी करा’ मनातल्या मनात म्हणत ती लायब्ररीकडे वळली.
मानसी आणि तो दुसरा कुणीतरी खुर्च्यांवर बसले होते. शेजारी शेजारी!
तिच्या हृदयाची धडधड, ठोके वाढले. ती गडबडली.
तेवढ्यात मानसी पुढं येत म्हणाली : ‘‘आई, काय झालं? तब्येत ठीक नाही का? चेहरा उतरलाय तुमचा. तुम्हाला बरं वाटत नव्हतं तर मग फोन करायचात ना. इकडे कशाला मला बोलवायला यायचं? इथं बसा. मी पाणी आणते.’’ तिला खुर्चीत बसवून मानसी आत गेली.
तिनं पाण्याचा ग्लास तिच्या हाती दिला.
‘‘सावकाश प्या. घाबरू नका,’’ तिनं सासूबाईच्या पाठीवर हात ठेवला. पाणी पिऊन तिनं मानसीच्या हाती ग्लास दिला.
‘‘बरं वाटतय ना?’’ मानसीनं विचारलं.
‘‘हो’’ ती म्हणाली.
दुसरी खुर्ची आणून तीवर बसत मानसीनं विचारलं : ‘‘का आलात आई?’’
‘‘अगं, मी वाणसामान घेतलं. पिशव्या दुकानातच ठेवल्या. तुला भेटून जावं असा विचार करून आले इकडं.’’
‘‘पण, वाणसामानाची काय एवढी घाई? बसा जरा शांत. का जाऊन यायचं डॉक्‍टरांकडे?’’
‘‘नाही गं. तब्येत ठीक आहे तशी माझी.’’
‘‘आई, तुमची ओळख करून देते...सर, या माझ्या सासूबाई; पण खरं तर आईच आहेत या माझ्या. खूप जपतात मला’’ मानसीनं त्या पुरुषाला सासूबाईंची ओळख करून दिली आणि पुढं सासूबाईंकडं पाहत म्हणाली : ‘‘आई, आणि हे महेश दाबके. हे प्रकाशक आहेत. माझा कथासंग्रह ते प्रकाशित करणार आहेत. आज ते कथाच न्यायला आलेत.’’
‘‘नमस्कार करतो आई’’ म्हणत त्यानं तिच्या पायांना हात लावला.
‘‘सुखी भव’’ ती म्हणाली.
‘खरं तर सर, आईंमुळेच माझं लिहिणं होतं. त्या माझ्या कथा वाचतात आणि खूप कौतुक करतात माझं’’ मानसीचा चेहरा आनंदानं फुलला होता.
‘‘वाटलंच मला. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला आई मिळाली. आणि बरं का आई, माझ्या प्रकाशनाचं नावही ‘आई प्रकाशन’ असंच आहे! माझ्या आईची ती स्मृती आहे. या क्षेत्रात मी तसा अजून नवोदितच आहे. मानसी यांच्या कथा मला आवडल्या. मी पुस्तकासंदर्भात त्यांना विचारलं. त्यांनी होकार दिल्यावर पुस्तक काढायचं ठरवलं. पुढच्या आठवड्यात प्रकाशित होईल. निघतो आई, निघतो ताई.’’ त्या दोघींचा त्यानं निरोप घेतला.
तो गेल्यावर मानसी म्हणाली : ‘‘आई, मी येऊ का तुमच्याबरोबर? काकांना सांगून येते...’’
‘‘नको गं. रिक्षा बघ. सामान आहे दुकानातच.’’
‘‘चला’’ म्हणत मानसीनं रिक्षाला हात केला. पिशव्या रिक्षात ठेवून आणि तिला रिक्षात बसवून मानसी म्हणाली : ‘‘आई, परागचा फोन आला तर सांगू नका हं त्याला इतक्यातच पुस्तकाबद्दल!’’
‘‘हो, हो. नाही सांगत’’ ती म्हणाली.
मानसीनं हात केला. तिनं पण हात केला.
मनातलं विचारांचं गडद सावट आता पुसट झालं होतं.
तो पुरुष मानसीच्या पुस्तकाचा प्रकाशक असून त्याविषयीच्या पूर्वतयारीसंदर्भात मानसीला भेटायला येत असल्याचं कळल्यानं तिच्या मनातल्या विचारांचं घोंघावणं आता थांबलं होतं...पण तरीही पूर्णतः थांबलं नव्हतं!
भुंगा पुन्हा गुणगुणू लागला...‘पण हे सारं परागला न सांगता का करत असावी मानसी? आणि ‘त्याला सांगून नका इतक्यातच’ म्हणजे काय!
का? का हे असं?’
पुसट झालेल्या सावटातून तिला काही प्रश्‍न परत वाकुल्या दाखवू लागले...‘परागला का नाही सांगायचं?’ या प्रश्‍नाचं सावट घेऊन ती घरात शिरली. या घटनेला आठवडा उलटून गेला.
आज पराग येणार होता. संध्याकाळी मानसी घरी आल्यावर दोघींचा चहा झाल्यावर मानसी म्हणाली : ‘‘आई, तुम्हाला एक सांगायचं होतं.’’
‘‘काय!’’ ती उगाचच धास्तावली!
‘‘आई, पराग आता येतीलच. लक्षात आहे ना? पुस्तकाचं गुपितच ठेवायचंय ते!’’
‘‘हो. आहे लक्षात!’’ ती म्हणाली.
मनातलं पुसटलेलं सावट पुन्हा गडदल्यासारखं वाटू लागलं...‘वाचव रे, भगवंता’
पराग आला.
तिला नमस्कार करून म्हणाला : ‘‘छान आहेस ना आई?’’
‘‘हो रे, बाबा’’ ती म्हणाली.
डायनिंग टेबलवर चहा घेत असताना मानसी तिच्या खोलीतून आली. दोघांना म्हणाली ‘‘दोघांनीही डोळे बंद करा.’’
‘‘केले’’ दोघं म्हणाले.
मानसीनं दोघांच्या हातात एकेक पुस्तक ठेवलं.
पुस्तक पाहून दोघं म्हणाले : ‘‘अभिनंदन, मानसी.’’
‘‘अरे...पण तोंड गोड करायचं राहिलंच की...’’ म्हणत मानसी तिच्या खोलीत गेली.
ही संधी साधून पराग तिला म्हणाला : ‘‘आई, मला माहीत होतं की मानसी पुस्तक देणार आहे.’’
‘‘म्हणजे रे?’’ तिनं विचारलं.
‘‘अगं आई, सदानंदकाकांचा मुलगा - महेश गं, महेश दाबके - मला म्हणाला, ताईचं पुस्तक प्रकाशित करतो मी. मी म्हटलं, कर. मात्र, आई, महेशचं आणि माझं हे असं बोलणं झाल्याचं मानसीला सांगू नकोस हां तू.. गुपितच ठेव.’’
‘‘नाही सांगणार!’’ तिच्या चेहऱ्यावर आता स्मित झळकत होतं.
दोघांना मिठाई देऊन, नमस्कार करून मानसीनं पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेचं पान उघडून परागसमोर ठेवलं.
त्यानं ते जोरात वाचलं... ‘आईसारखी माझ्यावर माया करणाऱ्या सासूबाई, पूजनीय सविताबाई आणि माझ्यावर निरतिशय प्रेम करणारे माझे पतिदेव पराग यांना आदरपूर्वक’ - मानसी.
तिचे - म्हणजे सविताबाईंचे- डोळे आता भरून आले होते!
सुनेला, मुलाला जवळ घेत ती म्हणाली ‘उदंड आयुष्य आणि सुखी जीवन लाभेल तुम्हाला.’
तिच्या मनातलं संशयाचं सावट आता कुठल्या कुठं निघून गेलं होतं...आणि शांती-समाधानाचा लख्ख प्रकाश तिच्या मनात, चेहऱ्यावर पसरला होता!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com