पूजा आदिशक्तीची (आश्लेषा महाजन)

ashlesha mahajan
ashlesha mahajan

नवरात्रोत्सव म्हणजे काळ-नदीच्या प्रवाहात सोडलेले मिथक-कथांचे दीप. आज हजारो वर्षांच्या लाटांच्या नि भवऱ्यांच्या हेलकाव्यांमध्येही हे दीप उत्सवप्रिय माणसांच्या मनात लखलखत आहेत. म्हणूनच ‘नवरात्र’ देशभर साजरा होतो; पण साजरा करण्याच्या राज्याराज्यातल्या रीती विभिन्न आहेत. रुढींच्या बेडीत अडकण्यापेक्षा परंपरा आणि नवता यांचा मिलाफ करत देवीच्या सामर्थ्याचाच आज पुनर्जन्म होण्याची आवश्यकता आहे. नवजाता, बालिका, कलिका, कुमारिका, ऋतुमती, पुनर्नवा, किशोरी, षोडशा, तरुणी, प्रौढा, ऋतुगर्भा, जन्मदा, माता, पोषिता, संजीवनी आणि युगंधरा ही स्त्रीची विविध रूपं स्त्रियांसह पुरुषांनीही समजून घ्यावीत. मग नवरात्रीच्या नव्या कथा नि कालांतरानं मिथकं तयार होतील.

उमा, गौरी, पार्वती, जगदंबा ही देवीची सौम्य रूपं. दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही उग्र रूपं. ही शक्तीची रूपं सर्वश्रुत आहेत. बालिका, कुमारिका, युवती, प्रेमिका, अभिसारिका, पत्नी, गर्भधारिणी, जन्मदा, संहिता, पालक, पोषिता, गृहस्वामिनी, अभद्रसंहारिणी...अशा साऱ्या जीवनकला साकारणारी, स्वअस्तित्व सिद्ध करणारी ही देवता. ही सारी पार्वतीदेवीची रूपं म्हणजे स्त्रीरूपंच की! पार्वती म्हणजे शक्ती. शंकराची शक्ती. शंकर-पार्वती म्हणजे स्त्री-पुरुष मीलनातून निर्माण होणाऱ्या नव-सर्जनाच्या देवता. अर्धनारीनटेश्वराच्या रूपानं या देवता-द्वय स्त्री-पुरुष यांच्या रसपूर्ण अनुरूपतेचे दर्शन घडवतात. त्यांच्या मीलनाचं प्रतिक म्हणजे शिवलिंग! या मानवी वंश-सातत्याचं महत्त्व सांगणाऱ्या देवता. त्यातली पार्वती वेळोवेळी विविध रूपांत प्रकट होते, समाजपुरुषाला सुयोग्य दिशेनं वळवते, समाजप्रवाहात सुसंगती आणत सातत्य टिकवण्याचं काम करते. वराहपुराणात हरिहरब्रह्म नामक ऋषीनं रचलेलं ‘चण्डीकवचम्’ नामक देवीस्तोत्र आहे. त्यात नवदुर्गांची क्रमश: नावं दिली आहेत :
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चंद्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम्।
पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रिश्च, महागौरीति चाष्टमम्।
नववं सिद्धिदां प्रोक्ता, नवदुर्गा प्रकीर्तिता:
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।


या नवदुर्गांची नावं मोठी रोचक नि अर्थवाही आहेत. त्या नावातच तिची कथा आहे. त्यात प्रत्येकीचं रूपवर्णन असून तिचं वाहन, शस्त्रं, पराक्रम इत्यादीचे वर्णन आहे. ‘शिखेपासून (डोक्यापासून) पायाच्या नखापर्यंत माझे रक्षण कर. आम्हास धनधान्ये, पुत्र-पौत्र, सुख-शांती-आरोग्य, यश-कीर्ती-लक्ष्मी दे, भूतप्रेतपिशाच्चांपासून रक्षणा कर,’ अशी त्यात प्रार्थना आहे. काही स्तोत्रांमध्ये फलश्रुतीही आहे. प्राचीन वाङ्‍मयामध्ये अनेक देवीस्तोत्रं आहेत. ‘देव्यथर्वशीर्षम्’, ‘आनंदलहरी’, ‘शीतलाष्टकम्’, ‘चण्डीकवचम्’, ‘सौंदर्यलहरीस्तोत्रम्’, ‘दुर्गास्तोत्रम्’, ‘कालिकास्तोत्रम्’, ‘पुराणोक्त रात्रिसूत्रम्’, ‘वाग्वादिनीस्तोत्रम्’, ‘ललितापंचरत्नस्तोत्रम्’, ‘अन्नपूर्णास्तोत्रम्’ इत्यादी. या स्तोत्रांच्या रचनांचा काळ ठरवणं अवघड आहे.

या काव्यरचना बव्हंशी पुरुषांनी रचलेल्या आहेत. पुरुषांना देवीची, देवीरूपी स्त्रीची भरभरून स्तुती करावीशी वाटणं ही गोष्ट आश्चर्याची आणि महत्त्वाची आहे. स्त्रीच्या स्तुतीसाठी खास ‘रचलेल्या’ या कविता असल्या, तरी त्यातून त्या त्या काळातल्या लोकसंस्कृतीचा, जनरीतींचा, समाजधारणांचा सुगंध येतो. त्यात देवीला हजारो उपमा दिल्या आहेत. भाषिक अंगानंही या साहित्याचा अभ्यास रोचक ठरतो. एकेकाळी स्त्री खरंच समाजातला प्रभावशाली घटक असावा, त्या काळात मातृसत्ताक पद्धत काही कुळांमध्ये अस्तित्वात असावी, असं वाटतं. ‘शीतलाष्टकम्’मधली देवी रोगनिवारिणी आहे :
वंदेऽऽहम् शीतलां देवीं सर्वरोगभयापहम्।
यामासाद्य निवर्तेत विस्फोटकभयं महत् ।।

कदाचित रोगनिवारण करणारी ती कोणी जाणकार स्त्री असेल. त्या स्त्रीलाच देवीरूप दिलं गेलं असेल. साक्षात मृत्यूरूपिणी असणाऱ्या महामारी देवीवरही स्तोत्र आहे. ‘महामारीस्तोत्रम्’मधून माणूस निरामय जीवनाची इच्छा व्यक्त करतो. हे सारी देवीस्तोत्रं मोठी रंजक आहेत. भारतीय प्राचीन संस्कृतीची त्यात प्रतिबिंबं आहेत. परमेश्वरानं (निसर्गानं) जरी ही चराचर सृष्टी निर्माण केली असली, तरी देवतांना निर्माण करणारा मानवच आहे. स्तोत्रं म्हणजे स्तुतिपर रचना. त्यात त्या त्या देवींची वर्णनं, विविध पात्रं, स्वभाववैशिष्ट्यं, त्यांच्या पराक्रमकथा, उपकथा आहेत. ही स्तोत्रं रचणारे पुरुष आहेत. पुरुषांना सदैव स्त्रीबद्दल आचंबा वाटत असतो. तिच्या सर्जनशील देहाविषयी आकर्षण आणि कृतज्ञताही वाटत असते. ती आपला वंश-प्रवाह पुढं नेणारी जन्मजान्हवी आहे, याची जाणीव त्यातून प्रकट होते. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मानुषीला ‘देवीस्वरूप’ देण्यात आलं. मानुषीची पूजा करण्याऐवजी दगडी वा लाकडी देवीची पूजा होऊ लागली. तिच्या विविध कथा निर्माण झाल्या. त्या कथांमधून समाजदर्शन घडतं. ही कथायुक्त स्तोत्रं म्हणजे कवींच्या प्रतिभेचा सुंदर आविष्कार आहेत. त्यातल्या देवींची नावं जरी पाहिली, तरी कवींच्या उन्मेषांचे व शब्द-लालित्याचे धुमारे सामोरे येतात. पुरा-कथांच्या, मिथक-कथांच्या डोळस अभ्यासातून त्या त्या काळातलं समाजजीवन समजून घेता येतं. शंकराचार्यांचं ‘त्रिपुरसुन्दरीमानसिकोपचारपूजास्तोत्रम्’ हे १२८ श्लोकांचं काव्य स्त्री-पुरुषांनी युक्त अशा या जगातल्या संदर्भांना लालित्याचे रंग देते. या स्तोत्रांमध्ये अनेक कथा आहेत. कथांचे उगम कुठले? त्यांना लोकोत्सवात मान्यता कशी व कधी मिळाली? हे सारं जाणून घेणं म्हणजे उत्सवाचं मर्म जाणून घेणं.
अश्विनशुद्ध पक्षी आंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासुनी घटस्थापना करुनी हो
मूळमंत्र जप करुनी भोवती रक्षक ठेवुनी हो
ब्रह्मा-विष्णु-रुद्र आईचे पूजन करिती हो…
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो…


खूप सारी संस्कृत स्तोत्रं असताना मराठीत नवरात्रीची नऊ कडव्यांची आरती लिहावी, असं समर्थ रामदासांना वाटलं. दशमीच्या दिवशी सिंहारुढ अंबेनं शुंभ-निशुंभ राक्षासाचा रणभूमीवर वध केला, या आणि अशाच नऊ कथांचे संदर्भ त्यात आहेत. स्त्री आणि पुरुषांनी मिळून तयार झालेली ही संस्कृती. त्या संस्कृतीच्या पोटात असतात काळप्रवाहाचे, माणसाच्या जीवनसंघर्षाचे, जय-पराजयाचे, त्याच्या उद्ध्वस्त होण्याचे, स्त्री-पुरुष नातेसंबंधांचे, त्याच्या उत्कर्षाचे-प्रगतीचे, त्याच्या आकलनशक्तीचे, स्खलनाचे, लोकरूढींचे हे रंगीबेरंगी कवडसे. या कवडशांमधल्या लखलखत्या कथेतली मोजकी प्रभावी पात्रं ठरतात लक्षवेधी नि श्रेष्ठतम. त्यांना मान दिला जातो देवतेचा. देव या शब्दाचा अर्थ- चमकणारा, देदिप्यमान. समूहजीवनाच्या काही धारणांच्या घुसळणीतून काही लक्षवेधी पात्रांच्या कथा साकार होतात. देवता, मिथक-कथा, रुढी, परंपरा, पोथ्या, कर्मकांडं तयार होतात. माणसाच्या कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा तो आविष्कार असतो. त्या कथांना काव्य, गायन, नृत्य, नाटक, शिल्प अशा ललितकलांत किंवा ललितकलांच्या मिश्रणात रूपांतरित केलं जातं. त्यातून आनंद आणि उत्साहाचा वर्षाव होतो. त्या कथा बहुसंख्य लोकांना भावल्या, तर त्यांचा प्रसार होतो.

नवरात्रोत्सवाचं मूळ आणखी एका कथेत आहे. जेवढे कल्पनाशक्तीचे धुमारे तितक्या कथा. कोणे एके काळी दुर्गम राक्षसानं घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. ‘वर माग’ म्हणताच ‘चारी वेद हवेत’ असं तो म्हणाला. वेद मागणं वा देणं ही अद्‍भुत घटना पुराकथांमध्ये घडू शकते; पण त्यामुळे यज्ञच बंद पडले. दुर्गमनं देवांवर आक्रमण केलं. त्यावेळी विश्वव्यापक, त्रिगुणात्मक, शतनेत्रधारी आदिमाया प्रकटली. तिनं दुर्गमचा शिरच्छेद केला. दुर्गमला मारणारी ती दुर्गा. हा विजयादशमीचा उत्सव घटस्थापना, नवरात्रोत्सव, सीमोल्लंघन, सोने-वाटप, शत्रपूजन, भोंडला अशा विविध स्वरूपांत विस्तारत गेला. दुर्गादेवीच्या मूळ उत्सवात ‘रामायणा’तल्या रावणवधाचा संदर्भ डकवला गेला. खंडेनवमीला पांडवांनी शमीवृक्षाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रं काढली आणि विराटाच्या मदतीनं कौरवांवर विजय मिळवला. म्हणजे ‘महाभारता’चा संदर्भही जोडला. ज्या उत्सवाला पुराणकथांसह रामायण आणि महाभारताचे संदर्भ जोडले गेलेले आहेत, तो उत्सव भरतवर्षात लोकप्रिय होणं अगदी स्वाभाविक आहे. कारण या प्राचीन वाङ्‍मयानं भारतीयांचं युगांपासून भावनिक पोषण केलं आहे. शस्त्रपूजनाचा, सीमोल्लंघनाचा संदर्भ घेत बंगालसह संपूर्ण देशातच स्त्रीशक्तीचा जागर करण्याची परंपरा म्हणूनच निर्माण झाली. अष्टमीच्या दिवशी दुर्गेच्या नावानं आजही जोगवा (कोरडा शिधा) मागितला जातो. त्याचाही हा आनंदोत्सव. या नऊ दिवसांत कुमारिकांनाही भेटवस्तू देऊन खाऊपिऊ घातलं जातं. हस्त नक्षत्रावर मुली भोंडला, भुलाबाई खेळतात.

मिथक-कथांचे दीप
सण-उत्सवांमध्ये स्थल-कालपरत्वे त्यात काही बदल होतात. प्रांताप्रांतातल्याच नव्हे तर गावोगावच्याही कथा वेगळ्या असतात. कारण त्या देवांच्या नावानं सांगितलेल्या माणसांच्याच कथा असतात. त्या कथा काही काळासाठी जनमानसात स्थिरावतात. कथांमध्ये एकवाक्यता असतेच, असं नाही. माणूस त्या कथेचे हवे तसे, अनुकूल वा प्रतिकूल विविध अर्थ लावतो. त्यानुसार त्यातली पात्रं, प्रसंग चक्क बदलून वा नव्या कथा/उपकथानकांची त्यात भर घालतो. मग कधी देवताच असुर होते! कधी खलनायक होतो नायक! कधी देवी होते वाघीण! कधी देव होतो गरुड! कधी अतिंद्रिय शक्ती धुमाकूळ घालते, कधी स्वप्नातली अद्‍भुतं! मग बुद्धिमान आणि सर्जनशील माणसं नव्या कथांची नवी स्तोत्रं लिहितात. पोथ्यांचं परिष्करण करतात. त्यांना लोकप्रिय देवतांचे अवतार म्हणून रंगवतात आणि देवतांना व सणांनाही ‘नियमित’ करतात. काही कथा काळाच्या विवर्तात नष्ट होतात. ज्या कथा युगानुयुगांच्या प्रवाहात प्रवास करत वर्तमानात येऊन उभ्या ठाकतात, त्यांचे उत्सव साजरे होतात. नवरात्रोत्सव म्हणजे काळ-नदीच्या प्रवाहात सोडलेले मिथक-कथांचे दीप. आज हजारो वर्षांच्या लाटांच्या नि भवऱ्यांच्या हेलकाव्यांमध्येही हे दीप उत्सवप्रिय माणसांच्या मनात लखलखत आहेत. म्हणूनच ‘नवरात्र’ देशभर साजरा होतो; पण साजरा करण्याच्या राज्याराज्यातल्या रीती विभिन्न आहेत. बंगालची दुर्गापूजा वा दुर्गाष्टमी, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत नवरात्र, कोल्हापुरात दसरा-उत्सव अशी त्याची अनेक रूपं आहेत. जसा प्रदेश तशी माणसं; जशी माणसं तसे सण. या सणांच्या प्रथा नि कथा भजन, कीर्तन, पोवाडे, फटके, गवळण, तमाशा इत्यादी लोककलांतून साग्रसंगीत ऐकवल्या, आळवल्या जातात. त्यांचा प्रसार होतो. पुराण-कथांच्या संदर्भात ‘हे असं खरंच घडलं होतं का?’ हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे सत्य पुरावे देता येत नाहीत. कथाबीज सत्यघटनेत असू शकतं, किंवा कल्पनाविलासात. या कथा वेळोवेळी माणसाच्या मनात जन्म घेतात नि लोकवाङ्‍मय समृद्ध करतात.

कृषिसंस्कृतीतून विकसित
घटस्थापना करण्याची प्रथा ही कृषिसंस्कृतीतून विकसित झाली आहे. वर्षाऋतूनंतरचा सुगीचा हा सुजलाम् सुफलाम् काळ. या काळात शेतात पीक मावत नाही. अन्नब्रह्म प्रसन्न झालेलं असतं. मग त्याच शेताचं लघुरूप देव्हाऱ्यात ठेवून त्याची मनोभावे पूजा केली जाते. ही अन्नब्रह्माचीही पूजा. तीच घटस्थापना. घट मातीचा असतो. घट हे पृथ्वीचं जसं प्रतीक; तसंच ते स्त्रीच्या गर्भाशयाचं द्योतक होय. कुलाचाराप्रमाणं घट बसवणं, मालाबंधन आणि नऊ दिवस तेलाचा दिवा लावणं इत्यादी प्रथा आहेत. या प्रथा म्हणजे कृतज्ञनेची प्रतीकं आहेत. कर्मकांडं आहेत. कर्मकांडं न करताही भूमीविषयीची, स्त्रीविषयी कृतज्ञता दाखवता येते; पण भाबड्या माणसाला सगुणभक्ती प्रिय. म्हणून हे उत्सव. काही जण घटात सप्तधान्य पेरतात. घटा म्हणजे शेतातली माती आणून तिचा चौकोनी थर करून त्यात सप्तधान्यं- जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे व चणे- लावली जातात. नऊ दिवसांत ही सप्तधान्यं वीत, दीड-वीत उंच वाढतात. बीजांना माती, पाणी, उजेड, वारा आणि आकाशाच्या पोकळीत (पंचमहाभूतांत) अंकुर फुटतात. त्या बीजांकुरांना फुलं, पानं, फळं, गंध, अक्षता, हळद-कुंकू, कापसाचं वस्त्र वाहतात. म्हणजे निव्वळ निसर्गच निसर्ग! हा खरंच सर्जनाचा उत्सव, नवनिर्मितीची पूजा. बीजक्षेत्राचा सण. शेतीचा शोध लावणाऱ्या बुद्धिमान स्त्रीच्या निर्मितीक्षमतेचा गौरव. तिच्या चिवट आसोशीचा, जगण्याचाच उत्सव करणाऱ्या तनामनाचा सत्कार. माता आणि मातीचा उत्सव!

खरंच उत्सव आहे का?
आज मात्र आपल्या पूजासाहित्यात प्लॅस्टिकची तोरणं-फुलं, कृत्रिम मोती-हार, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या, विद्युत रोषणाई, सिंथेटिक अत्तर, डिजिटल पूजाविधी, माईकवरच्या आरत्या, रेडिमेड चटपटीत प्रसाद यांचा समावेश झालेला आहे. शिवाय घरातला नवरात्रोत्सवसुद्धा सार्वजनिक होत चौकाचौकात पोचला आहे. त्यात बाजारपेठेची मगरमिठी; तसंच अर्थकारण, राजकारण, समाजकारण यांचा हस्तक्षेप वाढतो आहे. कृतक अस्मितांचे तवंग नि शक्तिप्रदर्शन वेगळंच. सार्वजनिक संपत्तीची आणि पर्यावरणाची हानी हा तर ऐरणीवरचा प्रश्न आहे. हा खरंच ‘माता आणि मातीचा उत्सव’ आहे का, असा प्रश्न पडतो आहे. स्त्रीशक्तीचा जागर करतानाच उत्सवात घुसलेल्या कृत्रिमतेला दूर सारण्यासाठीही विवेकजागर करण्याची आवश्यकता आहे. हा विवेकजागरही स्त्रियांनीच करावा. तेच सयुक्तिक ठरेल.
उत्सवांची मुळं जशी गोष्टीवेल्हाळ माणसांच्या कल्पनाविलासात असतात, तशीच त्याच्या जीवनलालसेतही असतात. कधी देवतेविषयीच्या कृतज्ञतेतून भक्ती-प्रीती, पूजा-अर्चा वाहिली जाते; तर कधी भयातून वा अपराधीपणातून नवस-सायास...! भक्ती, प्रीती, समर्पण, शरणता, पूजन-अर्चन, भय, आदर, दबदबा, आचंबा अशा विविध भावना त्यात ओतप्रोत असतात. व्रत म्हणजे संयमाची कसोटी; पण व्रतांचं अवडंबर झालं, की पापपुण्याच्या कल्पनांचं पेव फुटतं नि सणाचं प्राणतत्त्व नष्ट होतं. नवरात्रांत उपवासांचं महत्त्व आहे. उप+वास म्हणजे देवाजवळ- त्याच्या सन्निध बसणं. म्हणजे दैवीगुणांचा अंगीकार करणं. दैवीगुण म्हणजे प्रेम, दया, क्षमा, दातृत्व, सहकार, सेवा यांतून शांती निर्माण करणं. उप+वास ऊर्फ उपासाच्या निराहार, अल्पाहार, विशिष्टाहार, द्रव-आहार, फलाहार, एकभुंक्त... इत्यादी अनेक प्रथा प्रचलित आहेत. नवरात्रींचे नऊ उपास, उठती-बसतीचे उपास वा अष्टमीचा उपास अशा प्रकृतीला सोसतील अशा सोयीस्कर प्रथाही आहेत. आहाराविषयीची जागरुकता, विविध व्याधी यांमुळे उपवासाविषयीच्या कट्टर प्रथांना शिथील करून काही नव्या शेलक्या उपप्रथाही पडतात. रसनेवर नियंत्रण आणि दैवी गुणांजवळ राहणं हे उत्सवाचे मूळ हेतू साध्य होतात का, हे सुज्ञ मंडळी बघतात. सणांच्या बाह्य महिरपींच्या डामडौलात आणि बाजारपेठेच्या अटळ मगरमिठीत मूळ उगमाचं औचित्य विरघळून/वाहून जातं, हे पाहणंही रोचक असतं. हा देवीचा उपवास अधिकतर स्त्रियाच करतात. स्त्रीरूपाची पूजा अधिकतर स्त्रियाच करतात. स्त्रियाच उत्सवात अधिक रमतात, गुंततात. मग ती परंपरा चालू ठेवण्याचं उत्तरदायित्व त्यांच्याकडंच येतं- कधी स्वेच्छेनं, कधी सक्तीनं. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सणांचा मूळ गाभा तपासण्याचं व्रत हाती घ्यायला हरकत नाही. त्यातून हीण टाळता आलं तर उत्तमच. कुठल्याही उत्सवातून, कर्मकांडातून तना-मनाला आनंद मिळतोय ना, हे महत्त्वाचं.

स्वतःचं आकाश आखा
स्त्री आपल्या पतीवर, मुलांवर, कुटुंबावर प्रेम करतेच. स्त्रीनं स्वत:वर प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वत:ला ओळखायला शिकलं पाहिजे. आपलं आकाश नि अवकाश आखत पुढं जायला हवं. ते खरं देवीपूजन. तो खरा आत्मसन्मान. देवीच्या सामर्थ्याचा मान राखावा, ही भावना खूप विलक्षण आहे; पण तिला नक्षीदार देव्हाऱ्यात पुजून झाल्यावर नि उत्सवाचे सोपस्कार पार पाडल्यावर मग मात्र दुय्यम ठरवून गृहस्वामिनीच्या मखरात बंदिनी करावं, असं समाजपुरुषाला का वाटलं असेल? एकीकडे देवी नि दुसरीकडे दासी अशा दोन टोकांवर तिला कुणी, कधी बसवलं? स्त्रियांनी ते का मान्य केलं असावं, हा समाजशास्त्रातला अभ्यासाचा विषय आहे. रुढींच्या बेडीत अडकण्यापेक्षा परंपरा आणि नवता यांचा मिलाफ करत देवीच्या या सामर्थ्याचाच आज पुनर्जन्म होण्याची आवश्यकता आहे. ‘माणूस’ किंवा ‘व्यक्ती’ म्हणून अनेकींचा समाजात आत्मविश्वासपूर्ण वावर का नाही? ही सुंदर स्तोत्रं वाचताना हा प्रश्न पडतो. स्त्रीभ्रूणहत्या रोखणं, मुलींच्या जन्माचं स्वागत करणं, तिचं पालनपोषण आणि शिक्षण याविषयी सजग राहणं आणि तिला एक स्वयंपूर्ण व्यक्ती म्हणून विकसित करणं हे स्त्रियांनीच स्त्रियांसाठी करणं आवश्यक आहे. ही नवजाता, बालिका, कलिका, कुमारिका, ऋतुमती, पुनर्नवा, किशोरी, षोडशा, तरुणी, प्रौढा, ऋतुगर्भा, जन्मदा, माता, पोषिता, संजीवनी आणि युगंधरा ही स्त्रीची विविध रूपं स्त्रियांसह पुरुषांनीही समजून घ्यावीत. अशा वेळी पुरुषांचा ‘संवेदनशील माणूस’ होण्याचा प्रवास महत्त्वाचा ठरेल. कारण पुरुषप्रधान संस्कृतीनं त्यालाही जखडलं आहे. त्याचा पुरुषी अहंकार कुरवाळण्यात स्त्री-पुरुष दोघंही अग्रेसर असतात. पुरुषांना समानतेचं मूल्य कळावं म्हणून वेळोवेळी समुपदेशन करणं आवश्यक आहे. त्यांना श्रमविभाजन आणि श्रमप्रतिष्ठा शिकवणं, नकार पचवायला शिकवणं, त्यांच्यात त्याग-सेवा-करुणा-सहनशीलता इत्यादी गुण बाणवणं ही कामंही आता स्त्रियांनी करणं क्रमप्राप्त आहे. मग नवरात्रीच्या नव्या कथा नि कालांतरानं मिथकं तयार होतील. स्त्री-पुरुष समानतेची स्तोत्रं रचली जातील. जशी :
तुझ्या नि माझ्या हृदयामधुनी
आर्त वाहत एकच स्पंदन
स्थळकालाच्या पल्याड आहे
ब्रह्म जसे की एक सचेतन...

तो खरा नवरात्रीचा पुण्यदायी जागर ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com