esakal | मायाबाजार (नीलिमा मांडेकर)
sakal

बोलून बातमी शोधा

nilima mandekar

मेधा एक कनिष्ठ मध्यमवर्गीय गृहिणी. तिचा पती किसन हा एक गाडी ड्रायव्हर होता. सोबत व्यसनीही. त्याला कामाच्या मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून घरगाडा चालवणं अवघड पडत होतं.

मायाबाजार (नीलिमा मांडेकर)

sakal_logo
By
नीलिमा मांडेकर nilimamandekar84@gmail.com

मेधा एक कनिष्ठ मध्यमवर्गीय गृहिणी. तिचा पती किसन हा एक गाडी ड्रायव्हर होता. सोबत व्यसनीही. त्याला कामाच्या मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून घरगाडा चालवणं अवघड पडत होतं. मुलांचं शिक्षण, आईचं आजारपण आणि इतर खर्च त्यामुळे ती मशीन काम करून जमेल तेवढा हातभार लावत होती; पण संसार फाटक्‍या कापड्यासारखाच होता. एकीकडून ठिगळ दिलं, की दुसऱ्या बाजूला फाटलेलाच अशी संसाराची परिस्थिती होती. अर्णव आणि मनू ही दोन फुलं त्यांच्या संसारवेलीवर लागली होती, हेच खूप मोठं सुख होत त्यांचं. परंतु मुलांसोबत त्यांचा नवनव्या आणि अपरिहार्य गरजा पूर्ण करणं मात्र दिवसेंदिवस अशक्‍य होतं होतं. दिलाशाचे आणि समजुतीचे काही शब्द मेधा अधूनमधून उच्चारायची. वातावरण निवळायला तेवढीच मदत झाली तर झाली.

'अर्णव, जरा कुकरच्या शिट्टीला हात लाव रे..'' माजघरातून आईनं ओरडून सांगितलं.
'काय ग आई, किती दिवस झाले? आता तरी कुकर बदल ना.. डबडा झालाय तो. हात लावल्याशिवाय शिट्टी वाजत नाही त्याची. मग कुकर होईपर्यंत इकडेच थांबावं लागत. अजून किती दिवस असाच चालणार?'' असं म्हणत अर्णव पाय आपटतआपटतच स्वयंपाकघरात गेला.
'हो रे, बदलू या महिन्यात,'' आई शर्टला बटन लावता लावताच क्षीण स्वरात म्हणाली.
'हो ना.. हे मी गेल्या पाच महिन्यापासून ऐकतोय. जसं तुला या महिन्यात बॅट आणू, त्या महिन्यात आणू असं ऐकवत असतेस ना तसंच.'' अर्णव संतापून बोलला अन्‌ टीव्हीसमोर येऊन बसला.
"हो, तीही घेणार आहे बरं.. अभ्यास कर आता. परीक्षा जवळ आलीय.'' आईचं समजुतीचं उत्तर.
'आई, दादाला बॅट अन्‌ मला काहीच नाही का? मला रिटासारखीच स्कूल बॅग हवी आहे. कधी घेणार?'' छोटी मनू लटका राग गालावर आणत लगेच बोलली.
'हो ग बाई. तुलाही घेईन हं रिटासारखी बॅग.'' तिच्या लटक्‍या रागाकडे कौतुकानं पाहून ती म्हणाली.
मेधा एक कनिष्ठ मध्यमवर्गीय गृहिणी. तिचा पती किसन हा एक गाडी ड्रायव्हर होता. सोबत व्यसनीही. त्याला कामाच्या मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून घरगाडा चालवणं अवघड पडत होतं. मुलांचं शिक्षण, आईचं आजारपण आणि इतर खर्च त्यामुळे ती मशीन काम करून जमेल तेवढा हातभार लावत होती; पण संसार फाटक्‍या कापड्यासारखाच होता. एकीकडून ठिगळ दिलं, की दुसऱ्या बाजूला फाटलेलाच अशी संसाराची परिस्थिती होती. अर्णव आणि मनू ही दोन फुलं त्यांच्या संसारवेलीवर लागली होती, हेच खूप मोठं सुख होत त्यांचं. परंतु मुलांसोबत त्यांचा नवनव्या आणि अपरिहार्य गरजा पूर्ण करणं मात्र दिवसेंदिवस अशक्‍य होतं होतं. दिलाशाचे आणि समजुतीचे काही शब्द मेधा अधूनमधून उच्चारायची. वातावरण निवळायला तेवढीच मदत झाली तर झाली.

मेधा शिवत होती, तो शर्ट शिवून झाला. धागा दातानं तोडून ती शर्ट ठेवण्यासाठी उठली. तेवढ्यात वाऱ्याच्या एका झुळकेबरोबर खिडकीला लावलेला पडदा तिच्या तोंडावर आला. ती पुन्हा विचारात गुंगली. अर्णवच्या जन्मावेळेला हे पडदे लावले होते. पुरती दहा वर्षं झाली आता. केव्हा बसतील नवे पडदे त्याची काहीच कल्पना नव्हती. माणूस कितीही म्हणाला, की पैशांपेक्षा मनाची श्रीमंती महान; तरीहीण माणसाच्या मनातल्या आशा, इच्छा, आकांक्षा या पैशाच्याच प्रतीक्षेत असतात हेही तितकंच खरं. मग आभावातली हतबलता माणसाला दुःखी बनवते.
दहा वाजत आले होते. आज बाजारात जाऊन शिलाईसाठी लागणारं सामान खरेदी करायचं होतं. मेधान पटकन्‌ आवरलं. बॅग घेतली अन्‌ ती मुलांना सूचना देऊन बाहेर पडली. घराच्या बाजूला वळल्यावर लीना भेटली. 'अगं मेधा, तुलाच भेटायचं होत. हे बघ कालच साड्या विकण्यासाठी आणल्या आहेत. तुला एक घे. खूप छान आहे. एवढ्या कमी किंमतीला मिळणार नाही. बघ तुला म्हणून मी सातशे रुपयांना देते,'' ती मऊ स्वरात म्हणाली.

'मस्तच आहे गं; पण आता घेणं मला जमणार नाही .पुढच्या आठवड्यात सांगते तुला,'' कसला तरी हिशेब केल्यासारखं करून मेधा म्हणाली. स्पष्टपणे सांगणं काही वेळा बरंही असतं.
'निघते मी. खूप कामं आहेत,'' असं सांगत लीनाला टाळून कशीबशी मेधा घाईनं निघाली.
दुकानदाराकडे जाऊन लिस्टप्रमाणं तिनं समान खरेदी केलं. दुकानदाराला पैसे दिले. फोनवर बोलताबोलता त्यानं उरलेले पैसे परत दिले. मेधा ते पैसे घेऊन बाजूला झाली आणि बाहेर येऊन हिशेबाप्रमाणे पैसे आले की नाही हे मोजू लागली.
एकदा, दोनदा, तीनदा पैसे मोजले. फोनवर बोलण्याच्या नादात दुकानदारानं पाचशे रुपयांची नोट जास्त दिली होती. तिनं मागं पाहिलं. दुकानदार अजूनही फोनवर बोलत होता. त्याच्या काही लक्षातही आलं नव्हतं.
मेधानं ती नोट अशीच हातात घट्ट पकडली आणि चालू लागली. बाजाराचा दिवस होता. विक्रेते आपापल्या मालाची जाहिरात करत होते. सगळीकडे गलका होता. मेधाची नजर बाजारातल्या वस्तूंकडे तरंगत होती.
मिनूला हवी असणारी बॅग काचेतून तिला दिसली. खेळण्याच्या दुकानात खरेदी करण्यासाठी आलेला मुलांचा घोळका तिचं लक्ष हेरून घेत होता. ती झपाझप पावले टाकत निघाली. रंगीबेरंगी साड्या, कपडे असणारं दुकान मनाला भुरळ पाडत होतं. कुकरची शिट्टीही तिच्या डोक्‍यात वाजली. हातातले पाचशे रुपये एकएक गरज भागवून आनंदित करणार होते. बाजारातल्या आणखीन वस्तू तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागल्या. सगळ्या बाजाराकडे पाहत पाहत तिनं एक वेढा पूर्ण केला होता आणि ती त्याच दुकानासमोर पुन्हा आली. हातातल्या नोटेकडे एकदा पाहिलं.
आणि ती तडक दुकानदाराकडे पुन्हा गेली. 'आपण मघाशी मला पाचशे रुपये जास्त दिले. हे तुमचे पैसे...'' असं म्हणून तिनं ते टेबलावर ठेवले. दुकानदारानं आभार मानलं. प्रामाणिकपणा जगात शिल्लक आहे याचं कौतुक केलं. एक पाचशे रुपयांची नोट काय काय करू शकणार होती हे त्याच्या गावीही नव्हतं. त्याचे ते शब्द ऐकून मेधानं स्मितहास्य केलं आणि तिथून निघाली.

गरज माणसाला लाचार बनवते; पण लाचारी आयुष्य बिघडवते. प्रमाणिकांच्या डोळ्यातली विशुद्धी समोरच्यास नमवण्यास पुरेशी ठरते. मान ताठ ठेवून जगण्याचं सामर्थ्य देते.
मेधानं बाजाराकडे पाहिलं. मोहमायेनं झाकोळलेला बाजार शांत झाला होता. तिनं दीर्घ निःश्वास टाकला आणि घराकडे निघाली.

loading image