कल्हईवाले काका (निरुपमा भालेराव)

nirupama bhalerao
nirupama bhalerao

बच्चेकंपनीचं हे असं सगळं सुरू असतानाच काका ढेकर देत तिथं हजर व्हायचे. काकांना बघताच, जसं काही झालंच नाही, अशा आविर्भावात मुलं गुपचूप बसायची.
मात्र, मुलांनी उचापती केल्या आहेत हे काकांना एका नजरेतच कळायचं. मग पुन्हा एक दीर्घ ढेकर देत काका मुलांवर ओरडायचे : ‘‘हे काय करून ठेवलंय?’’

आठवणीच्या हिंदोळ्यावर मन जेव्हा जेव्हा झुलत असतं तेव्हा तेव्हा ‘बालपणीचा काळ सुखाचा’ म्हणत हा हिंदोळा अधिकच उंच झेपावतो...
आम्ही तेव्हा कॉलनीत राहायचो. आमच्या दारात विलायती चिंचेचं भलंमोठं झाड होतं. दिवसभर झाडाखाली भरपूर सावली असायची. त्यामुळे बरेच खेळ या झाडाखालीच खेळले जायचे.
गोट्या, विटी-दांडू, लगोरी, लंगडी, लपाछपी, कॅरम, पत्ते, ‘चांदोबा’चं सामूहिक वाचन, गाण्याच्या भेंड्या, तळ्यात-मळ्यात, चित्रकला, कलाकुसर...असं बरंच काही. याशिवाय काही गहन विषयांच्या चर्चाही याच झाडाखाली झडत. हे झाड म्हणजे आमच्या बालपणीचा सर्वात मोठा साक्षीदार आणि आमचा साथीदार. या झाडाच्या थोडं पुढं काही अंतरावर कडूलिंबाचंही झाड होतं. हे झाड अतिशय देखणं, डेरेदार होतं.
कधी कधी आम्हा मुला-मुलींचे मतभेद किंवा भांडणं झालीच तर विरुद्ध पार्टीला या शेजारच्या कडूलिंबाच्या झाडाचाच आधार असायचा. समोरासमोरच आमची ‘खुन्नसबाजी’ चालायची! अगदी या दोन झाडांसारखीच...विरुद्ध...गोड आणि कडू!
बालपणीच्या या आठवणींत हे झाड जसं समाविष्ट आहे त्याचप्रमाणे काही विशिष्ट व्यक्तिमत्त्वंही समाविष्ट आहेत. त्यातलंच एक ठळक आणि सगळ्या मुलांच्या उत्सुकतेचं व्यक्तिमत्त्व म्हणजे कल्हईवाले काका! आम्ही चंचल मुला-मुलींना एकाच जागी दिवसभर खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य या व्यक्तिमत्त्वात होतं!

आमच्या लहानपणी जवळपास सर्वच घरांत तांब्या-पितळेची भांडी वापरली जायची. पितळेचे डबे, कढया, पातेली, परात, झारा, जेवणाची ताटं-वाट्या, पेले-तांबे, हांडे-कळश्या, चरवी, इतकंच नव्हे तर पोहे खाण्याचे चमचेही पितळेचेच असत. आजच्यासारखी स्टिलची, प्लॅस्टिकची, काचेची आणि नॉनस्टिकची भांडी तेव्हा कुणीही वापरत नसे. पितळेची भांडी अगदी पिढ्यान्‌पिढ्या चालायची. त्यांचे ते सुबक, देखणे आकार...त्यांवरचं नक्षीकाम...सगळ कसं अगदी शाही वाटायचं. त्या भांड्यांची श्रीमंती आता कुठल्याही भांड्यांना येऊ शकत नाही.
आमच्या कॉलनीत दर दोन-तीन आठवड्यांनी सकाळी दहा ते साडेअकराच्या दरम्यान या कल्हईवाल्या काकांचं आगमन होई!
या काकांकडे एक सायकल असायची. हॅंडलच्या दोन्ही बाजूंना दोन मोठ्या, मळक्या पिशव्या अडकवलेल्या असायच्या. मागं कॅरिअरला मोठ्या गोणीसारखं बाचकं घट्ट बांधलेलं असायचं. धोतर आणि पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरी स्वच्छ गांधीटोपी असा त्यांचा वेश असे. काका तब्येतीनं हडकुळे होते. चेहरा लांबट, गाल बसलेले, नाक तरतरीत, आणि डोळे बटबटीत म्हणता येतील एवढे मोठे आणि लालसर. बुबुळं बाहेर आल्यासारखे. एकूण, काकांच्या चेहऱ्यावर रागीट छटा दिसायची. ते खूप कमी बोलायचे.
ते आमच्या इथं येताच सायकलवरून एक पाय जमिनीवर टेकवून
‘कल्हईऽऽ’ अशी हाळी खणखणीतपणे द्यायचे व मग सायकलवरून उतरून सायकल चिंचेच्या झाडाला टेकवून उभी करायचे. एका ऐसपैस ठिकाणी बसून कल्हईची सगळी सामग्री बाहेर काढू लागायचे आणि पुन्हा एकदा जोरात ‘कल्हई...हाये का भांडीऽऽ?’ अशी हाळी द्यायचे.
कल्हईवाल्या काकांची ही हाळी गृहिणींच्या कानावर पडायची की नाही माहीत नाही; पण सगळ्या बालगोपाळांना मात्र ती जरूर ऐकू जायची! दुपारच्या शाळेची मुलं शाळेची तयारी सोडून धावत-पळत
काकांपुढं येऊन उभी राहायची.

काका बाचकं सोडून एकेक वस्तू बाहेर काढत मुलांना म्हणायचे : ‘‘जा रे, आईला विचार भांडी आहेत का...घेऊन या भांडी, जा...’’ आणि पडत्या फळाची आज्ञा पाळावी तशी मुलं धावतच घरात जाऊन काकांच्या आगमनाची बातमी आईला द्यायची. बायका हातातली कामं सोडून कल्हईसाठी भांडी काढायच्या व स्वत: काकांना नेऊन द्यायच्या. साधारणतः आठ-दहा घरची भांडी जमा होताच काका प्रत्येकीच्या भांड्यांची वेगवेगळी यादी तयार करून ठेवत. बायकांबरोबर सगळी बोलणी करतच काका जमिनीत एक खळगा करून त्यात त्यांचं कल्हईसाठीचं यंत्र बसवत. रॉकेलमध्ये भिजवलेला कापूस त्या खळग्यात टाकून त्यावर कोळसे रचून ते पेटवत. यंत्र फिरवताच कोळसे पेटत. हे पेटते कोळसे जसजसे लालबुंद होत तसतशी आम्ही मुलं एका अनोख्या आनंदानं भारावून जायचो! हे सगळं होता होता बारा वाजत आलेले असायचे. मग दुपारच्या शाळेला जाणाऱ्या मुलांच्या पोटात अचानक दुखायला लागायचं, कुणाचं डोकं दुखायचं, तर कुणाला गरगरायला व्हायचं! असलं खोटं दुखणं सांगून मुलं त्या दिवशी शाळेला दांडी मारायची. कारण, कल्हईवाले काका म्हणजे आमच्यासाठी जादूगारच असायचे.

गरम भांड्यातून धूर निघाला की त्या धुरातून भांडं चांदीसारखे लखलखू लागायचं...भांड्यांचा रंग बदलायची ही किमया काकांकडं होती.
शाळेतून घरी येणाऱ्या मुलांनाही कल्हईवाल्या काकांच्या आगमनाची खबर मिळताच दप्तर घरात भिरकावून देत मुलं या काकांच्या आजूबाजूला गोलाकार बसायची. काही उभी राहायची.
तहान-भूक सगळं काही विसरून काका काय काय कसं कसं करतात, कल्हईसाठी काय काय वापरतात याकडेच टक लावून बघत बसायची. काकांचं काम आता जोरात सुरू असायचं. काका कल्हईच्या यंत्राचं चाक फिरवत पेटलेल्या कोळशांवर भांडं चांगलं गरम करायचे. नंतर चिमट्यानं ते भांडं बाजूला घेऊन त्यात मिठासारखी दिसणारी पावडर शिंपडल्यासारखी टाकायचे. मग खूप धूर व्हायचा व त्या धुरातच ते चमचमणारी चपटी कांडी त्या भांड्यात गिरवायचे आणि लागलीच काळपट, जळक्या, धागेदार कापसानं पूर्ण भांडं पुसून घ्यायचे.

तो मिठासारखा पदार्थ जमिनीवर टाकून ते भांडं घंघाळ्यातल्या पाण्यात बुडवून बाहेर बाजूला काढून ठेवायचे. ते भांडं आतून चांदीसारखं चकचकीत झालेलं असायचं. आम्ही लहान मुलं हे सगळं विस्फारल्या डोळ्यांनी पाहायचो आणि सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न निर्माण व्हायचे.
मग मुला-मुलींपैकी कुणीतरी मध्येच मोठ्या धीरानं काकांना विचारायचं : ‘‘काका, ते मीठ धूर कसं सोडत हो?’’
काका हातातलं काम करतच म्हणायचे : ‘‘ते मीठ न्हाई. नवसागर हाये.’’
मग दुसरा एखादा विचारायचा : ‘‘काका, नवसागर कुठल्या दुकानात मिळतो?’’
लगेच तिसरा प्रश्न यायचा : ‘‘काका ती चमकती कांडी कुठून आणली? खूप महाग असते का?’’
प्रश्न सुरूच राहायचे. कुणीतरी आणखी विचारायचं : ‘‘काका, ते फिरवायचं मशिन कुठं मिळतं?’’
प्रश्नांचा असा भडिमार काकांना सहन होत नसे. मग आपले बटबटीत डोळे वटारून काका मुलांवर खेकसायचे आणि म्हणायचे : ‘‘काय? शाळा सोडून हे करायचंय हाये का? जा, घरी जाऊन अभ्यास करा.’’
त्यावरही मुला-मुलींची उत्तरं तयारच असायची. एखादा मुलगा सांगायचा : ‘‘काका, आमचा अभ्यास झालेला आहे.’’
मग काका विचारायचे :‘‘पाढे येतात का? चल, साताचा पाढा म्हण...’’ तो बिलंदर मुलगा तेवढ्याच धीटपणे काकांना उत्तर द्यायचा : ‘‘मध्ये मध्ये चुकतो माझा सातचा आणि तेराचा पाढा! काका, या तान्याचे सगळे पाढे पाठ आहेत. त्याला सांगा म्हणायला.’’ पाढ्यांचा विषय येताच बाकीची मुलं तोंड पाडून गप्प बसायची.
तरीही एक-दोन मुलं दम खात पाढे म्हणून दाखवत.
काका किती शिकलेत याची कुणालाही कल्पना नसली तरी कुठलाही पाढा चुकला की काका चूक दाखवून द्यायचे.
त्या काळी का कुणास ठाऊक; पण मुलांची हुशारी पाढ्यांवरून ठरवली जायची. हे सगळं सुरू असताना काकांची जेवणाची वेळ झालेली असायची. कल्हई झालेली भांडी काका समोरच्या घरात द्यायला जात आणि तिथंच जेवायला बसत. मग काय, याच संधीची आम्ही मुलं वाट बघत असायचो.

एकामागून एक मुलं ते चाक गरागरा फिरवायचे...कुणी पेटत्या कोळशावर नवसागर टाकून धूर करायचं...कल्हईसाठीची ती चमकदार कांडी काकांनी कुठं ठेवली आहे हे कुणीतरी शोधायचं...तर कुणी भांडं त्या कोळशांवर गरम करायला ठेवायचं...कुणी नवसागर कागदाच्या पुडीत जमा करून ठेवायचं, तर कुणी मातीत पडलेले जस्ताचे कण वेचून मुठीत लपवायचं. बच्चेकंपनीचं हे असं सगळं सुरू असतानाच काका ढेकर देत तिथं हजर व्हायचे. काकांना बघताच, जसं काही झालंच नाही, अशा आविर्भावात मुलं गुपचूप बसायची.
मात्र, मुलांनी उचापती केल्या आहेत हे काकांना एका नजरेतच कळायचं. मग पुन्हा एक दीर्घ ढेकर देत काका मुलांवर ओरडायचे : ‘‘हे काय करून ठेवलंय?’’
मग एखादा हुशार मुलगा सांगायचा : ‘‘कोळसे विझायला आले होते म्हणून आम्ही ते यंत्र फिरवून कोळसे विझू दिले नाहीत!’’
काका काही न म्हणता शांतपणे पुन्हा कोळसे टाकून आपलं काम पुढं सुरू करायचे.
काका चिडलेत की काय असं वाटून मुलंही शांत बसायची.
मुलं अशी शांत झालेली बघून मग काकाच मुलांबरोबर बोलायला लागायचे.
‘‘काय रं, तू कितवीला? तुला मोठ्ठं होऊन काय व्हायाचं?’’ असले प्रश्न विचारून काका मुलांना बोलतं करायचे. मुलंही खुलायची.
नान्याला मोठेपणी कल्हईवाला व्हायचं असायचं, तान्याला पोलिस व्हायचं असायचं...संत्याला मोठेपणी पोपट पाळायची इच्छा असायची...राधाला चित्रकार, तर कांचनला दुकानदार व्हायचं असायचं...
काका हे सगळं ऐकून घ्यायचे आणि गप्प गप्प असणाऱ्या मिनीला विचारायचे. ‘‘पोरी, तुला काय व्हायाचं गं मोठेपनी?’’
मिनी म्हणायची: ‘‘मला मोठ्ठं होऊन बाई व्हायचंय!’’
या उत्तरावर सगळी मुलं तर हसायचीच; पण काकाही हसू आवरायचं नाही. ते म्हणायचे : ‘‘बाईच हाये ना गं तू...!’’
या मुलांसोबत गप्पा मारायला काकांनाही खूप आवडायचं.
मुलांचा आणि या कल्हईवाल्या काकांचा असा एक सुंदर भावबंध होता.
ही मुलं आपल्या निरागस स्वप्नांचा दरबार या काकांसमोर बिनदिक्कतपणे भरवायची. बच्चेकंपनीच्या सोबतीत काकांचं काम कधी संपायचं ते काकांनाही कळायचं नाही. काम संपलं की काका सामग्रीची आवराआवर करत. पेटलेल्या कोळशांवर पाणी टाकत.
ते यंत्र, चिमटे आणि इतर सगळी छोटी-मोठी उपकरणं पिशवीत ठेवत. विझलेले ओले शिल्लक कोळसे एका फडक्यात बांधून घेत आणि सर्व पिशव्या सायकलच्या दोन्ही हॅंडलला अडकवत.
काकांच्या चेहऱ्यावर आता रागीटपणा नसायचा. ते आपल्या बटबटीत डोळ्यांनी मुलांकडे प्रेमानं बघत म्हणायचे :‘‘जावा आता घरी... चांगला अभ्यास करा...आईला मदत करा.’’
कल्हईवाले काका निघणार म्हणून आम्हा
मुलांचंही मन नकळतपणे जड व्हायचं.
काका सायकलवर टांग टाकणार तोच एखादा मुलगा धावत-पळत यायचा आणि सांगायचा : ‘‘काका, आईनं सांगितलंय की
गौरी-गणपती पंधरा दिवसांवर आलेत...पुढच्या आठवड्यात पूजेची भांडी कल्हई करून पाहिजेत.’’
या एका वाक्यानं मुलांना कळायचं की पुढच्या आठवड्यात कल्हईवाले काका पुन्हा येणार आहेत!
त्याच आनंदात मुलं घरी परतायची...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com