तेलकट पावसाच्या निमित्तानं... (अ. पां. देशपांडे)

a p deshpande
a p deshpande

डोंबिवलीत गेल्या आठवड्यात तेलकट पाऊस पडला. निसर्गातले असे अनेक ‘चमत्कार’ हे खरं तर मानवनिर्मितच असतात. त्यांमागचं खरं कारण शोधण्याची वृत्ती मात्र हवी.

आठवड्याभरापूर्वी डोंबिवलीत तेलकट पाऊस पडला आणि सगळीकडं तो एक चर्चेचा विषय झाला. या पावसाला कुणी ‘दैवी प्रकोप’ वगैरे म्हटलं नाही ही समाधानाची बाब.
डोंबिवलीत छोटे छोटे बरेच रासायनिक कारखाने आहेत. ‘न परवडण्याच्या’ नावाखाली आपल्या कारखान्यातली नको असलेली रसायनं अशा कारखान्यांचे काही मालक धुराड्यातून हवेत सोडतात. या रसायनात तेलाचा अंशही बराच असतो. खरं म्हणजे ही धुराडी ३०-३० मीटर उंच असायला हवीत आणि धुराड्याच्या वरच्या टोकाला ती जाळून टाकायला हवीत, म्हणजे वायू हवेत पसरून आजूबाजूच्या वस्तीला त्याचा उपद्रव होणार नाही. मात्र ‘न परवडण्याच्या’ नावाखाली ते वायू जाळून टाकणं तर दूरच; पण धुराड्याची उंचीही फारशी न ठेवल्यानं तो धूर हवेत व गावात पसरतो. ३० मीटर उंचीची धुराडी ठेवली व वायू तिथं जाळून टाकला तर जाळल्यानंतर उरलेला वायूही वरच्या वर जातो व जमिनीकडं येत नाही. ज्या पद्धतीनं वर्षाचे १२ महिने समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ती वर वर जात असते आणि ती वातावरणात साठून तिचे हळूहळू पावसाळी ढग बनतात, त्याच धर्तीवर त्या वाफेबरोबर जर तेलाचा अंशही हवेत जात असेल तर तयार होणाऱ्या ढगांत तेलाचा अंश जमा होतो व तो स्थानिक जागेवर जमा होऊन तिथं पडणाऱ्या पावसात तो अंश उतरतो. ‘तेलाचा पाऊस’ म्हणजे पाण्याऐवजी पूर्ण तेल पडत नाही तर ते पाणी तेलकट, बुळबुळीत असतं. काही वेळा धुरात असलेलं आम्ल जमा होऊन पडणाऱ्या पावसाचं पाणी आंबटसर लागतं. त्याला ‘आम्लवर्षा’ असं म्हणतात. पावसाला सुरवात झाली की पहिले दोन दिवस पावसाचं अशा प्रकारचं पाणी, जिथं आजूबाजूला कारखाने आहेत, तिथं अपेक्षित असतं.

‘करावं तसं भरावं’ अशी मराठीत एक म्हण आहे. माणूस हवेत जे पाठवेल ते माणसाला पावसामार्फत परत मिळतं! दोन महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. समुद्रात माणसानं पूर्वी टाकलेला कचरा समुद्राच्या लाटांबरोबर काठावर येऊन पडल्याच्या बातम्या आणि छायाचित्रं सगळ्यांनीच पाहिली असतील. माणसानं समुद्रात कचरा टाकला, तो समुद्रानं न बोलता माणसाला परत आणून दिला! जसं कचऱ्याचं तसंच या तेलकट पावसाचंही. निसर्ग मानवाच्या आगळिकीला क्षमा करत नाही. तोही ‘जशास तसं’ वागतो.

मुंबईच्या एका इंग्लिश साप्ताहिकात
सन १९८० च्या सुमारास एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्या वेळी मुंबईत ५० हून अधिक कापडगिरण्या होत्या. मुंबईभरच्या धुराड्यातून बाहेर पडणारा धूर हा पवईच्या त्या वेळी अस्तित्वात असलेल्या टेकड्यांवर नऊ महिने जमा होई व पावसाळ्यात ते थर पाण्याबरोबर वाहून जाऊन जवळच्या पवई तलावातल्या पाण्यात जात. ते थर पाण्यात वाढणाऱ्या माशांच्या पोटात जाऊन तिथल्या माशांना ‘फायब्रोसिस’ झाला होता. त्या थरांतून माशांच्या पोटात पाऱ्याचा अंश गेला होता. फायब्रोसिस होण्याचं ते कारण होतं. हा पाऱ्याचा अंश मुंबईभरच्या धुराड्यांतून जमा झालेल्या पवई टेकडीवरच्या थरातून जमा झाला होता. ‘मासे वातड लागतात’ अशी तक्रार पवईच्या आयआयटीमधल्या बंगाली लोकांनी केल्यानंतर नेमल्या गेलेल्या चौकशीत हे सत्य बाहेर पडलं होतं

अशीच आणखी एक गोष्ट घडली होती. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सृष्टिज्ञान’ या मासिकात पुणे विद्यापीठातले भौतिकी शास्त्राचे निवृत्त विभागप्रमुख प्रा. मो. वा. चिपळोणकर यांनी सन १९७८ मध्ये एक लेख लिहिला होता. ते एकदा काही कामासाठी कोलकाता इथं गेले असता परतीला विमानानं येण्यासाठी डमडम विमानतळावर थांबले होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष आकाशाकडं गेलं आणि त्यांना एक ढग आकाशातून खाली येऊन त्यानं हत्तीच्या सोंडेचा आकार घेतला असून तो दूरवर जमिनीपर्यंत आला आहे असं दिसलं. त्यांनी आपल्या खिशातून डायरी काढून तीत, त्या ढगाचा झालेला सोंडेचा आकार पेन्सिलनं चित्रित करून ठेवला. नंतर त्यांना दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात वाचायला मिळालं, की त्या ढगाची सोंड कोलकात्यापासून १५० किलोमीटर दूरच्या शकुरबस्ती गावाच्या जवळील समुद्राच्या पाण्यात बुडाली आणि त्या ढगात निर्माण झालेल्या पोकळीनं समुद्राचं हजारो लिटर पाणी सोंडेद्वारे ढगात ओढून घेतलं. पाणी ओढून घेतल्यावर ढगाची सोंड आखडली गेली. ढग जमिनीपासून वर उचलला गेला व हवेच्या वेगानं दुसरीकडं वाहून गेला आणि दुसरीकडं तो बरसला तेव्हा त्या पाण्याबरोबर हजारो मासेही खाली पडले! पाऊस जिथं पडला तिथले बंगाली लोक खूप खूश झाले.
‘परमेश्वराची लीला अगाध आहे...त्यानं नुसतंच पाणी दिलं नाही तर त्याबरोबर ‘बडोबडो मोछलीही’ दिली,’ असं त्यांना वाटलं! निसर्गाचे असे अनेक ‘चमत्कार’ वारंवार होत असतात. फक्त त्याची आपण तारीखवार नोंद ठेवायला हवी. आपण भारतीय या कामी कमी पडतो. उलट, परदेशी लोक याबाबतीत अगदी काटेकोर असतात.

जून २००५ मध्ये मी कॅनडाच्या अल्बर्टा राज्यातल्या लेथब्रिज गावी गेलो होतो. तिथं ता. २२ जूनच्या संध्याकाळी गारांचा पाऊस झाला. ता. २३ जूनच्या ‘लेथब्रिज हेरॉल्ड’ या वृत्तपत्रात त्याविषयीची बातमी दोन छायाचित्रांसह प्रसिद्ध झाली होती. गार केवढी मोठी आहे हे दाखवण्यासाठी ती एका व्यक्तीच्या तळहातावर ठेवून त्या व्यक्तीचा संपूर्ण तळहात त्या गारेनं व्यापला आहे हे दर्शवणारं एक छायाचित्र होतं, तर ती गार फूटपट्टीवर धरून तिचा व्यास ३ सेंटिमीटर असल्याचं
दुसऱ्या छायाचित्रद्वारे दर्शवण्यात आलं होतं. आपल्यापैकी कुणी गारेची अशी मोजमापं घेतली आहेत का? आपण दरवेळी गारांचं वर्णन करताना ‘गारा लिंबाएवढ्या मोठ्या होत्या...मोसंबीएवढ्या मोठ्या होत्या’ असं वर्णन वृत्तपत्रांतून वाचतो. मात्र, बाजारात मिळणाऱ्या लिंबाचा आकार, मोसंबीचा आकार एकसारखा असतो का? बरं,
लिंबू असलं तरी ते कागदी लिंबू की ईडलिंबू? आपलं सगळं जीवनच मुळी मोघमपणावर अवलंबून असतं!

डोंबिवलीत पडलेला पाऊस कोणत्या दिवशी पडला, किती वाजता पडला, कोणकोणत्या भागात पडला, पावसाची ती बुरबुर होती की तो मुसळधार होता? तो जिथं पडला त्या भागात सल्फर डायाक्सॉईड किंवा कोणत्या वायूचा प्रादुर्भाव होता का? कुणी पावसाचा एखादा नमुना घेऊन प्रयोगशाळेत त्याचं विश्लेषण करून घेतलं आहे का? पाण्यात तेलाचा किती अंश आहे, ते तेल कोणतं आहे, हानिकारक आहे का? तेलाला काही रंग आहे का, वास आहे का अशा गोष्टींची शहानिशा करायला हवी.

मुंबई हवामानखात्याच्या अधिकाऱ्यांशी मी याविषयी बोललो असता ते म्हणाले : ‘‘सध्या सोशल मीडियातून अशा अफवा अनेक वेळा पसरवल्या जातात.’’
दुसरं उदाहरण : ‘आरे कॉलनीत बर्फ पडतो आहे, काय कारण असेल?’ अशी विचारणा करणारा फोन एकानं केला असता तिथले अधिकारी त्या फोन करणाऱ्या म्हणाले : ‘मला फोटो पाठव, मग मी शहानिशा करतो.’ असो.
डोंबिवलीच्या संदर्भात दोन वृत्तपत्रांत बातमी प्रसिद्ध झाली व काही प्राथमिक काम झालं याचा मला आनंद झाला.
सन १९८० च्या आसपासची गोष्ट. चेंबूरच्या ट्रॉम्बे भागात - जिथं भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपन्यांचे तेलशुद्धीकरण कारखाने आहेत - त्या भागात राहणाऱ्या काही लोकांनी वृत्तपत्रांकडं तक्रार केली, की त्यांच्या घरांच्या आवारात असलेल्या विहिरीतल्या पाण्यावर तेलाचा तवंग येत आहे, तेव्हा या तेलशुद्धीकरण कारखान्यांनी काहीतरी करावं...

मुळात या कारखान्यांच्या इतक्या जवळ घरं कशी बांधली गेली? कितीही काळजी घेतली तरी कारखान्यातल्या पंपांतून, टाक्यांतून वा अन्य उपकरणांतून तेलाची गळती होतच राहते (कितीही लक्ष पुरवलं तरी आपल्या घरातलं दूध कसं उतू जातं त्याप्रमाणे इथंही होतं). त्यामुळे अशा तक्रारी करून त्यावर उपाय मिळत नाही. जिथं कारखाने आहेत, त्यांच्याजवळ घरं असू नयेत एवढा एकच उपाय त्यावर असतो.
डोंबिवलीतल्या तेलकट पावसाच्या निमित्तानं इतकंच सांगता येईल की
अशी प्रकारे घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा उपयोग जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com