मायमराठीच्या भल्यासाठी (प्रभाकर बागले)

prabhakar bagale
prabhakar bagale

मराठीच्या भल्यासाठी कार्यरत असणाऱ्या, महाराष्ट्रातल्या चोवीस संस्था काही दिवसांपूर्वी एकत्र आल्या ही एक मोठी सांस्कृतिक घटना आहे. या घटनेतली एक लक्षणीय गोष्ट अशी, की ग्रामीण भागातल्या शाळांचे प्रश्‍न आणि सीमावर्ती भागातल्या शाळांचे प्रश्‍न आणि अडचणी अधोरेखित केल्या गेल्या. बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा केला जाईल, मराठी भाषेच्या समृद्ध संचिताला अभिजाततेचा दर्जा मिळावा यासाठी अधिक प्रयत्न केले जातील, वाचनसंस्कृतीनं समाजमानसात मूळ धरावं यासाठीही प्रयत्न केले जातील असं आश्‍वासन मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. एका महिन्यात वटहुकूम निघेल, असं त्यांनी सांगितलं. चोवीस संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी, वाचनसंस्कृती गतिमान करणाऱ्यांनी मराठी भाषेविषयी जी पारदर्शी भावना एकत्र येऊन व्यक्त केली तिला मिळालेलं यश आहे असं वाटतं. मात्र, मराठी भाषेच्या विकासाचं काम खूप मोठं आहे. त्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. या अडचणींचा स्रोत लक्षात घ्यावा लागेल. हा स्रोत तसा परिचित वाटला, तरी वरील विषयाच्या संदर्भात तो उचित वाटावा.
वर्ष 1960 मध्ये मराठी भाषिक राज्याची स्थापना झाली. या घटनेला आता सहा दशकं होतात. त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. समृद्ध सांस्कृतिक आयाम असलेलं ते व्यक्तिमत्त्व होतं. त्यावेळीही मराठी भाषेविषयीचा प्रश्‍न होता. नंतर भाषाविषयक संस्था, समित्या अस्तित्वात आल्या. दर पाच वर्षांनंतर येणारं शासनाचं नवं शैक्षणिक धोरण, त्यात मराठी भाषेच्या भल्यासाठी घेतलेले निर्णय अशा स्तरावरही प्रयत्न झाले, तरी मराठी भाषेचा प्रश्‍न प्रश्‍नचिन्हासारखा उभाच असतो. असं का व्हावं? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी वर्ष 1960 नंतरचं समाजवास्तव खरडलं तर काही हाती लागतं का ते पाहिलं पाहिजे.

वर्ष 1960 नंतर अनेक शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं निघाली. विज्ञान-तंत्रज्ञानाचा विस्तार होत गेला. वैद्यकीय-अभियांत्रिकी-संगणकीय शाखांमध्ये पदव्या प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यांत आणि परदेशात मोठ्या नोकऱ्या मिळत गेल्या. त्यांच्या शिक्षणाचं माध्यम इंग्लिश होतं. त्यांच्या पालकांची स्वप्न साकार होऊ लागली. ही मंडळी उच्च मध्यमवर्गातली होती. इंग्लिश माध्यमामुळं आपण वेगळे आहोत ही भावना त्यांच्या मानसिकतेत आकार घेऊ लागली. त्या भावनेचं अभिसरण समाजाच्या अन्य स्तरांत होत गेलं आणि इंग्लिश भाषेनं त्या मानसिकतेचा कब्जा घेतला आणि मराठी समाज तीत अडकला. हे पाहून इंग्लिश माध्यमाच्या शाळांचं पेव फुटलं आणि संस्थाचालकांना शिक्षण प्रसाराच्या नावे व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आणि मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागली. व्यवसाय करणाऱ्याची भूक मोठी होत गेली. डीएड झालेल्या शिक्षकापासून ते प्राध्यापकांपर्यंत नोकरी मिळविण्यासाठी दामाजीपंताची मदत घ्यावी लागते. ग्रामीण भागातून येणाऱ्या उमेदवाराची आर्थिक स्थिती दयनीय असते. अनेक वर्षांपासून शेतीत फक्त नुकसानीचं पीक येत आहे. त्यामुळं शिक्षकाच्या पालकाला कर्ज काढावं लागतं वा जमिनीचा तुकडा विकावा लागतो आणि ती नोकरी मिळवावी लागते. ही घटना शिक्षकाच्या मनावर जखम करणारी असते. वर्गात प्रवेश करताना, अध्यापन करताना तिची सल त्याच्याबरोबर असते. अशा स्थितीत मनःपूर्वकतेनं शिकवणं शक्‍य होईल का? त्याच्या शब्दांत भावभरलेपण येईल का? "माय मराठी' या शब्दात असलेला आत्मीयभाव त्याला स्पर्श करेल का? त्यासाठी मन स्वतंत्र असावं लागतं. आणि त्यानं मात्र आपलं स्वातंत्र्य संस्थाचालकाकडे आणि तिथल्या व्यवस्थेकडे जमा केलेलं असतं. जेव्हा त्याला पाठ्यपुस्तकांतल्या स्वातंत्र्यावरचा धडा मराठी भाषेत शिकवायचा असतो, तेव्हा लक्षात येतं, की या भाषेला किती स्तरांवरची गुलामी वाहावी लागते आहे. या वास्तवाचा विचार एकंदर शैक्षणिक व्यवस्थेच्या संदर्भात व्हायला हवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी व्यवस्था निरोगी असण्याची गरज आहे, तरच मराठी भाषेचा विकास सर्जनाच्या, वैचारिकतेच्या, सांस्कृतिकतेच्या पातळ्यांवर होण्याची शक्‍यता असते; कारण या तीनही पातळ्यांवरील संस्कार माय मराठी वेचत असते आणि अर्थसंपन्न होत असते आणि हीच गोष्ट मराठीच्या भल्यासाठी आवश्‍यक असते. मात्र, वरील परिस्थितीत अध्यापन करणारा शिक्षक स्वातंत्र्य या शब्दाला असलेले सर्जनाचे, वैचारिकतेचे, सांस्कृतिक संवेदनेचे पदर वर्गात उलगडून सांगू शकेल का?

म्हणून मराठी भाषेचा, तिच्या विकासाचा प्रश्‍न समाजपर शैक्षणिक व्यवस्थेशी निगडित झाला पाहिजे असं वाटतं आणि तो कार्यरत असलेल्या 24 संस्थांच्या कक्षेतला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि शालेय आणि महाविद्यालयीन स्तरांवर मराठी विषयाची जी परवड होताना दिसते ती मात्र सर्वांनाच अस्वस्थ करणारी असते. अर्थात, याला काही संस्था अपवाद असतात.

शैक्षणिक व्यवस्था पोषक नसली, तरी आंदोलक एकजुटीनं उभे राहिले आणि बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा व्हावा यासाठी जो प्रयत्न तडीस नेला तसा सबंध शिक्षणाचं माध्यम मराठी व्हावं यासाठीही झाला पाहिजे. कारण मूलगामी सर्जन-संशोधन मातृभाषेतून गतिमान होत असतं. ते बीजासारखं सुप्तपणे मातृभाषेच्या ओटीपोटात असतं. ती फक्त विज्ञाननिष्ठ प्रज्ञा-प्रतिभेच्या स्पर्शाची वाट पाहत असते. त्या बीजाला तो स्पर्श झाला, की मात्र भाषेच्या नैसर्गिक प्रयोगशाळेत ते बीज जणू मूळ धरू लागतं. आपल्याकडे शास्त्रज्ञांची संख्या कमी असण्याचं एक कारण इंग्लिश भाषेचा आपल्यावरच्या प्रभावात आहे आणि उच्चशिक्षणाच्या इंग्लिश माध्यमात आहे असं वाटतं. जपानसारख्या काही देशांत मातृभाषा हेच शिक्षणाचं माध्यम असल्यामुळं संशोधन प्रक्रियेत ते देश आघाडीवर आहेत. आपल्याकडे मात्र मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा नसल्याचा न्यूनगंड आपल्या मानसिकतेचा भाग झालेला दिसतो. मातृभाषेत असणाऱ्या बहुविध क्षमतांचा तावून सुलाखून वापर केला गेला असता, तर मराठी भाषा ही उजळून निघाली असती. आपण विचार करतो मराठीतून, एखादी गोष्ट भावते ती तिच्याच मदतीनं, सर्जनाच्या-संशोधनाच्या प्रक्रियेचं खरं माध्यम तेच असतं- म्हणजे आत्माविष्काराचा स्रोतही त्याच माध्यमात असतो. या साऱ्या क्रिया-प्रक्रिया संयुक्तपणे मातृभाषेला ज्ञानभाषेचं परिमाण देत असतात. हेच मातृभाषेच्या क्षमतांचं साक्षात होणं असतं. शंभर-दीडशे वर्षं या क्षमतांपासून आपण दूर राहिलो. मराठी राज्य अस्तित्वात आल्यानंतर आपल्याला मोठी संधी होती. ती आपण गमावली की काय, असं वाटू लागलं आहे. असं वाटण्यात इंग्लिश भाषेविषयीचा आकस नाही. ती समर्थ अशी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिची सामर्थ्यस्थळं भिन्न आहेत. ती सक्षम आहेत. त्यांचा उपयोग होऊ शकतो. तिच्यातल्या अद्ययावत ज्ञानाशी आपल्याला जोडून घेता येऊ शकतं; पण जोडून घेणं आणि मातृभाषेतल्या क्षमतांमधून ज्ञानभाषा आकारित करणं या दोन गोष्टी भिन्न आहेत, हे या संदर्भात लक्षात घ्यावं लागेल.

कला, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान आदी विषयांवरचं मराठी भाषेतलं दर्जेदार, सर्जनात्मक आणि वैचारिक साहित्य उपलब्ध करून अधिकाधिक वाचकांपर्यंत कसं पोचेल याचा मात्र अधिक गांभीर्यानं विचार करण्याची आज गरज आहे. कारण मनाला विचलित करणाऱ्या अनंत गोष्टी भवतालात घडताना दिसतात. एक चॅनेल लावलं, की मन नव्याण्णव चॅनेल्समध्ये विभागलेलं असतं. अशा परिस्थितीत साहित्यकृतीच्या आशयातून निघणाऱ्या भावविश्‍वात ते मन कसं स्थिरावेल? ज्या शब्द माध्यमातून कथेचं कथापण अस्तित्वात आलं, कवितेचं कवितापण अस्तित्वात आलं त्या माध्यमाच्या सौंदर्यस्थळावर ते मन स्थिरावेल का?.. असे काही कळीचे प्रश्‍न आज आपल्याला भेडसावत आहेत.

ग्रामीण भागातले शिक्षणविषयक प्रश्‍न अधिक जटिल झालेले आहेत. शहरी शालेय-माध्यमिक शिक्षणाच्या तुलनेत तिथला अनुशेष फार मोठा आहे. तो आधी भरून काढला पाहिजे. ग्रामीण भागातल्या वाचकांची भूक मोठी आहे. त्यासाठी एक प्रयोग केला गेला होता. तो यशस्वी झाला; पण त्यात सातत्य राहिलं नाही. औरंगाबादमधल्या एका ग्रंथालयानं (जीवन विकास ग्रंथालय) मोबाईल लायब्ररी सुरू केली. सायकलीवर पुस्तकांचा गठ्ठा घेऊन जायचा, आठ दिवसांनी दुसरा न्यायचा, पहिला गठ्ठा परत आणायचा. वाचकांचा चांगला प्रतिसाद होता. असे लहान-मोठे प्रयोग ग्रामीण भागामध्ये केले गेले, तर वाचनसंस्कृती गतिमान होईल. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या चोवीस संस्थांमधील काही पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन असे काही प्रयोग करता येतील का, यावर विचार करायला हवा. कारण ग्रामीण भागातला अनुशेष भरून काढल्याशिवाय वाचनसंस्कृती ही संज्ञा अपूर्ण राहील.

प्रस्तुत लेखाच्या शेवटी मराठी विषय सक्तीच्या करण्याबाबतचे दोन शब्द. तत्त्वतः एखादा विषय सक्तीचा करून विद्यार्थ्यांवर लादणं बरोबर नाही; पण दोन कारणं अशी आहेत, की सक्ती या शब्दाकडे थोडं वेगळ्या कोनातून पाहायला लावतात. वर्ष 1970-80 च्या दशकापासून कला विभाग सोडून अन्य विभागांकडे विद्यार्थी वळू लागले. त्यांना रिझल्ट ओरिएंटेड विषयांबाबतचं आकर्षण स्वाभाविकपणे वाटू लागलं. वैद्यकीय-अभियांत्रिकी, सीबीएससी, आयसीएसई, आयटीआय ते आयआयटीकडं त्यांचा ओढा वाढतच गेला. या सर्व विभागातलं यश आर्थिक सुबत्ततेशी निगडित झालं. ही सुबत्ता हेच ध्येय होऊन बसलं. या ध्येयानं सामाजिकतेच्या संकल्पनेला व्यापून टाकलं. वरील विषयांच्या कोणत्याच स्तरावर मराठी साहित्य हा विषय नाही. कथा-कवितेचा संबंध नाही. त्याचं वाचन सांस्कृतिक संवेदनेशी निगडित असतं याचं भान नाही. घटकाभर का होईना; पण कालनिरपेक्ष क्षण निर्माण करण्याचं सामर्थ्य कृतीत असतं याची कोणी जाणीव करून दिलेली नाही. साहित्यकृतीच्या वाचनाअभावी मन कोरडं पडत जात असतं हे कोणी सांगतिलं नाही. म्हणून हा विषय सक्तीचा करणं अपरिहार्य झालं असावं.

वर्ष 1960 पासून आजपर्यंत मराठी विषयासाठी, मराठी माध्यमासाठी प्रयत्न झाले; पण प्रतिवादात ते टिकले नाहीत. मात्र, सक्ती केली गेली, की कानाला, जिव्हेला, नजरेला, लेखणीला आणि म्हणून मनाला मायमराठीची सवय लागत असते, ती अंगवळणी पडत असते. त्या विषयाच्या गोडीसाठी सक्ती, अन्य साहित्यकृतींकडे जाण्याची प्रेरणा त्याला मिळावी म्हणून सक्ती. फक्त मराठीच्या भल्यासाठी सक्ती. एरवी सक्ती वाईटच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com