'पालकांनी चांगले श्रोते बनावं' (प्रवीण तरडे)

pravin tarde
pravin tarde

परार्धनं किमान एक कला तरी जोपासली पाहिजे, हा आमचा हट्ट आहे. उद्या परार्ध काय होईल, हे आज आम्हाला माहीत नाही. कारण तो अजून आठच वर्षांचाच आहे. तो काहीही होवो; पण त्याच्याकडे चित्रकला, नाट्यकला, लेखनकला, वाद्यकला यांसारखी कोणतीही कला असेल, तर व्यग्र दैनंदिनीतून स्वतःसाठी वेळ काढून तो या कलेचा आनंद घेऊ शकेल. ती कला त्याला जगवेल, जगण्याची प्रेरणा देईल. म्हणून किमान एक कला यावी या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत.

पालक म्हणजे नागरिकशास्त्राचं पुस्तक असलं पाहिजे. दिसताना ते वीस मार्कांचंच दिसलं पाहिजे; पण त्याचा प्रभाव पाडताना तो अख्या जगण्यावर पडला पाहिजे. मला नेहमीच वाटतं, की शाळेत नागरिकशास्त्र अजून चांगलं शिकवलं असतं, तर आपला समाज अजून शिस्तबद्ध दिसला असता. आज लॉकडाऊनची गरजच पडली नसती. नागरिकशास्त्र हा खरं तर स्वतंत्र विषयच असायला हवा. मथितार्थ हाच, की पालकांनी नागरिकशास्त्राच्या पुस्तकाप्रमाणं असावं! लहान असलं, तरी जगण्याचं एक अविभाज्य अंग असलं पाहिजे.

आम्ही आतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो आहोत. वडील विठ्ठल तरडे हे ग्रामीण भागातून पुण्यात आले. बजाज ऑटोमध्ये जॉब करायचे. आम्ही एकूण सहा भावंडं आणि आई-वडील असे सर्वजण दहा बाय दहाच्या खोलीत राहायचो. ग्रामीण भागातून आलेलो असलो, तरी आमच्या आई-वडिलांनी कधी आम्हाला आर्थिक चणचण जाणवू दिली नाही. त्याचं कारण म्हणजे एकूण गरजाच इतक्‍या कमी होत्या, की आहे त्यात खूप आनंदी राहाता यायचं. सामान्य परिस्थिती असली, तरी संस्कार मात्र खूप चांगले झाले. वडील पैसे साठवून दरवर्षी काही दिवाळी अंक आणायचे. घरात रोज दोन वर्तमानपत्रं यायचीच. वर्तमानपत्राचं सक्तीचं वाचन, शिवाय घरातले दिवाळी अंक वाचायचो. त्यावेळी पुस्तकं विकत घेणं परवडायचं नाही. म्हणून घराजवळ असणाऱ्या वाचनालयाचं सभासदत्व घेतलं होतं. आर्थिक चणचण असली, तरी वाचनाची गोडी वडिलांनी लावली. वाचनाच्या या आवडीमुळंच भविष्यात आम्ही उभे राहिलो. आमचे वडील निर्व्यसनी आहेत. त्यामुळे ते आम्हाला सतत सांगायचे, की आयुष्यात उभं राहायचं असेल, तर निर्व्यसनी राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. अनेकवेळा परिस्थिती बिकट असते आणि त्यावेळी तुम्ही शुद्धीवर नसता परिणामी नुकसान होतं. त्यामुळे परिस्थिती कितीही बिकट असली, तरी आपण शुद्धीवर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांच्या या शिकवणीमुळे मी व्यसनांपासून नेहमीच दूर राहिलो. माझी आई अशिक्षित आहे, तरीही ती अतिशय उत्तम प्रकारे आमचा अभ्यास घ्यायची. पालक म्हणून आई-वडील दोघांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवलं. काय केलं पाहिजे याबरोबरच काय नाही केलं पाहिजे या गोष्टी त्यांच्या शिकवणीतून आम्हाला समजल्या. दोघं हाडाचे शेतकरी आहेत. त्यामुळे शेतीचा सगळा व्याप सांभाळून त्यांनी आम्हाला घडवलं. दर सुट्टीत एक-दीड महिना ते शेतात राबत असत. भाताची लावणी, पेरणी असेल तेव्हा ते आम्हा मुलांना घेऊन जात असत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ तुटली नाही. त्याचबरोबर पुस्तकांशीही नाळ जोडली गेली. घरात साहित्याची कुठलीही पार्श्वभूमी नसताना लहानपणीच पु. ल. देशपांडे, व. पु. काळे यांसारख्या अनेक लेखकांच्या साहित्याबद्दल आवड निर्माण झाली, हे पालकांच्या संस्कारामुळंच शक्‍य झालं. मी स्वतःला नशीबवान समजतो- कारण जगातले बेस्ट आई-वडील मला मिळाले. अत्यंत योग्य पद्धतीनं त्यांनी आम्हाला घडवलं.

मी कबड्डी आणि सॉफ्टबॉलचा राष्ट्रीय खेळाडू होतो. त्यावेळी ट्रॅक सूट आणि शूज या गोष्टी सर्वसामान्यांसाठी महागच होत्या. अर्थात मी लहान होतो त्यामुळे मला हे त्यावेळी कळत नव्हतं. ब्रॅंडेड कपन्यांच्या वस्तू मिळाव्यात, म्हणून मी हट्ट करायचो आणि वडील ते आणून द्यायचे. त्यांना त्या परिस्थितीत हे कसं काय जमत होतं हा विचार माझ्या मनात यायला बराच काळ गेला. मी जे शूज घालायचो त्याच कंपनीचे शूज गाडीतून येणारी श्रीमंत मुलं घालायची. त्यामुळे ते मला त्यांच्या स्टेटसचाच समजायचे. एकदा कुतूहल म्हणून अशाच एका मित्राला शूजची किंमत विचारली आणि ती ऐकून मी हादरलोच. मी घरी येऊन वडिलांना विचारलं ः ""अहो, हे शूज खूप महाग आहेत. कशाला घेतलेत?'' त्यावर ते म्हणाले ः ""तू सॉफ्टबॉल खेळतोस. तो मुळात महागडा खेळ आहे. तू कबड्डीचाही राष्ट्रीय खेळाडू आहेस; पण तिथं खर्च नाही. मात्र, या खेळात हेच शूज लागतात. ते आणलेच पाहिजेत.'' त्यानंतर मला समजलं, की पैशांची जुळवाजुळव करणं त्यांच्यासाठी खूप अवघड होतं; पण ते ती करायचे. फेब्रुवारी महिन्यात सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय सामने व्हायचे. ते शूज मला मिळावेत म्हणून वडील सात महिने आधीपासून पैसे साठवत होते. आता मी कुठल्याही महागड्या ब्रॅंडचा शूज पटकन घेऊ शकतो; पण त्यावेळी आर्थिक परिस्थिती आगदी साधारण असताना वडील हे कसं करत होते त्यांचं त्यांनाच माहीत. म्हणूनच आज मला कोणतंही ऍवॉर्ड मिळालं, तर ते मी ते आई-वडिलांना समर्पित करतो. कारण त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोचलो आहे.

आज मीही एका मुलाचा पालक आहे. परार्ध त्याचं नाव; पण मी माझं पालकत्व आणि आई-वडिलांचं पालकत्व याची तुलनाच करू शकत नाही. कारण आता परिस्थिती खूपच बदलली आहे; पण तरी माझ्या पालकांनी आम्हाला घडवण्यासाठी केलेल्या काही मूलभूत गोष्टी मी मुलासाठी आवर्जून करतो. उदाहरणार्थ, घरात पुस्तकं आणणं, मुलाचे छंद जोपासणं, त्यासाठी त्याला चांगला क्‍लास लावणं यांसारख्या गोष्टी करतो. सहा तासांचं त्याचं शालेय शिक्षण सोडून त्याची वेगळी आवड निर्माण झाली पाहिजे, हे वडिलांचं तत्त्व जपतो आहे. त्यात किती यशस्वी होऊ हे भविष्यात समजेलच; पण परार्धच्या उत्तम जडणघडणीसाठी प्रयत्न नक्कीच करत आहे. त्याला चांगल्यातलं चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून चांगले क्‍लास बघतो. माझ्या वडिलांइतका वेळ मी परार्धला नाही देऊ शकत. वडिलांची त्यावेळी मर्यादित वेळेची नोकरी होती. आता माझ्या कामाचं स्वरूपच असं आहे, की अठरा तास काम करूनही ते कमीच पडतात. त्यामुळे परार्धचं पालकत्व निभावताना त्यात माझा वाटा तीस टक्के असला, तर माझ्या पत्नीचा म्हणजे स्नेहलचा वाटा सत्तर टक्के आहे. तिनं तिचं अभिनयाचं करिअर सहा वर्ष थांबवलं. ती अतिशय गुणी अभिनेत्री आहे. "देऊळबंद'मध्ये ती होती आणि आता "देऊळबंद भाग दोन'मध्येही ती काम करणार आहे.

आमच्या आई-वडिलांनी आम्हाला वाढवताना फार प्रश्न कधी विचारले नाहीत. फक्त अयशस्वी होणार नाही याची ते अप्रत्यक्षपणे काळजी घ्यायचे. ही काळजी मीही परार्धच्या बाबातीत घेत आहे; पण प्रत्यक्षपणे. वडील मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत पाठवायचे. आमची विचारसरणी कॉंग्रेसी असली, तरी ते कोणत्या दृष्टिकोनातून मला तिथं पाठवत होते माहीत नाही; पण त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणून मीही परार्धला शाखेत पाठवतो.

परार्धनं आमच्याच क्षेत्रात यावं अशी आमची दोघांची इच्छा आहे. कारण कलेतून जो आनंद मिळतो त्याला तोड नाही. एखाद्या सर्जनला अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केल्यानंतर जो आनंद मिळतो, तसाच आनंद एका कलाकाराला उत्तम कला साकार केल्यानंतर मिळतो. काही वर्षांपूर्वी साकारलेली कलाकृती प्रेक्षक पुनःपुन्हा बघतो तेव्हा तो आनंद शब्दांत सांगता येत नाही. आयुष्यात कला जगण्यासाठी प्रेरणा आणि आनंद बनतच असते; पण या लॉकडाउनच्या काळात मला विशेषत्वानं जाणवतं, की कला जगण्याचा एक भाग होऊ शकते. परार्धनं किमान एक कला तरी जोपासली पाहिजे, हा आमचा हट्ट आहे. उद्या परार्ध काय होईल, हे आज आम्हाला माहीत नाही. कारण तो अजून आठच वर्षांचाच आहे. तो काहीही होवो; पण त्याच्याकडे चित्रकला, नाट्यकला, लेखनकला, वाद्यकला यांसारखी कोणतीही कला असेल, तर व्यग्र दैनंदिनीतून स्वतःसाठी वेळ काढून तो या कलेचा आनंद घेऊ शकेल. ती कला त्याला जगवेल, जगण्याची प्रेरणा देईल. म्हणून किमान एक कला यावी या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही काही लादत नाही; पण वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. त्याला एक चर्मवाद्य देतोय, एक सूरवाद्य देतोय, चित्रकलेच्या क्‍लासला पाठवतोय, तायक्वांदोला पाठवतो आहे. परार्ध अजून लहान आहे, त्यामुळे नक्की कशात त्याला आवड आहे हे चाचपडून पाहतो आहोत. काही दिवसांनी ते समजेलच. त्यानुसार ती आवड आणखी जोपासता येईल. सर्वप्रथम पालकांनी एक चांगला श्रोता बनले पाहिजे. आम्ही दोघंही परार्धचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत असतो. कारण जेवढं ऐकून घेऊ, तेवढं तो अधिक बोलेल आणि जेवढं बोलेल तेवढा तो अधिक मोकळा होईल. माझ्या मते हे प्रत्येक पालकांनी केलं पाहिजे. याबाबतीत स्नेहलची अधिक मेहनत आहे. संध्याकाळचं शुभंकरोती, सकाळचे मनाचे श्‍लोक किंवा अन्य काही गोष्टी हे सगळं जबाबदारीनं परार्धकडून ती करून घेते. अर्थात आम्ही जे करतो ते आमच्या आई-वडिलांच्या तुलनेत चाळीस टक्केसुद्धा नाही. कारण परार्ध माणूस म्हणून कसा घडतोय हे अजून समजायचं आहे. आमच्या आई-वडिलांमुळे जी सद्‌सदविवेकबुद्धी आम्हाला लाभली, ती त्याच्यातही येवो, हीच स्वामींचरणी प्रार्थना आहे.

मी परार्धला वाढवणं एंजॉय करतो. पालकत्व हे जबाबदारी म्हणून बघण्यापेक्षा कर्तव्य म्हणून बघितलं तर जास्त मजा येते. ते निभावताना मी थोडा माझ्या बायकोसारखं होण्याचा प्रयत्न करतो. तिच्याइतकं उत्तम पालक मला व्हायचंय. पालकांनी मुलांना कुठल्याही गोष्टीकडे सतत विवेकबुद्धीनं पाहायला शिकवलं पाहिजे. अलीकडचीच गोष्ट आहे- परार्धनं मला विचारलं ः ""मोदी अंकल सुपरमॅनपेक्षा भारी आहे का?'' हे ऐकून मला मोठी गंमत वाटली. मी विचारलं ः ""का रे, असं का विचारतोयस?'' त्यावर तो म्हणाला, की आमच्या शाळेच्या मित्रांमध्ये सुट्टीच्या दिवसात नेहमी अशी चर्चा चालते. त्याला मी त्याच्या भावविश्‍वाचा संदर्भ देऊन योग्य ते उत्तर दिलं; पण तिसरीतल्या मुलाचा चर्चेचा हा विषय ऐकून मी आश्‍चर्यचकित झालो. मग मी स्नेहलला म्हणालो ः "यापुढे कुठलीही राजकीय चर्चा त्याच्यासमोर करताना सांभाळून केली पाहिजे. उद्या आपण एखादी गोष्ट नकळतपणे त्याच्या आदर्शांच्या विरोधात बोलून गेलो, तर त्याला वाटेल की आपण त्याच्या विरोधात आहोत. त्याचं म्हणणं समजण्यासाठी तो आपल्याशी मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे. तसं वातावरण आपण घरात निर्माण करून दिलं पाहिजे.'' आता मी अवतीभोवतीच्या वेगवेगळ्या बातम्या त्याला सांगत असतो. मुलांच्या मनात वेगवेगळं कुतूहल असतं. ते शमवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणखी काही वर्षांनी त्याचं मत कदाचित बदलेलही; पण तो अधिकार त्याचा आहे. पालक म्हणून आपण त्यांच्यावर आपले विचार न लादता ते फक्त ऐकून घेतले पाहिजेत. निष्कर्ष त्यांनाच काढू द्यावा.

परार्धला अंतराळ, अंतराळवीर यासारख्या गोष्टींचं आकर्षण आहे. एकदा मी पृथ्वी, तिची भ्रमणकक्षा याबद्दल कोणाशी तरी फोनवर बोलत होतो. वादविवादात आपलं म्हणणं समोरच्यानं ऐकलं नाही, तर आपण ते उगाच लादायचा प्रयत्न करतो. काहीवेळा ते चुकीचंसुद्धा असू शकतं. त्या दिवशी असंच झालं. हा वाद परार्ध ऐकत होता. सगळं झाल्यावर तो मला म्हणाला ः ""बाबा, तू त्या माणसाशी खोटं का बोललास? पृथ्वी एवढी भारी आहे का? जर तसं असतं तर ती इतर ग्रहांपेक्षा लहान का? तिचा स्पीडही इतर ग्रहांपेक्षा कमी आहे. फक्त ऑक्‍सिजन आणि पाणी पृथ्वीवर आहे म्हणून आपण भारी का?'' आठ वर्षांच्या मुलाचं बोलणं ऐकून मी हादरलोच!! म्हणजे आपण फोनवर काय बोलतो, हेदेखील मुलं ऐकत असतात. मी त्याला फोन ठेवल्यावर म्हणालो ः ""अरे, त्या माणसाशी खोटं बोलावं लागलं.'' त्यावर परार्धचा प्रतिप्रश्न ः ""मग तू कशाला म्हणतोस मला, की खोटं बोलायचं नाही.'' तेव्हापासून मी ठरवलं, की परार्ध आसपास आहे की नाही हे बघूनच फोनकॉल करायचा आणि समोर असेल तर खूप सांभाळून बोलायचं आणि खरं बोलायचं. ही पिढी प्रचंड हुशार आहे आणि त्यांना खूप कळतं.
सध्याच्या शिक्षणपद्धतीपेक्षा आणखी चांगलं आपल्याला देता येईल का, असा विचार करून मी आणि स्नेहल आम्ही दोघंजण या लॉकडाऊनच्या काळात गेले तीन आठवडे रोज एक तास नवी शिक्षणपद्धती आणि अशा शिक्षणपद्धतीशी संबंधित शाळा यांची माहिती घेतोय. त्यानिमित्तानं आम्हा दोघांनाही कळलं, की खरं तर आपण परार्धसाठी हे काम सुरू केलं आणि शिक्षण आपलंच होतंय. आम्हाला वाटत होतं, की आपण आपल्या मुलासाठी वेगळं काहीतरी शोधतोय म्हणजे खूप ग्रेट !! पण हे असं "वेगळं' दहा वर्षांपूर्वीच सुरू झालंय. आम्ही जो आता आमच्या मुलासाठी विचार करतोय, तो दहा वर्षांपूर्वीच इतर पालकांनी केलाय. थोडक्‍यात मुलाच्या अभ्यासाबाबतचा विषय आमच्याच अभ्यासाचा झाला.

इच्छा आसूनही मी परार्धला इतर वेळी जास्त वेळ देऊ शकत नाही. कारण लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपटातली प्रमुख भूमिका अशी तीन महत्त्वाची व्यवधानं मी सध्या पार पाडतोय. त्यामुळे माझे सोळा ते अठरा तास ऑफिसमध्येच जातात. त्यामुळे वेळेच्या बाबतीत मी कमी पडतो; पण स्नेहल ती कमतरता भरून काढते. अर्थात परार्धसाठी वेळ काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो. आता लॉकडाऊनमध्ये तर धमालच आहे. मला परार्धबरोबर भरपूर वेळ घालवता येत आहे. एरवीसुद्धा संधी मिळाली, की तो पूर्ण वेळ त्याच्याच बरोबर असतो. या वेळेत मी त्याला गोष्टी सांगतो. कुठलीही गोष्ट पुस्तकातली नसते. मी लेखक असल्यामुळे स्वतः गोष्टी तयार करतो. मी गोष्टी सांगताना परार्धला नायक करतो. त्याच्या आवडीनिवडी मला माहीत आहेत. त्यामुळे गोष्टीतले चढ-उतार त्याच्या पद्धतीनं करतो. मग त्याच्या आवडीनुसार कथा वळते. त्याच्याकडून वदवून घेऊन शेवटी गोष्टीतला नायक म्हणजेच तो स्वतः जिंकतो. कधी कधी मला त्याच्या गोष्टींमधूनही एखादी स्टोरी मिळून जाते, एखादा चांगला सीन मिळून जातो.

सध्याचा काळ बघता मुलांना गॅजेट्‌स देणं आवश्‍यक वाटतं. त्यामुळे आम्ही ते परार्धला देतो; पण त्याच्या वापरण्यावर पूर्ण लक्ष ठेवून असतो. बहुतांश वेळा तो अंतराळाशी, अंतराळवीरांशी संबंधित गोष्टी बघतो. माझं आणि स्नेहलचं गॅजेट्‌सबाबत मत सकारात्मक आहे. आमच्या लहानपणी आम्ही भरपूर पुस्तकं वाचायचो, कारण माहितीला ज्ञानात परिवर्तन करण्याचं तेच एक प्रभावी साधन त्यावेळी होतं. आत्ताचं तंत्रज्ञान, त्यात उपलब्ध असणारी माहिती हे एक प्रकारचं पुस्तकच आहे. व्हिडिओमध्ये कोणीतरी पृथ्वीच्या भ्रमणकक्षेबद्दल बोलत असतं. परार्ध ते ऐकत असतो, पाहत असतो. हा एकप्रकारे अभ्यासच आहे. काही वेळा तो माइंड क्राफ्ट बघतो, काही वेळा डोरेमॉनही बघतो. अर्थात या गोष्टींचं प्रमाण मात्र आम्ही ठरवत असतो. त्यामुळे गॅजेट्‌स हा आताच्या पिढीचा जगण्याचा भाग आहे. तो जर आपण त्यांच्या हातातून काढून घेतला, तर आपण कदाचित त्यांचे व्हिलन ठरू. त्यामुळे आम्ही गॅजेट काढून घेण्यापेक्षा फक्त तो काय बघतो यावर लक्ष ठेवतो. कंटाळा आला, की तोच ते बाजूला ठेवतो. सुदैवानं आम्ही प्राणीप्रेमी असल्यानं घरात मांजर, कुत्रा, पोपट आहे. त्यांच्याशी खेळण्यात परार्धला मजा येते. त्याच्यातही वेळ जातो. शेवटी पालकत्व हे मुलांच्या जडणघडणीतलं अत्यंत महत्त्वाचं अंग असतं. पालक म्हणजे नागरिकशास्त्राचं पुस्तक असलं पाहिजे. दिसताना ते वीस मार्कांचंच दिसलं पाहिजे; पण त्याचा प्रभाव पाडताना तो अख्या जगण्यावर पडला पाहिजे. मला नेहमीच वाटतं, की शाळेत नागरिकशास्त्र अजून चांगलं शिकवलं असतं, तर आपला समाज अजून शिस्तबद्ध दिसला असता. आज लॉकडाऊनची गरजच पडली नसती. नागरिकशास्त्र हा खरं तर स्वतंत्र विषयच असायला हवा. मथितार्थ हाच, की पालकांनी नागरिकशास्त्राच्या पुस्तकाप्रमाणं असावं! लहान असलं, तरी जगण्याचं एक अविभाज्य अंग असलं पाहिजे!!
(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com