कुटुंबातलं ‘बॉंडिंग’ फार महत्त्वाचं! (प्रिया बेर्डे)

priya berde
priya berde

पालक म्हणून जगताना वेळेनुसार भूमिका बदलावी लागते. कधी आई-वडील, कधी मित्र बनावं लागतं. म्हणजे त्यांना बाहेरच्या लोकांचा आधार घेण्याची गरज वाटत नाही. वादविवाद प्रत्येक घरात होतात; पण कुटुंबात एकमेकांचं बाँडिंग असणं खूप महत्त्वाचं असतं. अन्यथा त्या नात्याला आणि घराला काही अर्थ नाही.

अरुण कर्नाटकी हे माझे बाबा आणि लता अरुण ही माझी आई. दोघंही चित्रपट, नाट्य क्षेत्रातले असल्यामुळे सतत बाहेर असायचे. त्यामुळे मला त्यांचा सहवास कमी लाभला. मी जास्त करून माझ्या आजीकडे म्हणजे आईच्या आईकडेच राहिले आहे. आजीचा मला खूप सहवास मिळाला. माझे मामा-मामी म्हणजे शहाजी काळे आणि माया जाधव यांच्याबरोबरही माझं बरंच बालपण गेलं. प्रयोग नसेल तेव्हा आई यायची; पण फार कमी दिवसांसाठी. त्यामुळे आजीबरोबर मामा-मामींचे माझ्यावर जास्त संस्कार आहेत. आजी मला शाळेत सोडायला आणि आणायला चालत यायची. तिच्यामुळे मला भरपूर चालायची सवय लागली. ती सवय मला अजूनही आहे. मी सात-आठ किलोमीटर सहज चालू शकते. घरात अतिशय संस्कारशील वातावरण होतं. गुरुचरित्राची पारायणं व्हायची, नवरात्रं असायची, रोज पूजा व्हायची. व्यंकटेश स्तोत्र, शिवमहिमा स्तोत्र, मारुती स्तोत्र इत्यादी स्तोत्रं आजीची तोंडपाठ होती. त्यामुळे माझीही ही स्तोत्रं पाठ आहेत. माझे आई-बाबा फार स्थिर वृत्तीचे होते. त्यांनी बरंच यशापयश बघितलं होतं. त्यामुळे यशानं हुरळून जायचं नाही आणि दुःखानं खचून जायचं नाही, निश्चल कसं राहायचं हे संस्कार आई-बाबांकडून मला मिळाले. आम्ही फार श्रीमंत नव्हतो. चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात माझं बालपण गेलं; पण आम्ही खूप समाधानी होतो. आमच्याकडे टीव्हीसुद्धा नव्हता. त्यामुळे मैत्रिणीकडे किंवा शेजारी जाऊन टीव्ही बघायचो; पण खरं सांगायचं तर त्यात मजा होती. परिस्थितीला कसं सामोरं जायचं आणि कितीही नाव, प्रसिद्धी, पैसा मिळाला, तरी आपण जमिनीवर कसं राहायचं हे मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलं किंवा त्यांचं बघत मी शिकत गेले. वेळेचं महत्त्व त्यांच्याकडून शिकले. वडील दिग्दर्शक. ‘वेळ वाया घालवायचा नाही. कुणाला ताटकळत ठेवायचं नाही आणि कोणाला दिलेला शब्द मोडायचा नाही. तुमच्याकडे नंतर किती चांगलं काम आलं, तरी त्यासाठी आधीचं काम सोडायच नाही,’ ही वडिलांची शिकवण होती. आईकडून आणि मामीकडून मी वेगवेगळ्या प्रकारे नऊवारी साडी नेसायला शिकले. आई सुगरण होती. तिच्याकडून मी पाककला आणि घरातल्या अगदी बारीकसारीक; पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी शिकले. आईनं छोटा गंधर्व, बालगंधर्व यांच्याबरोबर काम केलं होतं. आई-वडील दोघं कामानिमित्त बाहेर असायचे- त्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यासाठी आजी आमच्याचकडे होती. मी एकवीस वर्षांची असतानाच माझी आई गेली. आजीच मला प्रत्येक वेळी सांभाळायला होती. ती खूप खंबीर होती. कधी खचली नाही. स्वतःची मुलगी डोळ्यासमोर जाताना पाहिली; पण तरी उभी राहिली. मला आणि वडिलांना आधार दिला. घरामधले सर्व आर्थिक व्यवहार तीच बघायची. आमच्या घराचा आधारस्तंभच होती जणू ती. त्यामुळे माझ्या संगोपनात तिचा खूप प्रभाव आहे.

मला लहानपणी आई-वडिलांकडे राहायचं होतं; पण मी आजीकडे राहिले. त्यामुळे माझ्या मुलांना माझ्याच जवळ ठेवायचं होतं. म्हणून अभिनय झाल्यानंतर मी काम थांबवलं होतं; पण नियती कशी असते बघा! नेमकी नको असणारीच गोष्ट मला करावी लागली. माझा मोठा मुलगा अभिनय सहा वर्षाचा होता आणि मुलगी स्वानंदी अडीच वर्षाची होती तेव्हाच लक्ष्मीकांत गेले आणि घराची सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मी एकदम पोरकी झाले. मला कोणीच जवळचे नातेवाईक नव्हते त्यावेळी, त्यामुळे मुलांना नाइलाजानं हॉस्टेलमध्ये ठेवावं लागलं. पुढे सात-आठ वर्षांनी मी मुलांना परत माझ्याकडे आणलं; पण तोपर्यंत ‘आई जवळ असायला हवी,’ असं वाटण्याचं त्यांचं वय निघून गेलं होतं. हॉस्टेलवर त्यांना एक-दोन महिन्यांनी भेटायला जायचे. मुलांच्या सुट्यांमध्येच आम्ही एकत्र घरी राहायचो. अभिनयला किमान सहा-सात वर्षांपर्यंत तरी मी वाढवलं; पण स्वानंदी तर पहिलीपासूनच हॉस्टेलमध्ये राहिली. त्यामुळे मुलं माझ्यासोबत वाढली नाहीत, ही खंत कायमच माझ्या मनात राहिली. दहावीनंतर मुलं पुन्हा मुंबईत आली आणि आम्ही सोबत राहू लागलो; पण तोपर्यंत ती मोठी झाली होती आणि मीसुद्धा बऱ्यापैकी स्थिरावले होते. लक्ष्मीकांत गेल्यानंतर माझ्यासमोर खूप अडचणी होत्या. आता पुढे काय, अशी परिस्थिती होती. मी लग्नानंतर काम करणं थांबवलं होतं. त्यामुळे ती पुन्हा मिळवण्यापासून सुरुवात होती. सगळ्या पातळ्यांवर झगडत होते; पण खरं सांगू का? माझी मुलं होती म्हणून मी सर्व करू शकत होते. तो समंजसपणा बहुधा त्यांच्यात रक्तातूनच आला असेल. आलेल्या परिस्थितीनुसार आईला आधार दिला पाहिजे, परिस्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे, हे त्यांनी जाणलं. त्यामुळे मी त्यांना अॕडजस्ट करण्यापेक्षा त्यांनी मला अॕडजस्ट केलं, असं मी म्हणेन. कारण माझं करिअर आणि माझ्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांभाळून घेतल्या, त्यामुळे मी इथवर येऊ शकले. मागं कोणाचाच आधार नाही, मुलांची, घराची सर्व जबाबदारी माझ्यावर आली होती. घरात मुलांची फी भरण्यासाठी पैसे नसायचे. खरं तर लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी म्हटल्यावर लोकांना वाटत असावं, की यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी वगैरे असेल; पण असं आजिबात नव्हतं. आम्ही कशा परिस्थितीत दिवस काढले हे कोणाला काय माहीत? आता पुढे काय करायचं असं मोठ प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं होतं; पण त्याच्यातूनही परमेश्वरानं आम्हाला बाहेर काढलं आणि इथपर्यंत आणलं.  

माझी दोन्ही मुलं सुज्ञ आहेत. कदाचित त्यांच्या करिअरमध्ये स्थिरावण्यासाठी ते थोडा वेळ घेतील; पण माझी त्याला काही हरकत नाही. कारण मला खात्री आहे, की ती जे करतील ते उत्तमच करतील. त्यांच्यावर संस्कारच तसे केले आहेत. मी त्यांना एक सांगितलंय : ‘तुम्ही नेहमी स्थिर राहा. कोणाच्या स्तुतीनं हुरळून जाऊ नका आणि कोणी टोचून बोललं, तरी मन खच्ची करू नका.’ आम्ही दोन-चार वर्षांत इंडस्ट्रीमधला बदल बऱ्यापैकी  समजून घेतला आहे. मी सुरुवातीला काम करत होते, तेव्हाची इंडस्ट्री आणि आताचा जमाना खूप वेगळा आहे. सध्याच्या अनिश्चित काळात तुम्ही स्वतःला उभं करणं आणि स्थिरावणं खरोखरच आव्हानच आहे; पण मुलं तयारी करत आहेत. माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. अर्थात आम्ही तिघंही भरपूर स्ट्राँग आहोत. आमचा एकमेकांना खूप आधार आणि पाठिंबा आहे आणि आम्ही तिघांनी एकमेकांना घट्ट बांधूनही ठेवलं आहे.
मुलांचा हॉस्टेलमधला काळ माझ्यासाठी जड होता; पण मुलं सुट्टीत घरी यायची, तेव्हा मी पूर्ण वेळ त्यांच्यासोबत असायचे. आम्ही दिवसभर फिरायचो, चित्रपट, नाटकं बघायचो. कारण मुलांना हॉस्टेलमध्ये असताना कुठंच जाता यायचं नाही. त्यामुळे घरी आल्यानंतर आम्ही खूप धमाल करायचो. मी घरी वेगवेगळे पदार्थ करायची. खूप आनंद होता त्यात. एक महत्त्वाची गोष्ट मी केली. मुलं हॉस्टेलला असतानाही आमच्यातला संवाद मी कधीच कमी होऊ दिला नाही. समोर जी काही अडचण असेल, ती मी त्यांना सांगायचे. शाळेत असताना एकदा अभिनयला नासामध्ये जायची संधी आली; पण मी त्याला त्यावेळी सांगितलं : ‘‘हे बघ अभिनय, तुला नासामध्ये पाठवण्यासाठी आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत; पण जेव्हा शक्य होईल, तेव्हा मी तुम्हाला नक्की परदेशात कुठंतरी फिरायला घेऊन जाईन.’’ ते ऐकल्यावर अभिनय लगेच म्हणाला : ‘‘अगं ठीक आहे, नाहीतरी मी चित्रपट क्षेत्रातच करिअर करणार आहे, तेव्हा नासाला जाऊन मी काय करणार?’’ मी मुलांशी नेहमी खरं बोलत आले आहे. पुढं दोन-चार वर्षांनी मी पैसे साठवून मुलांना परदेशात घेऊन गेले. पंधरा दिवस आम्ही खूप आनंदात घालवले. अशा प्रकारे आम्ही परस्परांमधलं नातं दृढ करत आलो आहोत. मी मुलांपासून कोणतीही गोष्ट कधी लपवून ठेवली नाही. मी खरीखुरी परिस्थिती सांगते. बरेच पालक मुलांना तोशीस पडू नये म्हणून का कुणास ठाऊक; पण सत्य परिस्थिती सांगत नाहीत, काहीतरी खोटं सांगतात. मला हे कधीच योग्य वाटलं नाही. तुमची परिस्थिती कशी आहे हे मुलांना खरं सांगून, आहे त्या परिस्थितीत कसं जगायचं हे सांगितलं पाहिजे. नाहीतर खूप लाड करण्यामुळे आपण जे देतो त्याची किंमत राहत नाही. मुलांशी मोकळेपणानं शेअर करत राहिल्यानं कदाचित ती जास्त समजूतदार झाली असावीत. पैसे कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, हे मुलांना  समजलं पाहिजे. उद्या ती पैसे कमवतील, तेव्हा ते कसे खर्च केले पाहिजेत, स्वतःला सुरक्षित कसं ठेवलं पाहिजे, या गोष्टी मी त्यांना सांगितल्या. माझ्या प्रत्येक कृतीतून दाखवत गेले.

मुलांशी वागताना पालकांनी त्यांची भूमिका वेळोवेळी बदलली पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे कधी पालक, कधी मित्र, काही वेळा गाईड म्हणून मुलांशी वागलं पाहिजे. वयात येताना मुलांना पालकांपेक्षा मित्राची जास्त गरज असते. म्हणून त्या वयात मुलांना मित्रांचा अधिक ओढा असतो. पौगंडावस्थेत मुलं खूप वेगळीच होतात, हे मी माझ्या निरीक्षणावरून सांगते. अशा वयात मुलांशी मोकळा संवाद साधला पाहिजे. मी हेच केलं. त्यामुळे मुलं मला सगळ्या गोष्टी सांगायची आणि अजूनही तसंच वातावरण घरात आहे. मला आठवतंय, अभिनय सातवीत की आठवीत असताना त्यानं वर्गातल्या मुलीला प्रेमपत्र लिहिलं होतं. त्यावेळी मला शाळेत बोलावलं गेलं आणि तुमच्या मुलानं असं लिहिलंय हे सांगितलं. एरवी माझा स्वभाव जरा तापट आहे. काही वेळा चिडल्यावर मुलांना मी मारलेलंही आहे. अर्थात ते त्यांच्या चांगल्यासाठीच. मला समोर बघितल्यावर अभिनयला वाटलं, की आता आई आपल्याला फटके देणार; पण तो सर्व प्रकार मी सामंजस्यानं हाताळला. मी अभिनयला म्हणाले : ‘‘अरे, हे काही तुझं वय आहे का असं करण्याचं?’’ नंतर त्याला सर्व काही समजावून सांगितलं. ‘या वयात भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटणं साहजिकच आहे; पण तरी अशा गोष्टी करणं चुकीचं आहे. एखादी मुलगी आवडली, तर तिला जाऊन सांग; पण असा वेडेपणा नाही करायचा. प्रत्येक मुलीबद्दल आदर ठेवायचा. अजून तू खूप लहान आहेस,’ असं सगळं सांगितलं. या प्रसंगानंतर आम्ही दोघं खूप छान मित्र झालो. त्यानंतर तो मला अधिक मोकळेपणानं सर्व गोष्टी सांगायला लागला. अभिनय लहानपणापासून स्वभावानं थोडा अंतर्मुख आहे. खूप कमी व्यक्तींशी मोकळा बोलतो. त्यात तो लहान असतानाच लक्ष्मीकांत गेले- त्यामुळे घरात कोणी पुरुष माणूस नाही. त्यामुळे त्याला बोलतं करण्यासाठी मला जरा प्रयत्न करावे लागले. तसं स्वानंदीच्या बाबतीत नाही. लहानपणापासूनच ती टॉमबॉय स्टाईलची आहे. ती लहानपणी मुलांना ठोकून यायची. तिच्या पातळीवरच ती बऱ्याच गोष्टी सोडवायची. त्यामुळे तिला बोलतं करण्यासाठी वा मोकळं करण्यासाठी मला प्रयत्न नाही करावे लागले.

लक्ष्मीकांत गेल्यानंतर मुलं खूप अस्वस्थ झाली होती. ती बाबाची खूप आठवण काढायची; पण मग मी त्यांना समजावलं, की ‘आता हेच आपलं आयुष्य आहे. आपल्याला इथूनच पुढं जायचं आहे. तुमच्या नावाबरोबर हे नाव लागलं आहे- त्याचा आदर तुम्हाला आयुष्यभर करायचा आहे. त्यामुळे इतर मुलं वागतात तसं वागून तुम्हाला चालणार नाही.’ ही गोष्ट मुलं पाळतात, याचा मला आनंद आहे. त्यांना एक माहीत आहे, की एखादी गोष्ट मागितल्यावर किंवा सांगितल्यावर आई लगेच ती करणार नाही; पण चार-पाच महिन्यांनी जमेल तेव्हा नक्की करेल. आपले पालक कोणत्याही परिस्थितीत कायम आपल्याबरोबर आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्यामागं उभे राहतील, अशी खात्री मुलांना वाटणं फार गरजेची आहे.  अर्थात मुलांनीही एक गोष्ट लक्षात ठेवावी, की अडचणीच्यावेळी कोणीही मदतीला येत नाही, पालकच येतात.  
माझा स्वभाव काहीसा चिडका आहे. त्यामुळे मी कधी चिडले, तर मुलं मला शांत करतात. एखाद्या गोष्टीवर माझी तीव्र प्रतिक्रिया उमटली, तर अभिनय ‘‘तू अशी काय प्रतिक्रिया देते आहेस? चिल राहा जरा,’’ वगैरे समजावतो. आम्ही तिघंही एकमेकांचा खूप आदर करतो आणि एकमेकांचं खूप ऐकतोही. माझं चुकलं, तर मी ते मुलांसमोर लगेच मान्य करते. त्यात मला कमीपणा वाटत नाही आणि मी चुका सांगितल्या, तर मुलंही ते ऐकतात. तेवढं सामंजस्य निर्माण केलं पाहिजे.

मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सगळे नातेवाईक वगैरे फारच तीव्र प्रतिक्रिया देऊ लागले. खरं तर आई म्हणून माझ्या मनाची काय अवस्था होती, हे कोणी लक्षातच घेत नव्हतं. मी अक्षरशः काळजावर दगड ठेऊन मुलांना हॉस्टेलला पाठवलं. मुलांना हॉस्टेलवर ठेवावं लागलं, तो आयुष्यातला वाईट दिवस होता, तर अभिनयचा ‘ती सध्या काय करते?’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, तो दिवस सर्वांत आनंदाचा होता. मुलांना चित्रपटाचं वातावरण अगदी नवखं होतं. त्यांनी कधी शूटिंगही पाहिलं नव्हतं; पण आता अभिनय खूप मेहनत करतो आहे. एक-दोन वर्षांत ते सगळ्यांना कळेलच. स्वानंदीचेही दोन चित्रपट तयार आहेत; पण तिला टूर्स अँड ट्रॕव्हल्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे. सध्या ती मँडरिन आणि जर्मन या भाषा शिकत आहे. तिला भरपूर फिरायचं आहे. हौस म्हणून तिनं दोन चित्रपट केले; पण तेच पुढं करेल असं नाही. मी मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी कधी दडपण आणलं नाही, की बळजबरी केली नाही. शिक्षणाच्या बाबतीतही कधी नव्वद टक्के गुण मिळवा, असा हट्ट धरला नाही. रिलॕक्स राहून अभ्यास करा, हेच माझं सांगणं होतं. महत्त्वाचं म्हणजे मुलं फार टेंशन न घेता चांगले मार्क मिळवत होती. स्वानंदी तर मुळातच खूप हुशार आहे. तिला अभ्यासाचं कधी सांगावं लागलं नाही. माझं पुण्यात हॉटेल आहे. ते बघण्यासाठी कधी स्वानंदी, कधी मी पुण्यात जात असतो.

मुलं हॉस्टेलला होती, तेव्हा तिथं मोबाईल चालतच नव्हता; पण मुंबईत आल्यावर ती माझा मोबाईल वापरायची. दहावीनंतर मी जुना मोबाईल त्यांना दिला होता. बऱ्याच उशिरा नवा मोबाईल दिला. मोबाईल आता मात्र जीवनाचा भाग झाला आहे. अभिनय, स्वानंदी दोघंही रेल्वेनं प्रवास करतात. मला खूप काळजी वाटते- त्यामुळे मी त्यांना सवयच लावली आहे. आमचा ग्रुप आहे तिघांचा. जगाच्या पाठीवर कुठंही जा- ‘पोचलो’, ‘निघालो’, ‘जेवलो’ असे मेसेज त्यावर टाकायचे. त्यामुळे एकमेकांची व्यवस्थित माहिती राहते. अगदी ते मित्रांबरोबर असले, मी बाहेर असले, तरी वेळोवेळी प्रत्येकाची माहिती ग्रुपवर टाकायची हा नियमच बनवला आहे. ‘तुमचे फोन बंद होता कामा नयेत. नेहमी पॉवर बँक जवळ ठेवा. त्यात हलगर्जीपणा नको,’ ही माझी ताकीदच आहे. नाहीतर माझा खूप ओरडा खावा लागतो मुलांना.

शेवटी पालक म्हणून जगताना वेळेनुसार भूमिका बदलावी लागते. कधी आई-वडील, कधी मित्र बनावं लागतं. म्हणजे त्यांना बाहेरच्या लोकांचा आधार घेण्याची गरज वाटत नाही. वादविवाद प्रत्येक घरात होतात; पण कुटुंबात एकमेकांचं बाँडिंग असणं खूप महत्त्वाचं असतं. अन्यथा त्या नात्याला आणि घराला काही अर्थ नाही, असं मी म्हणेन.
(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com