प्रातिभ सुगंधानं गंधाळलेली रानजाई (प्रा. मिलिंद जोशी)

prof milind joshi
prof milind joshi

महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन होणार आहे. या निमित्तानं या प्रतिभावान साहित्यिकाच्या कर्तृत्वाचा आढावा.

लोकसाहित्यातून लोकमानस, लोकपरंपरा, लोकश्रद्धा आणि लोकजीवन यांचं दर्शन घडतं. लोकसंस्कृतीच्या अभ्यासासाठी ते गरजेचं असतं. लोकसंस्कृतीच्या विविधांगांचं दर्शन घडवण्याचं आणि लोकपरंपरांचा परिचय करून देण्याचं मोलाचं काम डॉ. सरोजिनी बाबर यांनी आयुष्यभर केलं. त्यांनी मराठी ग्रामसंस्कृतीचा पैस धांडोळून लोकसांस्कृतिक धन गोळा केलं. ते अनेक संपादित पुस्तकांमधून समाजाला वाटून टाकलं. या अनमोल धनाचा उपयोग अनेक संशोधकांनी केला. त्यांचा सामाजिक-सांस्कृतिक अन्वयार्थ लावणाऱ्या मर्मग्राही अभ्यासकांची एक पिढी पुढं आली, त्यामुळे महाराष्ट्र संस्कृतीच्या अभ्यासाला नव्या दिशा मिळाल्या.
डॉ. सरोजिनी बाबर यांना सर्वजण प्रेमानं ‘आक्का’ म्हणत. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्‍यातल्या बागणी या गावी झाला. त्यांचे वडील कृष्णराव भाऊराव बाबर हे अतिशय तळमळीचे आणि निरलस असे प्राथमिक शिक्षक होते. लहानपणी पोलिओच्या तडाख्यात सापडल्यामुळे आक्कांचा डावा पाय अधू झाला होता. असं असतानाही आक्कांनी निरनिराळ्या खेळांत भाग घेतला. फेर धरला. झिम्मा खेळला. फुगडीही घातली. महाविद्यालयात असताना त्या बॅडमिंटनही खेळल्या. वडिलांची नोकरी बदलीची असल्यामुळे सातारा, काले, चितळी, म्हसवड, पेठ, इस्लामपूर, नगर अशा अनेक नगरांत त्यांचं वास्तव्य घडलं. मायेचा वर्षाव करणारी माणसं, आजूबाजूचा बहरलेला निसर्ग, जीव लावणाऱ्या जनावरांनी गच्च भरलेले गोठे, दुध-दुभत्यांची रेलचेल, शेणानं सारवलेल्या गुळगुळीत जमिनी, सडा-रांगोळीनं सजलेलं अंगण आणि तिथं येणारे लोककलावंत अशा वातावरणात त्यांच्या व्यक्तिमत्वाचं भरणपोषण झालं. सन १९४० मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आक्कांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. तिथं प्रा. श्री. म. माटे, के. ना. वाटवे आणि सोनोपंत दांडेकर या जाणत्या शिक्षकांनी आक्कांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या गुणांना उत्तेजन दिलं. आक्का बीएला पहिल्या आल्या. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या हस्ते त्यांना यशोदा चिंतामणी पारितोषिकही मिळालं.

आक्कांनी शिवाजी मराठा सोसायटीच्या जिजामाता हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी केली. ती सोडून एम.ए. पूर्ण केलं. डॉ. के. ना. वाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी साहित्यातील लेखिकांचे योगदान’ या विषयावर संशोधन करून पीएचडी संपादन केली.

आक्कांचे वडील मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि बंगाली या भाषांचे जाणकार होते. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात हजारो मौलिक ग्रंथ होते. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, रियासतकार सरदेसाई, डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे, वा. भा. पाठक, प्र. के. अत्रे, कवी गिरीश, कवी यशवंत, वि. द. घाटे, आनंदीबाई शिर्के, अनंत काणेकर, के. नारायण काळे, सेतू माधवराव पगडी, द. रा. बेंद्रे, सरदार आबासाहेब मुजुमदार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ग. ल. ठोकळ अशा दिग्गज माणसांचं घरी येणं-जाणं होतं. या निमित्तानं घडणाऱ्या वाङ्‌मयीन चर्चातून आक्कांचा वैचारिक पिंड पोसला गेला.

लोकसंस्कृतीविषयीच्या आत्मीयतेचा वारसा आक्कांना माती, नाती आणि संस्कृती यांना प्राधान्य देणाऱ्या ग्रामजीवनातून मिळाला. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या खेड्यातल्या माणसांचं आयुष्य ऋतुचक्राच्या लयीत कसं फिरत होतं. हे आक्कांनी जवळून पाहिलं. सण आणि उत्सवांमधला लोकांचा उत्साह पाहिला. गावजत्रांची मौज अनुभवताना समाजमनाची स्पंदनं टिपली. गावगाड्यातल्या खेळांची मस्ती पाहिली. कुलदेवतेपासून ग्रामदेवतेपर्यंत अनेक देवतांची मनोभावे पूजा बांधणारी भोळी माणसं त्यांच्या सभोवती होती. त्या माणसांच्या श्रद्धा-समजुती, प्रथा-परंपरा आक्कांनी समजून घेतल्या. सासूरवास सहन करून कुटुंबातल्या सर्वांचा प्रेमानं सांभाळ करणाऱ्या कणखर आणि सोशिक बायका त्यांच्या आसपास वावरत होत्या. त्यांची सुख-दु:खं उखाण्यांतून, गाण्यांतून आणि जात्यावरच्या ओव्यांतून व्यक्‍त होत होती.
उगवला नारायण पसरलं पिवळं ऊन
बाई हसलं हिरवं रान
उगवला नारायण त्या आधी उगव माझ्या दारी
माझ्या त्या बाळासंगं दुधातुपाची कर न्ह्यारी
पोथी पुस्तक वाचताना बाई कानीचा डूल हाले
माझा तो बाळराज सये कागदासंग बोले

असं म्हणत घरातल्या बाळराजाचं कौतुक केलं जात होतं.

बाप्पाजी माझा वड बया मालन पिंपरण
दोघांच्या सावलीत झोप घेते मी संपूरण
सासरएवढा वस नको करुस सासूबाई
दारीच्या चाफ्यापायी दूर देशाची आली जाई
असं म्हणत वेदनाही सांगितली जात होती

हे सारं त्या आयाबायांकडून ऐकताना आक्कांची संवेदनशक्ती विकसित झाली. त्यांच्या प्रतिभेची सतार हळुवार मुखरित झाली. यातूनच आक्कांच्या पुढच्या जीवनकार्याची पायाभरणी झाली. आक्कांनी लोकजीवनात जाऊन लोकधन वेचण्याचा ध्यासच घेतला. हजारो मैलाचा प्रवास करून, खेडोपाडी जाऊन, जनसामान्यांमध्ये मिसळून आक्कांनी ओव्या, खेळगाणी, फेरांची गाणी, कहाण्या, उखाणे यासारखे समाजभर विखुरलेले अज्ञात लोक वाङ्‌मय मिळवले. ते संग्रहित केले. अनेकांनी आक्कांसाठी प्रेमानं गोळा केलेला लोकसाहित्याचा रानमेवा आक्कांनी आनंदानं स्वीकारला आणि संपादित स्वरूपात तो समाजालाच अर्पण केला. ‘एक होता राजा’ किंवा ‘जनलोकांचा सामवेद’ यांसारख्या पुस्तकांतून विविध प्रकारच्या लोक साहित्याचा, ‘सांगीवांगी’सारख्या पुस्तकातून लोककथांचा, ‘दसरा-दिवाळी’सारख्या पुस्तकातून सण उत्सवांचा, ‘राजविलासी केवडा’मधून स्त्री-पुरुष नात्यांचा, तर ‘तीर्थांचे सागर’मधून वडीलधाऱ्या नातेसंबंधांचा लोकसंस्कृतीतला ठेवा आक्कांनी मराठी साहित्य शारदेच्या दरबारात जमा करून लोकसाहित्य - लोकसंस्कृतीचं दालन समृद्ध केलं.

आक्कांच्या वडिलांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी इस्लामपूर इथं त्यांचा महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या हस्ते सत्कार केला आणि त्यांना एक थैली अर्पण केली. त्यामध्ये स्वत:ची भर घालून त्यांच्या वडिलांनी प्रकाशन सुरू केलं. समाजाला वाचनाभिमुख करण्यासाठी ‘समाज शिक्षणमाला’ सुरू केली. त्याचं संपादकत्व स्वीकारून आक्कांनी लहान-मोठी शेकडो पुस्तकं लिहिली आणि मान्यवर लेखकांकडून लिहूनही घेतली. समाजाचं नैतिक सांस्कृतिक शिक्षण हाच या मालेचा हेतू होता. या कामात वडिलांचं मार्गदर्शन आक्कांना लाभलं. आक्कांच्या धाकट्या भगिनी कुमुदिनी पवार आणि शरदिनी मोहिते यांचं उत्तम सहकार्य आक्कांना लाभलं. इतिहास, भूगोल, आरोग्य, विज्ञान, शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, शेती, कायदा, अध्यात्म, क्रीडा, कला, नाट्य असे वेगवेगळे विषय या ‘समाज शिक्षणमाले’नं हाताळले आणि समाजमानस जाणतं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यातून ५५० पुस्तकांची निर्मिती झाली. ग. ल. ठोकळ, सुमती क्षेत्रमाडे, कुमुदिनी रांगणेकर, नरुभाऊ लिमये, गंगूताई पटवर्धन, गोपीनाथ तळवलकर, डॉ. रा. ना. दांडेकर, रमेश मंत्री, शंकर पाटील, गोविंदस्वामी आफळे, बा. भ. बोरकर, दुर्गा भागवत, शंकरराव खरात, ना. सी. फडके, मालतीबाई दांडेकर, शांता शेळके, गो. नि. दांडेकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी समाजशिक्षण मालेसाठी लेखन केलं.

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचा अभ्यास, ‘समाज शिक्षणमाले’चं काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना सन १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि भाऊसाहेब हिरे यांच्या आग्रहामुळे आक्का बत्तीस शिराळा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि अटीतटीच्या लढतीत विजयी झाल्या. सन १९५२ ते ५७ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य होत्या. सन १९६३ ते ६६ या काळात त्या विधान परिषदेच्या सदस्य होत्या. सन १९६८ ते ७४ या काळात राज्यसभा सदस्य होत्या. नागपूरच्या अधिवेशनाला गेल्यानंतर पवनारला जाऊन आक्कांनी विनोबा भावेंची भेट घेतली, तेव्हा विनोबांनी दिलेला ‘राजकारणातून बाजूला होऊन लेखन आणि संशोधनाच्या कार्याला वाहून घ्या,’ हा सल्ला आक्कांनी मानला आणि पुढचं आयुष्य वाङ्‌मय सेवेसाठी वाहून घेतलं. महाराष्ट्र शासनाच्या लोकसाहित्य समितीची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. बहुजन समाजानं शतकानुशतकं सांभाळलेलं लोकसंचित उजेडात आणण्याचं महत्त्वाचं कार्य आक्कांनी या काळात हाती घेतलं आणि पूर्णत्वास नेलं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या आणि विश्वकोश मंडळाच्याही त्या सदस्य होत्या. राजकारण आणि समाजकारणाच्या या धावपळीत आक्कांचं स्वत:च्या लेखनाकडं थोडंही दुर्लक्ष झालं नाही. समाज शिक्षणमालेसाठी संपादित केलेली ५५० पुस्तकं, मालेसाठी स्वत: लिहिलेली ८७ पुस्तकं, ७ कादंबऱ्या, ११ कथासंग्रह, २६ ललित लेखसंग्रह, ४ बालवाङ्‌मय आणि नाटिकांची पुस्तकं, २ काव्यसंग्रह, लोकसाहित्य समितीसाठी संपादित केलेली ३० पुस्तकं अशी मोठी ग्रंथसंपदा लेखक-संपादक म्हणून आक्कांच्या नावावर आहे. यावरून आक्कांच्या अफाट सर्जनक्षमतेची साक्ष पटते. ‘माझ्या खुणा माझ्या मला’ हे आक्कांचं आत्मचरित्र काळाचा मोठा पट उलगडणारं आहे. महाराष्ट्रातली आद्य साहित्य संस्था असा लौकिक असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचं अध्यक्षपदही आक्कांनी भूषवलं. मराठी अस्मितेची ओळख करून देणारी ‘रानजाई’ ही दूरदर्शनवरची मालिका आक्का आणि शांता शेळके यांच्या सहभागामुळे लोकप्रिय झाली. आक्कांच्या वाट्याला अनेक पुरस्कार आणि मानसन्मान आले. आपल्या प्रातिभसुगंधानं आयुष्यभर मराठी मुलखात गंधाळलेली ही रानजाई २० एप्रिल २००८ रोजी देवांच्या बागेत शांतपणे विसावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com