खरा मार्गदर्शक (पुष्कर जोग)

pushkar jog
pushkar jog

‘राजू’ चित्रपटाबद्दल बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला, तेव्हा प्रचंड कौतुकाचा वर्षाव झाला. आई, बाबा घरातले सगळे खूष झाले; पण कांचन सरांकडून तेवढी दाद मिळाली नव्हती. मी एकदा त्यांना विचारायचं ठरवलं, की ते कामाचं एवढं कौतुक का नाही करत? मी त्यांना विचारलं : ‘‘कांचन सर, तुम्हाला माझं काम नाही आवडलं का?’’ ते म्हणाले : ‘‘नाही नाही. असं काही नाही.’’ मग मी म्हटलं : ‘‘मग तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेट का नाही केलंत?’’ ते तेव्हा जे बोलले ते मला अजून आठवतं. ते म्हणाले : ‘‘मी कौतुक यासाठी नाही केलं, की तू अजून लहान आहेस. तुझ्या डोक्यात हवा शिरेल. ती शिरू नये आणि तू सतत सिनेमाचा विद्यार्थी राहावास, म्हणून मी तुला ‘शाब्बास’ असं नाही म्हणालो.’’ कांचन सर आज हवे होते. त्यांच्याबरोबर अजून काम करायला मिळायला पाहिजे होतं.

कांचन नायक यांच्याबरोबर साधारण वीस वर्षांपूर्वी मी काम केलं. मी खूप लहान होतो तेव्हा. तेरा-चौदा वर्षांचा असेन. राजू हा चित्रपट आम्ही केला. मी त्यात मुख्य भूमिकेत होतो. त्याचं दिग्दर्शन कांचन नायक यांनी केलं होतं. मी खूप अल्लड होतो. ही भूमिका कठीण होती, कारण संपूर्ण चित्रपट माझ्या व्यक्तिरेखेभोवती फिरत होता. अभिनयाबाबत तसं कमी ज्ञान होतं, अनुभव कमी होता आणि समोर कांचन नायक यांच्यासारखा कसलेला दिग्दर्शक; पण त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं.
अतिशय परफेक्शनिस्ट, ज्ञानसंपन्न, तांत्रिकदृष्ट्या माहिती असलेला हा दिग्दर्शक. पण त्याहीपेक्षा मला महत्त्वाचं वाटतं, की ते अतिशय स्पष्टवक्ते होते. त्यांच्या वागण्याबोलण्यात खोटा फिल्मीपणा कुठंही नव्हता. उगाच कुणाचं खोटं कौतुक करणार नाहीत, जे मनात आहे ते तोंडावर आहे असं सांगायचे. अतिशय उत्तम माणूस. ‘राजू’मध्ये बरेच सीन्स असे होते, ज्याच्यात अभिनयाचा कस लागणार होता. माझ्यासाठी हे फार कठीण होतं; पण कांचनजी फार छान समजावून सांगायचे. ही व्यक्तिरेखा अशी का वागेल, असं का बोलेल, हे सांगायचे. डायलॉग डिलिव्हरी काय असते, इतर गोष्टी काय असतात अशा अनेक गोष्टींबाबत खूप छान समजावून सांगायचे. प्रचंड पेशन्स होता त्यांच्यात. माझे जवळजवळ दहा-बारा रिटेक्स व्हायचे; पण तरीसुद्धा ते सांभाळून घ्यायचे. जब्बार पटेल यांच्यापासून इतर अनेक दिग्गज लोकांबरोबर त्यांनी काम केलं होतं. ‘कळत-नकळत’सारखा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट त्यांच्या नावावर होता; पण त्याचा कोणताही गर्व त्यांच्यात नव्हता. अशा माणसाबरोबर मला काम करायला, शिकायला मिळालं याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो.

‘राजू’ चित्रपट खूप चालला. मला सर्वोत्कृष्ट बालकलाकारासह सात पुरस्कार मिळाले; पण त्यानंतरही, ते नेहमी मला म्हणायचे, ‘तू रिलॅक्स राहू नको. अॅक्टिंगवर काम करत राहा. सतत इंप्रूव्ह करत राहा. डिक्शनवर काम कर.’ ही गोष्ट मला पार महत्त्वाची वाटते. कुठलं काम असेल तर ते ‘बरं केलंयस’ असं म्हणायचे. बरं का म्हणायचे, कारण चांगलं म्हटलं की नंतर आपण रिलॅक्स होतो आणि आपल्याला सगळंच येतंय, असं वाटायला लागतं. ते इतर लोकांकडून शिकायला सांगायचे. ते लोक कसं काम करतात, कशी डायलॉग डिलिव्हरी असते, त्यांची एक्स्प्रेशन्स कशी असतात ते बघायला सांगायचे,.
हा त्यांचा गुण मला खूप आवडायचा. आज स्तुती करणारे खूप लोक असतात- ‘क्या काम किया है’ वगैरै म्हणतात; पण हा एकदम खरा बोलणारा माणूस. योग्य दिशा दाखवणारा माणूस होता. कांचनजी गेले त्याबद्दल मला खरंच फार वाईट वाटतंय. काही गोष्टी मी अजून विसरत नाही. ‘बिग बॉस’ मी जिंकलो तेव्हा मी त्यांना फोन केला होता. तेव्हाही त्यांनी चार गोष्टी सांगितल्या होत्या. ते नेहमी म्हणायचे ‘वुई आर स्टुडंट्स ऑफ द फिल्म इंडस्ट्री.’ ते मी नेहमी लक्षात ठेवतो. विद्यार्थीवृत्ती सतत जागती ठेवायला त्यांनी प्रेरणा दिली. आपला नेहमी एक मार्गदर्शक असतो, शिक्षक असतो. कांचन नायक हे माझे चित्रपटसृष्टीतले शिक्षक होते. योग्य मार्गदर्शक होते.

मला ‘राजू’ चित्रपटाबद्दल बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला, तेव्हा प्रचंड कौतुकाचा वर्षाव झाला. आई, बाबा घरातले सगळे खूष झाले; पण कांचन सरांकडून तेवढी दाद मिळाली नव्हती. आम्ही कांचन सरांबरोबर अनेक ठिकाणी एकत्र जायचो. मी एकदा त्यांना विचारायचं ठरवलं, की ते कामाचं एवढं कौतुक का नाही करत? मी त्यांना विचारलं : ‘‘कांचन सर, तुम्हाला माझं काम नाही आवडलं का?’’ ते म्हणाले : ‘‘नाही नाही. असं काही नाही.’’ मग मी म्हटलं : ‘‘मग तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेट का नाही केलंत?’’ ते तेव्हा जे बोलले ते मला अजून आठवतं. ते म्हणाले : ‘‘मी कौतुक यासाठी नाही केलं, की तू अजून लहान आहेस. तुझ्या डोक्यात हवा शिरेल. ती शिरू नये आणि तू सतत सिनेमाचा विद्यार्थी राहावास, म्हणून मी तुला ‘शाब्बास’ असं नाही म्हणालो.’’ पण हा जो शाब्बास राहून गेला होता, तो नंतर बिग बॉसच्या वेळी त्यांच्या तोंडून ऐकला. ‘बिग बॉस’ जिंकल्यामुळे मला जी प्रसिद्धी मिळाली, प्रेम मिळालं त्यानंतर त्यांना खूप भरून आलं आणि त्यांनी खूप छान दाद दिली. कांचन सर आज हवे होते. त्यांच्याबरोबर अजून काम करायला मिळालं असतं, तर मी अजून इंप्रूव्हमेंट करत राहिलो असतो. अशी माणसं तुम्हाला सतत जमिनीवर ठेवतात, नम्र ठेवतात. त्यातला हा एक उत्तम दिग्दर्शक होता. त्यांनी मला जे जे शिकवलं ते ते मी सतत लक्षात ठेवीन. माझ्या लहान वयात त्यांनी मला नम्र राहण्याचा जो मंत्र दिला, तो मला अजूनही उपयोगी पडतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com