पाककला : एक ‘रसा’स्वाद (रमा नाडगौडा)

ramaa nadgauda
ramaa nadgauda

समाजोन्नती होताना खुबीनं अन्न शिजवण्याचं कार्य ‘बेटर हाफां’च्या गळ्यात मारलं गेलं, यावर माझ्या माता-भगिनींचं दुमत असणार नाही. बिचाऱ्या अहोरात्र खपतात, झिजतात तेव्हा कठं रोज रोज नवनवं काही रांधून होतं. घरचे ‘वाहवाई’ करून थकतात. ‘‘मी कशी दिसते?’’ या अजरामर प्रश्नाला जसं ‘‘सुंदर!’’ हे तितकंच अमर उत्तर असतं, तसंच ‘‘कसं झालंय?’’ या प्रश्नालाही, ‘‘उत्तम!’’ हेच फिक्स उत्तर असतं. क्वचित कुणी धाडसी नरश्रेष्ठ जन्माला येतात, जे न डगमगता थेट सांगतात : ‘‘चांगलं झालंय; पण पुन्हा करू नकोस.’’ मग त्यांचं पुढं काय होतं याची इतिहासानं नोंद ठेवलेली नाही. चिल्लरखुर्दा किती हरपला, काय त्याचं?

कोणे एके काळी, म्हणजे काही शे-हजार वर्षांपूर्वी आपले पूर्वज रानात, झाडांवर, गुहेत किंवा असेच कुठंही राहायचे. राहायचे म्हणजे काय? आपलं असायचे. पक्ष्यांना, प्राण्यांना, किड्याबिड्यांना पडतो का असा प्रश्न, की ‘बोवा, आपण का जन्माला आलो? हा देह लाभण्याचं प्रयोजन काय? ईश्वरानं काय महान हेतूनं हा जन्म दिलाय? आपल्या महान ढेकूण जमातीचा प्रेषित म्हणून आपण जन्माला आलो आहोत. त्यामुळे रक्तपिपासा कशी चूक आहे यावर तिकीट लावून एसी सभागृहात सत्संग करावा, शिष्यीणी वाढवून रक्तरंजित धर्मप्रसार करावा...’ वगैरे?
छे छे! हे असले प्रश्न आणि त्यांची वाढीव उत्तरं फक्त माणसालाच पडतात. बाकी सगळे गप जन्माला येतात नि निमूट मरून जातात. हा जो मधल्या काळातला बौद्धिक, आत्मिक प्रवास (‘यातायात’ अधिक योग्य ठरेल नाही?) केला जातो त्याचं मूळ, दोन पायांच्या प्रजातीनं निसर्गवृत्तीवर मात केल्यानं झालेल्या बदलात आहे. इतर सगळे नेमून दिलेला चारा, दाणे, मांस, किडे वगैरे गट्टम करतात, अधुनमधून, मजा म्हणून प्रजा वाढवतात आणि जगण्याचा विषय कट करतात. माणसाला अक्कल ज्यादा झाल्यानं त्यानं यात बदल केले. मग सुधारणा केल्या. आता बदल करण्याच्या पल्याड सगळं गेल्यानं त्यातही वेडाचार करू लागला.

हे जरा कोड्यात होतंय का? विशेष नाही, आपली खाद्यसंस्कृती ते विकृती या प्रवासाचा हा छेदवेध आहे, इतकंच. छेद म्हणजे प्रयोगशाळेत काढतात ना? पातळसर छेद? मग भिंगाखाली धरून त्यात गुणावगुण पाहतात? बिल्कुल तसंच समजा.
‘कच्चं मांस ते कच्चं मांस’ असा पाककलेचा जो प्रवास झाला, त्यावर कितीक खंड आजवर लिहिले गेले. म्या पामरानं काय सांगावं. ज्ञानप्रसारास ‘गुगलमाता’ समर्थ आहे. समाजोन्नती होताना खुबीनं हे अन्न शिजवण्याचं कार्य ‘बेटर हाफां’च्या गळ्यात मारलं गेलं, यावर माझ्या माता भगिनींचं दुमत असणार नाही. पाप बिचाऱ्या अहोरात्र खपतात, झिजतात तेव्हा कठं रोज रोज नवनवं काही रांधून होतं. घरचे ‘वाहवाई’ करून थकतात. ‘‘मी कशी दिसते?’’ या अजरामर प्रश्नाला जसं, ‘‘सुंदर!’’ हे तितकंच अमर उत्तर असतं, तसंच ‘‘कसं झालंय?’’ या प्रश्नालाही, ‘‘उत्तम!’’ हेच फिक्स उत्तर असतं.

क्वचित कुणी धाडसी नरश्रेष्ठ जन्माला येतात, जे न डगमगता थेट सांगतात : ‘‘चांगलं झालंय; पण पुन्हा करू नकोस.’’ मग त्यांचं पुढं काय होतं याची इतिहासानं नोंद ठेवलेली नाही. चिल्लरखुर्दा किती हरपला, काय त्याचं?
मनुष्याला अधिकाची आवड असते. एक किल्ला जिंकला, त्यावर आपला झेंडा फडकला, की क्षणभर उर भरून येतो. लगेच क्षितिजावरचा दुसरा गड खुणावू लागतो. तिथंही आपला झेंडा फडकला, तर किती मौज येईल बरं! अर्थात ही मौज फक्त झेंडाच्या मालकिणीलाच येते. फौजेला नाही. तिला कसंही गारदच व्हायचं असतं.
मग बाई पाककला स्पर्धेत भाग घेतात. स्पर्धेच्या दिवशी त्यांचा हातखंडा पदार्थ करण्याचं योजतं. स्वयंपाकघराचं उद्ध्वस्त धर्मशाळेत रूपांतर होतं. त्यातून जीव बचावून स्पर्धक भांड्यात बसून स्पर्धेला जातो... आणि जर का तो तिथं नापास झाला..तर ‘‘काय हरकत होती माझ्या दुधी भोपळ्याच्या सूपला तिसरं उत्तेजनार्थ बक्षीस द्यायला, म्हणते मी. हं?’’ या वाहत्या गंगेतल्या डुबत्या तक्रारीला घरी कागदी नौकेचं भाग्य लाभतं.

यात कधी कधी एखादा दुर्भागी गड स्वतःहून सापळ्यात चालत येतो. शिकारीला अनवधानानं गुहेत चालत जाण्याची बुद्धी होते. नरो वा कुंजरोवा, अशा धर्मसंकटात पडण्याची वेळ प्रत्यही ओढवते. तुम्ही कुणाकुणाकडे जाता. आता प्रत्येक घरच्या लोकांचा हा पक्का समज असतो, की ‘आमची आई/ आज्जी/ बायको जी आहे ना ती अमकाढमका पदार्थ अप्रतिम बनवते! म्हणजे जगात भारी! अख्ख्या खानदानात हिच्या हातचं ते, हे, ते, जे आहे ना ते निव्वळ बिनतोड हो!’ तुम्ही पाहुणे म्हणून गेल्यावर तो सकलरूचीसंपन्न पदार्थ तुम्हाला काचेच्या राखीव डिशमधून पेश केला जातो. शेवटच्या बॉलवर सिक्सर मारणाऱ्या जावेद मियाँदादकडे प्रेक्षकांनी जसं पाहिलं होतं ना तसे हे घेराव घालून उभे असलेले यजमान कुटुंबीय तुमच्या चेहऱ्याकडे बघत ताणून उभे राहतात. तुम्ही फार जास्त अपेक्षेनं चमचा तोंडात घालता. आणि इथंच घात होतो ना राव! क्षणात तुमची सीतामाई होते. म्हणजे धरती गिळून टाकेल तर बरं अशी अवस्था. चेहरा क्रमाक्रमानं पांढरा, पिवळा, हिरवा, जांभळा होत जातो. उत्साहानं घेतलेला घास, नरडं नामक ‘नो मॅन्स लँड’मध्ये अडकतो. इकडे गालावर लाष्टला आलेला रंग अपेक्ष्योत्सुक प्रेक्षकांना ‘पसंद आहे मुलगा’ या धर्तीवरचा गुलाबी वाटू लागतो. मग ते जबर कॉन्फिडन्सनं विचारतात : ‘‘क्कॉय? मस्त झालाय की नाई?!!’’
आणि मग तुमचा युधिष्ठिर होतो. नरो वा कुंजरो वा स्टाइलनं तुम्ही मान सर्व दिशांना फिरवता आणि समोरच्या धर्मसंकटाला सामोरं जाण्यासाठी मनातल्या मधुसूदनाचा धावा करू लागता. ऐसा होता है ना बॉस ?

असं काही वेळा झालं, की आपण सावध होतो. डास चावू नये म्हणून बाजारात जसे अनेक प्रतिबंधक उपाय उपलब्ध असतात; पण तुमचा म्हणून एक काही तरी डासविरोधक असतो. तसं तुम्ही स्वतःच या खाऊसंकटातून सुटण्याचा स्वतःचा खास मार्ग शोधून काढता. ‘सुगरण’ नामक लाईलाज आजारावर रामबाण उपाय!
कोण म्हणतो रोग फक्त त्रासदायक असतो? तो बेष्टमपैकी उपयुक्त असा दोस्त पण असतो. आता असं बघा, लोक तुम्हाला घरीबिरी बोलावतात, आग्रहानं खाऊ पिऊ घालतात. पण होतं काय, की प्रत्येक घरी आरशासमोर एक हेमामालिनी असते, तशीच चुलीसमोर एक सुगरण! तिच्या हातचा अमुक एक पदार्थ म्हणजे जगात भारी अस्तोय; हे आपण मघाशीच वाचलं. तोच तो गल्लीत जगप्रसिद्ध असलेला पदार्थ असा काठोकाठ वाडगा भरून वाढला जातो. (‘आमच्या दिरांनी आणलेत म्हणून हो खास’, असं म्हणून कशातही सुका मेवा घातला जातो) खाताना तो सुगरण स्पेशल घशाशी येतो. वर आणि ‘‘कसा झालाय?’’ या प्रश्नाला मान डोलावून ‘‘वाऽऽ’’ म्हणावं लागतं. तुमच्या नजरेतल्या मूक आर्जवांकडे साफ दुर्लक्ष करून कढईतला बागुलबुवा पुढं सरसावू लागतो. नेमक्या या क्षणी माझा प्राणप्रिय, जिवलग आजार माझ्या मदतीला धावून येतो. मी लगेच जाहीर करते : ‘‘मला डायबेटिस आहे हो. जास्त नाही खाता येत. नाहीतर मी नक्की घेतलं असतं अजून.’’ हिरमुसली सुगरण पराभूत होतास्ती मागं सरते. मी मनोमन ‘जितम जितम!!’ अशा आरोळया ठोकत वाडग्याचा तळ गाठायच्या संकटाला सामोरी जाते.

तर समजा.. म्हणजे फक्त समजा..की तुम्ही कुणी मला बोलवलं आणि मी ‘मधुमेह,’ असं म्हणून शस्त्र टाकलं, तर खुशाल समजून जा की...!! पाककला ही ‘शस्त्र’ म्हणून घोषित करायला हवीय, या सूचनेकडे अध्यक्षमहोदय कृपया लक्ष देतील काय? लहान मुलांच्या हाती शस्त्र, वाहन इत्यादी देत नाहीत. अपघात होऊ शकतात ना? तसंच सेम एखादी बेसिक गुणवत्ता प्रमाण पदविका आवश्यक घोषित व्हायला हवी. विद्यमान कुणीतरी या प्रश्नाकडे जातीनं किंवा ‘जिभे’नं लक्ष घालतील, तेव्हा घालतील. तोवर ‘दीक्षित’ नामक संरक्षक कवच कामी येतं आहेच. ईश्वर त्यांचं फारच भलं करो.
आजकाल घराबाहेर असताना मी दोनच स्थितीत असते. ‘डाएट’ किंवा ‘मधुमेह’. तुमच्याकडे आल्यावर मी काय सांगेन यावर तुम्ही समजून घ्यालच. सुज्ञास सांगणे न लगे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com