‘खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा पाळा’ (ऋषिना कंधारी)

rishina kandhari
rishina kandhari

रोजचं वेळापत्रक मी अगदी काळजीपूर्वक पाळते. वेळेवर झोपते आणि वेळेवरच उठते. ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. चांगल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली राखणं गरजेचं आहे. मात्र, त्यासाठी जास्त वर्कआऊट करणं, किंवा जास्त डाएटिंग करणं चुकीचं आहे. नुसतं जिमला जाणं पुरेसं नाही. त्यासाठी नेमके व्यायाम निवडणं आणि योग्य तो आहार घेणंही महत्त्वाचं आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आरोग्य ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण, आरोग्य ही सर्वांत मोठी दौलत, आनंद हा सर्वांत मोठा खजिना तर आत्मविश्‍वास हा सर्वांत मोठा मित्र आहे. या सर्व गोष्टींवर माझा विश्‍वास असून, त्यासाठी मी प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक काळजी घेते. दररोजचं वेळापत्रक नित्यनियमानं काळजीपूर्वकच पाळते. वेळेवर झोपते आणि वेळेवरच उठते. ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. चांगल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली राखणं गरजेचं आहे. मात्र, त्यासाठी जास्त वर्कआऊट करणं, किंवा जास्त डाएटिंग करणं चुकीचं आहे. नुसतं जिमला जाणं पुरेसं नाही. त्यासाठी नेमके व्यायाम निवडणं आणि योग्य तो आहार घेणंही महत्त्वाचं आहे.
सकाळी लवकर उठून वॉकला जाणं गरजेचं आहे. कारण, सकाळी-सकाळी शुद्ध अन् ताजी हवा मिळते. त्यामुळं व्यायामही अतिशय चांगल्या प्रकारे होतो. जी माणसं नेहमीच आजारी पडतात, त्याचं कारण म्हणजे त्यांना शुद्ध, ताजी हवा मिळत नाही. त्यासाठी ताज्या हवेमध्ये व्यायाम करणं अन् त्यातून प्रसन्नता मिळवणं हाच माझ्या आरोग्याचा मंत्र आहे. त्यासाठी आपणच आपल्यासाठी जाणीवपूर्वक वेळ देणं गरजेचं आहे.

दिवसातून चार-पाच वेळा आहार
माझं खाणं-पिण अतिशय साधं आहे. डाळ-भात, चपाती-भाजी हा नेहमीचा आहार माझ्यासह कुटुंबीयांचा असतो. मात्र, एकदाच पोटभर जेवण घेत नाही. दिवसातून चार-पाच वेळा थोडं-थोडं खाते. त्याचप्रमाणं फळांचाही माझ्या आहारात भरपूर प्रमाणात समावेश असतो. सीझननुसार मी जास्तीत जास्त प्रमाणात फळं खाते. त्याचप्रमाणं कच्च्या भाज्यांचाही आहारात समावेश असतो. कारण, त्या शरीरासाठी खूपच हेल्दी असतात. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पितेच. आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून नारळ पाणी, लिंबू पाणी; तसंच वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मी नेहमीच घेत असते. उन्हाळ्यामध्ये तर ताकही पिते. कारण, आम्हा कलाकारांना कधी-कधी उन्हामध्येही चित्रीकरण करावं लागतं. त्यामुळं तहान लागते. त्याचप्रमाणं घामाद्वारे शरीरातलं पाणी कमी होतं. त्यामुळं नकळतपणे थकवा येतो. त्यासाठी शरीराला पाण्याची जास्त गरज लागते. ‘व्हिटॅमिन सी’च्या गोळ्याही खाते. कारण, आपल्याला दररोजच संत्री किंवा आवळे उपलब्ध होऊ शकत नाहीत. मात्र, या गोळीमुळं व्हिटॅमिन सीची कमतरता भरून निघते.

आठवड्यातून तीन दिवस मी जिमला जाते. त्यामध्ये वेगवेगळे बॉडी पार्ट करते. एक दिवस कार्डिओ करते. पाच किलोमीटर धावते. त्याचप्रमाणं जिम्नॅस्टिक्सही करते. रोप मल्लखांबचा प्रकार आवर्जून करते. रिंगला लटकणं आणि कोलांटउड्या मारण्याचे व्यायामही करते. हे करतानाच शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दर रविवारी न विसरता मसाज करते. कारण, आम्हा कलाकारांना बारा-बारा तास चित्रीकरण करावं लागतं. त्यामुळं शरीर थकून जातं. त्याला आठवड्यातून एक दिवस आराम मिळणं गरजेचं असतं. त्यावर मसाज हा उत्तम पर्याय आहे. त्यातून टीव्हीवरच्या स्क्रीनवर आपला चेहरा हसरा आणि प्रफुल्लित दिसतो. मसाजमुळं ऍक्‍युप्रेशर पॉइंटवर फोकस राहतो. मसाजमुळं शारीरिक आणि आंतरिक तंदुरुस्ती वाढते. जिमबरोबरच धावणं, किक बॉक्‍सिंग आणि तलवारबाजीही करते. गेल्या महिन्यातच मी घोडेस्वारी शिकले. जिमबरोबरच मी अनेक फिजिकल ऍक्‍टिव्हिटीजही करते.

प्रत्येकानं तंदुरुस्तीसाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. मात्र, अनेकदा मलाही वेळ मिळत नाही. त्यामुळं मी कारमध्येच डंबेल्स ठेवते. चित्रीकरणादरम्यान वेळ मिळतो, त्यावेळी मी माझ्या रूममध्ये जाऊन डंबल्सच्या साह्यानं सेट्‌स मारते. त्याचप्रमाणं रजिस्टंन्सच्या साह्यानंही व्यायाम करते. हेल्दी आणि फिट राहावं, असं आपल्याला वाटत असेल आणि मनात इच्छा असेल, तरच आपल्याला आपल्या शरीरासाठी वेळ मिळतो. कारण, म्हणतात ना...आवड असेल तरच सवड मिळते. मात्र, व्यायाम कधीच आपल्या मनानं करू नका. त्यासाठी योग्य त्या प्रशिक्षकाचं मार्गदर्शन घ्या. कारण, आपल्या शरीरयष्टीनुसार किती किलोचं वजन उचलायचं, नक्की कोणता व्यायाम करायचा, ही गोष्ट प्रशिक्षकच सांगू शकतो. त्यामुळं आपल्या शरीराची हानी होत नाही.

मी नेहमीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. मनामध्ये नकारात्मक विचारही येऊ देत नाही. आमच्या मालिकेच्या सेटवरचे सर्वजण नेहमीच हसतमुख असतात. त्यामुळं माझं मनही नेहमीच आनंदी असतं. त्यामुळं सकारात्मक ऊर्जा मिळते. सेटवर खूपदा टिंगल-टवाळी आणि गप्पागोष्टीही होतात. त्यामुळं आम्ही सर्वजण एकाच परिवारातले सदस्य आहोत, अशी भावना सर्वांमध्ये निर्माण होते.
शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मनःशांतीही गरजेची असते. त्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम, अनुलोम-विलोम करते. त्यामुळं मन प्रसन्न राहतं. थकवाही दूर होतो. व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर स्ट्रेचिंग करते. कारण, व्यायाम केल्यानंतर मसल्स कडक होतात. त्यामुळं त्यांना स्ट्रेच करणं खूपच गरजेचं असतं. आपल्या शरीराला सशक्त अन् फ्लेक्झिबल ठेवण्यासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सकाळी उठल्यानंतर मी लगेचच शुद्ध हवेमध्ये प्राणायाम करते. त्यामुळं शुद्ध हवाच माझ्या शरीरात जाते. त्याचे सकारात्मक परिणामही मला दिवसभर जाणवतात.

‘लुप्त’साठी वजन कमी
‘लुप्त’ या चित्रपटातल्या भूमिकेसाठी मला वजन कमी करावं लागलं. कारण, त्यामध्ये मी सडपातळ दिसणं गरजेचं होतं. जर मी सडपातळ झाली नसते तर ती व्यक्तिरेखा मला शोभली नसती. त्यामुळं मी माझं वजन कमी केलं. खरंतर वजन जास्त वाढवणं किंवा जास्त कमी करणं, ही गोष्टही योग्य नाही. आपल्या उंचीनुसारच आपलं वजन पाहिजे. ते कमी असूनही चालत नाही, वा जास्त असूनही उपयोग नाही. कमी वजनामुळं आपण अशक्त दिसतो, तर जास्त वजनामुळं सुदृढ दिसतो. त्यातच कलाकार स्क्रीनवर आहे त्यापेक्षा जाड दिसतो. त्यामुळं आम्हाला या गोष्टींची नेहमीच काळजी घ्यावी लागते.

सध्या मी सोनी टीव्हीवरच्या ‘इशारों इशारों में’ या मालिकेत राणीची भूमिका साकारत आहे. यामध्ये मी योगीची वहिनी आहे. योगी मला बहीण मानतो. मीही त्याला भाऊ मानते. मी नेहमीच त्याला वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी; तसंच मार्गदर्शकाची भूमिका पार पाडते. तसंच, त्याला वडिलांची बोलणी खावी लागू नयेत म्हणून नेहमीच वाचवते. हे करतानाच मी घरासह बाहेरच्याही जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडते. संपूर्ण कुटुंबावर माझं बारकाईनं लक्ष असते. सुंदर, सर्वांची काळजी घेणारी, सर्वांना मदत करणारी अशी सर्वगुणसंपन्न राणीची भूमिका मी पाडत आहे.

स्वयंपाक स्वतःच
माझं कुटुंबीयांवर बारकाईनं लक्ष असतं. स्वयंपाक मी स्वतःच करते. आहारामध्ये तेल-तूप किती पाहिजे, याची मी विशेष काळजी घेते. आम्ही सर्वजण सॅलड आवर्जून खातो. त्याचप्रमाणं कोणी काय खावं आणि काय खाऊ नये, याकडं माझं लक्ष असतं. आम्ही सर्वजण सकाळी पाच वाजता उठतो. त्यानंतर सर्वजण साडेपाच वाजता वेगवेगळ्या व्यायामासाठी जातात. मीही बागेमध्ये, तर कधी जिममध्ये एक्‍सरसाईज करते. सकाळी नऊ वाजता मी चित्रीकरणासाठी जाते. संध्याकाळी वा कधी रात्री आम्ही सर्वजण पुन्हा घरात एकत्र भेटतो अन् जेवण करतो. विशेष म्हणजे सर्वजण रात्री साडेअकरा वाजता झोपतात. संपूर्ण कुटुंबाचं शारीरिक अन मानसिक स्वास्थ्य जपण्याची भूमिका मी पार पाडते.

फिटनेसची अनेकांकडून प्रेरणा
खरंतर माझा फिटनेसबाबत कोणीही गुरू नाही. मात्र, मी अनेकांकडून प्रेरणा घेते. जे लोक चांगल्या-चांगल्या फिजिकल ऍक्‍टिव्हिटीज करतात, त्यांचं अनुकरण मी करत असते. सेटवरचे अनेक कलाकार; तसंच सुपरस्टार्सकडूनही मला प्रेरणा मिळते. एक महिला ४८ वर्षांची असून तिला दोन मुलं आहेत. तरीही ती इतकी फिट आहे. तिच्याकडूनही मला खूप प्रेरणा मिळते. स्वास्थ्यासाठी जो जागरूक असतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. त्यासाठी चांगलं खा, चांगलं प्या, ऍक्‍टीव अन हेल्दी राहा.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com