‘शरीराशी संवाद साधा’ (रोहन गुजर)

‘शरीराशी संवाद साधा’ (रोहन गुजर)

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. लहानपणापासूनच आपण निरोगी आयुष्यासाठी काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, हे ऐकत असतो. मात्र, जोपर्यंत ते कृतीत आणत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नाही. मग तो व्यायाम असो, डाएट असो वा योगाभ्यास! कृती आणि सातत्य याच्या जोरावरच उत्तम आरोग्य राखता येतं असं मला वाटतं. तुमच्या शरीराशी संवाद साधा, त्याच्या गरजा ओळखा. हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

वेलनेस ही खूप मोठी संकल्पना आहे. मानसिक आणि शारीरिक अवस्थेवर ती अवलंबून आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. मी नवनवीन लोकांना भेटण्याचा, त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक माणूस कुठल्यातरी गोष्टीत तरबेज असतोच. त्यामुळं वैचारिक देवाणघेवाण होते. मला वाचनाची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणं, कुटुंबाला वेळ देणं, मित्रमंडळींसोबत सल्लामसलत करण्यावर माझा भर असतो. या सर्व गोष्टींचा तुमच्या ‘वेलनेस’मध्ये महत्त्वाचा हिस्सा आहे, असं मला वाटतं.
माझ्या मते क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. लहानपणापासूनच आपण निरोगी आयुष्यासाठी काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, हे ऐकत असतो. मात्र, जोपर्यंत ते कृतीत आणत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नाही. मग तो व्यायाम असो, डाएट असो वा योगाभ्यास! कृती आणि सातत्य याच्या जोरावरच उत्तम आरोग्य राखता येतं असं मला वाटतं. तुमच्या शरीराशी संवाद साधा, त्याच्या गरजा ओळखा. हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

बाहेरचं खाणं टाळतो
मी घरातले पदार्थ खातो. बाहेरचं खाणं शक्‍यतो टाळतो. वेळेवर आणि योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. चित्रीकरणाच्या धावपळीत वेळेवर जेवण होतंच असं नाही; पण मी दर दोन तासांनी खाण्यावर भर देतो. गोड आणि तेलकट पदार्थ शक्‍यतो टाळतो. सीझनल फळांवर माझा भर असतो. दिवसातून किमान दोन फळं खाण्याचा माझा प्रयत्न असतो. भरपूर पाणी पिणं महत्त्वाचं आहे. रात्रीचं जेवण सहकुटुंब घेतो. जेवताना टीव्ही आणि मोबाईल लांबच ठेवतो. गप्पा मारत जेवणाचा आनंद लुटण्याची मजा काही औरच. विशेष म्हणजे मी आपल्या परिसरात जे काही पिकतं, ते जास्तीत जास्त खाण्यावर भर देतो. शक्‍यतो सेटवरचे पदार्थ मी खात नाही. घरात बनवलेले पदार्थच नेतो. परदेशीच फळं खाल्ली पाहिजेत, असं काही नाही. आपल्या भागातल्या फळांमध्येही भरपूर जीवनसत्त्वं असतात. आहारामध्ये मी चपाती-भाजी खातो. लहानपणापासून आपल्या घरामध्ये जे बनवलं जातं, तेच खाण्यावर माझा भर असतो. विशेष म्हणजे आहाराविषयी सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात माहिती असते. त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. मात्र, कधीकधी भरपूर माहितीमुळं आपली दिशाभूलही होऊ शकते. त्यामुळं सजग राहणं गरजेचं आहे. गोड आणि तेलकट पदार्थांपासून सर्वांनीच दूर राहणं गरजेचं आहे. मात्र, हे आव्हान पाळणं तसं कठीणच जातं. मी काही दिवस भाकरी जास्त प्रमाणात खात होतो. कारण, गव्हाचे अनेक पदार्थ आपल्या पोटात जातात. अनेकदा मी घरी असलेल्या वस्तूंमधूनच वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यातून मला मानसिक समाधानही मिळतं.
आपलं शरीर न थकता २४ तास काम करतं. मग व्यायामाला का रजा द्यायची. व्यायाम हा आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तो ब्रेक न घेता दररोज करायला हवा. मी आठवड्यातले सहा दिवस तरी व्यायाम करतो. ज्या दिवशी शक्‍य होत नाही, त्या दिवशी शतपावली तरी आवर्जून करतो. सध्या सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी कळतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. मित्रांचं मत आवर्जून घेतो. फिटनेसच्या बाबतीत फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीच माझी गुरू आहे. कारण या क्षेत्रात येण्यापूर्वी माझं वजन खूप जास्त होतं; पण इंडस्ट्रीमुळं मला फिटनेसचं महत्त्व समजलं. आता व्यायाम हाच माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे अनेकदा चित्रीकरणामुळं व्यायामाला वेळ मिळत नाही. तसंच मुंबईतल्या वाहतूक कोंडीमुळंही खूप वेळ जातो. त्यामुळं मी सेटवरच डंबेल्स नेले आहेत. ज्यावेळी वेळ मिळतो, त्यावेळी माझ्या रूममध्ये जाऊन व्यायाम करतो. रोजचा व्यायाम मी सकाळी बारापूर्वीच करतो. साधारणपणे चाळीस मिनिटं ते एक तास माझा व्यायाम चालतो.

मानसिक आरोग्य महत्त्वाचं
खरंतर कोणत्याही गोष्टीची सुरवात मानसिक आरोग्याने होते. समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात; पण त्यावर उपाय आपणच शोधले पाहिजे. सकारात्मक विचारांनीच योग्य तो मार्ग शोधता येतो. त्यामुळं हसा आणि हसवत राहा. प्रेमानं जग जिंकता येतं. मानसिक आरोग्यासाठी मनाची श्रीमंती महत्त्वाची आहे. त्यामुळं आपण आपल्या मनातले विचार इतरांकडं व्यक्त केले पाहिजेत. एखाद्या गोष्टीचा न्यूनगंड मनात न ठेवता मनमोकळेपणानं जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. कुटुंबीयांसह मित्र परिवार आणि नातवाईकांसोबत गप्पा मारल्या, तर आपण मनही हलकं होतं. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ आप्तेष्टांमध्ये घालवा. त्यातून मानसिक आरोग्याचं संतुलन राहील. त्याला व्यायामाची जोडही द्या. त्यामुळं शारीरिक स्वास्थही राखलं जाईल. कारण, मानसिक आरोग्य अन् शारीरिक आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

मी योगाभ्यास शिकलो नाही; पण शिकण्याची इच्छा आहे. लवकरच मी याचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे. कारण, त्यामुळं मनःशांती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणं आपल्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद राहतो. आपल्या शरीराला कधीही थकवा येत नाही. विशेष म्हणजे आपल्यातल्या नकारात्मक गोष्टी निघून जातात आणि आपली वाटचाल सकारात्मकतेच्या दिशेनं सुरू होते. त्यामुळं योगासन, प्राणायाम हीसुद्धा मानसिक शांतीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे.
अभिनय क्षेत्रामध्ये येण्याआधी माझं वजन खूप जास्त होतं. मात्र, या क्षेत्रात आल्यावर उत्तम आरोग्याचं महत्त्व मला पटलं आणि मी नियमित व्यायाम करायला लागलो. त्यामुळं माझं वाढलेलं वजन कमी झालं. विशेष म्हणजे आगामी काळामध्ये वजन कमी अथवा जास्त करण्याची वेळ आली, तर मी नक्कीच ते आव्हान स्वीकारीन. कारण, एखाद्या भूमिकेसाठी वजन कमी-जास्त केल्यानं त्यातून आपला लूक बदलतो. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांनाही आपला बदललेला लूक पाहायला आवडतो.

कुटुंबव्यवस्था, मित्रमैत्रिणींचा वेलनेसवर परिणाम नक्कीच होतो. तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत अनेक गोष्टींवर बोलता, सल्लामसलत करता. त्यानं विचारांची देवाणघेवाण होते. सकारात्मक माणसं आजूबाजूला असतील, तर त्याचा तुमच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम होतो. विशेष म्हणजे आपण व्यायामाविषयी जागरूक असलो, तर आपल्या कुटुंबातले सदस्यही त्याचं अनुकरण करतात. तसंच, मित्रमैत्रिणी व्यायामाबाबत जागरुक असतील, तर आपणही त्याचप्रमाणं वागतो. मी सेटवरही व्यायाम करतो. त्यामुळं सहकलाकारांना माझा हेवा वाटतो. अनेक जण त्या माध्यमातून माझी प्रेरणाही घेतात.

टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीच माझी वेलनेसच्या बाबतीत आदर्श आहे. अनेक कलाकारांचा फिटनेस पाहून मला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळं अभिनयासोबतच फिटनेस किती महत्त्वाचा आहे, हे मला समजलं. ‘स्टार प्रवाह’वरच्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेत मी एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आलो. सच्चा मित्राची भूमिका निभावली. या भूमिकेसाठी माझा व्यायाम माझ्या उपयोगी पडला आणि त्याचं खूप कौतुकही झालं. त्यामुळं फिटनेस आणि वेलनेसबाबत मी खूपच जागरुक आहे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com