‘आहाराचं काटेकोर पालन’ (रूपाली भोसले)

rupali bhosale
rupali bhosale

जेवणाच्या वेळाही खूपच महत्त्वाच्या असतात. तरीही दुपारच्या जेवणाची वेळ मी काटेकोरपणे पाळतेच. ते उत्तम आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. तुम्ही काय खाता, किती खाता अन कोणत्या वेळेला खाता, या गोष्टीही आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यातच आपल्या शरीरात काय जातं, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. मी नेहमीच सकारात्मक असते. देवानं आपल्याला सुंदर आयुष्य दिलं आहे, ते कसं जगायचं हे आपणच ठरवलं पाहिजे. त्यासाठी निरोगी आयुष्य जगणं आणि ते सुंदर करणं आपल्याच हातात आहे.

माझ्या दृष्टीनं वेलनेसची व्याख्या म्हणजे नुसतं शरीरानं हेल्दी राहणं असं नाहीये. मनानंसुद्धा हेल्दी आणि निरोगी राहणं गरजेचं असतं. तुम्ही कितीही जिम केलं, व्यायाम केला तरंच तुमचं शरीर हेल्दी राहतं. आपल्याला पाहिजे तशी शरीरसंपदा तयार होते. मात्र, मन शांत नसलं, तर आपलं शरीरही हेल्दी राहत नाही. त्यासाठी मन आणि शरीर या दोन्हीही गोष्टी सांभाळणं, हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
आरोग्य उत्तर राखण्यासाठी आहाराचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. मी नेहमीच या गोष्टी करते. आपलं दैनंदिन जीवन खूपच धावपळीचं असतं. मी तर अभिनय क्षेत्रामध्ये असल्यानं मला अनेक गोष्टी आणि वेळा पाळाव्या लागतात. चित्रीकरणासाठी वेळेत जाणं गरजेचं असतं. मात्र, रात्री घरी पुन्हा किती वाजता येऊ हे सांगता येत नाही. त्यात जेवणाच्या वेळाही खूपच महत्त्वाच्या असतात. तरीही दुपारच्या जेवणाची वेळ मी काटेकोरपणे पाळतेच. ते उत्तम आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. तुम्ही काय खाता, किती खाता अन कोणत्या वेळेला खाता, या गोष्टीही आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यातच आपल्या शरीरात काय जातं, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यातून मला रिझल्टही दिसतो. आपल्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद असणं हेही गरजेचं आहे. आपण नेहमीच सकारात्मक राहिलं पाहिजे. मी नेहमीच सकारात्मक असते. आयुष्य हे खूपच सुंदर आहे. सोशल मीडियावर माझा हाच हॅशटॅग आहे. देवानं आपल्याला सुंदर आयुष्य दिलं आहे, ते कसं जगायचं हे आपणच ठरवलं पाहिजे. त्यासाठी निरोगी आयुष्य जगणं आणि ते सुंदर करणं आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे.
मी काही ठराविकच पदार्थ खाते असं नाही. मला पुरणपोळी, मोदकही आवडतात. त्याचप्रमाणं घरात बनवलेले सर्वच पदार्थ खायचे असल्यास मी ते मनापासून खाते. विशेष म्हणजे मी घरातला डबाच सेटवर घेऊन जाते. बाहेरचे पदार्थ खाणं टाळते. सकाळपासून रात्रीपर्यंतचं सर्व जेवण माझ्या बास्केटमध्ये असतं. मी पुरणपोळी सणवारालाच खाते. मात्र, चपाती खात नाही. भाकरी खाते. पालेभाज्या, चिकन, फिश खाते. मटण खात नाही. कारण, ते रेडमीट आहे. एखादे वेळी कधी वाटलं तर खाते. मात्र, दुसऱ्या दिवशी एक्‍स्ट्रा जिम आणि सूर्यनमस्कार यांना प्राधान्य देते. मी खूप गोड-गोड खाणारी नाहीये. ज्या गोष्टी टाळाव्या वाटतात, त्या गोष्टी मी टाळतेच. साखरेऐवजी गूळ खाते. पालेभाज्यांचे सर्वच प्रकार खाते. ज्युसपेक्षा फळं खाणं आवडतं. कोणतेही पॅकिंगचे ज्युस पित नाही. त्यापेक्षा फळंच खूप आवडतात. त्यामुळं दात आणि चेहऱ्याचाही व्यायाम होतो. ज्युस पिला की संपतो. मात्र, फळं ३२ वेळा चावून खाणंच आवडतं. मला पाणी खूपच प्यावं लागत. मी चित्रीकरणासाठी जाते, त्यावेळी गाडीत चार बाटल्या असतात. त्या घरी येताना रिकाम्या असतात. म्हणजे दिवसभरात मी जवळपास चार ते पाच लिटर पाणी पिते. त्यामुळं बॉडी हायड्रेटेड राहते. हल्ली मुलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. चेहरा क्‍लीन राहत नाही. त्याचं कारण पाणी कमी पिणं असंच असतं. जास्त पाणी प्यायल्यानं आपल्या शरीरात नको असलेल्या गोष्टी घामाद्वारे निघून जातात.

व्यायाम शक्यतो पहाटेच
मी व्यायामाला सकाळी साडेपाचलाच सुरवात करते. ती वेळ मला खूप आवडते. त्यामुळं लवकर उठणं होतं आणि हवेशीर वातावरणात व्यायाम करता येतो. ‘बिगबॉस’च्या घरात मी लवकर उठायचे. नंतर इतर गोष्टींना सुरवात करायचे. त्यामुळं लवकर उठायची सवय लागते. समजा एखाद्या दिवशी रात्री उशीर झाला, तर दुसऱ्या दिवशी दहा-अकराला का होईना व्यायाम करते. चोवीस तासांमधला अर्धा तास मी माझ्यासाठी काढते. असाच वेळ सर्वांनी आपल्यासाठी काढायला हवा. रविवार सोडून सहा दिवस मी व्यायाम करते. जिममध्ये मला कार्डिओ आवडत नाही. मात्र, वेट ट्रेनिंग खूप करते. त्यामध्ये फंक्‍शनल ट्रेनिंगही आवडतं. एकच व्यायाम करणं कंटाळवाणं वाटतं. त्यामुळं वेगवेगळे प्रकार करते. कधी-कधी आउटडोअर व्यायामाला प्राधान्य देते. कधी बीचला जाऊन एक्‍सरसाईज करते, तर कधी रस्त्यावर जॉगिंगही करते. ते वातावरणही मला छान वाटतं. व्यायामात दर आठवड्याला बदल करते. सूर्यनमस्कार, अष्टांग योग या गोष्टीही आवडतात. या गोष्टी जिममध्ये करते. आपण इतर गोष्टी अपटूडेट ठेवतो, तशाच पद्धतीनं शरीरही अपटूडेट ठेवणं गरजेचं आहे. त्यातून आपण उर्वरित आयुष्य नक्कीच चांगलं जगू शकतो. मला खरंतर व्यायामाबाबत कोणीही मार्गदर्शन केलं नाही. झिरो फिगर कधीच डोक्‍यात नव्हती. मला फक्त मन आणि शरीर हेल्दी, आनंदी ठेवायला आवडतं. त्यासाठी मी प्रयत्न करतेय.

छोट्या गोष्टींतून आनंद
मानसिक आरोग्यासाठी खूष राहते. छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद शोधते. आठ तास झोप घेते. ती शांत लागते. त्यामुळं मानसिकता चांगली राहते. कितीही संकटं आली, तरी मी त्यांचा सामना करते. या गोष्टींकडं सकारात्मक रितीनं पाहते. त्यामुळं माझं मन नेहमीच सकारात्मक असतं. त्यामुळं झोप खूप छान लागते. मन अस्थिर असतं, त्यावेळी मेडिटेशन करते आणि स्वतःही शांत राहते. मुळात हसत राहणं गरजेचं असतं. हसत राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मी नेहमीच आनंदी राहते; तसंच डिप्रेशनपासून खूप दूर राहते. माझ्या दृष्टीनं सकारात्मकता खूप गरजेची आहे. त्यामुळं आपल्या आयुष्याचा प्रवास खूप चांगला होतो.
मी योगासनांसह मेडिटेशन आणि सूर्यनमस्कारही करते. अष्टांग योगाही करते. यातली सर्वच आसनं मला आवडतात. त्यामुळं आपलं शरीर लवचिक होतं. अभिनय क्षेत्रामध्ये या गोष्टी खूपच गरजेच्या असतात. कारण, अभिनयामध्ये कधी कोणतं पात्र करावं लागेल हे सांगता येत नाही. त्यासाठी आपलं शरीर त्याप्रमाणं असणं गरजेचं असतं. कधी डान्स, तर कधी फाइट असतात. या गोष्टींसाठी योगासनांचा खूपच फायदा होतो. सकारात्मकता येते. मेडिटेशन करताना आपल्या डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश येतो. आपण काहीही इमॅजिन करू शकतो.

वजन कमी केलं
‘बडी दूर से आये है’ या शोच्या वेळेस वजन कमी केलं होतं. त्यावेळी मी यूकेवरून आले होते. माझं ७० किलो वजन झालं होतं. मला सुमित राघवनच्या अपोझिट काम करायचं होतं. त्यावेळी मी डाएट आणि एक्‍सरसाईज करून ४९ किलोपर्यंत वजन केलं. त्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागले. हेल्दी आणि बारीकही झाले. या गोष्टी कलाकारांच्या आयुष्यात नेहमीच येतात. वजन कमी किंवा जास्त करणं ही गोष्ट अवघड नाहीये. मात्र, त्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी मी उकडलेल्या भाज्या खाते. भात खाणं बंद केलं आहे. आता सूप आणि सॅलिड खाते. मीठ काही प्रमाणात कमी, तर कधी-कधी बंद केलं. गोड पदार्थांवर माझी बारीक नजर असते. जगात कुठंही असले, तरी रात्रीचं जेवण आठच्या आतच घेते. त्यामुळे सकाळी चार वाजता उठले, तरी काही अडचण येत नाही. ॲसिडिटी होत नाही. दर दोन तासांनी मी काही ना काही खातच असते. ते खूपच गरजेचं असतं. त्यासाठी अरबटचरबट काही खात नाही. ज्या गोष्टी हेल्दी असतात, त्या गोष्टी आवर्जून खातेच. वजन वाढवायचं असलं, तरी अनेक गोष्टी मी पाळते. त्यासाठी डाएट आणि व्यायाम या गोष्टींचा संगम मी करते. त्यातून शेवटी चांगले रिझल्ट मिळतात.

कुटुंबावर व्यायामाचा चांगला परिणाम होतो. कधी-कधी खाण्यापिण्याबाबत आईबाबा बोलतात; पण मी डिसिप्लीन पाळते. घरीही वेळेत जेवते. त्याचा चांगला परिणाम कुटुंबीयांवर होतो. आई तर वेळी-अवेळी जेवायची; पण हेल्थ बेनिफिट पाहिल्यानंतर आता ती माझ्यासारखाच आहार घेते. तिलाही ते चांगलं वाटतं. आता ती सकाळी न चुकता नाश्‍ता करते; तसंच दुपारचं आणि रात्रीचं जेवणही वेळेवर घेते. माझ्या आरोग्याचा रिझल्ट पाहून मित्र-मैत्रिणीही हेल्दी लाइफस्टाईल पाळतात. वेगळे वर्कआऊट मी करत असेन, तर मित्रही त्याचप्रमाणं बदल करतात. जी माणसं स्वतःची काळजी घेतात, शरीराला आरोग्यदायी ठेवतात, ते सर्वजण माझ्या व्यायामासाठी आदर्श आहेत. प्रत्येक जण काही ना काही संघर्ष करतो. प्रत्येकाकडं वेळ असतो. त्यासाठी अर्धा तास तरी आपल्या स्वतःसाठी देणं गरजेचं आहे आणि जो स्वतःसाठी वेळ काढतो, तो माझ्यासाठी खूपच आदर्श आहे. आपल्याला हेल्दी आणि आनंदी जगायचं आहे, हा विचार जो करतो, तो माझ्यासाठी आदर्श आहे. कारण, त्यांच्यामुळं इतरांना प्रेरणा मिळते. सध्याची पिढी लगेच थकते. जेवणही मोबाईलवरून मागवते. हॉटेलपर्यंत जायला कंटाळा येतो. ही लाइफस्टाइल खूपच वाईट आहे. त्यामुळं स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळं तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com