स‘चित्र’ आठवण (डॉ. ऋता लिमये)

dr ruta limaye
dr ruta limaye

‘सकाळ चित्रकला स्पर्धे’नं अनेकांच्या आयुष्यात रंग भरले. नुकतीच या स्पर्धेची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली. या स्पर्धेनं अनेकांचं रंगरेषांचं भावविश्व समृद्ध केलं, तशी अनेकांच्या करिअरची दिशाही या स्पर्धेमुळे बदलली. या स्पर्धेची ही अशीच एक आठवण.

सकाळचीच वेळ. ‘सकाळ’मधल्या चित्रकला स्पर्धेचं आवाहन मी वाचत होते. माझ्या शेजारीच माझा मुलगा मिहीर अभ्यास करत होता. यंदा तो अकरावीत आहे. मी या स्पर्धेत कसा भाग घेतला, बक्षिस कसं मिळालं अशा आठवणी मी त्याला सांगत होते. या स्पर्धेमुळं आठवणींचा कोश समृद्ध झाला आहे. त्यामुळं ती आठवण आजच्या बालचित्रकारांना नक्की सांगायला हवी.

वर्ष १९८३. मी होते इयत्ता पाचवीत. तेव्हाची ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ पिंपरीतल्या माझ्या एचए स्कूलच्या (हिंदुस्थान अँटिबायोटिक स्कूल) पटांगणात होती. आम्ही संत तुकारामनगरमध्ये राहत असल्यानं एचएची दगडी भिंत, कंपाऊंड वॉल ओलांडून उड्या मारत, दंगामस्ती करत, कधी आईच्या मैत्रिणीबरोबर आम्हा मुला-मुलींना शाळा गाठावी लागे. (तेव्हा स्कूलबस/ रिक्षा जवळपास नव्हत्या.) त्या दिवशी रविवार असल्यानं आई-बाबांबरोबर मी स्पर्धेसाठी उपस्थित होते. आसपासच्या अनेक शाळांतल्या मुला-मुलींना घेऊन त्यांचे पालकही सहभागी झाले होते. या सर्वांना त्यांच्या त्यांच्या गटांनुसार प्रत्येक शाळेतल्या चित्रकला शिक्षकांनी शिस्तबद्धपणे जमिनीवर बसवलं. सकाळची प्रसन्न वेळ. उबदार, मऊ उन्हं अंगावर येत होती. गार वारा सुटला होता. गुणे सरांनी आमच्या हाती एक एक ‘ड्रॉईंग पेपर’ दिला. उजव्या कोपऱ्यात रिकामा कॉलममध्ये आमचं नाव/ शाळा/ इयत्ता-तुकडी अशी सर्व माहिती भरून घेतली. पाचएक मिनिटांनी बेल वाजली- सूचना झाली. आयत्या वेळचा विषय होता : ‘नदीकाठ’. आम्ही सारेच गप्प! चुळबूळ सुरू झाली. नेमकं काय चित्र काढायचं, काहीच सुचेना. शेजारचा काय काढतो आहे, याकडेच साऱ्यांचं लक्ष होतं. बहुतेक जणांनी शाळेत गिरवलेला चित्र देखावा म्हणजे डोंगर, नदी, ढग, पक्षी, वाट, झाड, झोपडी असं. अनेकांनी चित्रं काढून दिली, तरी माझा कागद कोराच होता. ते पाहून चित्रकलेचे शिक्षक गुणे सर यांनी बजावलं : ‘‘तुला जे सुचेल, तुझ्या मनात असेल तसं काढ; पण चित्र काढ. कोरा कागद मी घेणार नाही. द्यायचा नाही. घंटा होईल. लवकर सुरवात कर. आटप.’’ अखेरची २०-२५ मिनिटं होती. कल्पनाशक्तीला भरपूर वाव असलेला हा विषय होता. नदी-ओढा, धबधबा, आजूबाजूचा परिसर मी मनात आणला. ‘डायरेक्‍ट’ कॅमल पेटीतल्या बारा रंगीत खडूंनी उभ्या-आडव्या रेघांनी, भराभर रंग फासत कसंबसं आखलेल्या चौकोनात चित्र पूर्ण करून देऊनही टाकलं. चित्र पूर्ण केलं आणि आई-बाबांकडे धाव घेतली. मिहीरला मी जे जे प्रश्‍न स्पर्धेनंतर विचारायचे, तेच प्रश्‍न माझ्या आईनं मलाही विचारले होते, याची मला आठवण झाली. ‘चित्र नीट रंगवलंस का?’ या आईच्या प्रश्नाला माझं उत्तरही तसंच होतं : ‘‘हो गं आईऽऽ.’’ नेहमीप्रमाणं माझा नाराजीचा सूर पाहून ‘बाबा’ मला समजावतो : ‘‘हे बघ बेटा! स्पर्धा कोणतीही असो - तू भाग घेणं महत्त्वाचं. जिंकणं, हरणं, बक्षिस मिळणं- हे सारं नंतरच. पटतंय ना तुला!’’ माझा बाबा मला हाच सल्ला समजुतीत (सूचना न करता) प्रेमानं देत आहे अजूनही.
***

दिवाळीचे दिवस. सकाळी सकाळीच ‘रविवार सकाळ’ घरी आला. नेहमीप्रमाणं बाबानं उत्सुकतेनं तो उघडला. ठळक मोठ्या अक्षरात- चौकटीत मजकूर होता : ‘चित्रात बहरलेला नदीकाठ।’ परीक्षक होते प्रसिद्ध चित्रकार भय्यासाहेब ओंकार. त्यांनी माझ्या माझ्या चित्राबद्दल लिहिलं होतं : ‘मध्यम गटातले दुसरे बक्षीस ऋताला. तिच्या चित्रात आकाश नाही. चित्र सुरू झाले तेच पुलाच्या कठड्यापासून. पुलाच्या कमानी आणि पाण्यात त्यांचे सुळक्‍यासारखे दिसणारे खालचे भाग. हे चित्र तिच्या सूक्ष्म निरीक्षणाची साक्ष देते.’ त्यांची ही शाबासकी, अभिप्राय माझ्यासाठी फार मोलाचा होता. ऐन दिवाळीत ‘सकाळ’नं मला दिलेली ही पहिली ‘भेट’ मी अजून जपून ठेवली आहे. माझ्या आई-बाबांनी, नातलगांनी, मित्र-मैत्रिणींनी माझं केलेलं कौतुक आणि अभिनंदन यांमुळे माझ्यात चित्रकलेची आवड निर्माण झाली. पुढे ती वृद्धिंगत होत गेली. एचए स्कूलमध्ये गुणेसरांनी तर मोठ्या फलकावर माझं नाव लिहिलं होतं : ‘ऋता इनामदार, इ. ५ वी. इनपर हमें नाज है।’... हे अभिनंदनाचे शब्द मला सतत प्रेरणा देणारे ठरले आहेत.
पुढे कॅमल रंग स्पर्धेतल्या मेरीट ॲवार्डनं त्यात भरच टाकली. यातूनच मला रंगरेषांची किमया लक्षात आली, निसर्गाचं वेगळेपण जास्त जवळचं वाटू लागलं. निसर्गासारखा श्रेष्ठ गुरू नाही, हे लक्षात आलं. चित्रकलेमुळं ‘हुबेहूब - रेखाटन’ ही कला माझ्या अंगी हळूहळू विकसित होऊ लागली.

एचए स्कूल, पुढं नू. म. वि. कनिष्ठ महाविद्यालय, त्यानंतर स. प. महाविद्यालयात बीएस्सी, मॉडर्न महाविद्यालयात एमएस्सी या शैक्षणिक प्रवासात चित्रकलेची ही आवड फार उपयोगी पडली. माझ्या हातांनी काढलेल्या ‘डायग्रॅम्स’ म्हणजे रेखाचित्रांमुळे पुढील बॅचसाठी माझी सारी जर्नल्स/ नोटस्‌/ वह्या सर्वोत्कृष्ट ठरल्या. प्राध्यापकांनी ‘नमुना’ म्हणून ठेवून घेतल्या.

नंतर एक ‘रिसर्च स्टुडंट’ म्हणून मी पुण्यातल्या नामवंत आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (एआरआय) सुरुवात केली. डॉ. कुमारन, डॉ. राजशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली मी लग्नानंतरही पीएचडी पूर्ण केली. यावेळी माहेर, सासरच्या वडीलधाऱ्यांची आणि यजमान भरत यांची मला मोलाची साथ मिळाली, प्रोत्साहन मिळालं. मिहीर खूपच लहान होता. घरात सासू नसल्यानं त्याची जबाबदारी आई-वडिलांनी उचलली... आनंदानं. नंतर सीएसआयआर/ डीएसटीतर्फे यंग वुमन सायंटिस्ट म्हणून मी विविध प्रोजेक्‍टवर काम करत राहिले. मायक्रोस्कोपिक माध्यमातून दिसणारे अनेक सूक्ष्म भाग- जे फोटोग्राफीतही पकडता येत नाहीत, तिथं हळुवार ‘स्केच’ ड्राईंग स्वरूपात मी साकारू शकते; साकारले ते केवळ चित्रकलेच्या माध्यमातून.
संशोधन हा अखंड न संपणारा, खडतर प्रवास आहे. तिथं चिकाटीच हवी. ती हळूहळू विकसित होत गेली. केवळ प्रसिद्धीसाठी काम करणं, हा माझा स्वभाव नाही. माझ्या प्रामाणिक प्रयोगातून केलेल्या कामाची नोंद घेतली गेली. ‘सायन्स जर्नल्स, करंट सायन्स, क्वार्टरनरी इंटरनॅशनल रिसर्च यांमधून ३५ एक शोधनिबंधांना देश-विदेशातून प्रसिद्धी मिळाली. संदर्भ म्हणून अनेकांनी त्याचा उपयोग केला आहे. हा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा. अभिमानाचा. त्यामुळेच कॉन्फरन्सेस, प्रेझेंटेशन यांच्यासाठी मला बोलावण्यात आलं. केन्स (ऑस्ट्रिलिया), बॉन (जर्मनी), सिंगापूर/ फ्रान्स/ स्वित्झर्लंड/ चीन, जपान इथल्या ज्येष्ठ संशोधकांनी माझ्या कामाला, मला विशेष ‘दाद’ दिली आहे. आज स्वतंत्ररित्या मी अर्थसायन्स, पर्यावरणाशी संबंधित संशोधन करण्यात स्वतःला गुंतवून घेतलं आहे. हे सर्व करताना लीला पूनावाला फाऊंडेशन, सर रतन टाटा ट्रस्ट, आघारकर संस्था आणि किती तरी ज्येष्ठ मार्गदर्शक गुरूंचं वेळोवेळी मला संपूर्ण सहकार्य लाभलं. ‘संशोधन’ हे माझ्या आवडीचं क्षेत्र आहे. इथं ‘रिटायरमेंट’ नाही. रोजच्या वातावरणात घडणारा बदल, नैसर्गिक आपत्ती, संकट या साऱ्यांतून ‘सॅंपल्स’ गोळा करणं, माहिती शोधणं सुरू आहे. वीस वर्षांच्या अखंड संशोधनातून बरे-वाईट अनुभव मिळाले. खूप काही शिकता आलं. सध्या मी घरून ऑनलाइन मी इंडिपेंडंट रिसर्चर म्हणून काम करत आहे.

हे सगळं सांगायची गोष्ट इतकीच, की या सगळ्याची पायाभरणी झाली ती ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेतून. ही स्पर्धा हा माझ्या यशाचा पाया आहे. माझ्यात उत्कृष्ट रेखाटनाचे गुण विकसित झाले, ते या चित्रकला स्पर्धेमुळे. माझ्या वाटचालीचं सारं श्रेय या स्पर्धेला. या स्पर्धेमुळे आयुष्यात वेगळ्या रंगांचा प्रवेश झाला. बघताबघता मनःपटलावर अनेक रंगांचे फटकारे वाढत गेले आणि एक सुरेख ‘करिअरचित्र’ तयार झालं. म्हणूनच ही स्पर्धा कायमच माझ्या स्मरणात राहणार आहे...अनेकांच्या आयुष्यात आहे तशीच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com