सरसोती (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असेल तर त्या कामात कुठलाच अडथळा येऊ शकत नाही. अगदी शारीरिक विकलांगतेवरही मात करता येते. याचं एक उदाहरण म्हणजे अनुराधा गानू. आपण समाजाचं देणं लागतो, आपल्यावर ज्यांनी संस्कार केले आहेत ते संस्कार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणं हे आपलं आद्य काम असतं ही त्यांची भूमिका. त्यांच्या याच कामाविषयी...

सुदेश हिंगलासपूरकर यांचा सकाळी सकाळीच फोन आला.
‘‘तू किती वाजेपर्यंत पोचशील?’’ त्यांनी विचारलं.
‘‘अकरापर्यंत पोचेन.’’
नवी मुंबईहून पार्ल्याचा रस्ता धरला. ट्रॅफिकमधून रस्ता काढत काढत ठरलेल्या ठिकाणी आम्ही पार्ल्याला भेटलो. सुदेश सर आणि त्यांच्या पत्नी शोभाताई मॅजेस्टिक बुक डेपोजवळ माझी वाट पाहत होत्या. मला पाहताच शोभाताई उत्साहानं ओरडल्या : ‘‘सुदेश, तो पाहा संदीप आला.’’
कवी-लेखकचळवळीत काम करणाऱ्या अनेकांचं आपल्या सर्व परिवाराशी नातं टिकवून ठेवण्यात शोभाताईंचा मोलाचा वाटा. मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये काही अंक पाहायचे होते. अनिल कोठावळे यांच्या प्रकृतीची चौकशी करायची होती. हे झाल्यावर ज्यांच्याकडे जायचं होतं त्यांच्याकडे आम्ही निघालो. आपल्याला कुणाकडे जायचं आहे, ते काय करतात आणि त्यांचं वेगळेपण काय आहे, याची पुसटशी कल्पना मला सुदेश सरांनी अगोदर दिली होतीच. घराची बेल वाजवली. व्हीलचेअरवर असलेल्या बाईंनी दरवाजा उघडला.

आम्ही आत गेलो, बसलो. गप्पाटप्पा सुरू झाल्या, सुदेश सरांनी माझा परिचय करून दिला आणि ज्या विषयासंदर्भात ही भेट होत होती त्या विषयाला सुदेश सरांनी सुरवातही केली. मी ज्या दांपत्याला इथं भेटलो त्या दांपत्याचं नाव अनुराधा गानू आणि वामन गानू. दोघंही उच्चशिक्षित, चार चार पदव्या मिळवलेले. अनुराधाताई या अमेरिकेत सीए होत्या आणि वामन एक कंपनी चालवतात. दोघांनी अमेरिकेत खूप नावलौकिक मिळवला. आपल्या मातीसाठी काहीतरी करावं या उद्देशानं अमेरिकास्थित भारतीयांच्या माध्यमातून भारतातल्या अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी मदत केली. अनुराधाताई यांना मराठी साहित्याची खूप आवड. मराठी भाषेवर अतिशय प्रेम. त्यांचं वाचनही दांडगं. त्यांचा हात लिहिता. त्यांच्याकडे संघटनकौशल्यही आहे.
अनुराधाताई म्हणाल्या : ‘‘मी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं सगळं साहित्य वाचलं. त्यांच्यावर इतरांनी लिहिलेली पुस्तकंही बरीच वाचली. त्यात आशालता कांबळेलिखित ‘बहिणाबाईची कविता : एक आकलन’ हेही पुस्तक माझ्या वाचनात आलं. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहिणाबाईंनी आयुष्यात खूप काही भोगलं आणि जे भोगलं ते शब्दबद्ध करून ठेवलं. हे खूपच मोठं काम त्यांनी केलं; पण हे मोठं काम लोकांपर्यंत मात्र पाहिजे त्या प्रमाणात गेलं नाही. बहिणाबाई म्हटलं की ‘अरे संसार संसार’च्या पलीकडे लोकांना फारसं माहीत नसतं. बहिणाबाईंच्या प्रतिभेच्या कवयित्री मराठीत फार कमी. बहिणाबाई प्रत्येकाला समजाव्यात यासाठी मीही काही लेखन केलं; पण ते फार अपुरं होतं. त्याही पलीकडे जाऊन बहिणाबाईंचं वेगळेपण पुढं यायला पाहिजे होतं. ‘श्‍यामची आई’ या चित्रपटाच्या माध्यमातून सानेगुरुजी जसे सगळ्यांसमोर आले तशा बहिणाबाईही सगळ्यांसमोर यायला हव्यात या उद्देशानं मी ‘माझी माय सरसोती’ हे बहिणाबाईंवरचं नाटक लिहिलं. केवळ नाटक बघून तो संदेश लोकांना कितपत समजेल, या आशंकेनं नृत्यनाटिका ही संकल्पना पुढं आली आणि तिचा पहिला प्रयोग अमेरिकेत करण्यात आला. त्याला खूप प्रतिसाद मिळाला. त्या पैशातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली होती.

नाना व्याधींनी त्रस्त असणाऱ्या अनुराधाताई, आपल्याला कुठलाही आजार नाही, अशा पद्धतीनं व्हीलचेअरवरून वावरत होत्या. उत्साहानं त्यांच्या कामाविषयी सांगत होत्या.
आमचं बोलणं सुरू असतानाच त्या किचनमध्ये काहीतरी करण्यासाठी गेल्या. त्या किचनमध्ये गेल्याचं पाहून शोभाताईंना राहवलं नाही. त्याही उठल्या आणि त्यांच्या मागोमाग गेल्या. शोभाताईंनी त्यांना विनंती केली : ‘‘तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारा, किचनचं सगळं काम मी पाहते.’’ तरीही त्या ऐकेनात. सुदेश सरांनी सांगितल्यावर त्या येऊन आमच्यासोबत गप्पा मारायला लागल्या. अनुराधाताई सध्या काही महिन्यांसाठी भारतात आल्या आहेत.
‘माझी माय सरसोती’ हे नाटक समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी अनुराधाताईंचे पती वामनराव यांनी मोठाच पुढाकार घेतला. काही शो झाले आणि त्या शोंच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम हराळी इथल्या शेतकऱ्यांसाठीच्या प्रकल्पाला देण्यात आली.
हराळी हे किल्लारी परिसरातल्या भूकंपग्रस्तांसाठी पुन्हा वसवलेलं गाव होय.
अनुराधाताई म्हणाल्या : ‘‘शेतकरी कुटुंबातल्या बहिणाबाईंचं लेखन बहुजनांसाठी होतं, शेतकऱ्यांसाठी होतं. त्या पार्श्वभूमीवर बहिणाबाईंवर लिहिलेल्या या नाटकातून जी काही रक्कम मिळेल ती शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यायची या हेतूनंच हराळी हे गाव आम्ही निवडलं. यापूर्वीही हराळीतल्या शाळेच्या प्रकल्पासाठी
सव्वाशे हजार डॉलर जमा करून ही रक्कम त्या प्रकल्पाला सुपूर्द करण्यात अनुराधाताईंनी पुढाकार घेतला होता. त्या रकमेपैकी पस्तीस हजार डॉलरची रक्कम ही एकट्या अनुराधाताईंनी दिली होती. अनुराधाताई विविध आजारांनी, व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यांचं वावरणं आता बहुतकरून व्हीलचेअरवरूनच असतं. असं असलं तरीही ‘काहीतरी करायचं’ ही भावना त्यांच्या मनात कायम आहे.

दरम्यानच्या काळात शोभाताईंनी किचनमधलं काम आवरलं आणि आम्हा तिघांची ताटं वाढली होती. जेवताना पुन्हा गप्पा सुरू झाल्या.
शोभाताईंनी स्वतःला वाढून घेतलं नव्हतं. मी त्यांना विचारलं.
: ‘‘तुम्ही नाही का जेवणार?
त्या म्हणाल्या : ‘‘आज गुरुवार. माझा उपास आहे.’’
नंतर सुदेश सरांच्या ताटातलं थोडंसं काहीतरी - उपासाला चालणारं - त्यांनी खाल्लं.
आमचा विषय पुढं पुढं जात होता आणि त्यातून नवनवी माहिती कळत होती. अनुराधाताईंनी यापूर्वीही असे काही वेगळे प्रयोग केले होते. त्या प्रयोगांतून सामाजिक संदेशही पोचवला गेला होता आणि आणि त्या प्रयोगांतून गोळा झालेली रक्कम गरिबांचे अश्रू पुसण्यासाठीही वापरण्यात आली होती. यातून उभारी घेऊनच त्या बहिणाबाईंकडे वळल्या. बहिणाबाईंवर त्यांनी संशोधन केलं. बहिणाबाईंचं काम सगळ्यांसमोर आलं पाहिजे असं त्यांना तीव्रतेनं वाटू लागलं. हे काम
अमेरिकेतल्या शोनंतर भारतातही गावोगावी जाऊन दाखवण्याच्या तयारीत त्या होत्या. त्याचा पहिला शो आमच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी पार्ल्याच्या ‘दीनानाथ’मध्ये आयोजिण्यात आला होता. त्यांनी आम्हा तिघांना निमंत्रण दिलं.

सर्वसंपन्न असलेल्या आणि त्यातही अनेक आजारांमधून जात असलेल्या स्त्रीला लोकांसाठी काहीतरी करण्याची धडपड का करावीशी वाटत होती, एवढं काम करण्याची प्रेरणा, समाजाविषयीची तळमळ कुठून आली? असे प्रश्न पडले.
लोकांसाठी काहीतरी करण्याचा हेतू मनात ठेवून काम केलं तर कुठलाही विषय सहजरीत्या मार्गी लावता येऊ शकतो, असंच मला अनुराधाताईंच्या कामाकडं पाहून वाटलं आणि माझ्या प्रश्नांची उत्तरंही मला मिळाली.
गप्पांमध्ये सहभागी होत वामनराव म्हणाले : ‘‘ ‘तुझी तब्येत बरी नाही...तू काळजी घे...तू आराम केला पाहिजेस...’ असं आम्ही तिला कितीही सांगितलं तरी ती आमचं फारसं मनावर घेत नाही. परवा ती आजारी असतानाही सलग अनेक दिवस नाटकाच्या सरावासाठी स्वत: उपस्थित राहून त्यात बदल सुचवायची.’’
यावर अनुराधाताई मध्येच म्हणाल्या : ‘‘मी कुठं आहे आजारी? मला जे करायचं आहे ते मी करत राहीन. तुम्ही सगळे माझ्यासोबत राहा म्हणजे झालं.’’
***
‘उद्या नाटकाला येतो’, असं सांगून आम्ही गानू दांपत्याचा निरोप घेतला. अनुराधाताईंनी सांगितलेल्या काही गोष्टी माझ्या पक्क्या लक्षात राहिल्या. पहिली गोष्ट म्हणजे, जगताना खचून गेलेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात अनुराधाताईंना बहिणाबाईंचं साहित्य, त्यांचं जगणं रुजवायचं आहे. दुसरी गोष्ट ही की, अमेरिका ही जरी अनुराधाताईंची कर्मभूमी असली तरी भारत ही त्यांची अर्थातच जन्मभूमी आहे आणि सानेगुरुजींच्या ‘श्‍यामच्या आई’चे गाढ संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत.
निरोपापूर्वीच्या गप्पांदरम्यान अनुराधाताईंनी सांगितलेला एक प्रसंग आठवला.
अनुराधाताई म्हणाल्या होत्या : ‘‘एकदा श्‍याम, त्याच्या पायाला माती लागली तेव्हा ‘पदरानं पूस’ म्हणून आईकडे आग्रह धरतो. त्यावर आई त्याला म्हणते, ‘पाय मातीनं अस्वच्छ झाला म्हणून तू पायाची जशी काळजी घेतोस तशीच काळजी मनाचीही घे. मनसुद्धा स्वच्छ आणि साफ राहील हे पाहा.’ हा विचार मनात ठेवूनच, मी माझ्याकडे जे काही आहे त्यातला बहुतांश भाग हा स्वच्छ मनानं इतरांना देण्यासाठी पुढाकार घेतला. शेवटपर्यंत मला लोकांच्या उपयोगी पडता यावं असं मला वाटतं.’’
त्या ज्या बोलत होत्या, त्या ज्या सांगत होत्या आणि त्या ज्या करू पाहत होत्या ते माझ्या दृष्टीनं तसं अवघड काम होतं; पण त्यांनी ते केलं होतं. हराळी या गावाला किंवा कोकणातल्या मांगवली या गावाला जेवढी रक्कम त्यांनी देण्याचं कबूल केलं होतं तेवढी रक्कम त्यांनी त्या गावाला दिली. म्हणजे एकेका वेळी लोककल्याणासाठी सव्वाशे हजार डॉलरची मदत मिळवून देणं हे काही सोपं काम नव्हतं; पण ते त्यांनी करून दाखवलं.
***

परतीच्या वाटेवर मी शोभाताईंना म्हणालो : ‘‘शोभाताई, आपण महिन्यातून एखाद्या वेळी एखाद्या वाचनालयाला शंभर पुस्तकं भेट दिली तर आपली छाती अभिमानानं भरून येते, आपण चार लोकांना सांगतो ‘मी त्यांना मदत केली बरं का,’ मात्र, अनुराधाताईंसारखी एक स्त्री खूप मोठं काम उभं करतेय आणि तेही त्याचा गवगवा न करता!’’
दुसऱ्या दिवशी आम्ही तिघंही नाटकाला गेलो.
आमच्यासोबत आज एक चौथा मेंबरही होता- धनश्री धारप.
नाटकाला सुरवात झाली...
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर
अरे संसार संसार, खोटा कधी म्हनू नये
राउळाच्या कयसाले लोटा कधी म्हनू नये
बहिणाबाईंचं गाणं वेगळ्या धाटणीत आणि वेगळ्या शैलीत आमच्यासमोर दिसत होतं आणि ऐकू येत होतं. नाटकाचं संगीत, कथेतला वेगळेपणा आणि ताकदीनं उभी केलेली, काळजात घुसणारी बहिणाबाईंची ती छबी...सगळंच उत्तम होतं.
मी बहिणाबाईंचं साहित्य वाचलं होतं. त्यांच्या काही कविता पाठही होत्या; पण बहिणाबाई एवढ्या मोठ्या आहेत हे नाटक बघूनच माझ्या लक्षात आलं. सोनिया परचुरे, हर्षदा बोरकर, मिलिंद जोशी, अतुल जोशी, शीतल तळपदे या सगळ्यांनी आपापल्या भूमिका चोख वठवल्या होत्या. अतिशा नाईक, सुशांत शेलार, सुहास काळे आणि सोबत असणाऱ्या अठरा तरुण कलाकारांनी केलेलं काम अगदी बिनतोड. नाटक संपलं आणि मी अनुराधाताईंना कडकडून मिठी मारली. त्यांनी मला घरी जे काही सांगितलं होतं ते मी नाटकातून प्रत्यक्ष पाहिलं. व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते. मी माझ्या भावना त्यांना मिठी मारून व्यक्त केल्या. त्यांचं सगळं सांगणं माझ्यापर्यंत पोचलं होतं आणि त्यासुद्धा ते इतर लोकांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झाल्या होत्या हे त्यांच्या डोळ्यांतले भाव पाहून मला जाणवत होतं. त्यांना भेटू पाहणाऱ्यांची खूप गर्दी होती. अर्ध्या तासानंतर ती गर्दी ओसरली आणि आम्ही पुन्हा अनुराधाताईंसमोर जाऊन उभे राहिलो. पार्ल्याच्या या शोनंतर मुंबईसह राज्यभरात हा शो त्या सर्वत्र करणार असून त्याचं संपूर्ण नियोजनही तयार आहे. त्यांच्या तळमळीतून त्यांनी जे ठरवलं ते होणार होतं यात शंका नव्हती.

आपण समाजाचं काही तरी देणं लागतो, आपल्यावर ज्यांनी संस्कार केले आहेत ते संस्कार अधिक लोकांपर्यंत पोचवणं हे आपलं आद्य काम असतं, त्यातूनच अनुराधाताईंनी हे शिवधनुष्य पेललं आहे.
बहिणाबाईंना ‘सरसोती’ असं म्हटलं जातं. माझ्या दृष्टीनं या काळातली ‘सरसोती’ अनुराधाताई आहेत. कारण, लोकांसाठी काहीतरी करायचं आणि आपल्या संस्कारांची व्याप्ती वाढवायची ही त्यांची तळमळ आहे.अमेरिकी संस्कृतीत वाढलेल्या भारताच्या या ‘सरसोती’नं उभं केलेलं काम आणि त्या आज करत असलेलं काम अजोड आहे. ‘‘बाबा आमटे यांचाही विचार मला सर्वदूर पोचवायचा आहे,’’ असं अनुराधाताईंनी सांगितलं. समाजहित जोपासण्याची जिद्द, त्यासाठीची पद्धत कशी असावी? तर ती असावी अमेरिकी माय ‘अनुराधा सरसोती’ यांच्यासारखी. बरोबर ना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com