‘पोट’राज... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

आपल्या पोटासाठी आणि सामाजिक दबावापोटी ‘पोट’राज बनलेले संतोषसारखे कितीतरी जण आहेत. मात्र, कुणाच्या तरी नवसासाठी कुणीतरी आयुष्य का संपवून टाकायचं? का सगळी माया-ममता-वात्सल्य, नाती धुडकावून लावायची? या चुकीच्या प्रथांना आणि देवाच्या नावावर चाललेल्या रूढी-परंपरांना विरोध का करायचा नाही?

भंडारदरा...महाराष्ट्रातलं निसर्गरमणीय स्थळ. या भागातले, आसपासचे लोक किती भाग्यवान आहेत असं हा परिसर पाहताना वाटत राहतं. मी आणि माझ्यासोबतचे काही जण भंडारदऱ्यापासून पायी चालत निघालो होतो. समोरून एक उघडा माणूस येत असताना दिसला. अनवाणी. त्याच्या गळ्यात चाबूक आणि अंगाला रंगरंगोटी केलेली. त्याच्याबरोबर एक महिला होती. तीही अनवाणी. तिच्या डोक्‍यावर मंदिरासारखी दिसणारी एक प्रतिकृती होती. या दोघांच्या बरोबर चार-पाच वर्षांचा मुलगाही होता. तोसुद्धा अनवाणीच. आम्ही चालत चालत त्यांच्या जवळ पोचलो. आमच्याकडे लक्ष जाताच ‘जय भवानी माउली’ म्हणत पोतराजानं हात जोडले. पोतराजाच्या पायांत घुंगरं, गळ्यात माळा, सोबत ताशा, डोकं पूर्णपणे रंगवलेलं, हातात मोठमोठी कडी...आम्हाला नमस्कार घालून झाल्यावर पोतराजानं गाणी म्हणायला सुरुवात केली.
अंबाबाई माते, दर्शन द्या आम्हाला
जायचं आहे दूर आमच्या गावाला

सूर्य बऱ्यापैकी डोक्‍यावर आला होता. कडक उन्हापासून बचावण्यासाठी तो लहान मुलगा आईच्या सावलीत थांबला होता. पोतराजानं चार-पाच गाणी म्हटली. माझ्यासोबतच्या दोघांनी त्याला काही पैसे दिले. पोतराजासोबत असलेल्या बाईच्या डोक्‍यावर खूप ओझं होतं. डोक्‍यावरची मंदिरसदृश प्रतिकृती आणि तिच्या भोवती वेगवेगळ्या देवांचे फोटो लावलेले होते. ‘बाईच्या डोक्‍यावरचं ओझं उतरवा,’ असं दोनदा सांगितल्यावर पोतराजानं आमच्या मदतीनं बाईच्या डोक्‍यावरचं ओझं उतरवलं. ही बाई म्हणजे ओझं वाहून नेणारी एक गाडीच आहे की काय असं वाटून गेलं . भलंमोठं कुंकू, कोपरापर्यंत हिरव्या बांगड्या, पायात मोठाली कडी आणि डोक्‍यावर भलंमोठं ओझं. तिच्या पायातली ती वेगवेगळी कडी पाहिल्यावर वाटलं की हे ओझं बाळगून बिनचपलांची ही बाई हा उन्हातला प्रवास करत असेल? त्या लहान मुलाचीही परवड पाहवत नव्हती. जवळच कडूनिंबाचं झाड होतं.

‘तुम्ही समोरच्या झाडाखाली थांबून गाणं म्हणा’ असं माझ्या सोबतच्या पाहुण्यांनी त्या पोतराजाला सांगितलं. पोतराजासह आम्ही सगळे त्या झाडाखाली जाऊन थांबलो.
‘चपला विकत घ्या भाऊ...’ असं सांगत पोतराजाला काही पैसे दिले. माझ्यासोबतच्या हौशी पाहुण्यांना गाणं खूपच आवडत असावं असं दिसलं. ‘अंबाबाईचं गाणं म्हणा, दुर्गेचं गाणं म्हणा’, असं सांगत ते त्या पोतराजाला एकेक गाणं म्हणायला लावत होते. पोतराज जे वाद्य वाजवत होता ते इतर कुठल्याही वाद्यापेक्षा कमी नव्हतं. प्रत्येक वेळी नवीन गाणं म्हणताना तो त्या त्या गाण्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं अगदी सहजतेनं वाजवत होता. त्याचा लहान मुलगाही पुंगी वाजवून वडिलांना साथ देत होता. पोतराजाची बायकोही विशिष्ट ठेक्यात टाळ्या वाजवत होती. तो वाद्यांचा-टाळ्यांचा मिलाफ श्रवणीय होता.
तिथं आणखी सात-आठ माणसं जमली. टाळ्या वाजवू लागली. पोतराजाला पैसे देऊ लागली. पोतराज आता घामेजून गेला होता. त्याच्या गळ्यातही आता पहिल्यासारखा जोम राहिला नव्हता.
शेवटी तिथला एक जण म्हणाला : ‘‘आता बास. पाणी प्या आणि घडीभर बसा. आराम करा.’’
‘आता थांबा’ असं सांगण्याची पोतराजही जणू वाटच बघत होता. पोतराजाचं गाणं थांबलं आणि जमलेले बाकीचे सगळे आपापल्या रस्त्याला लागले. मी माझा मोर्चा त्या लहान मुलाकडं वळवला.
त्याच्याशी बोलायला सुरुवात करायची म्हणून मी त्याच्याकडची पुंगी मागितली. त्यानं लगेचच ती माझ्या हाती दिली. बाईला हसू आलं. पोतराजाच्या थकलेल्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. कुणीतरी पहिल्यांदा आपल्याकडे काहीतरी मागितलंय याचा आनंद त्या तिघांनाही झाला असावा असं मला वाटलं.
मी पोतराजाशी बोलायला सुरुवात केली.
‘‘कुठून आलात? कोणत्या गावाला चाललात?’’
दरम्यान, पोतराजाच्या बायकोनं भाकरी काढली आणि हातावरच त्या मुलाला दिली. भाकरी, चपाती...इतरही काही वेगवेगळे पदार्थ पाहून लक्षात आलं की हे अन्न या लोकांना कुणीतरी दिलेलं आहे.
घाम पुसत पोतराजानं जेमतेम शब्दांत मोठं मार्मिक उत्तर दिलं : ‘‘कुठलं गावं? मला कुठलंच गाव नाही. ज्या दिवशी ज्या गावात पोटाची खळगी भरते त्या दिवसापुरतं तेच आमचं गावं.’’
तो थकलेला असल्यानं फार काही बोलू इच्छित नव्हता असं दिसलं.
बाईनं पोतराजाच्याही हातावर भाकरी ठेवली. दोन मिनिटांत पोतराजानं जेवण उरकलं.
‘‘तुम्ही जेवणार का दादा?’’ त्या बाईनं मोठ्या आपुलकीनं मला विचारत माणुसकीचा धर्म पाळला.
तो लहान मुलगा हातातली भाकरी मोठ्या आनंदानं खात होता. त्याला खूपच भूक लागलेली असावी, असं त्याच्या खाण्याच्या लगबगीवरून वाटत होतं. पोतराजाच्या बाजूलाच असलेल्या एका दगडावर मी बसलो.
पोतराजाचं आयुष्य, त्याचा जन्म, असं करत करत त्याची सगळी कहाणी गप्पांच्या ओघात मला समजली. ही कहाणी सांगायला त्याची बायकोही अधूनमधून मदत करत होती.
***

आपली साधी साधी दुःखंही आपण एकदम जागतिक पातळीवर नेतो! पण आपल्याच आसपासच्या अनेकांना दोन वेळचं पोट भरण्याइतकं अन्न मिळवण्यासाठीही किती वणवण करावी लागते हे आपल्या गावीही नसतं. स्वतःचं कुठलंच गाव नसलेला हा पोतराज त्यांपैकीच एक होता. ‘पोट’राज होऊन गावोगावी, गल्लोगल्ली अनवाणी फिरणं त्याच्या नशिबी आलं होतं...त्याचं भवितव्य अंधश्रद्धांमध्ये आणि रूढी-परंपरांमध्ये जखडलं गेलं होतं. या रूढी-परंपरा त्याला गुरफटत नेत होत्या...फरफटत नेत होत्या...
या पोतराजाचं नाव आहे संतोष भिकाजी करपल्ले. त्याच्या पत्नीचं नाव लक्ष्मी आणि मुलाचं नाव राजू. तिघंही नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे. संतोषच्या सामाजिक कोंडीचं रूपांतर या रोजच्या जीवघेण्या प्रवासात कसं झालं हे त्याच्या बोलण्यातून मला कळलं होतं.
संतोष म्हणाला : ‘‘मला सात भाऊ होते. सातांतले चारजण जन्मतःच, तर तीनजण जन्मानंतर चार दिवसांनी वारले. त्यानंतर माझी आजी अंबाईदेवीला नवस बोलली : ‘माझ्या मुलाचा आठवा मुलगा वाचू दे. तो वाचला तर मी तो तुला सोडेन.’ यानंतर माझ्या आई-वडिलांना आठवा मुलगा झाला. तो आठवा मुलगा म्हणजे मी. नवसानुसार, मला देवीला सोडण्यात आलं.’’
संतोषची बायको लक्ष्मी हिलासुद्धा देवीला सोडण्यात आलेलं आहे. पाच मुली झाल्यावर लक्ष्मीच्या वडिलांना मुलगा हवा होता.
‘मला मुलगा होऊ दे. तुला मुलाच्या आधी झालेली मुलगी देईन’, असा नवस लक्ष्मीच्या वडिलांनी देवीला बोलला होता. लक्ष्मीच्या नंतर तिला भाऊ झाला आणि लक्ष्मीला देवीला सोडण्यात आलं.
देवीला सोडायचं म्हणजे काय?
नवसाचं अपत्य झाल्या झाल्या देवीकडे जाऊन पूजा-अर्चा करायची आणि मूल तीन वर्षांचं झालं की त्या मठामधल्या बाबांकडे ते बाळ विधिपूर्वक दान करून टाकायचं! संतोषला आणि लक्ष्मीला ज्या ठिकाणी दान करण्यात आलेलं आहे त्या मठाशी संबंधित असलेले बारा जण असेच संतोष-लक्ष्मीसारखे गावोगावी फिरून आपापला उदरनिर्वाह करत असतात.
‘‘तुझे आई-वडील तुला कधी भेटत नाहीत का? तू कधी त्यांच्याकडे जात नाहीस का? घरदार, पाहुणे यांच्याशी तुझा काही संबंध नसतो का?’’ मी संतोषला विचारलं.
संतोष म्हणाला : ‘‘ज्या दिवशी आम्हाला महाराजांच्या स्वाधीन केलं गेलं, ज्या वेळी आम्ही देवीच्या ओटीत बसलो त्या दिवशी आमचा सगळ्यांशी संबंध संपला. आम्हाला तशी चौकट घालून देण्यात आलेली आहे.’’
संतोष मला एकेक चौकट सांगत होता आणि मी त्या चौकटी आणि परंपरा ऐकून अवाक्‌ होत होतो...निःशब्द होत होतो. घरादाराशी काही संबंध नाही...शिक्षणाशी काही संबंध नाही...जर एखादी मुलगी ओटीत आली असेल तरच तिच्याबरोबर लग्न करायचं...अन्यथा दुसऱ्या कुठल्याही मुलीबरोबर लग्न करायचं नाही...झालेल्या अपत्याला शिकवायचं नाही...ते अपत्यही देवीचा भक्त म्हणून चार घरं भिक्षा मागून खाणार...पायात पायताण नाही, पुरुषाच्या अंगावर कपडा नाही... अशा अनेक ‘प्रथा’ संतोषनं मला सांगितल्या. या सगळ्या प्रथा तो काटेकोरपणे पाळतो.
या सगळ्या प्रकाराकडे मी चिकित्सक भूमिकेतून पाहत संतोषला विचारलं :‘‘हे केलंच नाही तर काय होईल?’’
तो म्हणाला : ‘‘कोप होतो...देवी श्राप देते...आणखी बरंच काही होतं...असं मोठे महाराज आम्हाला वारंवार सांगत असतात.’’
संतोषच्या बोलण्यातून त्याचा अडाणीपणा डोकावत होता हे तर उघडच होतं. रूढी-परंपरा, अंधश्रद्धा यांत गुरफटलेला अशिक्षित माणूस आयुष्यात सर्वस्व गमावून बसतो, याचं मोठं उदाहरण म्हणजे हा संतोष.
गप्पांच्या ओघात संतोषनं त्याच्या लहान मुलाचंही गुणगान केलं.
मी मध्येच त्याला विचारलं : ‘‘तुझे वडीलही तुझं असंच गुणागान करत होते का?’’
त्यावर संतोष म्हणाला :‘‘माझी माय आणि बाप देवी आहे!’’
संतोषच्या मनात रूढी-परंपरा अशा अतिशय घट्टपणे रुतल्या होत्या.
भावनिक ओलाव्यात, आई-वडिलांच्या आठवणींत तो जराही गुंतू इच्छित नव्हता.
संतोषला मी विचारलं : ‘‘तुझं बरचसं आयुष्य आता सरलं आहे; पण तुला तुझ्या मुलाची काळजी वाटत नाही का? त्याला शिकवावं असं तुला वाटत नाही का? त्याच्या भविष्याबाबत काही चांगला विचार करावा असं वाटत नाही का?’’
संतोष म्हणाला : ‘काय माहीत! देवीच्या मनात काय दडलंय ते!’’ बाटलीतलं उरलेलं पाणी नवऱ्याच्या पायावर ओतत लक्ष्मी म्हणाली : ‘‘आपल्या मुलाला शाळेत घालावं, कुठंतरी छोट्याशा वस्तीत राहावं, असा विचार आमच्या सोबत असणाऱ्या एकाच्या मनात आला होता. तो विचार त्या जोडप्यानं महाराजांकडे बोलून दाखवला. त्यावर महाराजांनी त्याला आणि तिच्या कुटुंबीयांना बहिष्कृत कुटुंब म्हणून सहा महिने खूप छळलं. ते नंतर हातापाया पडल्यावर त्यांना परत सोबत घेण्यात आलं.’’
आपण कमवायचं, थोडंसं मंदिराला द्यायचं, थोडंसं आपण खायचं, असं करत करत आयुष्याची पंचेचाळिशी कधी आली हे संतोषलाही कळलं नव्हतं. संतोषची इतर अपत्यंसुद्धा - दोन मुलं आणि दोन मुली - अशीच गल्लोगल्ली फिरून भिक्षा मागून, गाणी म्हणून चार पैसे मिळवतात.
आमच्या गप्पा सुरू असतानाच संतोषच्या मुलाला झोप लागून गेली होती. ‘चला, आपल्याला निघायचंय’ म्हणत लक्ष्मीनं मुलाला हलवून जागं केलं. तिघांचीही निघण्याची गडबड सुरू झाली.
***

आपल्या पोटासाठी आणि सामाजिक दबावापोटी असे ‘पोट’राज बनलेले संतोषसारखे कितीतरी जण आहेत. कुणाच्या तरी नवसासाठी कुणीतरी आयुष्य का संपवून टाकायचं? का सगळी माया-ममता-वात्सल्य, नाती धुडकावून लावायची? या चुकीच्या प्रथांना आणि देवाच्या नावावर चाललेल्या रूढी-परंपरांना विरोध का करायचा नाही? यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तरं संतोषकडेही नाही आणि समाजकडेही!
मात्र, असे ‘संतोष’ घडू नयेत यासाठी तुम्हा-आम्हा सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com