पडत्या घराचा आधार... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

ती म्हणाली : ‘‘मी एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुंबईत आले. काही तृतीयपंथी मित्रांची ओळख करून घेऊन त्यांच्याकडून सगळं समजून घेतलं. गल्लोगल्ली, दारोदारी, लोकांना आशीर्वाद देत जगू लागले. आज दहा वर्षं झाली...काही वेळा माझ्यावर वाईट प्रसंगही आले; पण त्यांना तोंड देत देत मी पुढं जात राहिले.’’

आमचं ‘सकाळ’चं ऑफिस ज्या भागात आहे तो बेलापूरचा परिसर सुधारणांच्या दृष्टीनं सध्या प्रकाशझोतात आलाय. इथं जवळपास सर्व सोई-सुविधा आहेत, त्यामुळे बेलापूर सोडून इतरत्र जाण्याची आवश्यकता भासत नाही. ऑफिसमधलं काम आटोपलं आणि मी बाहेर पडलो. मोहंमद हसन अल्वी या माझ्या मित्राचं हेअर कटिंग सलून अर्ध्या किलोमीटरवर आहे. तिथं मला जायचं होतं. मला पाहताच तिथल्या नेहमीच्या ओळखीच्या व्यक्तीनं मला आतमध्ये बसायला सांगितलं. रविवारचा दिवस असल्यानं खूप गर्दी होती. मी बाहेरच्याच एका खुर्चीत बसलो आणि काही फोन करायचे होते ते करू लागलो. तितक्‍यात एक तृतीयपंथी व्यक्ती माझ्याजवळ आली आणि माझ्या डोक्‍यावरून-पाठीवरून हात फिरवत ‘दे रे बाबा, भगवान तेरा भला करेगा...कुछ चायपानी के लिए दे दे बाबा’ असं म्हणू लागली. तिच्या एका खांद्याला पिशवी अडकवलेली होती आणि आणि दुसऱ्या हातात काही नोटा होत्या.
स्त्रीच्या गेटअपमधल्या त्या व्यक्तीनं ठसठशीत कुंकू लावलं होतं. तिचा चेहरा प्रसन्न वाटत होता.
‘कुछ दे दे बाबा’ असं म्हणत तिनं मला पुन्हा पैसे मागितले.
मी पैशांसाठी खिशात हात घातला आणि शेजारीच असलेल्या खुर्चीकडे दुसऱ्या हातानं खूण करत तिला तिथं बसायला सांगितलं. ती तत्काळ त्या खुर्चीत बसली.
मी शंभराची नोट काढून तिच्या हातावर ठेवली.
‘भगवान तेरा भला करेगा’ असं म्हणत तिनं माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत कडकड
बोटं मोडली.
मी विचारलं : ‘‘कुठून आलात तुम्ही?’’
माझं एकदम गावठी मराठी ऐकून तिला खूप छान वाटलं असं मला जाणवलं आणि
तिचं बिहारी स्टाईलचं आधीचं हिंदी बदलून ‘इथलीच आहे, नवी मुंबईतली. कळंबोलीत राहते’ हे मराठी वाक्य ऐकून मीही अवाक्‌ झालो.
मी तिला म्हणालो : ‘‘अरे! तू तर छान मराठी बोलतेस.’’
ती लगेच म्हणाली : ‘‘हो, मी मराठीच आहे.’’
‘‘कुठली? मुंबईचीच का मूळची?’’
ती म्हणाली : ‘‘नाही. मी मराठवाड्यातली. परभणीची.’’
‘‘अरे व्वा... मीपण मराठवाड्यातलाच.’’
‘‘तुम्ही कुठले?’’
‘‘मी नांदेडचा. आता राहतो मुंबईतच.’’
‘‘नांदेडला माझी आत्या राहते...’’ ती म्हणाली.
अशा आमच्या गप्पा सुरू झाल्या.
‘तिचं’ नाव होतं माधवी तांबोळी.
नवी मुंबईच्या कळंबोली भागात ती दहा वर्षांपासून राहते. आई-वडील आणि बहिणीसमवेत. रोजच्या जीवनात येणारे अनेक भले-बुरे अनुभव माधवीनं मला गप्पांच्या ओघात सांगितले. तिचे ते अनुभव ऐकल्यानंतर ‘आपलं जगणं किती सुकर आहे...निसर्गानं आपल्यावर किती भरभरून प्रेम केलंय...सगळं काही सहज आणि आयतं आपल्या वाट्याला आलंय...’ असं मला मनात वाटून गेलं.
मात्र माधवीचं तसं नव्हतं.

मधू या नावानं तिच्या गावात परिचित असलेली ही माधवी चांगली कबड्डीपटू होती.
ती जसजशी मोठी होऊ लागली तसतसे तिच्या वागण्यात काही बदल घडू लागले. ते तिला आणि इतरांनाही जाणवू लागले. घरच्यांनाही तिचं वागणं खटकू लागलं.
मधूचं मूळ नाव माधव. तिच्या वागण्यात-शरीरात होणाऱ्या बदलांमुळे तिला घरातून कुणी
हाकलून देत नव्हतं; पण तिच्याशी कुणी प्रेमानंही वागत नव्हतं. अत्यंत तुच्छ अशी वागणूक तिला दिली जात होती. शेवटी वैतागून तिनं आपल्या काही मित्रांच्या मदतीनं मुंबई गाठली.
माधवी सांगू लागली : ‘‘मुंबईत तृतीयपंथीयांशी भेटी-गाठी झाल्यावर कसं राहायचं, कसं वागायचं, समाजात काय काळजी घ्यायची याविषयी त्यांनी मला सगळं समजून सांगितलं.’’
मी मध्येच विचारलं : ‘‘काही तरी दीक्षा दिली जाते, काही अवयवांवर प्रक्रिया केली जाते असं ऐकलंय. ते खरं आहे का?’’
ती म्हणाली : ‘‘असं काही नाही. तसं असेल तर मला माहीत नाही. मी एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुंबईत आले. काही तृतीयपंथी मित्रांची ओळख करून घेऊन त्यांच्याकडून सगळं समजून घेतलं. गल्लोगल्ली, दारोदारी, लोकांना आशीर्वाद देत जगू लागले. आज दहा वर्षं झाली...काही वेळा माझ्यावर वाईट प्रसंग आले; पण त्यांना तोंड देत देत मी पुढं जात राहिले.’’
‘‘आई-वडील-बहीण हे तुझ्याकडे कसे आले?’’ एक निःश्वास टाकत आणि लगेच हसून माझ्या प्रश्नांचं उत्तर देत माधवी म्हणाली : ‘‘दादा, ती मोठी कहाणी आहे, आता काय सांगू तुम्हाला?’’
माधवीला निघण्याची घाई होती. मी माझं व्हिजिटिंग कार्ड तिला देत म्हणालो : ‘‘बेलापूर स्टेशनच्या बाजूलाच ‘सकाळभवन’ आहे. तुझं काम आटोपलं की ये. आपण गप्पा मारू. मी खारघरला राहतो. जाताना तुला घरी सोडेन.’’
आम्हा दोघांचं ‘मराठवाडा-कनेक्‍शन’ असल्यामुळे तिनं कदाचित लगेच होकार दिला असावा. तिनं माझं कार्ड घेतलं आणि ती पैसे मागण्यासाठी दुसऱ्या दुकानापुढं उभी राहिली.
कटिंग करणारा माझा मित्र माझ्याजवळ येऊन मला म्हणाला : ‘‘साहेब, गप्पा जोरदार रंगल्या होत्या.’’
त्याला नेमकं काय म्हणायचं होतं ते त्याचं त्यालाच माहीत; पण त्याच्या हसण्यावरून तरी, त्याच्या मनात फार काही चांगलं असेल असं वाटत नव्हतं.
मी ऑफिसला परत गेलो. काही वेळानं ऑफिसच्या गेटवरून वॉचमनचा फोन आला : ‘‘सर, तुम्हाला कुणीतरी भेटायला आलंय.’’
मी विचारलं : ‘‘कोण आहे?’’
कोण आलंय हे सांगताना वॉचमनला संकोचल्यासारखं झालं होतं. बाई म्हणावं की पुरुष म्हणावं हा प्रश्न त्याला पडला असावा.
शेवटी मीच म्हणालो : ‘‘माधवी आहे ना? अच्छा, आलोच मी.’’
मी खाली गेलो. गाडी काढली, माधवी गाडीत बसली. गेटच्या बाहेर पडताना मी वॉचमनकडे पाहिलं. माझ्या गाडीत माधवी बसलेली पाहून वॉचमनला कसलासा आनंद होऊन टिंगलीचा भावही त्याच्या मनात आला होता. त्याचे डोळे तरी तसंच सांगत होते.
माधवीच्या घरीच जाऊन गप्पा माराव्यात असं आमचं ठरलं.
आम्ही घरी पोहोचलो.

एका कोपऱ्यात माधवीची आई बसली होती आणि दुसऱ्या कोपऱ्यात एका खाटेवर माधवीचे वडील होते. पडल्या पडल्या खोकत होते. छोटंसं घर आणि छोटासा पसारा. मला बसण्यासाठी माधवीनं चटई अंथरली. तीही चटईवर बसली. माधवीनं तिच्या आई वडिलांची ओळख करून दिली.
माधवी म्हणाली : ‘‘आई, हे दादा... नांदेडचे आहेत. इथं बेलापूरला एका ऑफिसात साहेब आहेत!’’
माधवीच्या आईला मी नमस्कार केला. मी नमस्कार करत असतानाच त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला व म्हणाल्या : ‘‘सुखी राहा बाळा. माझा मुलगाही तुझ्यासारखाच आहे.’’
मी माधवीला म्हणालो : ‘‘तुला एक बहीण आहे एवढंच सांगितलं होतंस तू मला...भाऊही आहे हे सांगितलं नाहीस.’’
माधवी म्हणाली : ‘‘आपल्याला बोलायला वेळ कमी होता ना.’’
मी विचारलं : ‘‘भाऊ कुठं असतो?’’
‘‘तो परभणीलाच असतो. वडिलांची शेती आहे. माझी वहिनी शिक्षिका आहे. भाऊ छोटा-मोठा व्यापार करतो. त्याला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे.’’
‘‘तो येत नाही का कधी भेटायला?’’
‘‘नाही.’’

थोडक्यात उत्तर देऊन माधवी मला गावाकडची हकीकत सांगू लागली : ‘‘मी मुंबईला आल्यावर भावाचं लग्न झालं. मला लग्नाविषयी काहीच सांगण्यात आलं नाही. माझ्या आई-वडिलांना कर्करोग आहे. त्यांचा आजार वाढत गेल्यावर भावानं वहिनीच्या सल्ल्यानं त्या दोघांनाही शेतातल्या झोपडीत राहायला पाठवलं. त्यांची खूप परवड होत होती. बहिणीचं शिक्षणही थांबवण्यात आलं. एक-दोन वर्षं अशीच गेली. रमेश नावाचा माझा मित्र - ज्यानं आजही लग्न केलेलं नाही - माझ्या आई-वडिलांसंदर्भातली सगळी माहिती मला द्यायचा. भावाला कसलीच कल्पना न देता मी एक दिवस रमेशच्या मदतीनं आई-वडिलांना आणि बहिणीला मुंबईला घेऊन आले. चार-पाच दिवस भावाला ते माहीतही नव्हतं. मीच फोन करून सांगितलं. त्यावर तो काहीही बोलला नाही. आतासुद्धा कधीही त्याचा फोन येत नाही. आई-वडील कसे आहेत, तू कशी आहेस, अशी विचारपूस तो करत नाही.’’

माधवी मला हे सगळं सांगत असताना मुलाच्या आणि नातवाच्या आठवणीनं तिच्या आईचे डोळे भरून आले. मात्र, वडील तिला दटावून म्हणाले, ‘जे कधी आपली चौकशीही करत नाहीत त्यांच्या आठवणीनं काय रडायचंय?’
आमचं बोलणं सुरू असतानाच दारावर टकटक झाली. माधवीनं दार उघडलं. दारात एक मुलगी उभी होती. हीच माधवीची बहीण. शिवानी तांबोळी. मी शिवानीशीही गप्पा मारल्या. अभ्यासात हुशार असलेली शिवानी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात आहे. माधवीनंच शिवानीच्या शिक्षणाचा भार उचलला. तिला येणाऱ्या अडचणी ओळखीपाळखीतून दूर केल्या. आई-वडिलांच्या प्रकृतीच्या नियमित तपासणीचा खर्च, बहिणीच्या शिक्षणाचा खर्च आणि स्वतःसह चारजणांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी एकट्या माधवीवरच आहे. शिवानीही अधूनमधून तिच्या मैत्रिणीबरोबर छोटी-मोठी कामं करून माधवीला हातभार लावत असते.
माधवीच्या बोलण्यात मघाशी रमेशचा उल्लेख आला होता, त्या उल्लेखाची आठवण होऊन मी तिला मध्येच विचारलं : ‘‘हा रमेश कोण? ज्याचा उल्लेख करताना ‘ज्यानं आजही लग्न केलेलं नाही,’ असं तू मघाशी म्हणालीस...’’
रमेशचं नाव काढताच दोघी बहिणींनी एकमेकींकडे आश्र्चर्यानं पाहिलं. रमेशचं नाव काढताच वडिलांचा खोकला थांबला आणि मघाशी भावविवश झालेली आईही खंबीरपणे सावरून बसली.
‘‘सांगेन दादा कधीतरी,’’ माधवी हळूच म्हणाली.
शिवानीनं माधवीचा हात हातात घेतला आणि मान हलवत काहीतरी खूण करत ‘शांत राहा’ असं तिला समजावलं.
तेवढ्यात मला कप-बशीतून दूध देण्यात आलं. कप-बशीतून दूध देणं ही आमची खास ‘मराठवाडा-स्टाईल’! बाकीच्यांसाठी चहाही तयार झाला होता. आज मिळवलेले सगळे पैसे आपल्या म्हाताऱ्या आईच्या हाती देत माधवीनं दिवसभरातली सगळी हकीकत शिवानीला सांगितली.

मी शिवानीला विचारलं : ‘‘आता तू पुढं काय करणार आहेस?’’
ती लगेच म्हणाली : ‘‘आई-बाबा आणि माधवी ठरवतील ना! आम्हा चौघांचं कुटुंब कधीही विभक्त होऊ नये एवढा एकच विचार मी सध्या करते.’’
शिवानीची अभ्यासाची वही मी पाहिली. तिचं हस्ताक्षर सुंदर होतं. वेगवेगळ्या विषयांना मिळालेले गुणही चांगले होते.
माझी आणि माधवीची भेट परत कधी होणार की नाही हे मला माहीत नाही; पण तरीही मी माधवीला म्हणालो : ‘‘तुला माझी काही मदत लागली तर नक्की सांग.’’
‘‘हो दादा, तुमची मदत मला लागणारच आहे. दवाखाना खूप महाग झालाय. शिक्षणही खूप महाग झालंय. ओळखपाळख असल्याशिवाय या शहरात पानही हलत नाही. काही माणसं ओळखीची आहेत, त्यात आता तुम्हीही एक...’’ माधवी म्हणाली.
‘येतो’ असं म्हणत मी तिच्या आई-वडिलांचा निरोप घेतला.
‘‘आता परत येशील तेव्हा जेवायलाच ये, बाळा...’’ आई आग्रहानं म्हणाली.
आपल्या भागातला, मराठवाड्यातला माणूस म्हणून मला केला जाणारा माधवीच्या आईचा तो आनंदपूर्वक आग्रह मला जाणवला.
माधवी आणि शिवानी मला गाडीपर्यंत सोडायला आल्या.

मी माधवीला पुन्हा विचारलं : ‘‘हा रमेश कोण आहे? रमेशचं नाव ऐकल्यावर मघाशी सगळे जण शांत का झाले? आणि त्यानं लग्न का केलं नाही अद्याप?’’
माधवी काहीच बोलली नाही, मग शिवानीच सांगू लागली : ‘‘रमेश हा ताईचा पहिलीपासूनचा मित्र. परभणीत असताना सतत एकत्र असायचे. ताई आता मुंबईला आली आणि त्या बिचाऱ्याचा ‘सैराट’ झालाय...’’
तितक्‍यात माधवीनं शिवानीच्या पाठीवर गमतीनं थाप मारली आणि ‘तू पण हां’ असं म्हणत व लटक्या रागानं तिच्याकडे पाहत तिनं विषयावर पडदा पाडला.
मला काय समजायचं ते समजलं. मीही हसत दोघींना हात जोडून नमस्कार केला व त्यांचा निरोप घेतला.

निघताना मी माधवीच्या घराकडे पाहिलं. एका बाजूनं पूर्णपणे पडलेलं असं ते घर होतं. पडलेला भाग प्लॅस्टिकच्या आधारानं झाकण्यात आला होता. ते पडकं घर सावरण्याचं, त्याला आधार देण्याचं काम- ‘तृतीयपंथी’ म्हणून शिक्का
मारण्यात आलेल्या - माधवीवर जसं होतं, तसंच त्या घराचं ‘घर’पण कायम ठेवण्याचं काम त्या प्लॅस्टिकवर होतं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com