मी कुणाची? (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

रेल्वेरूळ ओलांडून मी टॅक्‍सीसाठी पलीकडे निघालो. वर जाऊन बघतो तर काय, आजींचं लक्ष माझ्याकडेच होतं. मागं वळून पाहता क्षणी आजींनी हात उंचावला. आजींचा तो हात बघून मनात विचार आला...हा हात नेमका कशासाठी होता? आपल्या मनातलं दु:ख ऐकून घेतलं म्हणून? आपल्याला काही क्षण का होईना आधार दिला म्हणून? की आपल्या मुलाला न जमलेली माणुसकी या अनोळखी माणसानं दाखवली म्हणून? त्या हात उंचावण्याचा अर्थ काय घ्यायचा हे मला कळेना.

वांद्र्याला मनोजकुमार शर्मा यांची भेट घेतली आणि परतीच्या प्रवासासाठी लोकलची वाट बघत वांद्रे स्टेशनकडे आलो. वृत्तवाहिनीची एक वार्ताहर-मुलगी एका आजींची मुलाखत घेत होती. त्यांच्या अवतीभवती बरीच माणसं जमली होती. आजी रडत होत्या. त्या वार्ताहर-मुलीचं काम आटोपलं आणि ती तिथून निघून गेली. गर्दी कमी झाली. मी त्या आजींच्या शेजारी बसलो. माझ्याकडे असलेली पाण्याची बाटली त्यांना दिली.
मी आजींना म्हणालो : ‘‘आजी, काही काळजी करू नका. होईल सगळं ठीक.’’
आजी म्हणाल्या : ‘‘ काय होईल बाबा ठीक? देव आहे की नाही असा प्रश्न मला पडलाय.’’

आजींनी त्यांच्याकडच्या बिस्किटाचा एक तुकडा काढला व ‘खातोस का रे बाबा?’ म्हणून मला विचारलं. मी ‘नको’ म्हटल्यावर त्या बिस्किट खाऊ लागल्या.
आम्ही थोडंसं बोलायला सुरुवात केली नाही तोच पलीकडच्या बाजूला एक छोटासा टेम्पो आला. त्या टेम्पोतून एक माणूस हातात छोटा लाउडस्पीकर घेऊन ओरडू लागला : ‘‘खाना आया है, लेकर जाओ... खाना आया है, लेकर जाओ...’’
आजींची नजर त्या माणसाकडे गेली. आजींनी त्यांच्याकडची पिशवी माझ्याकडे दिली आणि त्या गाडीच्या दिशेनं निघाल्या. केवळ अर्ध्या तासाच्या ओळखीत आजींनी माझ्यावर विश्वास का ठेवला ते कळायला मार्ग नाही. त्या पिशवीत काय होतं, तर दोन-तीन जुने कपडे.
खाण्याच्या पदार्थांचे दोन बॉक्स दोन्ही हातांत घेऊन आजी माझ्याकडे आल्या. एक बॉक्स त्यांनी माझ्याकडे दिला आणि दुसरा बॉक्स उघडून त्या लगबगीनं जेवण करू लागल्या.
आजींच्या मुखात एकही दात नव्हता. त्यांची खाण्याची लगबग पाहता त्यांनी सकाळपासून काहीही खाल्लेलं नसावं असा अंदाज करता येत होता. आता सूर्य कलला होता. बऱ्याच वेळानं आजींचं लक्ष एकदम माझ्याकडे गेलं. त्या म्हणाल्या : ‘‘तू खा ना! ते मी तुझ्यासाठीच आणलंय.’’
मी म्हणालो : ‘‘मी जेवून आलोय.’’
आजी म्हणाल्या : ‘‘ते अन्न चांगलं आहे. तीन दिवस झाले, मी हेच खाते. खा...खा...तूही खा.’’
आजींचा आग्रह सुरूच होता. आजींच्या रिकाम्या झालेल्या त्या खिचडीच्या बॉक्‍समध्ये मी माझ्या बॉक्समधली थोडीशी खिचडी टाकली. मीही खाऊ लागलो. खात असताना त्या टेम्पोकडे माझी नजर गेली. स्टेशनवरचे अनेक भिकारी आणि भिकारी नसलेली इतर माणसंसुद्धा टेम्पोतून आलेलं अन्न घेण्यासाठी रांगेत उभी होती. लहान, मोठा, भिकारी, बिगरभिकारी असे सगळेजण एकाच रांगेत आले होते ते कोरोनामुळे. भूक लागली, खिशात पैसे आहेत; पण हॉटेलं उघडी नाहीत अशा अवस्थेत या टेम्पोमधली खिचडी पोटाची भूक भागवायची. आजींचं खाऊन संपलं होतं. नीटनेटकं, स्वच्छ असं त्यांचं वर्तन होतं. आम्हा दोघांचे रिकामे बॉक्‍स त्यांनी घेतले आणि दूरच्या कचराकुंडीत टाकून आल्या. आता आजी एकदम शांत झाल्या होत्या. खायला पोटभर असेल आणि मन समाधानी असेल तर पुढचा विचार करायला, काम करायला बळ येतं हे आजींच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं.
‘‘मग आता काय?’’ मी आजींना विचारलं.
आजींनी आकाशाकडे हात करत मला सांगितलं : ‘‘तो ठरवील ते करायचं! मी कोण, कुणाची, कुठं जाणार, सगळं तो ठरवील!’’
मी शांत झालो आणि आजीही.
थोड्या वेळानं आजींनी विचारलं : ‘‘लॉकडाऊन कधी संपणार? रेल्वे कधी सुरू होणार?’’
त्यांच्या भाबड्या प्रश्नांना उत्तरं देत मी म्हणालो : ‘‘आजी, याविषयी आत्ता काहीच सांगता येणार नाही.’’
माझं उत्तर ऐकून आजी निराश झाल्या. रडवेल्या झाल्या.
आमच्यापासून थोडेसेच दूर सात-आठ भिकारी होते. खिचडी खात असताना त्यांच्याकडून खरकटं खाली सांडत होतं. स्वच्छ रेल्वे स्टेशन खराब होत होतं.
त्यांच्याकडे पाहून आजी म्हणाल्या : ‘‘हे लोक रोज असंच करतात. अर्धी खिचडी खातात आणि अर्धी खाली सांडतात. त्यांच्या हाताला छिद्र आहे का काय कुणास ठाऊक! पहिल्या दिवशी मी त्यांना सांगायचाही प्रयत्न केला; पण ते ऐकतील तर!’’
स्टेशनवरचा एकेक अनुभव आजी सांगत होत्या.
रात्री भांडणारी माणसं, रात्रभर भुंकत बसणारे कुत्रे, महिलांवर सतत लांडग्यासारखी नजर ठेवणारी माणसं...आजीचं निरीक्षण दांडगं होतं आणि हे सगळं गप्पांच्या ओघात त्या मांडत होत्या.
आजींना मुख्य विषयाकडे कसं न्यावं हे मला कळत नव्हतं.
‘‘इथं स्टेशनवर राहण्याची वेळ तुमच्यावर का आली?’’ असं मी त्यांना अखेर विचारलंच.
आपल्या शत्रूवरही येऊ नये अशी वेळ लीलाबाई पटेल या आजींवर आली होती.
आजींनी मला त्यांची कहाणी सांगितली. त्यांनी सांगितल्यानुसार, आजींना दोन मुलं. सौरभ आणि सचिन.
दोघंही इंजिनिअर. सौरभ दिल्लीला, तर सचिन मुंबईतच वांद्र्याला असतो.
लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी सचिन आजारी पडला. ‘मी आजारी आहे. मदतीसाठी आईला मुंबईला पाठवून द्यावं,’ असं सचिननं सौरभला कळवलं. मुलगा आजारी आहे हे कळल्यावर मिळेल त्या वाहनानं आजी दिल्लीहून मुंबईला आल्या. पंधरा दिवस त्यांनी सचिनचं सगळं केलं. रोजचा स्वयंपाक केला. घरातली इतर सगळी कामंही केली. कारण, सचिनची बायको नोकरी करत होती. सचिन बरा झाला आणि आजी आता निघणार तेवढ्यात लॉकडाउन सुरू झालं. घरातल्या सगळ्या माणसांना एकत्र राहण्याची संधी मिळाली. खूप दिवसांनी असं घडलं. आजींना नातवांचा आणि नातवांना आजीचा लळा लागला; पण आजी आपल्या घरी राहायला असणं हे सुनेला खटकायला लागलं. रोज भांडणं होऊ लागली. बायकोला समजून सांगण्याऐवजी सचिन आईलाच बोलू लागला. आधी रागावून बोलणं, नंतर शिव्या घालणं, प्रसंगी हातही उचलणं असं सुरू झालं.

आजी पुढं सांगू लागल्या : ‘‘रात्री दोन्ही नातवंडं माझ्या शेजारीच झोपायची. आजीच्या अंगावर हात ठेवून झोपल्याशिवाय त्यांना झोप यायची नाही. आपले वडील आजीला मारत आहेत हे पाहताना नातवंडंच माझ्या आधी रडायची. नंतर चार दिवसांनी सुनेनं नवीनच पवित्रा घेतला. सून म्हणाली : ‘या घरात एकतर मी राहीन, नाही तर ही म्हातारी.’
सचिननं सौरभला फोन केला. फोनवर तो त्याला तक्रारीच्या सुरात म्हणाला : ‘‘आई इथं व्यवस्थित राहत नाही.’’
सौरभनंही तिकडून सांगितलं : ‘‘लॉकडाउनमुळे माझे सासू-सासरे माझ्याकडे राहायला आलेले आहेत. माझं घर छोटं आहे. तूच आईला तुझ्याकडे ठेवून घे.’’
आजींच्या म्हणण्यानुसार, एवढं सांगून सौरभनं फोन बंद केला.
आजी म्हणाल्या : ‘‘सौरभचा पुन्हा फोन येईल असं आम्हाला वाटलं; पण तसं झालं नाही. दुसऱ्या दिवशी सचिन मला म्हणाला, ‘तू सामान भर आणि माझ्या घरातून चालती हो.’ हे ऐकून काय बोलावं हेच मला सुचलं नाही. बरं, लॉकडाउनमुळे बाहेरचे सगळे व्यवहार बंद. अशा परिस्थितीत मी जायचं तरी कुठं? टोकाच्या वादामुळे घरातली शांतता नष्ट झाली. मी दोन्ही नातवंडांना जवळ घेतलं. त्यांना कडकडून मिठी मारली. थोड्या वेळातच मी घराबाहेर पडणार होते; पण तितक्‍यात सचिननं मला दाराबाहेर ढकललं आणि सुनेनं माझी बॅग घराबाहेर फेकली आणि दरवाजा बंद करून घेतला. नातवंडांचा रडण्याचा आवाज आतून येत होता. त्या दोघांनाही त्यांची आई मारत असल्याचं माझ्या लक्षात आलं.’’
आजींचे डोळे पाणावले होते. माझेही.
आजींना मी पाण्याची बाटली दिली. त्यांनी सगळं पाणी एका दमात प्यायलं.
‘‘आता कुठं जाणार, आजी?’’ असं विचारल्यावर त्या म्हणाल्या : ‘‘आज ना उद्या मला एखादं वाहन मिळेल. त्या वाहनानं मी दिल्लीला जाईन.’’
‘‘पण ‘आईला तुझ्याकडेच राहू दे,’ असं तिकडच्या मुलानं इकडं फोनवरून सांगितलं आहे ना?’’
मी आजींच्या लक्षात आणून दिलं.
आजी म्हणाल्या : ‘‘मुलगा तसं म्हणत असला तरी ती सून खूप चांगली आहे. ती मला सांभाळून घेईल.’’
दिल्लीला जाण्यासाठी रेल्‍वेगाडी कधी सुरू होईल, असं मी रेल्वेत अधिकारी असलेल्या माझ्या दोन मित्रांना फोन करून विचारलं; पण ‘आताच काही सांगता येत नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
आता या आजींचं कसं होणार असा प्रश्न मला पडला.

आजींना मात्र आपल्या घरी जाण्याची तितकीशी गडबड नसावी असं दिसलं. त्या स्टेशनच्या आणि आसपासच्या वातावरणाच्या जणू प्रेमात पडल्या होत्या! तिथं त्यांना कुणी शिव्या घालणारं, त्यांच्यावर हात उचलणारं तरी नव्हतं निदान.
मी आजींना पुन्हा बोलतं केलं. मी विचारलं : ‘‘तुमचे यजमान काय करायचे? तुमचं मूळ गाव कोणतं?’’
आजी म्हणाल्या : ‘‘माझे यजमान मूळचे गुजरातमधले. त्यांचे वडील व्यापाराच्या निमित्तानं नाशिकला आले. व्यापार सुरू झाला; पण तो टिकला नाही. माझ्या यजमानांनी खूप हलाखीत दिवस काढले. त्यांना कुणी मुलगी देत नव्हतं. मी अनाथाश्रमातली. त्यांनी माझ्याशी लग्न केलं. त्यांनी त्यांचं निम्मं आयुष्य हमाली करून काढलं. नंतर चार पैसे आल्यावर कापडाचं दुकान सुरू केलं. चार पैसे यायला लागले. कर्ज काढून त्यांनी सौरभ-सचिनला शिकवलं. दोघांची लग्नं झाली. दोघांनाही चांगली नोकरी लागली.
एके दिवशी यजमानांच्या छातीत दुखायला लागलं म्हणून त्यांना दवाखान्यात दाखल केलं. चार दिवस ते दवाखान्यात होते. ‘दोन्ही मुलांना एकदा बघायचंय,’ असं ते सारखं म्हणायचे. नोकरीमुळे मुलं आली नाहीत. पाचव्या दिवशी यजमानांचं निधन झालं...’’
यजमानांच्या आठवणींनी आजींचे डोळे पाणावले.
* * *

‘मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडतो...मी तुमची राहायची व्यवस्था करतो...’ असे वेगवेगळे पर्याय मी आजींपुढं ठेवले. आजी कशालाच तयार नव्हत्या. त्यांचा धोशा एकच : ‘अडीच महिने झाले...मी दिल्लीच्या नातवंडांना भेटले नाही. ते माझी खूप आठवण काढत असतील. मला दिल्लीला जायलाच हवं...’
तेवढ्यात एका लोकल ट्रेनचा आवाज कानावर पडला. जागच्या जागी सरसावत आजींनी विचारलं :
‘‘ही गाडी जाते का दिल्लीला?’’
मी म्हणालो : ‘‘नाही. इथून तुम्हाला ‘छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस’ला जावं लागेल. दिल्लीला जाणारी गाडी तुम्हाला तिथून मिळेल.’’
मी थोडे पैसे आजींना देऊ केले; पण ते पैसे त्यांनी परत माझ्या बॅगेवर ठेवले. जवळ जपून ठेवलेले दोन हजार रुपये काढून त्यांनी मला दाखवले आणि म्हणाल्या : ‘‘माझ्याकडे पैसे आहेत. मला पैशांची तशी आवश्यकता नाही.’’
मी म्हणालो : ‘‘तुमच्या दिल्लीच्या मुलानं इकडं येताना पैसे दिलेले दिसताहेत तुम्हाला.’’
आजी म्हणाल्या : ‘‘नाही. माझा छोटा नातू आशिषनं परवा त्याच्या आईच्या पर्समधून दोन हजार रुपये हळूच काढले आणि माझ्या बॅगमध्ये ठेवले. त्या दिवशी निघण्याच्या रात्री हे त्यानंच माझ्या कानात सांगितलं. त्या भांडणाच्या घाईगडबडीत ते पैसे सुनेकडे परत द्यायला मी विसरले.’’
‘‘...पण तरीही, दूरचा प्रवास आहे, तुम्ही हेही पैसे ठेवा जवळ,’’ असं म्हणत आजींच्या हाती पैसे ठेवून मी त्यांची मूठ बंद केली. मी आजींचा निरोप घेतला.
तत्पूर्वी, आजींनी माझ्या गालावरून हात फिरवला. पाठीवरून हात फिरवत त्या म्हणाल्या : ‘‘काळजी घे बाळा, सुखात राहा.’’
लोकलनं जायची माझी वाट आता बंद झाली होती. विशेष बाब म्हणून असलेल्या दोन-तीनच लोकल लॉकडाउनच्या या काळात दिवसभरात ये-जा करायच्या. त्या केव्हाच गेल्या होत्या.

रेल्वेरूळ ओलांडून मी टॅक्‍सीसाठी पलीकडे निघालो. वर जाऊन बघतो तर काय, आजींचं लक्ष माझ्याकडेच होतं. मागं वळून पाहता क्षणी आजींनी हात उंचावला. आजींचा तो हात बघून मनात विचार आला... हा हात नेमका कशासाठी होता? आपल्या मनातलं दु:ख ऐकून घेतलं म्हणून? आपल्याला काही क्षण का होईना आधार दिला म्हणून? की आपल्या मुलाला न जमलेली माणुसकी या अनोळखी माणसानं दाखवली म्हणून? त्या हात उंचावण्याचा अर्थ काय घ्यायचा हे मला कळेना. आजींच्या दोन्ही उच्चशिक्षित मुलांचे न पाहिलेले चेहरे माझ्या डोळ्यांपुढं येत राहिले..त्या मुलांनी आपल्या गरिबीबरोबरच आपल्या आई-वडिलांनाही टाकून दिलं होतं! आज आपल्या आई-वडिलांवर जी वेळ आली ती उद्या आपल्यावरही येऊ शकते असा विचारही त्या स्वार्थी मुलांनी कधी केला नसेल का? जर जन्म देणाऱ्या आई-वडिलांना ही मुलं असं वागवत असतील तर ती बाकीच्यांशी कशी वागत असतील? इतरांशी वागताना आपल्या स्वार्थासाठी अशीच माणुसकी ही मुलं विसरत असतील का? याचा विचारच करायला नको...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com