तासिका नावाचा फास (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

मी त्या व्यक्तीला ‘ओ सर’ अशी हाक जाणीवपूर्वक मारली. काम थांबवून तिनं माझ्याकडे पाहिलं व तिचा चेहरा संकोचल्यासारखा झाला.
‘आपल्याला यांनी ओळखलं असावं,’ असं त्या व्यक्तीला वाटलं!
‘‘तुम्ही कुठल्या शाळेत आहात? की तुमचा खासगी क्‍लास आहे,?’’ या माझ्या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरं न देता ती व्यक्ती म्हणाली : ‘‘पहिल्यांदा मला सांगा, तुम्ही मला 'सर' कसं काय म्हणालात?’’

‘एमएसडीपी प्रोजेक्‍ट’च्या माध्यमातून राज्यात खूप चांगली कामं झाली आहेत. शिक्षित शेतकऱ्यांबरोबरच निरक्षर शेतकऱ्यांनीही या प्रकल्पाद्वारे खूप काही शिकून आपल्या शेतात केलेले अनेक प्रयोग बघण्यासारखे आहेत.
मी काही सहकाऱ्यांसह अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. याच संदर्भात मी लातूरच्या दौऱ्यावर होतो. लातूर म्हटलं की रामेश्‍वर धुमाळ हे सोबत असणारच. श्रीकांत जाधव नावाच्या शेतकऱ्यानं आपल्या शेतात राबवलेले वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी आम्ही निघालो. जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत आम्ही गेलो. नंतर गाडी रस्त्याच्या कडेला लावून पुढं पायवाट तुडवत निघालो. लातूरला शेतांमध्ये सगळं भकास दिसत होतं. लातूरकरांची पिण्याच्या पाण्यासाठी जी वणवण चालली होती तीच वणवण शेतीच्या पाण्यासाठीही कायम असल्याचं बघायला मिळत होतं. आम्ही जसजसं पुढं जात होतो तसतसा आमच्या कानावर मंजूळ आवाज पडत होता. तो कसला आवाज आहे हे थोडं पुढं गेल्यावर लक्षात आलं. एक बाई आपल्या मुलाला झोका देत गाणं गुणगुणत होती. त्या झोक्‍यातल्या छोट्या मुलाकडे आणि त्या काटेरी बाभळीच्या झाडाकडे बघितल्यावर धस्स झालं. मला राहवलं नाही. मी त्या बाईला म्हणालो : ‘‘बाई, एवढ्या जाड काट्यांच्या झाडांना कशाला बांधला झोका? एखादा काटा मुलाला टोचेल ना?’’
ती बाई शांतपणे म्हणाली : ‘‘दादा, आसपास दुसरं झाडपण नाही ना? कुठं बांधू झोका?’’ त्या बाईचं म्हणणं अगदी खरं होतं.
धुमाळ त्यांच्या लातुरी भाषाशैलीत म्हणाले : ‘‘काय सांगूलालाव बाई? तुमची कमाल आहे. अहो, वरतून काटे पडणं सुरू आहे आणि तुम्ही म्हणताय झाड कुठं आहे?’’ धुमाळ यांचं घाईघाईचं बोलणं ऐकून ती बाई शांत बसली. धुमाळ पुन्हा त्या बाईला म्हणाले : ‘‘जाधवांचं शेत कुठं आहे?’’
बाई म्हणाली : ‘‘मला माहीत नाही. पुढं माझे यजमान आहेत, त्यांना विचारा.’’
आम्ही थोडंसं पुढं गेलो. रस्त्याच्या कडेचं काम सुरू होतं. दोन व्यक्ती उघड्या अंगानं खोदकाम करत होत्या. एक अलीकडे होती आणि एक थोडीशी पलीकडे. धुमाळ यांनी त्या व्यक्तीला परत विचारलं : ‘‘जाधवांचं शेत कुठं आहे?’’
ती व्यक्ती म्हणाली : ‘‘मी नवा आहे. मला या भागातली फारशी माहिती नाही.’’
कडेला असलेल्या व्यक्तीकडे बोट दाखवत आधीची व्यक्ती म्हणाली : ‘‘तिकडे सर आहेत, त्यांना माहीत असेल.’’
ती व्यक्ती ‘सर' म्हणाल्याचं ऐकून मी चमकलो आणि विचारलं : ‘‘ते या गावचे शिक्षक आहेत की तुमचे साहेब म्हणून तुम्ही त्यांना सर म्हणताय?’’
ती व्यक्ती यावर काहीच बोलली नाही, फक्त हसली व हातातल्या कुदळीनं खोदण्याचं काम करू लागली. आम्ही त्या पुढच्या व्यक्तीकडे गेलो. ती साधारणतः चाळिशीतली व्यक्ती होती.
धुमाळ यांनी तिला हाक मारली, त्यासरशी ती व्यक्ती हातातलं
काम सोडून धुमाळ यांच्याकडे बघत म्हणाली : ‘‘त्या झाडावर मोठा झेंडा फडकतोय ना... तेच जाधवांचं शेत.’’
मी त्या व्यक्तीला ‘ओ सर’ अशी हाक जाणीवपूर्वक मारली. काम थांबवून तिनं माझ्याकडे पाहिलं व तिचा चेहरा संकोचल्यासारखा झाला.
‘आपल्याला यांनी ओळखलं असावं,’ असं त्या व्यक्तीला वाटलं!
‘‘तुम्ही कुठल्या शाळेत आहात? की तुमचा खासगी क्‍लास आहे,?’’ या माझ्या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरं न देता ती व्यक्ती म्हणाली : ‘‘पहिल्यांदा मला सांगा, तुम्ही मला ‘सर’ कसं काय म्हणालात?’’
मी म्हणालो : ‘‘त्या पलीकडच्या माणसानं तुम्हाला सर म्हणून हाक मारल्याचं मी ऐकलं व म्हणून मीही तशीच हाक तुम्हाला मारली.’’
आता त्या व्यक्तीचा मूड बदलला. ती म्हणाली : ‘‘मी शिक्षकही नाही आणि माझा कुठं कोचिंग क्‍लासही नाही.’’ यावर मी विचारलं : ‘‘मग ती तिकडं काम करणारी व्यक्ती तुम्हाला ‘सर’ असं का म्हणाली? तुम्ही मुकादम आहात का? त्या व्यक्तीच्या वरचे साहेब?’’
मी आणि धुमाळ सखोल चौकशी करायला लागलो तेव्हा त्या व्यक्तीनं कुदळ खाली ठेवली आणि घामानं डबडबलेला चेहरा जवळच पडलेल्या मळकट टॉवेलनं पुसला. त्या व्यक्तीच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या.
ती व्यक्ती काहीतरी बोलण्याची वाट आम्ही बघू लागलो...
* * *

लातूरमधल्या एका मोठ्या कॉलेजचं नाव सांगत ती व्यक्ती म्हणाली : ‘‘मी त्या कॉलेजात प्राध्यापक आहे. गेल्या तेरा वर्षांपासून मी तिथं शिकवतो. तो पलीकडे असलेला राहुल गायकवाड हा माझाच विद्यार्थी आहे. तोही प्राध्यापक आहे आणि तो खाण खोदायचं काम करतो.’’
त्या व्यक्तीच्या बोलण्यावर आमचा विश्वास बसेना. धुमाळ यांच्याबरोबर आणखी दोनजण होते. तेही अचंब्यानं पाहू लागले. मात्र, त्या व्यक्तीनं सगळे दाखले दिल्यावर आमचा विश्‍वास बसला.
जवळच चिंचेचं झाड होतं.
त्या झाडाच्या जेमतेम सावलीत आम्ही सगळे गेलो. एकमेकांशी ओळख झाली आणि ते प्राध्यापक आमच्यी प्रश्‍नांची मनमोकळेपणानं उत्तरं देऊ लागले.
त्यांच्या सांगण्यानुसार,
त्यांची मागची सोळा वर्षं फुकट गेली होती. कायमस्वरूपी टिकेल असं कुठलंच काम या सोळा वर्षांत
त्यांच्याकडून झालं नव्हतं.
मघाशी कुदळीनं खोदकाम करणाऱ्या या प्राध्यापकांचं नाव सीताराम पाटील.
आपल्याला मिळणाऱ्या पैशाबद्दल, मिळणाऱ्या आश्‍वासनांबद्दल, आपल्या स्वप्नांचा जो चक्काचूर झाला त्याबद्दल प्रा. पाटील यांनी तपशीलवार माहिती दिली.
मी त्यांचा हात हातात घेतला, त्या हातांना घट्टे पडलेले होते. प्रा. पाटील यांचं ‘नेट-सेट’ झालेलं आहे. ते पीएच.डी आहेत.
एवढं शिकलेली व्यक्ती आज ना उद्या प्राध्यापक होईल या आशेनं एका मोठ्या अधिकाऱ्यानं प्रा. पाटील यांना आपली एकुलती एक मुलगी दिली.
‘‘तुम्हाला संस्थेवर घेतो,’’ असं म्हणत संस्थाचालकांना पाहिजे ती रक्कमही प्रा. पाटील यांच्या सासऱ्यानंच दिली; पण प्रा. पाटील यांना पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून अद्याप संस्थाचालकांनीही पत्र दिलं नाही आणि शासनानंही दिलं नाही.
पूर्वी अडीचशे रुपये एका तासाला मिळायचे. दिवसभरात दोन-तीन तास होत असतील. आता ते पैसे चारशे सोळा रुपयांपर्यंत गेले आहेत; पण तास तेवढेच आहेत आणि ‘तासिका तत्त्वावरचे प्राध्यापक’ असा शिक्काही कायम आहे.
प्रा. पाटील म्हणाले : ‘‘महिन्याकाठी कामाचं कितीही मूल्यमापन केलं गेलं तरी पैशांच्या स्वरूपात फार फार तर दहा-बारा हजार रुपये पदरात पडतात. त्यात दिवाळीची सुटी, उन्हाळ्याची सुटी आलीच.‘तुम्हाला पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून घेऊ,' असं आश्वासनाचं गाजर शासनाकडून आणि संस्थेकडून दरवर्षी मिळतं. अजून किती दिवस हे गाजर मिळत राहणार आहे हे सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा इथं खोदकाम करून जास्त पैसे मिळतात. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.’’
ते पुढं म्हणाले : ‘‘मी कुटुंबात उच्चशिक्षित आहे; पण ‘चांगली नोकरी नाही', असा बोल लावला जाऊन माझ्या घरातच माझं खच्चीकरण होतंय. ‘हा काही कामाचा नाही,’ असा शिक्का सासुरवाडीनं माझ्यावर मारला आहे. दोन मुलींचं शिक्षण, एकूण खर्च, महागाई आणि एकंदर मिळकत पाहता जगावं की मरावं असा प्रश्‍न माझ्यासमोर आहे. आत्महत्येचेही विचार मनात
अनेक वेळा येऊन गेले; पण आपल्याकडून शिकून गेलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना काय वाटेल, आपल्या लहान दोन मुली आहेत, त्यांच्या भवितव्याचं काय होईल असे प्रश्न पडून तो विचार बाजूला सारावा लागतोय.
आता कॉलेज बंद आहे आणि पाच महिन्यांपासून तुटपुंजे पैसेही मिळत नाहीत. गावापासून दूर कुणाला कळणार-दिसणार नाही अशा ठिकाणी येऊन हे काम करतोय. आमच्या विविध प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही काही जणांनी एकत्रित येऊन संघटनाही स्थापन केली आहे. त्या संघटनेचं काम औरंगाबादहून चालतं.’’
त्या संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्याचं नाव आणि मोबाईल नंबर मी प्रा. पाटील यांच्याकडून घेतला. दुसऱ्या दिवशी औरंगाबादला जाणारच होतो, तेव्हा त्या पदाधिकाऱ्याला भेटावं, ती संघटना या 'तासिका प्राध्यापकां'साठी करते तरी काय याची माहिती घ्यावी असा विचार केला.
आम्ही निघताना प्रा. पाटील यांना धीर देत मी म्हणालो : ‘‘दादा, होईल सगळं ठीक. नका काळजी करू. आपण स्वप्न बघणं थांबवायचं नाही. सतत प्रयत्न करत राहायचे.’’
प्रा. पाटील शांतपणे म्हणाले : ‘‘हो सर, अगदी खरं आहे. मीही माझ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिकवताना हेच सांगत असतो!’’
प्रा. पाटील यांनी पुन्हा कुदळ हातात घेतली आणि ते खोदकाम करू लागले.
मी त्यांच्या उत्तरानं चक्रावून गेलो. माझं तत्त्वज्ञान त्यांच्या अनुभवानं एका मिनिटात गुंडाळून टाकलं होतं.
* * *

आम्ही जाधव यांच्या शेतात गेलो. त्यांचे प्रयोग पाहिले; पण तिथं काही समजून घेण्यात मन लागेना. दुसऱ्या दिवशी औरंगाबादला पोचलो आणि प्रा. सीताराम पाटील यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर संबंधित पदाधिकारी प्रा. संदीप पाथ्रीकर (९४२०४९४३४५) यांना फोन केला. त्यांना भेटण्यासाठी पोहोचलो. तासिका तत्त्वावर शिकवणाऱ्या शेकडो प्राध्यापकांना
‘महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना' या संघटनेंतर्गत एकत्रित करून त्यांच्या प्रश्‍नांवर लढा देण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून पाथ्रीकर करत आहेत. ते स्वतःही अनेक वर्षं तासिका तत्त्वावर शिकवणारे प्राध्यापक होते. आमचं बोलणं झालं. त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती.
शिक्षणव्यवस्थेवर, शिक्षणधोरणावर विश्‍वास बसू नये अशी ती माहिती होती.
प्रा. पाथ्रीकर म्हणाले : ‘‘नेट-सेट, पीएच.डी. झालेल्या पात्र उमेदवारांची संख्या आज महाराष्ट्रात पन्नास हजारांच्या वर आहे आणि रिक्त जागा आहेत तेरा हजार. आज महाराष्ट्रात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या नऊ हजार १८२ आहे. खूप ओरड केल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर ता. तीन नोव्हेंबर २०१८ रोजी भरती सुरू झाली. शासन
त्या वेळी साडेतीन हजार प्राध्यापकांची भरती करणार होतं; पण तेव्हा दीड हजारांचीच भरती केली गेली. राज्यात विनाअनुदानित कॉलेजांची संख्या तीन हजार पाचशे आहे आणि अनुदानित कॉलेजांची संख्या एक हजार १७१ आहे. अनुदान असणाऱ्या कॉलेजांमध्ये भरती होत नाही. ‘कॉलेजला अनुदान द्या आणि प्राध्यापकांची पदं भरा,’ अशी मागणी आम्ही शासनाकडे अनेक वेळा केली; पण शासन काही मनावर घेत नाही. सन २००० पासून अनुदान देणं पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत त्या तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी काय करायचं हा प्रश्‍न कायम आहे. कित्येक जणांनी आपलं आयुष्य संपवलं, कित्येक जण भ्रमिष्ट झाले.’’
आजपर्यंत उच्चशिक्षित असणाऱ्या अनेकांचे प्रश्‍न मी बारकाईनं अनुभवले; पण ‘नेट-सेट’आणि पीएच.डीसारख्या सर्वोच्च पदव्या घेणारेसुद्धा इतक्‍या मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत हे धक्कादायकच होतं. प्रा. पाथ्रीकर यांचा निरोप घेऊन मी मुंबईच्या दिशेनं निघालो.
प्रा. पाटील यांच्या हाताला पडलेले घट्टे माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हते. या घट्ट्यांना जबाबदार कोण? प्रा. पाटील यांच्या स्वप्नांचा जो चक्काचूर झाला त्याला जबाबदार कोण? प्रा. पाटील यांच्यासारखे आणखी कितीतरी ‘प्रा. पाटील’ हे उच्चशिक्षित असूनही या स्थितीत जगत आहेत...याला जबाबदार कोण? संस्थाचालक, सरकार की धोरण ठरवणारे ते सगळेजण? दोष नेमका कुणाला द्यायचा?

‘आपण आज ना उद्या पूर्ण वेळ प्राध्यापक होऊ,’ या आशेवर जगणाऱ्या त्या सगळ्यांची आता म्हातारपणाकडे वाटचाल सुरू आहे. तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही. आपण एक ना एक दिवस पूर्ण वेळ प्राध्यापक होऊ आणि तासिका नावाचा फास आपल्या आयुष्यातून दूर होईल या आशेवर ते सगळे जगत आहेत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com