esakal | संदल...! (संदीप काळे)
sakal

बोलून बातमी शोधा

sandip kale

त्या संदलच्या माध्यमातून एक मोठा सामाजिक संदेश दिला गेलेला मला दिसत होता. दोन भिन्नधर्मीयांमधलं मित्रत्वाचं नातं, मित्राच्या शब्दाला दिला गेलेला मान, दोन धर्मांमध्ये सलोखा टिकवण्याचा धागा आणि माणसामाणसात उत्सवाच्या माध्यमातून प्रेम शाबूत ठेवण्याचा हा उपक्रम म्हणजे संदल असं मला त्या ठिकाणचं वातावरण पाहून वाटलं.

संदल...! (संदीप काळे)

sakal_logo
By
संदीप काळे sandip.kale@esakal.com

त्या संदलच्या माध्यमातून एक मोठा सामाजिक संदेश दिला गेलेला मला दिसत होता. दोन भिन्नधर्मीयांमधलं मित्रत्वाचं नातं, मित्राच्या शब्दाला दिला गेलेला मान, दोन धर्मांमध्ये सलोखा टिकवण्याचा धागा आणि माणसामाणसात उत्सवाच्या माध्यमातून प्रेम शाबूत ठेवण्याचा हा उपक्रम म्हणजे संदल असं मला त्या ठिकाणचं वातावरण पाहून वाटलं.

हिंगोली जिल्ह्यातलं सांडस हे माझ्या मामाचं गाव. या गावातली निरगुडे मंडळी म्हणजे माझं आजोळ. समाजात अनेक चांगले प्रयोग केल्यामुळे सांडसचे निरगुडे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. माझं बालपण सांडसमध्ये गेलं, त्यामुळे आजही सांडसला जाण्याची ओढ कायम असते. वर्षातून एक-दोन वेळा का होईना सांडसला जाणं होतंच होतं. मागच्या महिन्यात सांडसला जायचं असं ठरवलं आणि निघालो. नांदेड ते कळमनुरी असा प्रवास करत सांडस गाठलं. आता म्हातारीकोतारी माणसं गावात शिल्लक आहेत, तरण्याताठ्यांनी आपली बिऱ्हाडं शहरांत थाटली आहेत. जुन्या आठवणी, नाती आजही किती प्रेमानं जपली जातात हे सांडसमध्ये गेल्याशिवाय कळत नाही. सांडसमधून निघत असताना, माझा मित्र जय मिजगर याचा फोन आला. तो म्हणाला : ‘‘तुम्ही आज हिंगोलीला जाणार होतात ना? येताना गावात जाऊन बाबांना आणि काकांना भेटून या.’’
संतोष मिजगर याचाही काल असाच निरोप होता : ‘गावाकडे जाऊन या म्हणून.’
रस्त्याला लागलो. दुपार झाली होती. बाळापूरला पोहोचलो आणि जय-संतोष यांच्या नेवरवाडी या गावाकडे निघालो. आसपास सर्वत्र दारिद्र्य...रस्ते बरोबर नाहीत...पिण्यासाठी पाणी नाही...शेतीला तर असायचा प्रश्‍नच नाही. सगळं काही भकास. संतोषनं ‘पाटील’ नावाचा सिनेमा काढला होता. त्या सिनेमाचं बरंचसं शूटिंग नेवरवाडी या गावात झालं होतं. त्यामुळे नेवरवाडी ही महाराष्ट्राला अगदीच अनोळखी आहे असं नाही. मी येणार असल्याचं जय-संतोषनं गावात अगोदर कळवलं होतं. सरकारी अनास्थेनं आणि निसर्गानं गावाची सर्व श्रीमंती बकालीत रूपांतरित करून टाकली होती; पण गावातल्या माणसांमध्ये श्रीमंती मात्र शिगोशिग भरल्याचा अनुभव आला.

संतोषचे वडील रामराव मिजगर (९३२२५५७५७५) माझ्या स्वागतासाठी अनेक माणसांसह उभे होते. खापराची घरं...जुन्या पद्धतीचं वातावरण...आजूबाजूला सगळीकडे हिरवळ...यामुळे गावाच्या सौंदर्यात वेगळीच भर पडल्याचं दिसत होतं. गप्पाटप्पा सुरू होत्या. इतक्‍यात संतोषच्या वडिलांना बोलावण्यासाठी काही माणसं घरी आली. ती माणसं म्हणाली : ‘‘ ‘संदल’च्या मीटिंगसाठी तुम्हाला बोलावलं आहे, चला.’’
मी संतोषच्या वडिलांना विचारलं : ‘‘तुमच्या गावात मुस्लिम समाजही आहे का?’’
त्यांनी माझ्याकडे पाहिलं.
मी पुन्हा म्हणालो : ‘‘नाही, संदलची मीटिंग आहे, असा निरोप तुम्हाला आला म्हणून मी विचारलं.’’
ते लगेच म्हणाले : ‘‘नाही, नाही. आमच्या गावात मुस्लिम बांधवांचं एकही घर नाही. संदल आम्हीच दरवर्षी काढतो. माझा भाऊ संभाजी मिजगर (७७३८०९८१०४) आणि मी असे आम्ही दोघं आमच्या वडिलांनंतर ही परंपरा जपतो आलो आहोत. संदल हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे. आमच्या आजोबांपासून ही परंपरा कायम आहे.’’
हा विषय मला तसा नवीनच होता. आपल्याकडे जाती-धर्माच्या भिंती इतक्‍या भक्कम आहेत की कुठला सण कुठल्या धर्माचा, कुठला उत्सव कुठल्या धर्माचा ही समीकरणं आपल्या मनात कायमस्वरूपी ठसून गेलेली असतात. अमका सण हिंदूंचा, तमका सण मुस्लिमांचा, तमका सण ख्रिश्‍चनांचा अशी विभागणी आपणच केलेली असते व त्या त्या चौकटीनुसार ते ते सण आपण साजरेही करतो. नेवरवाडीमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत होतं. नांदेड जिल्ह्यात टाकळी नावाचं गाव आहे. तिथं एकाच गाभाऱ्यात मंदिरही आहे आणि मशीदही! असं सर्वधर्मसमभावाचं चांगलं उदाहरण क्वचितच कुठं पाहायला मिळतं.
संदलचे वेगवेगळे पैलू रामराव मिजगर यांनी मला सांगितले.
जानेवारी महिन्यात दरवर्षी संदल असतो. गावाच्या बाजूला छोटंसं मजार शरीफ आहे. गावकऱ्यांच्या भाषेत त्याला ‘फकीरसाहब’ किंवा ‘फकीरदेव’ असं म्हणतात. तिथं प्रत्येक जण श्रद्धेनं नतमस्तक होतो.

संतोषचे वडील म्हणाले : ‘‘रझाकारांच्या काळात माणसामाणसांमधले भेद वाढवण्याचं काम सातत्यानं होत गेलं. ज्या गावांमध्ये मुस्लिम आहेत त्यांनाच आपलं मानणं, हिंदूंचा छळ करणं असं वातावरण त्या काळात होतं. माझे वडील, आजोबा मला सांगायचे, की रझाकारांच्या त्या काळात अनेक हिंदू आणि अनेक मुस्लिम एकोप्यानं राहत असत. त्या त्या गावात त्यांचे परस्परसंबंध चांगले असायचे; पण ते संबंध बिघडावेत यासाठी रझाकारी प्रयत्न सातत्यानं व्हायचे. मग कित्येक कुटुंबं गावं सोडून गेली. त्यांच्या खुणा मागं राहिल्या. आमच्या गावात मुस्लिमांची दोन-तीन घरं होती. त्यांचं आणि आमचं कमालीचं सख्य होतं. ‘आमच्या माघारी तुम्ही आमच्या देवाची पूजा करत जावी, संदल करत जावा,’ असं वचन रझाकारांच्या काळात हे गाव सोडताना त्या दोन-तीन मुस्लिम कुटुंबीयांनी माझ्या आजोबांकडून घेतलं होतं. ते वचन माझ्या आजोबांनी, वडिलांनी आणि आम्हीही पाळलं आहे. अवघं गाव एक होऊन या उत्सवात सहभागी होतं. जत्रा-यात्रा, एकमेकांच्या घरी जाणं-येणं हे या उत्सवादरम्यान होतं. गावात सरपंच कुणाचाही असो वा पोलिस पाटील कुणाचाही असो; पण या फकीरदेवामुळे आम्हाला ‘मानकरी’ ही पदवी मिळाली. तीन पिढ्यांपासून ती कायम आहे.

मराठवाड्यात रझाकारांच्या खुणा अशा अनेक गावांमध्ये बघायला मिळतात. माणसांची मनं दुभंगली, माणसं एकमेकांपासून दुरावली; पण त्यांच्यातला संस्कार आणि आपलेपणाचा धागा आजही कायम आहे. नेवरवाडीतले मिजगर कुटुंबीय आपल्या मित्राच्या देवाची सेवा, आपला देव मानून, करतात हे नक्कीच नोंद घेण्यासारखं आहे.
जेव्हा मुस्लिमांना वाटतं की हिंदूंचा देव माझा आहे आणि जेव्हा हिंदूंना वाटतं की मुस्लिमांचा देव माझा आहे तेव्हाच श्रद्धेच्या खऱ्या जागृतीची बीजं पेरली जात असतील आणि त्यातून निखळ माणुसकी जन्माला येत असेल. नेवरवाडीचं वातावरण पाहून असंच वाटत होतं.

मिजगर काकांसोबत मीही त्या मीटिंगला गेलो. मिजगर काका मीटिंगच्या तिथं जाताच, ‘मानकरी आले, मानकरी’ असं म्हणत सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. दरवर्षी होणाऱ्या या मीटिंगला गावातली सगळी प्रमुख माणसं उपस्थित असतात. कार्यक्रम कसा असला पाहिजे, घोडा कसा असला पाहिजे, इथपासून ते आसपास असणाऱ्या शेवाळा, कवडी, नेवरी, तालंग या गावांतल्या लोकांना कसं निमंत्रित करायचं हे त्या मीटिंगमध्ये ठरलं. नेवरीच्या पठाणाला दरवर्षी निमंत्रण असतं, ते या वर्षीही द्यायचं ठरलं. एका उत्सवासारखी सर्व तयारी तिथं सुरू होती.

मी घरी आल्यावर मिजगर काकांना या संदलविषयी अनेक प्रश्न विचारले. ते म्हणाले : ‘‘विज्ञान मानणारी माणसं माझ्या बोलण्याला हसतीलही; पण माझे आजोबा सांगायचे, वडील सांगतात आणि मीही तेच सांगतो, ‘संदलचा घोडा जेव्हा निघतो ना तेव्हा त्याची चाल पाहा...असं वाटतं, कुणी तरी महापुरुष त्या घोड्यावर बसलेला आहे.’ आम्ही त्या महापुरुषाला देवच म्हणतो! ज्या गावातून तो संदलचा घोडा फिरतो, त्या गावात इमान नावाचं एक ‘वारं’ वाहतं. ते ‘वारं’ प्रत्येक माणसाच्या मनात माणुसकी रुजवण्याचं काम करतं. या पंचक्रोशीत आणि आसपासही असा मान कुणालाही नाही. गावातलं वातावरण एकदम श्रद्धामय असतं. प्रत्येक जण त्या फकीरदेवापुढं नतमस्तक होतो. तिथं नतमस्तक होतांना ‘हा मुस्लिमांचा देव आहे’ असा किंतू कुणाच्याच मनात बिलकूलही येत नाही.’’

संतोषचे काका संभाजी मिजगर आणि संतोषचे वडील रामराव मिजगर या दोन बंधूंनी मिळून संदल आजही सुरू ठेवला आहे. मी मागच्या संदलचे काही फोटो पाहिले. मजार शरीफचा सजवलेला परिसर...त्यावर चढवलेली चादर...तो मिरवणुकीतला सजवलेला पांढराशुभ्र घोडा...घोड्यावर टाकलेला गलेब (गिलाफ)...अनेक लोकांनी डोक्‍याला बांधलेले रुमाल...हे सगळं लक्ष वेधून घेत होतं. आख्खं गाव आणि आसपासच्या गावांतले लोक त्या संदलमध्ये सहभागी झाल्याचं त्या फोटोंमधून दिसत होतं.
संभाजी मिजगर म्हणाले : ‘‘कितीही आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असली तरीही या उत्सवातला आनंद आम्ही कमी होऊ देत नाही. शानदार मिरवणूक, सगळ्यांचा पाहुणचार हे होतंच होतं. कधी ओला दुष्काळ असतो तर कधी कोरडा; पण संदल करताना दुष्काळाचं सावट कुणाच्याही मनावर नसतं.’’
मी गावातल्या तरुणांशीही बोललो. त्यांनीही संदलबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ‘तरुण श्रद्धा-परंपरा सांभाळत नाहीत’, असं आपण म्हणतो; पण नेवरवाडीतले तरुण मात्र आपल्या गावातल्या श्रद्धा-परंपरा सांभाळताना दिसत होते. ‘संदलच्या निमित्तानं आलेले अनेक मुस्लिमबांधव गावातल्या प्रसिद्ध देवस्थानाचं दर्शन घेतात,’ असंही एका तरुणानं आवर्जून सांगितलं.

तो म्हणाला : ‘‘गावात जेव्हा निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या रंगांचे रुमाल खांद्यावर टाकून कार्यकर्ते, नेते येतात तेव्हा आम्ही त्यांना अगोदर मजारच्या पुढं नतमस्तक व्हायला लावतो, त्या वेळी काहींचे चेहरे पाहण्यासारखे असतात.’’
रामराव मिजगर म्हणाले : ‘‘माझे वडील मला त्यांच्या अखेरच्या काळात सांगून गेले, ‘बाबा, आपली संदलची परंपरा कधी मोडू नकोस.’ माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांनी हेच सांगितलं होतं.’’ आता हा संदल म्हणजे एकट्या मिजगर या मानकरी कुटुंबाचीच नव्हे, तर त्या आख्ख्या गावाचीही जबाबदारी बनला आहे.
या संदलच्या माध्यमातून एक मोठा सामाजिक संदेश दिला गेलेला मला दिसत होता. दोन भिन्नधर्मीयांमधलं मित्रत्वाचं नातं, मित्राच्या शब्दाला दिला गेलेला मान, दोन धर्मांमध्ये सलोखा टिकवण्याचा धागा आणि माणसामाणसात उत्सवाच्या माध्यमातून प्रेम शाबूत ठेवण्याचा हा उपक्रम म्हणजे संदल असं मला त्या ठिकाणचं वातावरण पाहून वाटलं. त्या संदलमध्ये मुस्लिमही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
नेवरवाडीमधली सगळी ठिकाणं मी ‘पाटील’ या सिनेमात पाहिली होती. तीच ठिकाणं मी आज पुन्हा पाहत होतो. जिथून मिरवणूक निघते, त्या मजार शरीफजवळ मला मिजगर काकांनी नेलं. मी तिथं श्रद्धेनं नतमस्तक झालो. माझ्याबरोबरचेही नतमस्तक झाले.

संदल आता त्या गावातल्या माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. ‘संदलवर पैसे देतो,’ ‘संदलला मुहूर्त काढू,’ ‘संदल झालं की कामाला सुरुवात करू...’ असा प्रत्येक दैनंदिन गोष्टीत संदलचा उल्लेख येत असलेला ऐकायला मिळाला.
गावातले सगळ्या जाती-धर्मांचे लोक एका पंगतीला जेवायला बसतात ते इथल्या संदलच्या संस्कृतीमुळे! आसपासच्या अनेक गावांत आजही सगळ्या जाती-धर्मांतले लोक एका पंगतीला जेवायला बसत नाहीत, असं वातावरण आढळतं. त्या पार्श्वभूमीवर हे विशेष आहे.
मी निघताना गावातल्या अनेक तरुणांनी मला संदलचं निमंत्रण दिलं. त्या तरुणांनी निरोपाच्या वेळी हातात घेतलेला हात, त्यांनी दिलेलं निमंत्रण यातून त्यांची आपुलकी, श्रद्धा जाणवत होती.
मंदिर-मशीद यांच्या वादात जी माणसं संपली त्यांनी नेवरवाडीची संस्कृती पाहिली असती तर त्यांचं आयुष्य वाया गेलं नसतं असा एक भाबडा विचार माझ्या मनात येऊन गेला.

ग्रामीण भागांतल्या लोकांनीच - जी बहुतकरून अडाणी, अशिक्षित आहेत - सामंजस्याची, सलोख्याची संस्कृती अंगीकारली आहे आणि शिकलेल्या, शहरातल्या जाणकार माणसांनी याच भगव्या-हिरव्या संस्कृतीचा वापर आपल्या स्वार्थासाठी केला आहे, हे खरं नाही का? धर्माच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर आम्हाला एकमेकांची डोकी फोडायला कोण लावतं याचा विचार, नेवरवाडीतल्या त्या मिजगर कुटुंबीयांचं काम पाहून, नक्कीच मनात येतो.

या गावातला हा संदल म्हणजे एका हिंदू मित्रानं आपल्या मुस्लिम मित्राला दिलेलं केवळ वचनच नव्हे, तर माणुसकी जपण्याचा-जोपासण्याचा धागा आहे आणि त्या धाग्यात भारतीय संस्कृतीच्या आपलेपणाची माळ गुंफलेली आहे.