esakal | शेवटची साडी (संदीप काळे)
sakal

बोलून बातमी शोधा

sandip kale

काकांचा तो निरोप ऐकून माझ्या पोटात धस्स झालं. मी तसाच धावत घराकडे निघालो. आत हात घालून मी दार उघडलं. पाहतो तर काय...आई शांतपणे पडली होती. मी आईला हाका मारू लागलो...तरीही ती काहीही बोलायला तयार नव्हती.

शेवटची साडी (संदीप काळे)

sakal_logo
By
संदीप काळे sandip.kale@esakal.com

काकांचा तो निरोप ऐकून माझ्या पोटात धस्स झालं. मी तसाच धावत घराकडे निघालो. आत हात घालून मी दार उघडलं. पाहतो तर काय...आई शांतपणे पडली होती. मी आईला हाका मारू लागलो...तरीही ती काहीही बोलायला तयार नव्हती. थोडंसं पाणी पाजल्यावर काही वेळानं तिनं डोळे उघडले. माझा हात हातात घेत ती मंदसं हसली आणि म्हणाली, ‘तुझी साडी नेसल्याशिवाय मी मरणार नाही रे...’

रामकृष्ण सुराशे यांच्या विंचूर (विष्णुनगर) या गावाहून मी येवल्याकडे निघालो. रामकृष्णमामांनी शेतीविषयक सांगितलेल्या अनेक मुद्द्यांवर अथर्वनं मला प्रश्न विचारले. तसं पाहिलं तर माझ्याकडेच काय, कुणाकडेही रामकृष्णमामांच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. ‘कर्जासाठीच जन्म आमचा’ हा लेख गेल्या आठवड्यात या सदरात प्रसिद्ध झाल्यावर अनेक शेतकरी म्हणाले : ‘ही तर आमचीच करुण कथा आहे.’
कर्ज, सरकार, निसर्ग या सगळ्यावर शेतकरी भरभरून बोलले.
अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही येवल्यात पोहोचलो. येवल्याची साडी/पैठणी राज्यात प्रसिद्ध आहे. माझे सहकारी तेजस गुजराती यांचंही गाव येवला. ते येवल्याच्या साडीविषयी, तिच्या कारागिरीविषयी मला नेहमी सांगायचे. तेव्हा, येवल्यात साडी कशी तयार होते, तिचं मार्केटिंग कसं असतं, कारागीर कोण आहेत, ते कशा पद्धतीनं काम करतात हे सगळं समजून घ्यावं असं मलाही वाटलं. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्याकडच्या चांगल्या कला नष्ट होतात की काय असं वातावरण एकीकडे असताना येवल्यात ही कला जपली जात आहे ही खूप चांगली गोष्ट होय.
रस्त्याच्या दुतर्फा लावलेले या कलेविषयीचे मोठमोठे फलक येवल्यात प्रवेशतानाच लक्ष वेधून घेत होते. एका दुकानासमोर थांबलो व त्या दुकानदाराला विचारलं : ‘‘दादा, पैठण्या तयार करण्याचा तुमचा कारखाना कुठं आहे?’’
‘‘मागच्या बाजूला,’’ त्यांनी सांगितलं.
अगोदर दुकानात गेलो. तिथल्या पैठण्या आणि साड्या बारकाईनं पाहिल्या. जीव ओवाळून टाकावा अशीच ती कला होती. किती प्रकार, किती रंग...!
‘‘पैठणी कुठं तयार होते, कशी तयार होते ते सगळं मला पाहायचं आहे...’’ मी त्या दुकानदाराला म्हणालो.

त्यानंतर त्या दुकानात काम करणारा सचिन पारवे हा मुलगा मला मागच्या बाजूच्या कारखान्यात घेऊन गेला. भल्यामोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये पैठण्या तयार करण्याचं काम सुरू होतं. एकेक धागा बांधून पैठणीला रूप आणण्याचं काम शेकडो कामगार तल्लीनतेनं करत होते. एक धागा पकडायचा...त्या धाग्याला अनेक प्रकारचे आकार देत, ती पैठणी इंचाइंचानं पुढं घेऊन जायची...किती अवघड आणि जिकिरीचं काम होतं ते. तरी ते काम अगदी आनंदानं करणारे अनेक जण तिथं मला दिसले. एक काका जाड भिंगांचा चष्मा लावून पैठणीचे धागे रंगवत होते. त्यांची सत्तरी उलटून गेली असावी.
या काकांचं नाव संभाजी जाधव.
मी जाधवकाकांना विचारलं :‘‘किती वर्षांपासून तुम्ही हे काम करता?’’
ते म्हणाले : ‘‘बालवयापासूनच म्हणा ना! कामगार ते व्यवस्थापक असा माझा प्रवास. सुरुवातीला तीन रुपये महिन्याला मिळायचे. आता तीस हजार रुपये मिळतात.’’ पैठणीच्या निर्मितीची प्रक्रिया त्यांनी सविस्तरपणे सांगितली. एकेक पैठणी/साडी रंग-रूपानं देखणी होते, धाग्यांनी टिकाऊ होते तेव्हा त्यामागं किती आणि कशी मेहनत असते ते मी पाहत होतो. मी ज्या दुकानामध्ये पैठण्या/साड्या पाहत होतो तिथं त्यांची किंमत आठ हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत होती.

जाधवकाका म्हणाले : ‘‘एक पैठणी वा साडी तयार करायला महिना-दोन महिने लागू शकतात.’’ प्रत्येक धाग्याला रंग कसा लागतो, त्या रंगात कोणतं नक्षीकाम कसं उठून दिसतं ते मला जाधवकाकांनी सांगितलं. आमच्या गप्पा सुरू असतानाचा एक गाणं ऐकू आलं...‘तू कितनी अच्छी है... तू कितनी प्यारी है...’ एक तरुण मोबाईलवर ते गाणं ऐकत बसला होता.
जाधवकाका काहीसे वैतागून त्या तरुणाला मोठ्या आवाजात म्हणाले : ‘‘ए नरबा, बंद कर ते गाणं. एकच गाणं किती वेळा ऐकायचं रे...?’’
‘‘गेल्या चार महिन्यांपासून त्याचं सतत असं ‘आईपुराण’ चाललेलं आहे,’’ जाधवकाकांनी माहिती दिली.
मी विचारलं : ‘‘ ‘आईपुराण’ म्हणजे काय? मला कळलं नाही...’’
ते म्हणाले : ‘‘चार महिन्यांपूर्वी नरबा कांबळेची आई गेली, तेव्हापासून तो आईच्या आठवणीनं खूप हळवा झाला आहे. त्या गाण्यातून आपली आई आपल्याला भेटत असते असं त्याला वाटतं.’’
‘‘काय झालं होतं त्याच्या आईला?’’ मी विचारलं.
जाधवकाका म्हणाले : ‘‘काय सांगावं? शेवटपर्यंत निदान झालं नाही. सगळे जण म्हणत होते की टीबी झालाय.’’
मी कोण आहे हे, मला कारखाना दाखवायला आलेल्या सचिननं, एव्हाना सगळ्यांना सांगितलं होतं, त्यामुळं प्रत्येक जण स्वतःविषयी मला मोठ्या उत्साहानं सांगत होता. तिथं प्रत्येक कामगाराकडे वेगळी कला होती.
पैठणीच्या या कलेविषयी, कारागिरीविषयी जाणून घ्यायलाच मी इथं आलो होतो, त्यातच नरबाच्या आईविषयीची माहिती पुढं आली...

नरबा हा तिशीतला युवक. केस-दाढी वाढलेली. पायात साधी चप्पल. अंगात खादीचा जाडाभरडा सदरा. पैठणी, साडी विणण्याच्या दोऱ्यात सतत डोळे घातल्यामुळे त्याच्याही डोळ्यांना जाड भिंगांचा चष्मा लागला होता. या कडेचा त्या कडेला दोरा अडकून, त्या दोऱ्याला एक नवीन रूप देण्याचं काम नरबा करत होता. ‘मोबाईल बंद कर’ असं जाधवकाकांनी काहीसं वैतागून सांंगितल्यावर त्यानं मोबाईल बंद केला. मी नरबाकडं मोर्चा वळवायचं ठरवलं. अथर्व जाधवकाकांशी गप्पा मारत बसला.
मी नरबाजवळ गेलो. त्याला विचारलंं : ‘‘काका चिडले म्हणून नाराज झालास का?’’ नरबा फार काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
पैठणीवर चाललेली त्याची रेखीव कला मी बारकाईनं पाहू लागलो. त्याला हळूहळू बोलतं केलं.

‘‘एवढी चांगली कला तू शिकलास कुठं? कुठं घेतलंस हे शिक्षण?’’ माझ्या या प्रश्नावर तो शांतपणे हसला आणि म्हणाला : ‘‘शिक्षण नाही हो...मलातर माझी सहीपण येत नाही. तसं पाहिलं तर, माझ्या आईकडूनच मी ही कला शिकलो. हे श्रेय तिचंच. आई गोधड्या शिवत असे. कुणी महिला जुने कपडे आणून द्यायच्या आणि आई त्यांची गोधडी शिवायची. तिनं शिवलेली नक्षीदार गोधडी कमालीची आकर्षक दिसायची. गोधड्यांच्या पैशांतून आमचं घर चालायचं. गोधड्या शिवून शिवून आईच्या बोटांची चाळण झाली होती. तिची दशा मला पाहवत नसे. वडील होते तोपर्यंत चाळण झालेल्या बोटांचंही तिला काही वाटायचं नाही. ती उत्साहानं गोधड्या शिवायची; पण वडील गेले आणि तिच्या हाताला अक्षरशः लकवा लागल्यासारखं झालं. ती सतत आजारी पडू लागली.’’
मी मध्येच विचारलं : ‘‘तुमचं गाव इथून किती दूर आहे?’’
‘‘दहा किलोमीटर,’’ आईच्या आठवणींतून काही क्षण बाहेर येत त्यानं सांगितलं.
पुन्हा मूळ विषयावर येत तो म्हणाला : ‘‘मी इकडं काम करायचो आणि घरी गेल्यावर पुन्हा आईची उरलेली कामंही मलाच करावी लागायची. पैठणीचं काम शिकायला दोन-तीन वर्षं लागली मला. माझ्या हातात ही जी कोरीव कामाची कला आली आहे ती केवळ माझ्या आईमुळेच. मी पहिली पैठणी/साडी तयार केल्यावर, मालकांची परवानगी घेऊन, आईला दाखवायला नेली. आईला ती साडी खूप आवडली. आई म्हणाली, ‘माझ्या गोधड्यांवरचं नक्षीकाम तू साडीवर केलं रे पोरा...!’ आईनं केलेलं ते कौतुक, ती दिलेली शाबासकी माझ्यासाठी खूप मोलाची आहे. त्यानंतर तयार केलेली प्रत्येक साडी मी आईला नेऊन दाखवायचो. एके दिवशी आई म्हणाली, ‘बाळा, माझी एक इच्छा आहे.’ मला वाटलं, ‘सूनबाई आण,’ असं ती नेहमीसारखंच म्हणते की काय! पण आई म्हणाली, ‘बाळा, तू विणलेली, नक्षीकाम केलेली एक साडी मला नेसायचीय रे...’ मी हसलो आणि आईला म्हणालो, ‘एवढी महाग साडी...ते कसं शक्‍य आहे?’ आई म्हणायची, ‘बाळा सगळे दिवस सारखे नसतात...! एक दिवस तू मोठा माणूस होशील. तुझ्याकडे खूप पैसा जमेल आणि तू तुझ्या हातची विणलेली साडी माझ्यासाठी घेशील...’ साडीचा विषय निघाला की आई मला नेहमी म्हणायची, ‘तू तयार केलेली साडी मला कधी देशील?’ आईची साडीची इच्छा मी मालकांनाही अधूनमधून सांगायचो. मालक म्हणायचे, ‘अरे, त्यात काय? आईची इच्छा आहे ना? मग दरमहा थोडे थोडे पैसे जमा कर आणि घेऊन जा आईला साडी. मी तुला कमी भावात देईन.’ आमचे मालक फार मोठ्या मनाचे. मालकांनी तशी तयारी दाखवली असली, तरी मला माहीत होतं की हे सगळं काही शक्‍य नाहीये. गावाच्या कडेला आमची कांबळेमंडळींची चार घरं. त्या चार घरांत आमचं घर जरा बाजूलाच होतं. तरीही आजूबाजूचे लोक म्हणायचे, ‘तुझी आई रात्रभर खोकून, खोकून आमची झोपमोड करते.’ तिला कुठला आजार झाला होता कुणास ठाऊक. दवाखान्याला पैसे लागतील म्हणून ती दवाखान्यात जात नसे. अनेक वेळा आम्ही वैद्याला दाखवलं, तरीही तिच्या आजारात फार फरक नव्हता. एके दिवशी मी असाच नेहमीप्रमाणे कामावर आलो होतो. मालकांच्या फोनवर माझ्यासाठी एक फोन आला...तो माझ्या काकांचा होता. ते म्हणाले, ‘अरे, म्हातारीचं खोकणं, कण्हणं पूर्णपणे बंद झालंय. खूप वेळा दार वाजवलं; पण ते काही उघडलं गेलं नाही...’ काकांचा तो निरोप ऐकून माझ्या पोटात धस्स झालं. मी तसाच धावत घराकडे निघालो. आत हात घालून मी दार उघडलं. पाहतो तर काय...आई शांतपणे पडली होती. मी आईला हाका मारू लागलो...तरीही ती काहीही बोलायला तयार नव्हती. थोडंसं पाणी पाजल्यावर काही वेळानं तिनं डोळे उघडले. माझा हात हातात घेत ती मंदसं हसली आणि म्हणाली, ‘तुझी साडी नेसल्याशिवाय मी मरणार नाही रे...’ आणि ती माझ्याकडे एकटक बघत राहिली. काही वेळानं तिची हालचाल पूर्णतः बंद झाली. आई आपल्याला सोडून गेली आहे हे माझ्या लक्षात आलं. मी हंबरडा फोडला. मी ज्या दुकानात काम करायचो तिथंच काम करणारी दोन मुलं माझ्या गावातली होती. साडीविषयीची इच्छा व्यक्त करून आई मरण पावली हे गावातल्या लोकांनी, त्या दोन मुलांना सांगितलं आणि मुलांनी मालकांना सांगितलं.

नरबाची आई हयात असेपर्यंत आपण तिला साडी देऊ शकलो नाही
याचं मालकांनाही वाईट वाटलं असावं. मालक आणि दुकानातली काही मंडळी आईच्या अंत्यसंस्काराला आली. मालकांनी माझे डोळे पुसले. मीच नक्षीकाम केलेली साडी माझ्या हाती देत ते म्हणाले, ‘शेवटची साडी म्हणून ही साडी आईला नेसव, बाबा.’ मालकांनी साडी माझ्या हाती दिल्यावर माझं रडणं आणखीच वाढलं. माझ्या काकूनं आईला ती साडी नेसवली. ती साडी तिला खूपच सुंदर दिसत होती. जिवंतपणी मी तिची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, याचा सल माझ्या मनात आयुष्यभर राहील...’’
नरबाची ही कहाणी ऐकून मी निःशब्द झालो.
जाधवकाका पुन्हा ओरडले : ‘‘अरे, किती दिवस रडणार आहेस? येणाऱ्या प्रत्येक माणसाला हीच कहाणी सांगतोस...’’

मीही नरबाची समजूत काढू लागलो. जाधवकाका, नरबा कांबळे यांचा निरोप घेऊन आम्ही पैठणीच्या त्या छोट्याशा कारखान्यातून बाहेर पडायच्या तयारीत होतो. तेवढ्यात नरबा म्हणाला :‘‘दादा, आपली माणसं जिवंतपणी आपल्याकडं काहीतरी मागतात; पण तेव्हा आपल्याला त्याची कदर नसते आणि ती माणसं कायमची निघून गेल्यावर आपल्याला हळहळ वाटत राहते...’’ मी पुन्हा एकदा नरबाचं सांत्वन केलं. त्यानं माझ्या हाती दिलेला त्याचा हात मी प्रेमभरानं घट्ट धरला आणि त्याचा निरोप घेतला...
आई-वडील अथवा अन्य कुठल्याही नातेवाइकांचा आधार नसलेल्या नरबानं त्या कारखान्यातल्या धाग्यातच आपल्या जीवनाचं सूत्र शोधलं आहे. आई गेल्याचं, तिची इच्छा ती हयात असताना आपण पूर्ण करू शकलो नाही याचं दुःख तर त्याला आहेच...पण ते त्यानं साड्यांच्या विणकामात गुंफून टाकलं आहे...तो विणत असलेल्या प्रत्येक साडीच्या धाग्याशी त्यानं आयुष्याचा सूर जुळवून घेतला आहे! आपण तयार केलेली प्रत्येक साडी आपल्या आईला द्यायची आहे, अशा भावनेतूनच तो त्या साडीच्या प्रत्येक धाग्यात जीव ओततोय...मी नरबाचा निरोप घेऊन निघालो खरा; पण नरबाचा आणि मी न पाहिलेल्या त्याच्या आईचा चेहरा माझ्या डोळ्यांपुढून जाईना. नरबा कांबळेच्या आर्थिक स्थितीला गरिबीची खूप थिगळं होती; त्याचा नाइलाजच होता. मात्र, आपल्या आजूबाजूलाही आर्थिक सुस्थितीतले जे अनेक ‘नरबा’ असतात ते तरी आपल्या आईच्या भावनांची, इच्छांची कदर ती हयात असतानाच करत असतील का? की ती कायमची सोडून गेल्यावरच तिच्या इच्छा, तिच्या भावना त्यांना जाणवत असतील? आणि मग ते नंतर हळहळत बसत असतील का?