वंचित ते कोण? (संदीप काळे)

संदीप काळे sandip.kale@esakal.com
रविवार, 15 सप्टेंबर 2019

जाती-अंताच्या लढाईत माणसाला - मग तो कुठल्याही जातीचा असो - अनेक वेळा गुडघे टेकावे लागतात. जातीनं त्रासून गेलेला तो प्रत्येक जण ‘वंचित’ म्हणावा लागेल. मग या वंचितांमध्ये मोठी जात आणि छोटी जात असं काहीही नसतं.

औरंगाबाद विद्यापीठ हे पत्रकारितेच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर. खूप आठवणी आहेत तिथल्या. आयुष्याला कलाटणी देणारं हेच ते ठिकाण. वेगवेगळ्या विषयांमध्ये रुची वाढली ती इथंच. नव्या ताकदीनं आणि नव्या जोमानं खूप काही करण्याची प्रेरणा मनात निर्माण झाली तीही इथंच.
त्या दिवशी मी विद्यापीठाच्या गेटसमोर उभा होतो.

जाती-अंताच्या लढाईत माणसाला - मग तो कुठल्याही जातीचा असो - अनेक वेळा गुडघे टेकावे लागतात. जातीनं त्रासून गेलेला तो प्रत्येक जण ‘वंचित’ म्हणावा लागेल. मग या वंचितांमध्ये मोठी जात आणि छोटी जात असं काहीही नसतं.

औरंगाबाद विद्यापीठ हे पत्रकारितेच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर. खूप आठवणी आहेत तिथल्या. आयुष्याला कलाटणी देणारं हेच ते ठिकाण. वेगवेगळ्या विषयांमध्ये रुची वाढली ती इथंच. नव्या ताकदीनं आणि नव्या जोमानं खूप काही करण्याची प्रेरणा मनात निर्माण झाली तीही इथंच.
त्या दिवशी मी विद्यापीठाच्या गेटसमोर उभा होतो.

एकीकडं विद्यापीठाची कमान आणि एकीकडं डॉ. बाबासाहेबांचा पुतळा. कमानीतून ये-जा करणारी सगळी मुलं पाहून मलाही माझे जुने दिवस आठवत होते.
वाटलं, आपण कधी ६० वर्षांचे झालो आणि या विद्यापीठाच्या कमानीत प्रवेश केला तरी ते पंचविसाव्या वर्षीचं ‘फीलिंग’ पुन्हा जागं होईल. या विचारानं मी सुखावून गेलो. तीच माणसं, तेच रस्ते आणि तेच नमस्कार...‘जय भीम’ करत आपली खुशाली विचारणारी अनेक माणसं...विद्यापीठाच्या आत प्रवेश केल्यावर जुने मित्र पावलोपावली भेटत होते. कुलगुरूंचं निवासस्थान आणि त्यासमोर असलेली होस्टेलमधली ती वर्दळ आता बऱ्यापैकी कमी झालेली दिसते. मी जेव्हा विद्यापीठात शिकायला होतो तेव्हा कुलगुरूंच्या घरासमोर विद्यार्थ्यांचा मोठा घोळका पाहायला मिळत असे. कारण, समोरच्या बाजूला मुलींचं वसतिगृह होतं. आपण आपल्या मैत्रिणीला पाच ते सहा वर्षांनंतर भेटायला गेलोय अशा पद्धतीनं रोज तीच ती मुलं आणि त्याच त्या मुली तासन्‌ तास तिथं गप्पा मारताना दिसायच्या. प्रगल्भ वयात प्रेमाच्या आणा-भाका घेऊन उंच भरारी घेणारे अनेक किस्से त्या कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर घडलेले आहेत. ते ठिकाण, तो परिसर एखाद्या कादंबरीचाच विषय असल्यासारखं मला वाटू लागलं.

मी परिसरात फिरत होतो. मात्र, आपल्या वेळसारखी मजा आता नाही, असं का कुणास ठाऊक, मला हळूहळू पुढं जाताना वाटत होतं.
चार पावलं गेल्यावर प्रा. सुरेश पुरी सर राहत असलेलं जुनं घर दिसलं.
या घराच्या कितीतरी आठवणी मनात आहेत...भल्या पहाटे सडा टाकून रांगोळी काढणाऱ्या काकू आजही मला डोळ्यांसमोर दिसत होत्या. नेहमी गजबजून गेलेल्या घरासमोर किमान पाच-सहा मोटारसायकली लागलेल्या असायच्या. पुरी सरांच्या हॉलमधली केळ्यांची टोपली अजूनही भरलेली असेल का, असाही एक विचार मनात येऊन गेला. त्या घरात आता दुसरंच कुणी राहतंय हे मला माहीत असूनही माझं मन त्या घराभोवती भटकत राहिलं.

मी आणि माझे सगळे मित्र ज्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेत काम करत होतो त्या ‘कमवा-शिका’मधलं काम करतानाचे सगळे किस्से मला आठवत होते. एका बाजूला मुलं काम करायची आणि दुसऱ्या बाजूला मुली. सकाळी सहा ते आठ यादरम्यान कोळी नावाचा ‘कमवा-शिका’ चालवणारा माणूस सगळ्यांमध्ये नवी ऊर्जा भरायचा. शिक्षित असलेले हात मातीला लागायचे आणि त्या मातीचा सुगंध आणखीच दरवळायचा. त्या काळी उराशी बाळगलेल्या स्वप्नांमध्ये भरारीचं बळ भरण्याचं काम ‘कमवा आणि शिका’नं केलं. आता ‘कमवा-शिका’मध्ये ती मजा, ती क्रेझ आहे की नाही ते माहीत नाही; पण वातावरण उत्साही नाही हे तेवढंच खरं. पुढं गेलो...मी ज्या
‘कमवा-शिका’ विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात राहायला होतो, ज्या रूममध्ये मी चार वर्षं घालवली तिथं आलो. या रूमचा परिसर म्हणजे ‘एसएफआय’च्या मीटिंग, ‘छात्रभारती’चं नियोजन, विद्यापीठातल्या राजकारणाचे अनेक नवीन पैलू याचं जन्मस्थानच जणू. मी ज्या रूममध्ये राहायचो, तिच्या अलीकडं-पलीकडं सगळे नेते, विद्यार्थी-संघटनांचे प्रमुख राहायचे. मीटिंग मात्र आमच्या रूममध्ये व्हायच्या. रूमसमोर जाऊन दरवाजा वाजवला. दरवाजा उघडला गेला. मी ‘नमस्कार’ म्हणालो. समोरच्या मुलानंही प्रतिसाद दिला. मी त्याला माझी ओळख सांगितली. मी का आलो आहे ते सांगितलं. त्यालाही छान वाटलं. एकेकाळी आपण राहत असलेली रूम पुन्हा पाहण्यासाठी कितीतरी वर्षांनंतर कुणीतरी आल्याचं पाहून त्याला अप्रूप वाटलं. त्यानं मला बसायला चटई अंथरली. दरवाजा उघडणाऱ्या मुलाशिवाय अन्य दोन जण त्या रूममध्ये होते. सगळ्यांचा परिचय झाला. लातूरहून संतोष जोशी, उस्मानाबादहून मोहसीन सय्यद आणि जालन्यातून सिद्धार्थ कांबळे...वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेली ही तिन्ही मुलं एकाच विभागात शिकत आहेत. त्यांची खुशाली विचारल्यावर या रूमविषयीच्या माझ्या आठवणी मी त्यांना सांगितल्या. तिन्ही मुलं गंभीर प्रवृत्तीची होती. खूप स्वप्नं उराशी बाळगून होती. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्याला पुढं जायचं आहे या जोमानं ती कामाला लागली होती. रूममध्ये माझ्या वेळी असलेलं पोस्टर आणि सध्या असलेलं पोस्टर यात कमालीची तफावत होती. एका बाजूला देव-देवतांचं, मशिदीचं पोस्टर; तर एका बाजूला डॉ. बाबासाहेबांचं पोस्टर पाहायला मिळालं. त्या तिघांशी चर्चा करत असताना माझा मित्र ॲड. हसन पटेल याचा फोन आला. हसन माझ्याशी बोलत होता आणि मी हसनचं बोलणं ऐकत होतो. हसननं ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्या जरा धक्कादायकच होत्या. हसन उच्च न्यायालयात वकील आहे. त्याचे वडील पाशा पटेल. त्यांच्याविषयी बाकी काही सांगायला नको...तर हसनला मुंबईच्या हायकोर्ट परिसरात राहायचंय. त्यासाठी तो गेल्या चार ते सहा महिन्यांपासून घर शोधतोय. त्याला घर न मिळण्याचं मुख्य कारण होतं तो मुस्लिम असल्याचं. सेक्‍युलॅरिझमच्या गप्पा मारणारे आम्ही... जेव्हा प्रत्यक्षात त्या पद्धतीनं जगायची वेळ येते तेव्हा मात्र जात-धर्म यांच्यातच बुडून गेलेलो असतो. बराच वेळ बोलल्यावर हसननं फोन ठेवला आणि रूममधले ते तिघंही ‘काय झालं?’ असं मला विचारू लागले. हसनचा सगळा किस्सा मी त्यांना सांगितला. तिघंही माझ्याकडं मोठ्या आशेनं पाहत होते. का कुणास ठाऊक, त्यांचे चेहरेही मला अत्याचारग्रस्त भासले.

त्यातला सय्यद मध्येच म्हणाला: ‘‘दादा, ये जात आदमी का पीछा छोडती ही नही, चाहे वो कितना भी बडा आदमी क्‍यूं न हो! मी वर्गात असताना जर दहशतवाद्यांचा विषय निघाला तर इतर विद्यार्थी माझ्याकडं कुत्सित नजरेनं पाहतात. जणू त्या दहशतवाद्यांचा मी सख्खा भाऊ आहे! एकदा तर एक दहशतवादी माझ्या नावाचा निघाला, त्या वेळी माझे मित्र ‘तुझं नाव इथंही का?’ असं म्हणून माझी टर उडवत होते. काश्‍मीरमध्ये बॉम्बस्फोट होतो आणि त्याची आग मात्र माझ्या क्‍लासमध्ये धुमसत राहते. कुठंही जा...माझं नाव ऐकलं तर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव नसतात.’’

कांबळे मध्येच म्हणाला : ‘‘दलित-सवर्ण हा वादाचा विषय जेव्हा समोर येतो तेव्हा माझ्या क्‍लासमधली मुलं माझ्याकडंही शंकेच्या नजरेनं पाहतात. म्हणजे, सगळ्या योजना मीच घेतल्या, सगळे लाभ मलाच मिळतात, माझ्या पूर्वजांवर कुणीतरी अत्याचार केले होते आणि त्याचा सूड आता मी घेतोय अशा भावनेनं माझ्याकडं पाहिलं जातं. म्हणजे, आता राज्य दलितांचं आहे आणि ते सवर्णांवर अत्याचार करतात आणि त्यांचा मुख्य प्रतिनिधी म्हणून मीच सगळीकडं वावरतोय, हाच भाव अनेक शिक्षित मुलांच्या नजरेत मी अनुभवलाय.’’
आता वेळ संतोष जोशीच्या बोलण्याची होती.

जोशी म्हणाला : ‘‘ब्राह्मणांनी अत्याचार केल्याचा विषय अनेक वेळा चवीनं चघळला जातो. त्यातला अत्याचार करणारा ब्राह्मण, इतरांना तुच्छ लेखणारा ब्राह्मण दुसरा-तिसरा कुणी नसून मीच आहे अशा भावनेनं माझ्याकडं पाहिलं जातं. मी असताना अशा चर्चा अधिक मजेनं होतात. वेगवेगळ्या जातीची चार मुलं एकत्र आली की तिथं मला त्यांच्या स्टाईलनं टार्गेट केलं जातं. आपल्याला शिकवतो तो कोणत्या जातीचा आहे, मेसवाला कोणत्या जातीचा आहे, रोज वेगवेगळ्या कारणांमुळे भेटणारी माणसं, मित्र-मैत्रिणी या कोणत्या जातीच्या आहेत यावर खूप काही अवलंबून असल्याचं दिसून येतं. याचा अनुभव मला पावलोपावली येतो.’’

जाती-धर्मासंदर्भात आलेले अनेक वाईट अनुभव तिघांनीही मला सांगितले. सोईसाठी वापरली जाणारी जात...आपलं काम व्हावं यासाठी पुढं केली जाणारी जात...हे विद्यापीठाच्या पातळीवर असणाऱ्या उच्च शिक्षण घेणाऱ्यांमध्ये किती खोलवर पसरत गेलेलं रसायन आहे याचे अनेक दाखले जोशी, सय्यद आणि कांबळे यांनी मला सांगितले. हे तिघं एकाच रूममध्ये राहतात. एकमेकांच्या सुख-दुःखाचे तिघंही साक्षीदार आहेत, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी आहेत. आर्थिक अडचण, आजारपण आणि शैक्षणिक विचारमंथन या सगळ्यात तिघं नेहमी एकत्र असतात; पण या तिघांचं इतकं एकमेकांत मिसळून राहणं, एकमेकांवर जीव ओतून प्रेम करणं बाहेरच्या समाजाला आवडत नाही. दया पवार यांचं ‘बलुतं’ आणि लक्ष्मण माने यांचं ‘उपरा’ या दोन्ही आत्मचरित्रांचं कथानक माझ्या डोळ्यासमोर आलं. गावपातळीवर एक वेळचं जेवण मिळावं यासाठी तासन्‌तास काबाडकष्ट करणारा तो मजूर...त्यालाही जातीच्या आगीत होरपळून अनेक वेळा संघर्ष करावा लागतो आणि विद्यापीठात सर्वोच्च पदावर असलेल्या उच्चशिक्षित माणसाला, विद्यार्थ्याला जातीच्या संदर्भातली बंधनं, लांच्छनास्पद वागणूक दूर करता करता नाकी नऊ येतात.

नांदेड विद्यापीठात माझे एक आवडते प्राध्यापक होते. तिथल्या मराठा समाजातले अनेक जण ‘हा ब्राह्मण आहे’ असं म्हणून त्यांचा छळ करायचे. ते प्राध्यापक खूप तत्त्वज्ञानी आणि अभ्यासक होते म्हणून कदाचित त्यांनी हा छळ सहज पचवला असेल. विद्यापीठपातळीवर चालणाऱ्या जातीच्या घाणेरड्या राजकारणाचे किस्से मी अनेकांकडून नेहमी ऐकायचो. माझ्यासोबत असलेले हे तिघं आता मला यापेक्षा वेगळं काही सांगत होते. ते काळानुरूप होतं एवढंच. या रूममध्ये असलेले तिघं हे आपल्या इथं नांदणाऱ्या एकतेचं सर्वोच्च उदाहरण असल्याचं मला वाटलं. ‘विविधता में एकता’ जपण्यासाठी हे तिघं जमेल तसा संघर्ष करत आहेत. हा संघर्ष करताना ते दोन पातळ्यांवर लढत आहेत. एक पातळी आहे ती जातीयतेला खतपाणी घालणाऱ्यांना वेळीच धडा शिकवण्याविषयीची आणि दुसरी पातळी आहे ती आपली तत्त्वं, मूल्यं जपत आपल्या स्वप्नांना उंच आकाशी घेऊन जाण्याची. खरं तर हे त्यांचं वय एकच खिंड लढवण्याचं आहे; पण त्यांना दोन दोन वाटांवरचे खाच-खळगे ओलांडत पुढं जावं लागत आहे. जातीचा इतिहास त्यांचा पिच्छा सोडायला आजही तयार नाही. त्यांच्या भूतकाळामुळे, आडनावामुळे त्यांच्या भविष्यकाळाची गती काळानुसार वाढत नाही.
तिघांचाही निरोप घेऊन मी परतीच्या प्रवासाला लागलो.
‘‘या दादा, आता पुन्हा,’’ असं म्हणत त्यांनी मला अलविदा केलं.
‘जात’ माणसाच्या मनाला किती चिकटून बसली आहे याची अनेक उदाहरणं परतीच्या प्रवासात माझ्या डोळ्यासमोर येत होती.
जाती-अंताच्या लढाईत माणसाला - मग तो कुठल्याही जातीचा असो - अनेक वेळा गुडघे टेकावे लागतात. जातीनं त्रासून गेलेला तो प्रत्येक जण ‘वंचित’ म्हणावा लागेल. मग या वंचितांमध्ये मोठी जात आणि छोटी जात असं काहीही नसतं. इथं विजय होतो तो माणसाच्या राक्षसी क्रूर मानसिकतेचा.

आज असे अनेक ‘सय्यद’, अनेक ‘जोशी’, अनेक ‘कांबळे’ या अघोरी मानसिकतेचे बळी होत असताना पाहायला मिळतात. उच्चशिक्षित लोकांमध्ये जातीसंदर्भातले बुरसटलेले विचार अधिक आहेत याचं जास्त वाईट वाटतं. ज्या महामानवाच्या नावानं जे विद्यापीठ आहे त्याला जाती-जातींमध्ये चाललेलं हे द्वंद्वयुद्ध पाहून नक्कीच दु:ख होत असेल. हेच दु:ख जर जातीचा बुरखा पांघरून बसलेल्या त्या प्रत्येकाला झालं असतं तर किती बरं झालं असतं...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sandip kale write bhramti Live article