आतला आवाज... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

तिसरीमध्ये असताना डॉक्‍टरांनी ऊर्मिला यांना सांगितलं होतं, ‘या मुलीला पुढं शिकवू नका, शाळेत पाठवू नका, तिच्या डोक्‍यावर ताण देऊ नका’; पण डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्याला धुडकावून ऊर्मिला यांनी मानसीला इंजिनिअर तर बनवलंच; पण आयुष्यातल्या आत्मविश्वासाच्या सगळ्या परीक्षा तिच्याकडून पास करून घेतल्या. आपल्या मुलांसाठी वेळ न देणाऱ्या, स्वत:च्या करिअरला प्राधान्य देणाऱ्या त्या तमाम आई-बाबांसाठी ऊर्मिला आणि त्यांचे पती राजेंद्र हे दोघंही एक आयडॉल आहेत. प्रत्येक घरात अशा ऊर्मिला आणि राजेंद्र पुढं येऊन गड सांभाळणार नाहीत; पण त्यांच्यासारखं आपल्या मुलासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे?

मी सोलापूर दौऱ्यावर असताना रविवारी सकाळीच रा. रं. बोराडे सरांचा फोन आला. लेखाचं कौतुक करत होते. सूचनाही करत होते. बोराडे सरांची ओळख तशी अलीकडची; पण त्यांनी दिलेल्या सूचना, अधिकारवाणीनं सांगितलेले अनेक बदल यावरून त्यांची आणि माझी ओळख खूप वर्षांपासूनची आहे, असं मला वाटत असतं. फोन ठेवताना ते म्हणाले : ‘‘तू सोलापूरला जाशील, तेव्हा ऊर्मिला आगरकर या महिलेला भेट. तुला त्या निमित्तानं वेगळा विषय हाताळता येईल.’’ मी त्यांना लगेच म्हणालो : ‘‘अहो सर, मी तर सोलापूरलाच आहे.’’ सर म्हणाले : ‘‘ठीक आहे, मग तू भेट ऊर्मिलाला.’’ ऊर्मिला यांच्याविषयी सरांनी मला बरंच काही सांगितलं होतं, त्यामुळे त्यांना भेटायची उत्सुकता फार लागली होती. बोराडे सरांनीच मला ऊर्मिला यांचा संपर्क नंबर पाठवून दिला. त्यांच्याशी बोलणंही झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायचा बेतही आखला गेला.

ठरल्याप्रमाणं मी त्यांच्या घरी पोचलो. घरासमोर एक सुंदर रांगोळी काढली होती, मी ती रांगोळी पाहत होतो. बेल वाजवली, आतमध्ये प्रवेश झाला. ऊर्मिला माझ्यासमोरून थोड्याशा दूर झाल्या, तशी माझी नजर घरात असणाऱ्या अनेक पुरस्कारांवर पडली. ‘आई पुरस्कार’, ‘माता पुरस्कार’, ‘उत्कृष्ट लेखन पुरस्कार’; उत्कृष्ट हस्ताक्षर, लेखन अशा कितीतरी स्पर्धांचे पुरस्कार आणि पारितोषिकं माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती. ऊर्मिला आगरकर (संपर्क नंबर: ९३७०४०८५३५) यांचे पती राजेंद्र आगरकर यांनीही माझं स्वागत केलं. बोलता आणि ऐकू येत नसलेली ऊर्मिला यांची मुलगी मानसी हीदेखील माझ्या बाजूला येऊन बसली. कदाचित मी कोण आहे हे ऊर्मिला यांनी अगोदरच मानसीला सांगितलं असावं. माझी ओळख, त्यांची ओळख असा सगळा आमचा प्रथम परिचयाचा कार्यक्रम संपला होता. मानसी आतमध्ये गेली आणि तिनं तिचे आत्तापर्यंतचे काही जुने अल्बम माझ्यासमोर आणून ठेवले. रांगोळी, टाकाऊ वस्तूपासून वेगवेगळ्या देखण्या वस्तूंची निर्मिती, ऑनलाईन दागिने विकण्याचं मानसीनं हाती घेतलेलं काम हे सगळं त्या अल्बममधून मला दिसत होतं. मानसीच्या आई ऊर्मिला यांनी मानसी जन्मल्यापासून आतापर्यंतचा सगळा प्रवास माझ्यासमोर ठेवला. हा सगळा प्रवास त्यांनी ‘मनीमानसी’ या पुस्तकातही मांडलाय.
आपल्या मुलींसाठी ऊर्मिला यांनी जे काही केलं, ते कुठल्याही आईला किती जमेल किंवा एखादी आई ऊर्मिला होण्यासाठी इतक्‍या हिरिरीनं पुढं येईल का, हा माझा मला स्वत:लाच पडलेला प्रश्न आहे. मानसी सध्या बॅंकिंग अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. तिचं शिक्षण बी. ई. कॉम्प्युटर सायन्स झालंय. त्यामध्ये तिला ७० टक्के, डिप्लोमाला ८० टक्के, दहावीला ८१; तर पहिलीला ९८ टक्के होते. मानसीला जन्मतःच वाचादोष आणि श्रवणदोष आहे; पण आताच्या सगळ्या धष्टपुष्ट असलेल्या आणि सर्वगुणसंपन्न असलेल्या, सगळं जमत असलेल्या मुलींना तिनं मागं टाकलंय.

तिच्यामध्ये एवढा आत्मविश्वास, एवढी ऊर्जा आणि एवढं हत्तीचं बळ आलं कुठून, हा प्रश्न मलाही पडला होता. मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मानसीच्या आई देत होत्या. मानसी एकीकडं वाढत होती; तर दुसरीकडं तिच्या आई-बाबांची काळजी वाढत होती. तीन वर्षांनंतर त्यांच्या लक्षात आलं, की आपली मुलगी आता बोलूच शकत नाही आणि तिला ऐकायलाही येत नाही. सर्व वैद्यकीय इलाज करून बघितले; पण काही उपयोग झाला नाही. आपलं बाळ आता असंच राहणार का, तिच्या आयुष्याचं काय होणार, त्यात अत्यंत गरीब परिस्थिती असे सगळे प्रश्न ऊर्मिला यांच्यासमोर होते. या सगळ्या प्रश्नांना भोवऱ्यातून ऊर्मिला बाहेर पडल्या. ‘माझी मुलगी इतर धडधाकट मुलींप्रमाणंच वावरली पाहिजे, जगली पाहिजे. त्यासाठी मी वाटेल ते करीन,’ या भावनेतून ऊर्मिला कामाला लागल्या. ‘तिला बोलता येत नाही, ऐकू येत नाही, या सहानभूतीखाली कुठल्याही पद्धतीची भीक माझ्या पोरीला नको, कोणाच्या तरी मदतीशिवाय ती आपलं आयुष्य स्वत: ताठपणे उभे राहून जगली पाहिजे,’ हीच भूमिका घेऊन ऊर्मिला कामाला लागल्या. गेल्या काही वर्षांमध्ये ऊर्मिला यांनी जे काही केलं, त्याला आता खूप यश आलं आहे. त्यात ऊर्मिला आणि त्यांचे पती राजेंद्र यांच्या उमेदीचे सगळे दिवस निघून गेले. मात्र, आज मानसीच्या रूपानं तयार झालेली ‘सुपर’ मुलगी माझ्यासमोर उभी होती. मूकबधिरांशी संबंधित असलेलं सगळं प्रशिक्षण ऊर्मिलानं घेतलं. मुंबईच्या ‘सेंट्रल स्कूल ऑफ डेफ’मध्ये तीन वर्षं काढून अगोदर मूकबधिरांची सगळी शास्त्रीय भाषा ऊर्मिला शिकल्या आणि मग हळूहळू ती सगळी भाषा ऊर्मिला यांनी मानसीला शिकवली. ऊर्मिला यांच्या आयुष्याचा खूप काळ मूकबधिरांची शास्त्रीय भाषा शिकून घेण्यामध्ये गेला.

मानसीचा भाऊ निखिल याची पूर्ण जबाबदारी ऊर्मिलाचे पती राजेंद्र यांनी स्वीकारली होती, ते सोलापूरलाच राहत होते. आहे ते सगळं विकून आपल्या दोन्ही मुलांच्या आयुष्यासाठी हे पती-पत्नी कामाला लागले होते. निखिल बी. ई. पदवीमध्ये विद्यापीठात पहिला आला. परदेशामध्ये स्कॉलरशिप मिळावी म्हणून प्रयत्न करत होता; पण बराक ओबामा यांच्या काळात भारतीयांना मिळणाऱ्या संपूर्ण स्कॉलरशिप बंद करण्यात आल्या होत्या. निखिल आता परदेशात आहे. तिथं तो जॉब करतोय. त्याची परदेशात जाऊन सेटल होण्याची फार इच्छा होती. परदेशातलं शिक्षण घेताना तो अमेरिकेमधल्या एका मंदिरात राहिला. मंदिरात लोकांकडून मिळणाऱ्या अन्नावर त्यानं आपली गुजराण केली. आपली जिद्द त्यानं सोडली नाही. तो शेवटी शिक्षण पूर्ण करून अमेरिकेमध्ये सेटल झाला. आता त्याच्या जीवावर घराचा अख्खा गाडा चालतोय. ‘‘मानसीचं करता करता निखिल कधी मोठा झाला, हे मला कळलंच नाही. एक आई म्हणून माझ्या पोराला माझं प्रेम देता आलं नाही. त्यानंही तशी जाणीव मला कधी होऊ दिली नाही,’’ असं सांगताना ऊर्मिला यांचे डोळे पाणावले होते. खूप साधेपणा, सहजपणा आणि एकमेकांना अपार जीव लावायची परंपरा या घराकडून शिकायलाच पाहिजे, असं मला मनोमनी वाटत होत. ऊर्मिला यांनी निखिलशी माझं बोलणं करून दिलं, आई-बाबांवर प्रचंड प्रेम असलेलं हे गुणी लेकरू आपल्या आई-वडिलांपासून दूर असल्याची खंत व्यक्त करत होतं. मानसीच्या आयुष्यातील सगळे बारकावे मी या दरम्यान टिपत होतो. मानसीचं असलेलं प्रचंड फ्रेंडसर्कल, तिनं बनवलेल्या वस्तूच्या ऑनलाईन विक्रीतून तिला मिळणारे पैसे, तिचं वाचन, माणसं जोडण्याची पद्धत हे सगळं मी पाहत होतो. व्हॉट्‌सॲप आणि टीव्ही या दोन गोष्टींच्या नादी न लागलेली मानसी इतकी अप्रतिम रांगोळी काढते, की तिच्यासमोर मोठा कलाकारही फिका पडेल.

मी ऊर्मिलाला तिच्या लग्नाबद्दलच्या कल्पना विचारल्या, तर तिनं तिच्या आई-वडिलांकडं बोट दाखवलं. त्यानंतरही ती काहीतरी इशारे करून मला सांगत होती. ती काय सांगत आहे, असं मी ऊर्मिला यांना विचारलं. त्यावर ऊर्मिला म्हणाल्या : ‘‘मी माझ्या आईला आणि बाबांना सोडून कुठंही जाणार नाही.’’ मी महाराष्ट्रभर भ्रमंतीच्या निमित्तानं खूप फिरलो, खूप लोकांना भेटलो. त्यात मला ही संस्कृती जरा वेगळी वाटत होती. म्हणजे मुलं मोठी झाली, आपल्या पायावर भक्कम उभी राहिली, की ती आपल्या आई-वडिलांना विसरतात. इथलं वातावरण अगदी उलटं होतं. मुलं मोठी झाली, भक्कम उभी राहिली; पण त्यांच्या मनात आपल्या आई आणि वडिलांविषयीचं प्रेम जसं लहानपणी होतं, तसंच आजही आहे. ऊर्मिलाताईंच्या घरात असताना मला वृद्धाश्रमामध्ये असलेल्या अनेकांच्या आई-वडिलांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येत होते. आपण एखादं कुत्र्याचं पिल्लू पाळलं, त्याच्या पाठीवरून रोज हात फिरवला, त्याला आपलंसं केलं, तर ते पिल्लू रात्री झोपतानाही आपल्या कुशीचा आधार घेतं; पण जन्म दिलेला पोटचा गोळा आपले पाय थकल्यावर आपल्याला आधार देत नाही. असं का होत असेल, असा प्रश्न मला पडला होता, मग दोष आई-बाबांच्या प्रेमात असतो का मुलाच्या वाढत्या वयाचा, हे न सुटणारं कोडं होतं. त्या पार्श्वभूमीवर इथलं वातावरण मला सकारात्मक वाटलं.

सतत बोलणं, मानसीला समजावून सांगणं, तिला सातत्यानं काहीतरी नवीन शिकवणं यातून ऊर्मिला अक्षरश: खंगून गेल्या. त्यांचं आयुष्य खरंच संपलय. टेन्शनमुळे दोन्ही डोळ्यांवर ताण आल्यानं ऑपरेशन झालंय, पाठीचा आजार आहे. असे अनेक नाना तऱ्हेचे आजार त्यांना जडले आहेत, तरीही त्यांनी आपल्या लढाईतून माघार घेतलेली नाही. केवळ एका मानसीलाच घडवून, उभी करून ऊर्मिला थांबल्या नाहीत, तर त्यांनी अशा अनेक मानसींचा आयुष्यभर आधार बनण्याचा निर्णय घेतलाय. मी ज्या ठिकाणी त्यांच्या घरी बसलो होतो, त्या ठिकाणी दुसऱ्या खोलीत ऊर्मिला यांचा एक वर्ग सुरू होता. बोलता येत नाही आणि ऐकायलाही येत नाही, अशी किमान दहा-बारा मुलं-मुली त्या क्‍लासमध्ये ऊर्मिलाताईंनी दिलेले धडे गिरवत बसल्या हत्या. कुणाला आई नाही, कुणाला बाबा नाही, कोणी मामाच्या घरी राहतो, कोण शेतकऱ्याचा मुलगा आहे, कोण हमालाचा मुलगा आहे, अशी बारा बलुतेदारांची असलेली मुलं धीटाईनं आयुष्याच्या लढाईत उभी राहण्यासाठी ऊर्मिलाताईंचा हात धरून हळूहळू पुढं सरकत होती. मानसीचं सोडा, ती खूप उंचीवर गेली; पण ही सगळी मुलंही त्या उंचीच्या दिशेनं वाटचाल करत होती.

आपल्या समाजातली एक वाईट पद्धत आहे. निसर्गानं एखाद्याला अपूर्ण, कुरूप बनवलं, तर त्याची टिंगलटवाळी करण्याचा नाद काही मंडळी सोडत नाहीत. त्याला बिचारी मानसी तरी कशी अपवाद असेल? पण मानसीनं ज्या सोलापूरच्या ऑर्किट इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलं, त्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ती पहिली आली. तिच्या हस्ते १५ ऑगस्टला झेंडावंदन करून प्राचार्यांनी धडधाकट मुलांना काहीही न सांगता एक मोलाचा संदेश दिला. मी या घरातून सगळ्यांचा निरोप घेतला. या सगळ्या मनानं मोठ्या असणाऱ्या प्रत्येक पात्राचा चेहरा माझ्या डोळ्यांत घर करून उभा होता. ऊर्मिला, मानसी, राजेंद्र, निखिल ही सगळी पात्रं माझ्यासाठीही आयडॉलच होती.

तिसरीमध्ये असताना डॉक्‍टरांनी ऊर्मिला यांना सांगितलं होतं, ‘या मुलीला पुढं शिकवू नका, शाळेत पाठवू नका, तिच्या डोक्‍यावर ताण देऊ नका’; पण डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्याला धुडकावून ऊर्मिला यांनी आपल्या मुलीला इंजिनिअर तर बनवलंच; पण आयुष्यातल्या आत्मविश्वासाच्या सगळ्या परीक्षा तिच्याकडून पास करून घेतल्या. आपल्या मुलांसाठी वेळ न देणाऱ्या, स्वत:च्या करिअरला प्राधान्य देणाऱ्या त्या तमाम आई-बाबांसाठी ऊर्मिला आणि त्यांचे पती राजेंद्र हे दोघंही एक आयडॉल आहेत. आज अनेक ठिकाणी नवरा-बायकोंच्या करिअरमध्ये मुलांच्या उभं राहण्याचं महत्त्व तितकं फारसं कुणाला वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. दुभंगलेली कुटुंबपद्धती त्याला तितकीच जबाबदार आहे. प्रत्येक घरात अशा ऊर्मिला आणि राजेंद्र पुढं येऊन गड सांभाळणार नाहीत; पण त्यांच्यासारखं आपल्या मुलासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपल्या आयुष्याची खरी कमाई कोणती आहे आणि त्याला कुठल्या पद्धतीनं आपल्याला घडवावं लागेल, हे या जोडप्याला कळलं. त्यांनी त्या त्या काळात खूप गंभीर पद्धतीनं केलंही. त्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहिला नाही. ‘माझ्या मुलांना सुखी ठेव,’ असं म्हणून देवापुढं हात जोडून कधी नवस बोलले नाहीत. त्यांनी एक ध्येय मनात बाळगलं आणि अत्यंत चिकाटीनं ते पुढं नेलं, त्यातून त्यांना जे मिळालं त्याचं मोलच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com