अश्रूंची फुले... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

‘रूढी-परंपरा संपल्या आहेत’ असं म्हणत असतानाच त्या आजही कुठं तरी डोकावताना दिसतात. त्यात अनेकजण होरपळून निघतात. काय बरोबर आहे आणि काय चुकतंय हे या सगळ्या प्रवासात कळतच नाही. शर्मिला आणि त्यांच्या मैत्रिणींचा प्रवास अशा प्रवासांपैकीच एक आहे. तो बरोबर आहे की भलतीकडेच जातोय, ते माहीत नाही.

माझा मित्र दीपक याची आई मागच्या आठवड्यात गेली. दीपक तसा मूळचा राजस्थानचा; पण व्यवसायामुळे तो १५ वर्षांपासून मुंबईकरच झाला आहे. आई, वडील, बायको आणि दोन मुलं असं त्याचं सगळं कुटुंब वास्तव्याला मुंबईतच.
माझं दीपकच्या घरी येणं-जाणं होतंच. त्याची आई गेल्यानंतर मी त्याच्याकडे निघालो तेव्हा त्याच्या आईच्या आठवणी माझ्या मनात दाटून आल्या. त्यांची राजस्थानी टोनमधली लोभस हिंदी भाषा, त्यांनी केलेला स्वयंपाक...असं सगळं काही माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागलं. एखादी व्यक्ती आपल्यातून गेल्यावर तिची आठवण तीव्रतेनं येते...दीपकच्या आईबाबत माझंही तसंच झालं होतं. घराजवळ गेलो तर वाटतही नव्हतं की घरातला कुणी माणूस गेला असावा. कारण, गावाकडे किंवा कुठंही जर एखादा माणूस गेला असेल तर घरासमोर माणसांची बरीच गर्दी असते; पण इथं तसं काही नव्हतं. दादरसारख्या गजबजलेल्या वस्तीत प्रत्येकाचं रुटीन आपापल्या रोजच्या वेळेनुसार सुरू होतं. घरात गेल्यावर दीपकनं माझ्याकडे पाहिलं आणि त्याला अश्रू आवरले नाहीत. मी दीपकच्या आईच्या पार्थिवाजवळ गेलो, दर्शन घेतलं आणि बाजूला झालो. पार्थिवाशेजारी बसून पाच-सहा महिला मोठमोठ्या आवाजात रडत होत्या. त्या महिला, घरातली चार-पाच माणसं आणि मी यांच्या व्यतिरिक्त तिथं अन्य कुणीही नव्हतं. अधूनमधून कुणी तरी यायचं आणि दर्शन घेऊन पुन्हा बाहेर जायचं. त्या महिला एका सुरात आणि सलगपणे रडत होत्या. त्यांचं रडणं थांबत नव्हतं. अंत्यसंस्कारांसाठी पार्थिव घेऊन जाण्यासाठी जी गाडी बोलावली गेली होती ती आली. आम्ही चार-पाच जणांनी मिळून पार्थिव गाडीत ठेवलं. ‘हे राम, हे राम’ असा गजर त्या गाडीत सुरू होता. बाकी सगळा लवाजमा त्या गाडीसोबतच होता. धूप, उदबत्ती, हार, तिरडीपासून सगळं साहित्य त्या गाडीत होतं. एका खासगी संस्थेनं त्या गाडीसह सगळं साहित्य पैसे घेऊन पुरवल्याचं मला समजलं. गाडीपर्यंत त्या महिला आल्या आणि दीपकच्या नातेवाइकांनी त्या महिलांच्या हातात पैसे ठेवले. आम्ही अंत्यसंस्कारासाठी गाडीत बसलो आणि त्या महिला माघारी फिरल्या. आपल्या घरातली एखादी व्यक्ती गेली तर अशा प्रसंगी आपण आपल्या घरातल्याच माणसांच्या हाती पैशांचं काम ठेवत नाही. ही पैसे घेणारी माणसं कुणी तरी बाहेरची आहेत असं माझ्या लक्षात आलं; पण त्याविषयी दीपकला किंवा त्यांच्या नातेवाइकांना काही विचारण्याची ही वेळ नव्हती. त्या महिला कोण, असा प्रश्‍न मला नक्की पडला होता. दुसऱ्या दिवशी मी दीपकला फोन करून त्या महिलांविषयी विचारलं. दीपक म्हणाला : ‘‘आमच्याकडे कुणी व्यक्ती मरण पावली की अशा महिलांना बोलावून अंत्यसंस्कार होईपर्यंत त्यांना पार्थिवासमोर बसवून ठेवण्याची प्रथा आहे.’’
‘‘मला याबाबत जास्त काहीही माहीत नाही,’’ असं म्हणत त्यानं त्या महिलांविषयी अधिक बोलणं टाळलं. दीपकच्या एका नातेवाइकाकडून मी त्या रडणाऱ्या महिलांचा पत्ता मिळवला आणि त्यांच्या घरी पोचलो. मुलुंडमधल्या एका छोट्याशा वस्तीतल्या लहानशा खोलीत त्या सहाही महिला राहत होत्या. कुणाचा तरी संदर्भ घेऊन मी त्यांना भेटायला गेल्यामुळे त्यांनी मला बोलताना चांगला प्रतिसाद दिला.
या सगळ्यांची मुख्य होती शर्मिला नावाची महिला. त्या गेल्या १४ वर्षांपासून मुंबईत राहतात. एखादी व्यक्ती मरण पावल्यावर निमंत्रण येतं त्या ठिकाणी या सगळ्या जणी जातात. मग कुठं रडायचं काम करावं लागतं, तर कुठं अंत्यसंस्कार होईपर्यंत सगळी कामं पार पाडावी लागतात.

खोलीत स्टोव्हवर स्वयंपाक चालला होता. कुणी कपडे धूत होती, तर कुणी भाजी निवडत होती. शर्मिला यांनी त्यांच्यासोबतच्या त्या पाचही महिलांची ओळख करून दिली. घरातल्या वातावरणावरून गरिबीचं, दारिद्य्राचं दर्शन घडत होतं; पण त्या गरीब असल्या तरी मनानं श्रीमंत आहेत याचाही मला अनुभव आला. कुणी जेवायचा आग्रह करत होतं, तर कुणी चहा घ्यायचा. सगळ्या महिला ‘दादा, दादा’ करत माझ्याशी हिंदीतून बोलत होत्या. शर्मिला यांनी त्यांचा गावाकडच्या दिवसांपासूनचा ते मुंबईपर्यंतचा प्रवास सांगितला. उर्वरित पाच जणीही त्यांच्या सांगण्याला होकार भरत होत्या. राजस्थानातल्या रूढी-परंपरा आणि त्यांतून महिलांचं होणारं शोषण, महिलांच्या शिक्षणाकडे होणारं दुर्लक्ष, महिलांच्या जिवावर बसून खाणारा पुरुष असं खूप धक्कादायक चित्र होतं ते. अतिशय देखण्या आणि स्वभावानं तितक्याच मृदू असलेल्या त्या सगळ्या जणी त्यांच्या मायाळू स्वभावामुळे मला माझ्या कुटुंबातल्यासारख्याच वाटत होत्या. शर्मिला म्हणाल्या :
‘‘माझी आई झोरा, आजी तनेजा हेच काम करायच्या. कुणी व्यक्ती मरण पावली की तिच्या अंत्यसंस्काराला जाऊन तिथं हजेरी लावायची आणि ठरवून दिलेलं आपलं काम करायचं.’’

एखादी व्यक्ती वारली आहे आणि त्या व्यक्तीच्या पार्थिवासमोर रडण्याचं काम आपण करायचं आहे; किंबहुना तो आपला ‘जॉब’ आहे असं समजून ते काम करायचं आहे...किती धक्कादायक आहे हे!

शर्मिला यांच्या आईचा फोटो समोरच ठेवलेला होता. देखणा, टवटवीत, बोलका चेहरा. त्या फोटोसमोर सोन्याच्या दोन कुठल्या तरी वस्तू ठेवलेल्या दिसल्या.
‘‘या कसल्या वस्तू आहेत?’’ मी शर्मिला यांना विचारलं.
त्यांनी माझ्याकडं पाहिलं आणि त्या पाच महिलांकडेही एक नजर टाकली. काही न बोलता त्या शांतपणे बसल्या.
जिथं अशा पद्धतीचा शांतपणा असतो तिथं नक्की काही तरी दडलेलं असतं, हे मला माहीत होतं. त्या वेळी तो विषय तिथंच थांबवत मी त्यांच्या प्रवासाविषयी, त्यांच्या व्यवसायाविषयी, त्यांना मिळणाऱ्या पैशांविषयी चर्चा करू लागलो. शर्मिला यांच्यासोबत त्यांच्या पाचही मैत्रिणी माझ्याशी बोलताना चांगल्याच खुलल्या होत्या. एकंदर अंदाज घेऊन मी पुन्हा एकदा फोटोसमोरच्या त्या सोन्याच्या वस्तूविषयी शर्मिला यांना विचारलं.

आता मात्र शर्मिला खुलेपणानं सांगू लागल्या :‘‘ही कानातली दोन फुलं आहेत. सोन्याची. ‘कानातली सोन्याची दोन फुलं मला हवी आहेत,’ अशी इच्छा माझ्या आईनं आजीकडं व्यक्त केली होती; पण परिस्थितीअभावी आजी साधी फुलंही आईला करून देऊ शकली नव्हती. नंतर आईनं तिच्या आख्ख्या हयातीत अशी फुलं घेतली नाहीत. जाण्यापूर्वी तिनं माझ्याकडे ही खंत बोलून दाखवली तेव्हा
‘मी ही फुलं तुझ्यासाठी करीन, ’ असं वचन मी तिला दिलं. दागिने घालण्याची आणि ती घालून मिरवण्याची आमच्याकडे एक पद्धत आहे. माझ्या आईला या फुलांची आवड कशी निर्माण झाली ते मला माहीत नाही. मी मुंबईत आल्यावर पोटाला चिमटा घेऊन, पै पै जमा करून ती सोन्याची फुलं घेतली. ‘पुढच्या वेळी जाऊ तेव्हा ती आईला देऊ’, या हिशेबानं मी ती फुलं माझ्याजवळ ठेवली आणि एके दिवशी मला निरोप आला...तो निरोप होता आई गेल्याचा. दोन दिवसांनंतर मी जाऊ शकले. मला आईचं अखेरचं दर्शनही घडू शकलं नाही. अनेकांच्या मृतदेहांजवळ रडत बसणारी मी...सहानुभूतीचं वातावरण निर्माण करणारी मी...माझ्या आईच्याच मृतदेहाजवळ आठवणींचे दोन अश्रूही ढाळू शकले नाही...’’

हे सगळं सांगून झाल्यावर शर्मिला यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी अश्रूंना वाट करून दिली. आईच्या आठवणीनं रडताना शर्मिला यांच्यासोबतच्या पाचही जणींचे डोळे डबडबून आले होते. हे अश्रू एरवीसारखे ठरवून आणलेले नव्हते हे नक्की. सगळ्या जणींच्या डोळ्यांत आलेलं पाणी पाहून माझं पुरुषी मनही द्रवलं.
‘दादा को पानी लाओ’ असं म्हणत शर्मिला यांनी विषय बदलला. त्यांच्या आईचं स्मृतिस्थळ ज्या ठिकाणी बांधण्यात आलं आहे त्या ठिकाणी ही सोन्याची फुलं वाहिल्यानंतर तेव्हापासून ते आतापर्यंत ही फुलं या फोटोसमोर त्यांनी ठेवली आहेत.
कष्टाच्या कमाईसंदर्भात आपण जसं म्हणतो की घामाच्या धारा गाळून मी हे सगळं कमावलं आहे, तसं अश्रूंच्या धारांमधून शर्मिला यांनी ही सोन्याची फुलं कमावली आहेत. ती सोन्याची फुलं नव्हती तर अश्रूंची फुलं होती! शर्मिला मुंबईत आल्या तेव्हा म्हणजेच १४ वर्षांपूर्वी रूढी-परंपरा आणि तशी माणसं यामुळे बऱ्यापैकी त्यांचा संसार चालायचा; पण आता हा व्यवसाय किंवा ही प्रथा जवळजवळ बंद पडल्यासारखीच आहे. त्यामुळे शर्मिला आणि त्यांच्या पाचही मैत्रिणींना काही ठिकाणी बोलावलं जातं; पण रडण्याशिवाय अन्य काम त्यांना तिथं करायला लावलं जातं. त्यामुळे या कामासोबतच आता इतरही छोटी-मोठी कामं या सहाजणींना करावी लागतात.
‘‘आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे’’ असं एकीकडे सांगत असतानाच ‘‘अशा दिखाव्याच्या रूढी-परंपरा आता बंद झाल्या पाहिजेत,’’ असंही शर्मिला यांचं मत आहे.
शर्मिला यांना सहा अपत्यं; पण सध्या एकही जण त्यांच्या सन्निध नाही. अन्य पाच जणींनाही चार-पाच अपत्यं आहेत; पण त्यांच्याही सन्निध त्यांच्यातलं कुणीच नाही. या सगळ्या जणींचे पती आणि त्यांच्या त्यांच्या घरांतली म्हातारी माणसं अपत्यं सांभाळण्याची जबाबदारी पार पाडतात.

वर्षातून महिनाभर या सगळ्या जणी आपल्या गावी जातात अन्‌ पुन्हा जड पावलांनी परत मुंबईचा रस्ता धरतात. आपल्या अपत्यांना वर्षभरातून एकदाच भेटायचं हे एका आईच्या दृष्टीनं भावनिकदृष्ट्या किती अवघड काम.
शर्मिला मधून मधून त्यांचे इतरही अनुभव मला सांगत होत्या.
त्या म्हणाल्या : ‘‘मुंबईसारख्या ठिकाणी अंत्यसंस्काराला अगदी तुरळक माणसं आलेली पाहायला मिळतात. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये आपल्या आई-वडिलांना खांदा द्यायला मुलं परदेशातून येऊ शकत नाहीत अशी परिस्थिती अनेकदा अनेक ठिकाणी आढळते. मग ‘आम्हीच त्यांची मुलं आणि आम्हीच सगळं करणारे’ अशी परिस्थिती होते. अनेक वेळा तर माणुसकीही आम्हालाच दाखवावी लागते. कुठं पैसा बरा मिळतो, तर कुठं आधी जेवढा ठरलेला असतो त्याच्यापेक्षाही कमी दिला जातो. दुःख व्यक्त करण्यासाठी ज्यांना बोलावलं आहे त्यांना ठरल्यानुसार जरा बरे पैसे द्यावेत हा दृष्टिकोन अनेक ठिकाणी अनुभवाला येतोच असं नाही. उच्चभ्रू सोसायट्यांमधले असे अनुभव घेऊन मन अनेकदा विषण्ण होऊन जातं. एखाद्या गरिबाच्या अंत्ययात्रेच्या वेळचा अनुभव याच्या नेमका उलटा असतो.’’ शर्मिला म्हणाल्या : ‘‘सगळ्यांचा विरोध पत्करून माझ्या थोरल्या मुलीला मी शिकवलं; पण तीही म्हणते की मी आईचंच काम पुढं नेणार, मुंबईला येणार...मी तिला सांगितलं, ‘बाळा, आता हा व्यवसाय पूर्णपणे बंद झालाय, यातून पैसे मिळत नाहीत आता.’

यावर मुलीच्या बापाचा मात्र, तिनं मुंबईला जावं, असा आग्रह कायम असतो.’’ रूढी-परंपरा आणि त्यातून महिलांचं होणारं शोषण हे आपल्यासाठी नवीन नाही; पण या सगळ्या परंपरांचा प्रवास मात्र नक्कीच धक्कादायक आहे. यातून कुणाला काही तरी मिळतं आणि कुणाचं काही तरी जातं हे तितकंच खरं आहे. अश्रूंतून आलेली फुलं हे तितकंच खरं उदाहरण! शर्मिला यांची मुलगी जर उद्या मुंबईला आली तर तिच्यावरही अशीच फुलं वाहायची वेळ येऊ नये म्हणजे झालं.

शर्मिला आणि त्यांच्या सहकारी-महिलांना रडण्यासाठी, रूढी-परंपरा पुढं सुरू ठेवण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी मृत असलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांकडून बोलावण्यात येतं हे जरी खरं असलं तरी त्याही पलीकडचा विचार करता, मायेनं पाठीवरून हात फिरवणारं कुणीतरी आई-बहिणीसारखं असावं म्हणूनही कदाचित त्यांना बोलावलं जात असावं, असं मला त्यांच्या प्रेमळ स्वभावाकडे बघून वाटलं. त्या तरी काय करतील बिचाऱ्या? त्यांच्या वाट्यालाही असंच उसनं प्रेम आलं होतं.
मी त्या जित्या-जागत्या अश्रूंच्या फुलांचा जड मनानं निरोप घेतला आणि नवी मुंबईचा रस्ता धरला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com