संस्कार ते अंत्यसंस्कार (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

पंचाण्णव वर्षांच्या पुढचं ते जोडपं...त्यातल्या आजी आधी वारल्या आणि नंतर आजोबा गेले. त्यांची तिन्ही मुलं दूर अमेरिकेत. दोघांच्याही अंत्यसंस्काराला मुलं आली नाहीत. आजी-आजोबांवर निरतिशय प्रेम असणारी नात तेवढी आली. शेवटच्या प्रसंगीही उपस्थित राहण्याची इच्छा होऊ नये इतक्या कठोर पद्धतीनं नाती का दुरावत चालली आहेत? माया का आटत आहे?

माझा मित्र जय याचा सकाळी फोन आला.
तो म्हणाला : ‘‘काय जमाना आलाय, आपले आई-वडील वारल्यानंतरही मुलांना त्यांचं तोंड पाहण्याची इच्छा नसते. अरे, माझ्या समोरच्या घरात जे काही घडलं ते पाहून, असं होऊ शकतं यावर विश्वासच बसत नाही.’’
अंधेरीत जयच्या घराच्या समोर पंचाण्णव वर्षं पार केलेलं जोडपं राहत होतं. तीन महिन्यांपूर्वी त्या जोडप्यातल्या आजीबाई - त्यांचं नाव सविता महाजन- वारल्या. एकट्या आजोबांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. सोबतीला त्यांचे थकलेले चार मित्र होते.
मी त्याला म्हणालो : ‘‘मी तुझ्याकडे परवा येतो. आपण बोलू या.’’
ठरलेल्या दिवशी मी अंधेरीला निघालो. मी जयच्या घरी पोचलो. जयनं सगळी हकीकत सांगितली. जयच्या घरासमोर असलेला भला मोठा बंगला, त्या बंगल्याभोवती असलेली बाग आणि त्या बागेत सुकलेल्या फुलांना पाणी घालणारी ती व्यक्ती... हे सगळं चित्र माझ्या नजरेसमोर होतं.
मी जयला म्हणालो : ‘‘चल, आपण जाऊन त्यांना भेटू. त्यांच्याशी चर्चा करू आणि नेमकं झालंय तरी काय हे जाणून घेऊ.’’
आम्ही त्या बंगल्याच्या गेटजवळ गेलो. बेल वाजवली. माळीबाबा - सुदामकाका त्यांचा नाव - मोठ्या आशेनं धावतपळत आले. अन्य कुणाची तरी वाट पाहत असावेत.
अपेक्षित व्यक्ती आलेली नाही हे पाहून त्यांचा चेहरा पडला हे आम्हाला जाणवलं.
सुदामकाकांनी विचारलं : ‘‘कोण हवं आहे तुम्हाला?’’
‘‘काका आहेत का घरात?’’ आम्ही विचारलं.
रडवेल्या आवाजात ते म्हणाले : ‘‘काका आता या दुनियेत नाहीत
हे तुम्हाला माहीत नाही का?’’
मी म्हणालो : ‘‘कधी झालं हे?’’
जय माझ्याकडे पाहू लागला. आम्हा दोघांना सगळं माहीत असूनही आम्ही उगाचच, करायची म्हणून चौकशी करतोय हे सुदामकाकांच्या लक्षात आलं.
बागेच्या मधोमध एका झाडाभोवती गोल ओटा होता. त्या ओट्यावर बसून आम्ही सुदामकाकांशी बोलत होतो. आमचं बोलणं सुरू असतानाच सुदामकाकांना फोन आला. ‘आम्ही कोण आहोत, कुठून आलो आहोत’ वगैरे चौकशी त्या फोनवरच्या व्यक्तीनं त्यांच्याकडं मोठ्या आवाजात केल्याचं कळलं.
घरात कुणीच नसताना आम्ही आलो असल्याचं फोनवर बोलणाऱ्या त्या पलीकडच्या व्यक्तीला कसं कळलं असावं हे आम्हाला समजेना.
सुरूच असलेला तो फोन सुदामकाकांनी माझ्याकडे दिला. पलीकडची व्यक्ती इंग्लिशमधून माझ्याशी बोलू लागली.
‘‘व्हॉट इज युअर नेम? काय काम काढलंत? तुम्ही कोण आहात? तुमच्याकडे काही कागदपत्रं आहेत का? आई-बाबांसंदर्भात काही महत्त्वाचं तुम्हाला बोलायचं आहे का?’’ असे प्रश्नावर प्रश्र्न मला त्या व्यक्तीनं विचारले.
‘‘एका कार्यक्रमात आमची भेट झाली होती आणि ते गेल्याचं मला कळलं म्हणून मी त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला आलो आहे,’’ असं
मी त्या व्यक्तीला सांगितलं आणि आमचं बोलणं अखेर संपलं.
फोन ठेवल्यावर सुदामकाका सांगू लागले : ‘‘आमच्या साहेबांचा हा थोरला मुलगा सचिन. हा अमेरिकेत असतो. दुसऱ्याचं नाव आहे संजय. तो डॉक्टर आहे आणि मुलगी सुप्रिया हीसुद्धा डॉक्टर आहे. तिन्ही मुलं अमेरिकेतच राहतात. महिनाभरापूर्वी त्यांची आई वारली आणि आता चार दिवसांपूर्वी वडीलही गेले. घरात कोण येतंय, कोण जातंय, मी काय करतोय हे ते सगळं त्या कॅमेऱ्यामधून तिकडून बघत असतात. नवीन कुणी माणूस घरी आला की ते तिकडून लगेच मला फोन करून विचारतात.’’
‘‘तुम्ही जा लवकर,’’ असं म्हणत सुदामकाका आम्हाला घालवून देऊ बघत होते. मी त्यांना विश्वासात घेतलं आणि बोलतं करण्याचा प्रयत्न केला. काय सांगावं आणि काय सांगू नये अशी त्यांची अवस्था झाली होती. आम्ही सगळं ऐकलं आणि सुन्न झालो.
तितक्यात आतून कुणीतरी विचारलं : ‘‘सुदामकाका, कोण आलं आहे बाहेर?’’ ती पंचविशीच्या आसपासची तरुणी होती.
दोन दिवसांपूर्वी जे आजोबा वारले - त्यांचं नाव संतोष महाजन - त्यांची ही नात होती. सायली तिचं नाव. तिनं आमची विचारपूस केली आणि ती आतमध्ये निघून गेली.
सुदामकाकांना आम्ही विचारलं : ‘‘तुम्ही केव्हापासून इथं आहात?’’
ते म्हणाले : ‘‘माझा जन्मच या महाजन कुटुंबातला आहे. हे कुटुंब मूळचं रत्नागिरीचं. घरी मोठी वडिलोपार्जित संपत्ती. संतोषसाहेब हे नोकरीला लागल्यावर मुंबईत आले; पण त्यांचं कुटुंब, आई-वडील रत्नागिरीलाच होते. माझे आई-वडील रत्नागिरीला महाजन कुटुंबाकडे काम करायचे. संतोषसाहेब ज्या वेळी मुंबईला स्थायिक झाले त्या वेळी माझ्या आई-वडिलांनी मला आणि माझ्या बायकोला इकडे पाठवलं. घर बांधल्यानंतर पाचेक वर्षांनी साहेब निवृत्त झाले. एकेक करत साहेबांची तिन्ही मुलं परदेशात गेली. चार वर्षांनी त्यांचं कधीतरी आई-वडिलांना भेटणं होत असे. आई-वडील तिकडं भेटायला गेले तर ते त्यांच्याशी फारसं बोलत नसायचे. आपली मुलं आनंदानं जगत आहेत तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू द्यावं, अशी समंजस भूमिका आई-वडिलांनी घेतली. जसजसे दिवस चालले होते तसतशी या दोघांची प्रकृती खराब होत चालली होती. आपल्या आई-वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करायला तिन्ही मुलांना कधी वेळ नसे.’’
जय मध्येच म्हणाला : ‘‘चल ना यार...जाऊ या आपण...उगाच काहीतरी व्हायचं.’’
मी म्हणालो : ‘‘काहीही होणार नाही. थांब थोडा वेळ.’’
मी पुन्हा सुदामकाकांशी बोलू लागलो; पण जयचं मन तिथं लागेना.
तो सतत त्या कॅमेऱ्याकडे बघत होता.
सुदामकाका म्हणाले : ‘‘त्या कॅमेऱ्यातून नुसती चित्रं दिसतात.
आवाज येत नाही. मघाशी माझ्याशी बोलून ज्या आतमध्ये गेल्या ना त्या सायलीताईंनी मला हे सांगितलं आहे.’’
सुदामकाका आमच्याशी एवढ्या बेधडकपणे कसे बोलू शकत होते त्याचा उलगडा झाला.
सुदामकाका सांगू लागले : ‘‘तिन्ही भावंडांची आई एक महिन्यापूर्वी वारल्यावर तिघांनाही ती माहिती देण्यात आली. त्यावर ‘आता गेली तर अंत्यसंस्कार करून टाका,’ असा तिघांचाही निरोप आला. महिन्याभरात वडीलही वारले. तो निरोप भावंडांना देण्यात आला. त्यावर ‘जसे आईचे अंत्यसंस्कार केले तसेच वडिलांचेही करून टाका. आम्हाला यायला वेळ नाही,’ असं भावंडांनी सांगितलं.’’
आपले वडील किंवा आई जाते तेव्हा शेवटचं तोंड पाहायलाही मुलांना यावंसं वाटत नाही...
‘अश्रूंची फुले’ हा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा ‘आमच्याभोवती असे अनेक प्रसंग घडतात’ असं सांगणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. असे प्रसंग क्वचितच घडत असावेत, असं आपलं मला वाटत होतं.
मी गावाकडे गेल्यावर आई आजही म्हणते, ‘आपल्या मातीला (अंत्यसंस्कार) माणसं किती येतात यावरून आपली उंची कळते.’ कदाचित ते खरंही असेल; पण जिथं आपल्या पोटची मुलं आपल्या मातीला येत नाहीत, आपलं शेवटचं तोंड पाहत नाहीत तिथं त्या आई-वडिलांशी संबंधित असणाऱ्या इतर लोकांना काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही.
बागेतल्या एका झुडुप-वेलीकडं बोट दाखवत सुदामकाका म्हणाले : ‘‘बाईसाहेबांना ही रातराणी फार आवडायची, त्यांनीच ती लावली आहे. निगुतीनं मोठी केली आहे. सकाळी आम्ही उठायच्या अगोदर बाईसाहेब रातराणीला पाणी घालायच्या. फुलांचा सडा बाईसाहेब वेचत आहेत असा भास होतो कधी कधी.
महाजन आजी-आजोबांच्या अशा अनेक आठवणी
सुदामकाकांनी सांगितल्या.
सायलीचा आजी-आजोबांवर खूप जीव. आपल्या आई-वडिलांचा विरोध पत्करून ती आजोबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी भारतात आली आणि आता सगळे कार्यक्रम झाल्यावरच ती परत जाणार आहे, अशीही माहिती सुदामकाकांनी दिली.
सुदामकाका म्हणाले : ‘‘आपले वडील मोठ्या पदावर होते त्याअर्थी त्यांच्याकडे खूप पैसा असावा असं मुलांना वाटतं. कुणी तरी कुठून तरी येईल आणि ‘तुमच्या वडिलांनी आमच्याकडे घर, जमीन, पैसा-अडका, सोनं इत्यादी ठेवलेलं आहे असा काही निरोप आणतील याची ही मुलं वाटत पाहत आहेत. चार महिन्यांपूर्वी तिन्ही भावंडं सहकुटुंब इथं येऊन गेली. त्यांनी खूप भांडणं केली. ‘प्रॉपर्टीचे समान हिस्से करून ती आमच्या नावावर करण्यात यावी,’ असं तिन्ही भावंडांचं म्हणणं होतं. त्यावर बाईसाहेब त्यांना म्हणाल्या, ‘आम्ही गेल्यावर हे तुमच्याच नावावर होणार आहे ना?’ तेव्हा त्यांची मुलगी म्हणाली, ‘आम्हाला तेव्हा वेळ असेल की नाही ते माहीत नाही...’ त्या दिवसांपासून बाईसाहेब खचल्या. मुलं परदेशी निघून गेल्यावर त्या अंथरुणालाच खिळल्या. तिघांपैकी एकालाही आई-वडिलांविषयी माया नव्हती, आस्था नव्हती. ही नात तेवढी सगळ्यांच्या बोलण्याला विरोध करायची आणि आजी-आजोबांची बाजू घ्यायची.’’
सुदामकाकांना थांबवून जयनं मध्येच विचारलं :‘‘मग सगळ्यांच्या नावानं प्रॉपर्टी करण्यात आली का?’’
सुदामकाका सांगू लागले : ‘‘नाही. सगळ्यांचं वागणं पाहून साहेबांनी सगळ्या प्रॉपर्टीचे दोन हिस्से केले. एक हिस्सा सामाजिक ट्रस्टला देऊन टाकला आणि दुसरा हिस्सा आपल्या नातीला दिला. भावंडांना हे कळलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी आदळआपट केली; पण तेव्हा वेळ निघून गेली होती.’’
‘‘मी सायलीशी बोलू शकतो का?’’ मी सुदामकाकांना विचारलं.
ते म्हणाले : ‘‘हो. बोलू शकता.’’
त्यांनी सायलीला बोलावलं. मी सायलीला तिच्‍या आजोबांच्या आठवणी सांगू लागलो. खरं पाहता, मी त्या आजोबांना कधी भेटलोही नव्हतो; पण तिला बोलतं करण्यासाठी मी ही युक्ती केली.
सायली म्हणाली : ‘‘माझ्या आई-वडिलांनीच आजी-आजोबांना खूप त्रास दिला, नाहीतर अजून काही दिवस ते जगले असते; पण पैसा सगळ्यांना प्यारा असतो. माणुसकीचं कुणाला काही देणं घेणं नाही.’’
‘‘तुम्ही परत कधी जाणार आहात?’’ असं विचारल्यावर ती म्हणाली :‘‘येत्या आठ दिवसांत मला जावं लागेल. माझ्या परीक्षा आहेत. सगळे क्रियाविधी आटोपल्यावर मी जाईन आणि परीक्षा देऊन परत येईन. इथंच स्थायिक होण्याचा माझा विचार चाललाय.’’
‘‘तुमच्या आई-वडिलांना काय वाटतं?’’ या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली : ‘‘त्यांना कशाचंच काही वाटत नाही.’’
सुदामकाका आणि सायली यांचा निरोप घेताना त्यांना खरं काय ते मी सांगितलं.
मी म्हणालो : ‘‘हा जय...तुमच्या शेजारीच राहतो. माझा मित्र आहे. त्यानं मला ही सगळी हकीकत सांगितली आणि असंही कुठं घडू शकतं यावर आणि माणसं या पद्धतीनंही वागू शकतात यावर माझा विश्वास बसला नाही. तेव्हा प्रत्यक्षच भेटावं म्हणून मी इथं आलो होतो.’’
सुदामकाका आणि सायली यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आम्ही समोर गेटकडे पाहत बाहेर पडलो. ती बाग, तो बंगला माणसांविना सुना सुना वाटत होता.
एवढ्या मोठ्या बंगल्यात आणि बागेत सुदामकाका आता एकटेच थांबणार होते. त्यांना तिथल्या झाडांना पाणी घालायचं होतं...मालकांच्या आठवणींत राहायचं होतं...
आपलं या बंगल्यात कुणीतरी होतं आणि आता ते सोडून गेले आहेत...आपण पोरके झालो आहोत असं वाटणारे तूर्तास तरी सुदामकाका एकटेच तिथं आहेत. सायली इथं आज आहे,; पण उद्या असेलच असं नाही.
नात्यांमधला दुरावा वाढत चाललाय...पैसा, करिअर, प्रतिष्ठा
यांच्यापुढं माणसाला नाती क्षुल्लक वाटू लागली आहेत. नात्यांविषयीची आस्थाच संपत चालली आहे...ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी वाढवलं, उंच भरारी घेण्याचं बळं दिलं त्यांच्या अंत्यसंस्काराला, त्यांचं शेवटचं तोंड पाहायलाही येण्याची इच्छा होऊ नये अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा तिथं संस्कार कुणाचे कमी पडतात? जन्मदात्या आई-वडिलांचे की अन्य कुणाचे? संस्कार ते अंत्यसंस्कार यांचं नातं घट्ट आहे. ते टिकून राहील ते कुणामुळं आणि टिकून राहणार नाही ते कुणामुळं, हा प्रश्न अनुत्तरितच राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com