आस निळ्या पाखरांची... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

जसजशी रात्र वाढत होती, तसातसा चैत्यभूमीवरचा माहौल अधिकच भक्तिभावामध्ये बुडून जात होता. अनेक राजकीय नेते इथंही आपली वेगळी चूल मांडून आणि वेगळं स्टेज मांडून मोठमोठ्यानं भाषण करत होते. त्या भाषणांकडं फारसं कोणी लक्ष देत नव्हतं. तिथं जमलेला प्रत्येक जण दोन गोष्टींमध्ये रमला होता. एक- तिथल्या सगळ्या वातावरणाचा रसास्वाद घेण्यामध्ये आणि दोन- बाबासाहेबांच्या पायावर मस्तक टेकवण्यामध्ये. अनेक जण वेगवेगळ्या स्टेजवर आपल्या कला सादर करत होते. कोणी कविता सादर करत होतं, कोणी बाबासाहेबांना वंदन करत होतं, कोणी शाहिरीतून बाबासाहेबांना अभिवादन करत होतं, तर कोणी बाबासाहेबांच्या गीतावर तल्लीन होऊन नाचत होतं. भक्ती काय असते आणि ती एखाद्या व्यक्तीवर किती व्यक्त होते, हे पाहायचं असेल, तर सहा डिसेंबरला एकदा चैत्यभूमीच्या त्या निळ्या सागराचा तुम्हाला एक भाग व्हावा लागेल.

पाच, सहा आणि सात डिसेंबर हे तीन दिवस दर वर्षी मुंबईमध्ये असणारा माहौल डोळे दीपवून टाकणारा असतो. चैत्यभूमीवर असणाऱ्या भक्तांची गर्दी, दादर परिसरामध्ये पांढऱ्या कपड्यात निळा ध्वज खांद्यावर घेऊन जाणाऱ्यांची संख्या पाहिल्यावर लक्षात येतं, की या सगळ्या निळ्या पाखरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांवर मस्तक ठेवायची ओढ लागलेली असते. ग्रामीण भागातला माणसाचा मुंबईत यायचं म्हटलं, तरी थरकाप उडतो; पण बाबासाहेबांच्या दर्शनाची ओढ या निळ्या पाखरांना मुंबई जवळ करायची ताकद देते. हे तीन दिवस त्यांच्यासाठी सर्वांत श्रद्धेचे असतात. म्हणजे एक दिवस यायला, एक दिवस चैत्यभूमीवर आणि तिसरा दिवस परतीचा, अशा या तीन दिवसांच्या प्रवासात बाबासाहेबांना मानणारा प्रत्येक अनुयायी, मग तो कुठल्याही जातीचा असो, चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतोच. मी आणि माझे सगळे मित्र हे तिन्ही दिवस अनेकांमध्ये बाबासाहेब पाहण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झालेलो असतो. कुणी गाण्यातून, पुस्तकातून, उपक्रमातून बाबासाहेबांचं दर्शन घडवतात, तर कुठं मदतीच्या स्पर्शातून बाबासाहेबांचा भास होत असतो. हे तीन दिवस कसे जातात हे कळत नाही, बाहेरून मुंबईत येणाऱ्यांना चैत्यभूमीवर एकच दिवस राहायला मिळतं. माझ्यासारख्या मुंबईकरांना मात्र पहिल्यापासून ते शेवटपर्यंत चैत्यभूमीवर घडणाऱ्या बारीकसारीक सगळ्या गोष्टी अगदी बारकाईनं आणि वेगळेपणानं पाहता येतात. मी पंढरपूरच्या वारीच्या कव्हरेजच्या निमित्तानंही अनेकदा आठ-आठ दिवस प्रवास केलाय. शेकडो किलोमीटर चालून पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागणारा तो प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो. घर-दार सगळं सोडून केवळ भक्ती हा विचार घेऊन हा वारकरी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायावर नतमस्तक होतो. त्यावेळी प्रचंड भक्ती आणि श्रद्धा वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळते. तशाच प्रकारे चैत्यभूमीवर येणारा प्रत्येक अनुयायी हा बाबासाहेबांचा अंश असतो. तिथं प्रचंड श्रद्धा असते आणि भक्ती असते. त्या पलीकडं जाऊन एका विचाराशी, एका तत्त्वाशी प्रचंडपणे घट्ट बांधण्यासाठी, विज्ञानवादी होण्यासाठी इथं आलेला प्रत्येक अनुयायी आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी दादर स्टेशनपासून ते चैत्यभूमीपर्यंत तुम्हाला पायी प्रवास करावा लागतो. दोन्ही बाजूनं येणारे आणि जाणारे तेवढेच. ‘जय भीम’च्या घोषणा करत अवघं वातावरण दुमदुमलेलं असतं.

मी माझी गाडी स्टेशनच्या जवळ पार्क करून चैत्यभूमीकडे निघालो. सोबत सुनीता नावाची माझी एक सामाजिक कार्यात काम करणारी मैत्रीण होती. वीस मिनिटांच्या गर्दीमधून मार्ग काढत काढत आम्ही चैत्यभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबलो. आतमध्ये प्रवेश करत असताना एक मुलगी आमच्याकडं आली आणि तिनं सुनीताला सॅनिटरी पॅड दिलं. मला काही वाटलं नाही; पण सुनीता मात्र लाजली, कारण सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी पॅड जमर कोणी हातामध्ये देत असेल, तर महिलांसाठी तो लाजण्याचा विषय असेलच. सॅनिटरी पॅड वाटप करणारी ती मुलगी मात्र अगदी बिनधास्त होती. सविता यादव असं तिचं नाव, तिथं येणाऱ्या प्रत्येक महिलांना ‘सॅनिटरी पॅड तुम्ही घ्या आणि तो मोफत आहे,’ असं ती सांगत होती. महिला मात्र लाजून पुढं जात होत्या. ती आपलं काम अगदी चोखपणे बजावत होती. मी तिला विचारलं : ‘‘तुम्हाला महिला प्रतिसाद देत नाहीत, याचं काय कारण आहे?’’ ती म्हणाली : ‘‘असं काही नाही, ज्यांना हवं आहे, त्या महिला घेत आहेत. गावाकडून आलेल्या अनेक महिलांनी माझ्याकडून अधिक चार सॅनिटरी पॅड मागून घेतलेत.’’ तिच्याशी बराच वेळ संवाद साधल्यावर कळालं, की युवक पॅंथर, सम्राट अशोक विहार, आवेग फाऊंडेशन अशा समविचारी संघटना एकत्र येऊन या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करण्याचं काम करत आहेत, तर महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात येतंय. गेटपासून आतमध्ये नजर टाकल्यावर जिकडं जाईल तिकडं माणसं. एका बाजूला भलंमोठं स्टेज. त्या स्टेजवर भाषणं सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठी रांग लागली होती. अन्नदान करणारे, साफसफाई करणारे कर्मचारी, दिशा दाखवणारे अनेक स्वयंसेवक. दीक्षाभूमीचं वातावरण जितकं भक्तिमय होतं, तितकंच करुणेनं भरलेलं होतं. एरवी असं वातावरण आपल्याला कुठं दिसत नाही. ‘हे काम माझं आहे, ते मी केलं पाहिजे,’ असं समजून प्रत्येक जण आपापली भूमिका अगदी चोखपणे पार पाडत होता. मी आणि सुनीता वेगवेगळ्या पुस्तकांच्या स्टॉलवर जाऊन चौकशी करत होतो, पुस्तकं पाहत होतो.
नागपूरच्या एका संस्थेच्या स्टॉलवर दोन परदेशी मुलं खूप वेळ पुस्तकं चाळून ती विकत घेत होती. माझं इंग्लिश तसं फारसं चांगलं नाही. त्यामुळं मी सुनीताला म्हटलं : ‘‘तू यांच्याशी बोल.’’ ते कुठून आले, कुठं चालले, पुस्तकं का घेत आहेत, असे प्राथमिक प्रश्‍न विचारायला मी सुनीताला सांगितलं. सॅंट्रोझोस आणि तुंगीमवा, हे दोघं जण श्रीलंकेमधले. बाबासाहेबांवर दोघांचंही संशोधन सुरू आहे. बाबासाहेबांशी संबंधित असणारी अनेक पुस्तकं त्यांच्या हातात होती. त्यांच्याशी चर्चा करताना, बोलताना, त्यांनी आम्हाला सांगितलं : ‘‘आम्ही सगळं जग पायाखाली घातलं, बाबासाहेबांच्या रिसर्चच्या अनुषंगानं आम्हाला वेगवेगळे विषय आणि ग्रंथ हवे होते. खूप फिरल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी आम्ही परत गेलो. आम्हाला सांगण्यात आलं की, तुम्ही आता वेळ नका घालवू, सहा डिसेंबरला चैत्यभूमीला तुम्ही या, तुम्हाला ज्या विषयाची, ज्या लेखकांची आणि ज्या पद्धतीची पुस्तकं हवी आहेत, ती बाबासाहेबांवरची सगळी तुम्हाला मिळतील. आम्ही त्यांचं ऐकलं आणि परवापासून आम्ही मुंबईत आलो.’’ आपलं लहानसं मूल बाजारात हरवून जावं आणि दोन-तीन तासांनी ते परत भेटल्यावर आईला जो आनंद होईल, तसाच आनंद आपल्याला हवी ती पुस्तकं पाहून, या दोन्ही परदेशी पाहुण्यांना झाला होता. पंचवीस ते तिशीतले हे दोन्ही तरुण संशोधनाला, एखाद्या विषयाला समजून घेण्यासाठी आग्रही आहेत. त्या पलीकडं जाऊन भारतामधल्या महामानवाचं वेगळेपण त्यांना जगाला सांगायचं आहे. हे परदेशामधल्या युवकांना कळतंय आणि आमच्याकडल्या युवकांनी या वर्षी सपशेलपणे बुक स्टॉलकडे पाठ फिरवली होती. अनेक प्रकाशक मित्र मला चैत्यभूमीवर सांगत होते, या वर्षी जास्त पुस्तकं विकली नाहीत. ‘पुस्तकं घेतात कोण?’ असा प्रश्‍न विचारल्यावर ते म्हणाले, की तरुण मुलं जास्त पुस्तके घेतात. मात्र, या वर्षी पुस्तकं घेणारी ही तरुण मंडळी गेली कुठं, हा माझ्यासमोर पडलेला प्रश्‍न होता. त्या दोघांचा निरोप घेऊन आम्ही पुढं सरकलो. जसजशी रात्र वाढत होती, तसातसा इथला माहौल अधिकच भक्तिभावामध्ये बुडून जात होता. अनेक राजकीय नेते इथंही आपली वेगळी चूल मांडून आणि वेगळं स्टेज मांडून मोठमोठ्यानं भाषण करत होते. त्या भाषणांकडं फारसं कोणी लक्ष देत नव्हतं. तिथं जमलेला प्रत्येक जण दोन गोष्टींमध्ये रमला होता. एक- तिथल्या सगळ्या वातावरणाचा रसास्वाद घेण्यामध्ये आणि दोन- बाबासाहेबांच्या पायावर मस्तक टेकवण्यामध्ये. अनेक जण वेगवेगळ्या स्टेजवर आपल्या कला सादर करत होते. कोणी कविता सादर करत होतं, कोणी बाबासाहेबांना वंदन करत होतं, कोणी शाहिरीतून बाबासाहेबांना अभिवादन करत होतं, तर कोणी बाबासाहेबांच्या गीतावर तल्लीन होऊन नाचत होतं. भक्ती काय असते आणि ती एखाद्या व्यक्तीवर किती व्यक्त होते, हे पाहायचं असेल, तर सहा डिसेंबरला एकदा चैत्यभूमीच्या त्या निळ्या सागराचा तुम्हाला एक भाग व्हावा लागेल.
आम्ही पुढं सरकलो. एका बाजूला सत्तरी पार केलेलं म्हातारं जोडपं बराच वेळ रांगेमध्ये उभे राहून डाळभात खाण्यामध्ये तल्लीन झालं होतं. त्या जोडप्याच्या बाजूला जाऊन आम्हीही बसलो. म्हटलं, आता बोलायला सुरुवात केली तर हे खाणार कधी! त्यांचं संपलं आणि मी त्यांच्यासमोर जाऊन थांबलो. आजी आणि आजोबा दोघांच्याही चेहऱ्यावर थकवा होता. त्या दोघांना मी ‘जय भीम’ म्हटल्यावर ‘‘तुम्ही जेवला नाहीत का’’ असं विचारण्यात आल. मी त्यांना म्हणालो : ‘‘थोड्या वेळापूर्वीच आम्ही जेवलो. तुमचं जेवण झालं का?’’ ते म्हणाले : ‘‘हो!’’ विषय काढत काढत चर्चा रंगली आणि त्या दोन्ही जोडप्यांमध्ये मला बाबासाहेब दिसले. सिद्धार्थ कांबळे आणि जनाबाई कांबळे हे दोघेही नागपूरचे. गेल्या चाळीस वर्षांपासून न चुकता, त्यांचं इथं सहा डिसेंबरला येणं आहे. सिद्धार्थ यांना सात मुलगे, तीन मुली असा खूप मोठा परिवार आहे. सगळा परिवार सुशिक्षित, शिक्षित, प्रत्येक मुलाचा व्यवसाय अगदी आनंदानं सुरू आहे. ‘तुम्ही आता थकले आहात. आता मुंबईला जाऊ नका,’ असा विरोध गेल्या चार वर्षांपासून या दोघांनाही होतो; पण तरीही घरच्या सगळ्यांचा विरोध पत्करून चैत्यभूमीला येतात. आजी बोलता बोलता म्हणल्या : ‘‘येताना तर तिकिटाला पैसेही नव्हते, उसनंपासनं करून आलो तसंच.’’ आजोबांच्या थैलीमध्ये मोठ्या डायऱ्या होत्या, पुस्तकं होती. आजींनी बाबासाहेबांचे फोटो, कॅलेंडर खरेदी केली होती. मी आजोबाला विचारलं : ‘‘डायऱ्या कशाच्या आहेत?’’ त्यावर आजी म्हणाल्या : ‘‘या त्यांच्या गाण्याच्या डायऱ्या आहेत.’’ मी एक एक डायरी जेव्हा चाळत होतो, तेव्हा मोत्यासारखं अक्षर आणि प्रत्येक शब्दांत मला बाबासाहेब दिसत होते. ते गाणंही खूप छान म्हणतात. आम्ही गाणं म्हणा म्हटल्यावर एका क्षणाचाही विलंब न लावता, आजोबांनी गाणं सुरू केलं. आजोबांचा पहाडी आवाज ऐकून आजूबाजूची सेल्फीवाली मुलं एकत्र येऊन ते गाणं रेकॉर्ड करू लागली.

कायदा भीमाचा
पण फोटो गांधींचा
शोभून दिसतो का नोटावर
किती शोभला असता नोटावर
टाय आणि कोटावर

हे पहिले गाणे झालं, की लगेच दुसरं गाणं त्यांनी सुरू केलं.

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना
दुमदुमे ‘जय भीम’ची, गर्जना चोहीकडे
सारखा जावे तिथे, हा तुझा डंका झडे
घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना
कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे,
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे
या भराऱ्या आमुच्या, ही पाखरांची वंदना

अशी अनेक गाणी आम्ही तिथं ऐकली. सुनीतानं आपल्या पर्समध्ये हात घालून सुरकुत्या पडलेल्या आजींच्या हातावर काही पैसे ठेवले. आजी म्हणाल्या : ‘‘हे काय बाळा? हे कशासाठी?’’ सुनीता म्हणाली : ‘‘तुमची मुलगी समजून घ्या, तुम्हाला जायला कामाला येतील.’’ आजी अगदी नम्रपणे म्हणाल्या : ‘‘आले बाबासाहेबांमुळं आणि जाईनही बाबासाहेबांमुळं. त्यामुळं काळजी नाही गं पोरी, नको तुझे पैसे.’’ सुनीताला थोडं वाईट वाटलं; पण मी त्या स्वाभिमानाची भाषा समजू शकलो. आजी आणि आजोबा दोघंही संगीत रजनीचा कार्यक्रम सुरू असलेल्या स्टेजकडं गेले आणि आम्हीही तिथून पुढं निघालो. आजी-आजोबांसारखांच्या अनेकांच्या रूपांतून बाबासाहेबांच जणू आम्हाला भेटत होते. प्रत्येकामध्ये असलेली ऊर्जा ही कुठल्या जातीचं प्रदर्शन करणारी नव्हतीच. ते प्रदर्शन तत्त्वाचं आणि मूल्यांचं होतं. प्रत्येक माणसाला समजून घेण्याचं होतं.

आम्ही परतीच्या मार्गाने निघालो, रात्रीचे साडेअकरा वाजले होते. दिवसभर थकूनभागून आलेली माणसं जिथं जागा मिळेल तिथे अंग टेकत होती. जणू आपल्या घरी झोपत आहेत, आपल्या हक्काच्या जागी अंग टेकत आहेत, अशा प्रकारे आनंदाच्या भावात प्रत्येक जण वावरताना दिसत होता. चैत्यभूमीचा तो प्रत्येक प्रसंगन् प्रसंग आजही माझ्या डोळ्यांतून जात नाही. प्रत्येक माणसात, येणाऱ्या प्रत्येक कलाकारात, तिथं माझ्या पत्रकारितेच्या भाषेमध्ये वेगळी स्टोरी दडलेली होती. मग या वर्षी तर नाही, पुढच्या वर्षी तुम्ही येणार ना नक्की, बाबासाहेबांच्या पायावर नतमस्तक व्हायला, चैत्यभूमीवर, अभिमानानं ‘जय भीम’चा नारा द्यायला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com