अंधारातली एक पणती... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

मी पारूआजीला म्हणालो : ‘‘तुमचा नवरा तुम्हाला मदत करत नाही का? काही काम करत नाही का?’’ त्यावर पारूआजी म्हणाली : ‘‘तो काम करत नाही, कुटुंबाला पोसत नाही, याचं मला काहीही वाटत नाही; पण तो बाकी बायकांच्या नवऱ्यांसारखं मला दारू पिऊन मारत नाही, घरी असलेला मालटाल बाहेर विकत नाही, चोरी करून हातामध्ये बेड्या अडकवून घेत नाही. येवढ्यामध्येच मी खूश आहे.’’

नगरला आदल्या दिवशीच सकाळी कुठं फिरायला जायचं हे मी ठरवलं होतं, त्याप्रमाणं सकाळी साडेपाच वाजता निघालो. नगरमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली होती. मी चॉंद-बिबीच्या मकबऱ्याच्या दिशेनं निघालो. जिथनं चॉंदबिबीचा माळ चढायला सुरवात होते, त्या पायथ्याला गाडी लावली आणि पायी-पायी मी त्या मकबऱ्याकडे निघालो. थोडंसं वर गेल्यावर मागं वळून बघितलं, तर स्पष्टपणे नगर शहराचा देखणा चेहरा दिसत होता. अर्धा-पाऊण तास पायपीट केल्यावर मला कोरीव मकबरा दिसला. पुरातन शिल्प आणि त्याची कोरीव स्टाईल नक्कीच मनाला भुरळ घालत होती. चॉंदबिबीच्या मकबऱ्याला दोन मजले आहेत. सगळीकडून छान दिसणारं सौंदर्य अधिक आकर्षक वाटत होतं. एका बाजूला काही छोटी-छोटी गावं दिसत होती आणि दुसऱ्या बाजूला नगर शहराचा काही भाग दिसत होता. सुसाट वाहणारा वारा चॉंदबिबीच्या त्या मोठ्या खिडक्‍यांमधनं आतमध्ये शिरत होता. सोबत पाण्याचे फवारेही अंगाला चिंब करण्याच्या उद्देशानं चिकटत होते. मी शांतपणे सगळा परिसर पाहिला. तिथले बारकावे टिपले. या मकबऱ्याच्या बाहेर पडल्यावर एवढ्या सकाळी एक आजी पांढऱ्याशुभ्र छत्रीखाली मक्‍याची कणसं घेऊन विकण्यासाठी बसली होती. एका बाजूला टोपल्यामध्ये भरलेली कणसं आणि दुसऱ्या बाजूला कोळशांनी भरलेली एक थैली आणि थोडंसं पुढच्या बाजूला कणसं भाजण्यासाठी तिनं पेटवलेली चूल. घणघण करणारा भाता. मी दूर असतानाच तिनं मला हटकलं : ‘‘बाबा, खाणार का मक्‍याचं कणीस? आजच तोडून आणली आहेत, ताजी आहेत, कवळी आहेत, खाऊन तर बघ; चवीला लई छान आहेत. मसाला आणि लिंबू टाकला तर अजून लई मजा येईल.’’ मला तिच्या कणसाचं महत्त्व समजून सांगणारी आजी मार्केटिंगच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली असती, तर तिचा पहिला नंबर आला असता, असा विचार मनात आला. मार्केटिंगमध्ये ती पास झाली होती. इच्छा नसतानाही तिच्या बोलण्यामुळं माझ्या जिभेला कणीस खायची ‘आस’ लागली होती. मी म्हणालो : ‘‘द्या एक.’’ ती पुन्हा म्हणाली : ‘‘एक घेतलं तर पंधरा रुपयाला आणि दोन घेतली तर पंचवीस रुपयाला.’’ एका हातानं तिनं भाता सुरू केला आणि दुसऱ्या हातानं ती कणसं भाजत होती. जेमतेम अर्धं कणीस भाजून झालं असेल, तिच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधून फोनचा आवाज ऐकू आला. छोटासा बोटभर फोन तिथली सगळी शांतता भंग होईल, अशा आवाजामध्ये वाजत होता. भात्यावरचा हात काढून आजीनं पिशवीत हात घातला, पिशवी चाचपडून फोन बाहेर काढला. एका हातानं ती कणीस फिरवत होती आणि दुसऱ्या हातानं फोनवर बोलत होती. तिचं बोलणं सुरू झालं. फोनवरती ती म्हणत होती : ‘‘बाबा, या महिन्यात तरी पैसं पाठव, लई आडचण चालली रं...’’ असं बोलून पलीकडून बोलणाऱ्या माणसाचं आजी खूप वेळ कानाला मोबाईल लावून ऐकत होती. ‘‘बरं, ठीक आहे बाबा’’ म्हणत आजीनं पाण्यानं मोबाईल भिजेल म्हणून त्याच काळजीनं आरामात पिशवीत ठेवला. बोलण्याचं स्किल, नम्रपणा, धाडसीपणा आणि काळजी असे कितीतरी पैलू त्या साठीला आलेल्या आजीचे मला दिसत होते. अत्यंत उत्साहात आणि सुरवातीला हसून स्वागत करणारी आजी फोन आल्यावर मात्र काळजीच्या स्वरात मला बोलत होती, ते मला जाणवत होतं. आजीला काहीतरी झालंय; त्यामुळं ती निराश झाली हे माझ्या लक्षात आलं. दुसरं कणीस आजी भाजायला घेत होती, त्याच वेळी मी तिला विचारलं : ‘‘आजी, कोणाचा फोन होता?’’
ती म्हणाली : ‘‘लेकाचा. पुण्यात काम करतो, त्याचा फोन होता.’’
‘‘किती मुलं आहेत तुम्हाला?’’
‘‘दोन मुलं आणि पाच मुली.’’

मी एक घास कणसाचा खात होतो आणि एक प्रश्न आजीला विचारत होतो. पूर्ण कणीस संपेपर्यंत मी दोन-तीन प्रश्न आजीला विचारले असतील, त्यांचं मोठं-मोठं उत्तर आजी देत होती. आजीचा सध्याचा चाललेला वर्तमान आणि भूतकाळ हे सारं काही माझ्या भ्रमंतीच्या नजरेला नवीन नव्हतं. नवं होतं ते आजीचं पात्र आणि त्या पात्राभोवती असलेलं सिंहाचं काळीज.

पारू जाधव ही चॉंदबिबी का मकबरा इथं जवळच असलेल्या एका वाडीत राहणारी महिला. रोज सकाळी सहा वाजता चॉंदबिबीच्या मकबऱ्यासमोर यायचं, तिथं सकाळी दोन तास कणसं विकायसाठी छोटंसं दुकान लावायचं, पुन्हा आपल्या घरी जायचं. मग दिवसभर लोकांच्या शेतावर काबाडकष्ट करायचे आणि आपल्या संसाराचा गाडा हाकायचा... घरातलं सगळं काम आवरायचं आणि पुन्हा सकाळी चॉंदबिबीचा महल, हे सगळं रूटिन गेल्या अनेक वर्षापासून... आजी सांगत होती आणि मी एकत होतो. पारूआजीला पाच मुली आणि दोन मुलगे. पाचही मुलींची लग्न करण्यामध्ये आयुष्याचा सोनेरी काळ निघून गेला. म्हातारपणातली काठी अधिक बळकट व्हावी, त्यासाठी पारूआजीनं आपल्या रामजी आणि शिवाजी या दोन्ही मुलांना शिकवलं. रामजी एका संस्थेमध्ये नोकरीला होता. संस्थाचालक आणि रामजीमध्ये काही बिनसलं आणि त्यात रामजीनं आत्महत्या केली. पारूचा दुसरा मुलगा शिवाजी पुण्यामध्ये कॉंट्रॅक्‍टरच्या हाताखाली काम करत होता; पण अचानकपणे बांधकाम बंद पडल्यानं गेल्या दोन महिन्यांपासून वणवण फिरल्याशिवाय शिवाजीकडं पर्याय नव्हता.

बऱ्यापैकी कणसं संपलेली होती, माणसाचा ओघही कमी झाला होता, हे लक्षात आल्यावर आजीबाईनं आपलं सगळं दुकान आवरून ठेवायला सुरवात केली. पाऊस आता थांबला होता; पण माझ्या डोक्‍यातले विचार ‘आता पुढं काय?’ असे झाले होते. माझ्या हातातली दोन्ही कणसं खाऊन झाली होती; मात्र आजीचं बोलणं काही संपत नव्हतं. ‘आत्महत्या केलेला आपला शिक्षक मुलगा किती गुणी होता, ज्ञानेश्वराचं रूपच होता तो’ असं वारंवार ती मला सांगत होती. चॉंदबिबीच्या मकबऱ्यापासून माझी गाडी जिथं लावली होती, त्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत मी आजीशी बोलत गप्पा करत निघालो. जड असलेला आजीचा भाता मी आग्रह करून माझ्या हातामध्ये घेतला. डोक्‍यावर आणि हातात ओझं घेऊन ही महिला हा माळ चढत कसा असेल? एवढ्या सकाळी हिला भीती वाटत नसेल का? असे कितीतरी प्रश्न माझ्या मनाला पडत होते. आजीचा घरी जाण्याचा रस्ता आला आणि आजी थांबली. म्हणाली : ‘‘बाबा! जाते रे मी आता इथून. दे माझा भत्ता.’’ आपल्या डोक्‍यावरचं ओझं खाली ठेवत तिनं आपले दोन्ही हात माझ्या गालावर फिरवले आणि आपल्या गालावर नेऊन कडकड बोटं मोडली. मी जिथं उभा होतो, तिथून आजीनं तिचं गाव मला लांब हात करून दाखवलं. आम्ही टेकडीवरूनच सारं दृश्‍य पाहत होतो. इतक्‍या सुंदर आणि देखण्या गावाला सकाळच्या धुक्‍यानं चादर पांघरली होती. एकीकडं माझी गाडी दिसत होती आणि दुसरीकडं आजीचं गाव. दोन्हीमध्ये साधारणत: दोन किलोमीटरचं अंतर असावं. आजीनं थैली हातामध्ये घेतली आणि ती वाटेला निघाली. मी आजीला म्हणालो : ‘‘आजी, इथं चहा कुठं मिळेल?’’
आजी म्हणाली : ‘‘तुम्हाला शहरातच जावं लागेल. अलीकडं कुठं चहाचं दुकान नाही.’’
मी म्हणालो : ‘‘तुमच्या गावात चहा मिळेल का?’’
आजी म्हणाली : ‘‘मिळेल ना; पण तुम्हाला उलटं जावं लागेल.’’
मी म्हणालो : ‘‘चालेल. मला सकाळी चहा पिण्याची सवय आहे. नाही तर माझं डोकं दुखतं, दिवसभर काम होत नाही माझ्याकडून.’’

तिचं पुन्हा उत्तर आलं, म्हणाली : ‘‘कशी रे बाबा तुम्ही शिकलेली पोरं? कशाचंबी यसन लावून घेता.’’ त्यानंतर आजी पुढं आणि मी मागं निघालो. जड असलेल्या भात्याची थैली मी पुन्हा हातात घेतली. मी घरापर्यंत तिला कंपनी देणारा सोबती तिला भेटलो होतो. माहीत नाही, तिला इतक्‍या अलीकडच्या काळात अशी मनमोकळी कंपनी मिळाली होती की नाही? पारूआजीनं आपल्या आईच्या आठवणी जाग्या केल्या, ती किती कामाची होती, तिनं खूप कष्ट सहन केले. आपल्या मुली किती कामाच्या आहेत, हे पण ती सांगत होती. जन्मल्यापासून ते आतापर्यंतचा तिचा सगळा प्रवास त्या नावेसारखा वाटत होता; जिला छिद्र पडलेलं आहे; पण काहीतरी युक्ती करून ते छिद्र झाकण्याचं काम तात्पुरतं का होईना झालंय, असंच काहीसं.
आम्ही गावात गेलो. छोट्याशा मंदिराच्या पारावर पांढरं शुभ्र वस्त्र घालून आजोबा बसला होता, त्यानं पारूआजीला पाहिलं आणि बिडीचा एक झटका ओढत आपल्या तंद्रीमध्ये थोडासा तो रमला. पुन्हा पारूआजीच्या बाजूला त्यानं पाहिलं, पारूची पिशवी त्याला मी घेतल्यासारखं वाटलं. हातात असलेली बिडी त्यानं ताबडतोब विझवली. तो पटकन् खाली आला आणि माझ्या हातातली थैली त्यानं घेतली. मला क्षणभर काही कळेचना. पारूआजीनं हलक्‍या स्वरात पतीची ओळख करून दिली.
‘‘नमस्कार...’’ मी म्हणालो; पण त्यानं मला नमस्कार केला नाही. पारूआजीला म्हणालो : ‘‘कुठं मिळेल चहाचं हॉटेल इथं?’’
त्यावर आपल्या पतीकडं बघत पारूआजी म्हणाली : ‘‘अरे बाबा, तू माझं ओझं उचलून इथपर्यंत आलास, मी तुला एक कप चहाही पाजू शकत नाही का? चल माझ्या घरी.’’
व्वा! पारूआजी जेव्हा ‘‘माझ्या घरी चल’’ म्हणाली, तेव्हा मी त्या दिवसाची सगळी लढाई जिंकली होती. डोळे वटारून ताठ मानेनं चलणाऱ्या पारूआजीनं परत आपल्या पतीकडं पाहिलंही नाही. पारूआजीनं मला घरी बोलावलं, हे तिच्या पतीला आवडलं नव्हतं. मघाशी माझ्याशी बोलताना पारूआजीनं एका ओळीत आपल्या पतीचं कौतुक केलं होतं. आपला पती ग्रामपंचायतीचा सदस्य आहे, एवढंच ते कौतुक. त्यावर पारूआजीला म्हणालो होतो : ‘‘तुमचा नवरा तुम्हाला मदत करत नाही का? काही काम करत नाही का?’’

त्यावर पारूआजी म्हणाली होती : ‘‘तो काम करत नाही, कुटुंबाला पोसत नाही, याचं मला काहीही वाटत नाही. पण तो बाकी बायकांच्या नवऱ्यांसारखं मला दारू पिऊन मारत नाही, घरी असलेला मालटाल बाहेर विकत नाही, चोरी करून हातामध्ये बेड्या अडकवून घेत नाही. येवढ्यामध्येच मी खूश आहे.’’ पारूआजीचं घर आलं. दोन छोटी-छोटी मुलं ‘‘आजी आली, आजी आली’’ म्हणत पळत आली. आपल्या डोक्‍यावरचं ओझं खाली टेकवत पायातलं पायताण काढण्याच्या अगोदर पारूआजीनं त्या दोन्ही मुलांना आपल्या काळजाला घट्ट चिकटून घेतलं. छोट्याशा घरात एक तोडका-मोडका पलंग होता त्यावर कोणीतरी झोपल्याचं माझ्या लक्षात आलं. पारूआजीनं मला बसण्यासाठी एक चटई टाकली. मी बसायच्या अगोदर पती नवरा चटईवर बसला. पारूआजीनं चुलीवर पातेलं ठेवलं. तितक्‍यात मी हाक मारली : ‘‘आजी मी चहा पीत नाही, थोडींसं दूध ठेवा.’’ तेव्हा मात्र पारूआजीला शॉक बसला. ती माझ्याकडं बघत होती, मी तिच्याकडं बघत होतो. पारूआजीच्या नवऱ्याच्या बिडीचा धूर आणि घरातला धूर या दोन्हीचा संगम झाल्यामुळं अंथरुणात असलेली एक महिला खडबडून जागी झाली. मी समोर बसल्याचं पाहून तिनं काळजीनं आपला पदर सावरला. कपाळावर कुंकू नाही आणि हातात बांगड्यांचा पत्ता नाही. आयुष्याच्या काळजीनं काळवंडलेल्या त्या महिलेकडं बघत पारूआजी म्हणाली : ‘ही माझी मोठी सून. खूप कामाची आहे. चार दिवसांपूर्वी हिला बरं नव्हतं, तवाही ती कामाला गेली. त्यानंतर दोन दिसांत खूप आजारी पडली.’ आजीला माहीत होतं, की आपल्या घरात असं काही बोललेलं आपल्या नवऱ्याला आवडत नाही. तिनं दिलेलं दूध माझ्यासाठी मायेचा एनर्जेटिक प्याला होता. पारूआजीच्या त्या सगळ्या प्रवासामध्ये ती इतक्‍या उत्साहानं कशी तग धरून आहे, हे परमेश्वराला माहीत. तिनं काम केलं, तरच घरातली चूल पेटते आणि ही रोज पेटणारी चूल ती नित्यनेमानं पेटवतेच. तिच्या आईकडून घेतलेला वारसा तिनं चालवला. आता तिनं चालवलेला तोच वारसा तिची विधवा सून पुढं चालवते.

मी पारूआजीला अलविदा करत एकटाच रस्त्यानं निघालो. चार-दोन पावलं पुढं चाललो असेन; एक रिक्षावाला माझ्या पाठीमागं आला आणि म्हणाला : ‘‘चला, तुम्हाला पायथ्याला सोडायला सांगितलंय मला पारूमावशीनं.’’ वळून पाहिलं, तर पारूमावशी अजून दारात थांबली होती. मी त्या गावातून एक अशी ऊर्जा घेऊन चाललो होतो, ज्या ऊर्जेतून मला कधीही नैराश्‍य येणार नव्हतं. ही ऊर्जा पारूआजीच्या सहवासातून मला मिळाली. माझ्या गाडीपाशी रिक्षावाल्यानं रिक्षा थांबवली. खिशात हात घालून रिक्षावाल्याला पैसे देत होतो, तेवढ्यात रिक्षावाला म्हणाला : ‘‘पारूमावशीनं सांगितलंय, तुमच्याकडून पैसे घेऊ नका म्हणून.’’ एवढं बोलून रिक्षावाला सुसाट पुढं निघून गेला. का कुणास ठाऊक, माझं मन जड झालं होतं. गाडी स्टार्ट केल्याकेल्या सुरू झालेली गाणी मी बंद केली आणि शांतपणे मी जिथं थांबलो त्या रस्त्यानं निघालो.

महिला किती सहन करतात आणि सगळं पेलून नेण्याची ताकद त्यांच्यात किती मोठ्या प्रमाणात असते. असलेलं दु:ख झाकून ठेवायचं आणि नव्या आशेनं पुढं निघायचं, हे त्यांचं शेड्यूल दरदिवशी त्या उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे आहे. अशा कितीतरी पारूबाई आज रोज जळत असतील; त्या जळण्यामधनं त्यांच्या अंधारलेल्या कुटुंबाला उजेड देण्याचं काम त्या करतात. प्रत्येक आजीमध्ये, आईमध्ये, बहिणीमध्ये, मैत्रिणीमध्ये, प्रेयसीमध्ये, पत्नीमध्ये ती पारूबाई दडलेली असते. आपण तिच्याकडं कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो, हे महत्त्वाचं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com