गरिबीचं गोंदण (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

दुकानदाराला यायला वेळ होतोय, हे लक्षात आल्यावर त्या आजी स्वत:ची ताकद लावून ते कपड्यानं भरलेलं मोठं पार्सल खाली टाकत होत्या. घामाघूम झालेल्या आजींनी पदराला आपला घाम पुसला. परत पदर कमरेला खोवत त्या दोन्ही हातांनी गाडा ढकलत होत्या. पलीकडे असलेल्या त्या आजींचंही सामान उतरून झालं होतं. मी दुकानदाराला हाक मारली आणि म्हणालो : ‘‘या कोण आहेत आजी?’’ तो म्हणाला : ‘‘काम करणाऱ्या हमाल.’’ बाजारपेठेच्या मधोमध असलेलं एक दुकान अजून उघडलेलं नव्हतं. त्या दुकानासमोर त्या आजीबाईंनी आपली हातगाडी लावली आणि कमरेला खोवलेल्या थैलीमधून भाकरी काढून चटणीला टोचण्या मारत ती खाऊ लागल्या. दुसऱ्या आजीबाईही तिच्याजवळ गेल्या. दोघींचं हसून बोलणं सुरू झालं.

सोलापुरात सकाळी चाटी गल्लीतून निघालो. खूप छोटे-छोटे रस्ते आणि रस्त्यावर ये-जा करणारे लोक पाहून सोलापूरची मुख्य असलेली बाजारपेठ किती लहान आहे, असं वाटणं अगदी साहजिकच होतं. नेहमीच्या ओळखीच्या दुकानात गेलो. ‘‘खूप दिवसांनी आलात मालक,’’ असं म्हणत दुकानदारानं स्वागत केलं. रंगीत व्हरायटीवाला भल्या मोठ्या कपड्यांचा ढीग त्यानं माझ्यासमोर टाकला. किती ते रंग! काय सांगावं, आमचं मुंबईचं मार्केटही या रंगीत आणि स्वस्त मार्केटसमोर फिकं पडेल. कपड्यांची चाळण करत असताना बाहेरून एक आवाज आला : ‘‘शेठ, माल आणलाय, उतरा की लवकर. दुसऱ्या ठिकाणी जायचंय.’’ तोच आवाज पुन्हा आला. आजींनी जोरदार हाक मारली. त्या आवाजामध्ये मला कमालीचा करारीपणा वाटला. बाहेर जाऊन पाहतो तर काय, एका मोठ्या सामानाचं एक बंडल आजीनं हातगाडीवर ओढत आणलं होतं. तो आणलेला माल उतरून घ्यावा यासाठी त्या आजी दुकानदाराला हाक मारत होत्या. सत्तरी पार केलेल्या त्या आजी एवढं मोठं ओझं कसं पार करत असतील, कुठली ताकद या सुरकुत्या पडलेल्या हातामध्ये असेल, असे प्रश्न मला पडायला सुरू झाले. मी त्यांच्याकडे बघत होतो; पण त्यांचं माझ्याकडे जराही लक्ष नव्हतं. पाठीमागं बघितलं, तर अजून एक वृद्ध महिला अशाच एका दुकानदाराला माल उतरून घ्या, असं सांगत होत्या. दुकानदाराला यायला वेळ होतोय, हे लक्षात आल्यावर त्या आजी स्वत:ची ताकद लावून ते कपड्यानं भरलेलं मोठं पार्सल खाली टाकत होत्या. मी म्हणालो : ‘‘आजी, मी तुम्हाला मदत करू का?’’ त्या म्हणाल्या : ‘‘कशाला उगाच, कपड्याला काळं लागंल.’’ तरीही मी ते जड असलेलं पार्सल त्यांच्यासोबत ढकलायचा प्रयत्न करत होतो. पार्सल खूप जड होतं, दोघांनाही जागेवरून हलवता येत नव्हतं. घामाघूम झालेल्या आजींनी पदराला आपला घाम पुसला. परत पदर कमरेला खोवत त्या दोन्ही हातांनी गाडा ढकलत होत्या. पलीकडे असलेल्या त्या आजींचंही सामान उतरून झालं होतं. मी दुकानदाराला हाक मारली आणि म्हणालो : ‘‘या कोण आहेत आजी?’’ तो म्हणाला : ‘‘काम करणाऱ्या हमाल.’’ मी म्हणालो : ‘‘महिला हमाल, तेही या वयात?’’ तो म्हणाला : ‘‘त्यात काय?’’ आणि तो आपल्या कामाला लागला. बाजारपेठेच्या मधोमध असलेलं एक दुकान अजून उघडलेलं नव्हतं. त्या दुकानासमोर त्या आजीबाईंनी आपली हातगाडी लावली आणि कमरेला खोवलेल्या थैलीमधून भाकरी काढून चटणीला टोचण्या मारत ती खाऊ लागल्या. दुसऱ्या आजीबाईही तिच्याजवळ गेल्या. दोघींचं हसून बोलणं सुरू झालं.

मला काहीही करून या दोन वाघिणींशी बोलायचं होतं. मी अधिक वेळ न दवडता थेट त्यांच्याकडे गेलो. त्या आजींना म्हणालो : ‘‘एक गोणी किती रुपयांत टाकता? माझंपण सामान टाकायचं आहे.’’ आपल्या भाकरीचा तुकडा चटणीला लावत एक आजी म्हणाल्या : ‘‘मालक, तुम्ही काय नवीन हायसा? माहीत नाही व्हय तुम्हाला? एका डागाचं साठ रुपयं- रोडपासून ते दुकानात टाकायला. जर दोन डाग असतील तर पन्नासच्या खाली करणार न्हाय. तुम्ही सांगा, आम्ही कामाला सुरुवात करू.’’ दुसऱ्या आजी म्हणाली : ‘‘दोन दिवसांपासून हाताला कामच नाही आणि आज सकाळपासून कामाला दम नाही. टाकायची असतील तर लवकर सांगा, आम्हाला अजूनपण सामान टाकायचं आहे.’’ माझ्याकडे फारसं लक्ष न देता, त्या एकमेकींशी बोलत भाकरीचा तुकडा मोडत गप्पा करत होत्या. त्या असं दाखवत होत्या, की मला त्यांची गरज आहे. कमालीचं चैतन्य होतं या दोन्ही महिलांच्या चेहऱ्यावर. एकीच्या कपाळावर नक्षीदार गोंदण, तर दुसरीच्या कपाळावर लखलखती मोठी टिकली माझं लक्ष वेधून घेत होती. हातावर नक्षीदार गोंदणाऱ्या त्या कलाकारालाही मानलंच पाहिजे होतं. मी ‘‘पाणी देता का प्यायला?’’ असं म्हटल्यावर आजींनी अत्यंत मळकट असलेली पाण्याची बाटली माझ्याकडे केली. पाणी जिभेवर पडल्यावर त्या मळकट बाटलीतल्या पाण्याची चव मात्र कमालीची गोड होती. पहिल्या आजी म्हणाल्या : ‘‘नवीन आलाव काय इथं?’’ दुसऱ्या आजीबाईंचा लगेच प्रश्न : ‘‘दुकान टाकलंय का इथं?’’ त्या दोघीही मला प्रश्नांवर प्रश्न विचारत होत्या आणि मी कधी एका आजींकडे; तर कधी दुसऱ्या आजींकडे पाहत होतो. शेवटी मी त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. दोघींनाही जरा अवघडल्यासारखं वाटत होतं. त्यांच्या भाषेत ‘मालक’ माणूस त्यांच्या बाजूला कधी बसला नसेल. हळूहळू आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि प्रश्न-प्रतिप्रश्नही. जेवण झाल्यावर कंबरेला खोवलेली पिशवी काढत अडकित्त्यात सुपारी फोडत कराऱ्या आवाजामधल्या आजी म्हणाल्या : ‘‘ हे न ते विचारून कशाला उकरता वारकाचा उकंडा, किती उकरली तरी केसंच निघायची.’’ या दोघींच्या संवादातून वेगवेगळ्या म्हणी, कधी न ऐकलेले वेगवेगळे शब्द ऐकून असं वाटत होतं, की याची स्वतंत्रपणे कुठेतरी नोंद करून घ्यावी. त्यांची रोजची कमाई, गमाई, संसार, लग्न, मुलं, सगळा इतिहास मी जाणून घेतला. कधी रडणं, तर कधी हसणं आणि मोठमोठ्यानं नशिबाला शिव्या देणं, सर्व इतिहासाची उजळणी हे सगळं आम्ही जग विसरून दोन तास करत होतो.

मला पहिल्यांदा दुकानात ज्या भेटल्या त्या सत्तरी पार केलेल्या पारूबाई डाहवरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या आजी जेमतेम त्याच वयाच्या कोंडाबाई शिंगे या दोघीही वयाच्या चौदाव्या वर्षापासून याच मार्केटमध्ये हातगाड्यावर ओझं वाहत आहेत. पारूबाईंचा नवरा याच मार्केटमध्ये त्यांच्यासोबत हातगाड्यावर ओझं वाहून संसाराचा गाडा चालवायचा. सतत हेच काम केल्यामुळं अगोदर गुडघे कामातून गेले; नंतर हाताची हाडं. दहा वर्षं अंथरूणात पडून खिळखिळी झालेल्या पारूबाईंच्या नवऱ्यानं अखेरचा श्वास घेतला. रोज पैसे कमवायचे आणि त्याच पैशावर रात्रीची चूल पेटवायची. जेमतेम कसं तरी भागायचं. त्यात अंत्यसंस्कारांचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न पारूबाईंसमोर होता. काशीबाई सोनवणे नावाच्या महिलेनं अंत्यसंस्कारांसाठी मार्केटमधून पैसे जमा केले आणि सकाळी होणारे अंत्यसंस्कार रात्री उशिरा झाले. त्यानंतर पारूबाईचा मुलगा शेखर हा आपल्या वडिलांचा वारसा पुढं चालवू लागला; पण आजारानं त्याचाही मृत्यू झाला. त्यानंतर शेखरचा मुलगा किशोर हा आपल्या वडिलांचं काम करू लागला. त्याचाही आजारानं मृत्यू झाला. घरात उरलेल्या तीन माणसांची जबाबदारी आता पारूबाईंवर येऊन ठेपली होती. नवरा गेल्यामुळं कपाळ कोरं करकरीत असलं, तरी त्या कुंकू लावायच्या जागी असलेलं गोंदलेलं गोंदण फारच आकर्षक होतं. पारूबाईंला मी म्हणालो : ‘‘तुमचं लग्न झालं, तेव्हा हुंडा वगैरे काही घेतलं होतं का?’’ आपला नवरा, मुलगा, नातू यांच्या आठवणीमध्ये बुडालेल्या पारूबाईंच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांत लग्नाचं नाव काढलं नि एकदम चमक आली. डोळ्याचं पाणी पदरानं पुसत त्या म्हणाल्या : ‘‘आमच्या वेळी असं हुंडा वगैरे काही नव्हतं. तीन रुपये माझ्याच वडिलांना माझ्या सासऱ्यानं दिलं होतं. त्या तीन रुपयांसोबत पाच पोत्यांनी भरलेलं धान्य आणि तीन साड्याही मला दिल्या होत्या. आमच्या वेळी पोरीला देण्याची पद्धत होती.’’ ‘‘तुमचा नवरा तुम्हाला कुठल्या नावानं हाक मारायचा?’’ असं विचारल्यावर पारूबाई डोक्‍यावरचा पदर तोंडावर ठेवत खुदूखुदू हसत होत्या. आपला नवरा आणि आपण कसं राजासारखं जगलो, याचे अनेक किस्से त्या मला सांगत होत्या. माणूस गेल्यावर त्याची किंमत किती अधिक असते, हे पारूबाईच्या हमसून हमसून रडण्यावरून मला दिसत होतं.

‘‘शेवटच्या काळामध्ये रोजच्या कामांमध्ये त्यांना मला वेळ द्यायला जमलं नाही. मी घरी येऊन हातात हात घेतल्याशिवाय म्हाताऱ्यानं जीव सोडला नाही,’’ असं म्हणत पारूबाई अजूनच रडायला लागल्या. आता रोजच्या कामातून कधी दोनशे रुपये, तर कधी तीनशे रुपये मिळतात. त्यातच सून आणि दोन छोटे नातू यांनाही सांभाळायचं असतं. निराधार योजनेचे सहाशे रुपये महिन्याला मिळतात. गेल्या तीन महिन्यांपासून तेही मिळाले नाहीत... असं सारं पुराण पारूआजी मला सांगत होत्या.
दुसऱ्या आजी कोंडाबाई शिंगे. कोंडाबाईचा नवराही याच मार्केटला हेच काम करायचा. गेल्या पंधरा वर्षांपासून तो पिचलेल्या हाडांना घेऊन अंथरुणावर पडलेला आहे. काशीबाई, शशीबाई आणि लीलाबाई या तिघीही कोंडाबाईच्या मुली. एकीचा नवरा सोडून गेला, एकीचा नवरा दारू पिऊन मृत्युमुखी पडला, तर तिसरीचा गटार साफ करताना महापालिकेच्या कामावर असताना गेला. कोंडाबाईला एक मुलगा होता, तोही हातगाडा वाहायचं काम करायचा. कामाचा थकवा काढण्यासाठी रात्रीला थोडी थोडी दारू प्यायचा. असं करताकरता त्याला दारूचं व्यसन जडलं आणि तोही एक दिवस गेला. ‘‘माझा नवरा दारू पिऊन मेला असं म्हणत, मुलाची बायको आणि मुलं त्याच्या शेवटच्या दर्शनालाही आले नाहीत,’’ असं म्हणत कोंडाबाईंनी डोळ्यांत साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली. आजींचं रडणं ऐकून एका दुचाकीस्वारानं गाडी रस्त्याच्या बाजूला लावून आमच्याकडे पावलं टाकली. माझ्या बाजूला येऊन म्हणाला : ‘‘काय झालं?’’ आजी म्हणाल्या : ‘‘काही नाही मालक, या मालकाशी बोलताना जरा डोळे भरून आले.’’ माझी ओळख दिल्यावर त्या व्यक्तीनंही आपली ओळख दिली. देवीदास चेळेकर असं त्यांचं नाव. माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ते शहरात गरीब असलेल्या लोकांना मदत करतात. ‘‘निराधार योजनेमधून आम्हा दोन्ही म्हाताऱ्यांचं नाव याच मालकानं नोंदवलं,’’ असं त्या दोन्ही आजी देवीदास यांच्याकडे बघून मला सांगत होत्या.

आम्ही एकाला दोन झालो आणि आजींचा आवाजही तसाच वाढत होता. रस्त्यावरून येणारे-जाणारे आश्‍चर्यानं आमच्याकडे पाहत होते. काही वेळात कोंडाबाईंच्या तिन्ही मुली तिथं आल्या. आपली आई रडताना पाहून त्यांनाही आश्रू आवरले नाहीत. त्या पाचही महिला रडत होत्या आणि आम्हा पुरुषांचे डोळे मात्र फक्त त्यांच्याकडे पाहण्याचं काम करत होते.

मी मध्येच म्हणालो : ‘‘कपाळावर टिकली का?’’ आजी म्हणाल्या : ‘‘आजकालच्या कुंकवामध्ये खूप मसाला मिसळलेला असतो; त्यामुळं कपाळावर खाज सुटते. त्यामुळं टिकली परवडली.’’ बोलताना कपाळावरची टिकली काढत तिला आलेला घाम पुसत कोंडाबाई आपलं बोलणं पुढं नेत होत्या. टिकली काढल्याकाढल्या मला टिकलीखालचं गोंदण दिसलं. मी विचारलं : ‘‘हे गोंदण काय आहे?’’ त्या म्हणाल्या : ‘‘आईनं तुळस काढली आहे. मेल्यावर ती तुळसच सोबत येते, असं आई म्हणायची.’’

मी कर्म-धर्म मानत नाही; तरीही दोन्ही आजींचं गोंदण पाहून मला कर्मानं गोंदलेलं हेच नशीब असेल काय? गरिबी काय लिखितच असते काय?... असे प्रश्न पडले. या दोन आजींचं धाडस पाहून माझ्या मनात खूप प्रश्न पडले होते. निराश, निरुत्साही आणि सतत नकारात्मक आयुष्याचा सूर काढणाऱ्यांनी या दोन्ही आजींना एकदा सोलापुरात जाऊन भेटायला पाहिजे. आजींना काहीतरी देण्याएवढा मी श्रीमंत नव्हतोच. तरीही खिशात हात गेलाच. मी ‘निघालो’ म्हणाल्यावर दोघी आजींनी मला जवळ घेतलं. माझ्या गालावरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडली. माझ्या कानात दोन आवाज घुमत होते- एक त्यांनी सांगितलेल्या गरिबीच्या करुण कहाणीचा आणि दुसरा माझ्यावर मायेचा हात फिरवत मोडलेल्या बोटांचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com