‘ती’ सोडत नाही... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

व्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांशी माझा संवाद सुरू असताना अनेक प्रश्‍न पडत होते...व्यसन माणसाला किती घट्ट पकडतं याची अनेक उदाहरणं मी या केंद्रात पाहिली. अनेकांना भेटलो. अनेकांशी बोललो. प्रत्येकाची कहाणी चित्रपटात शोभावी अशी...

त्या दिवशी लातूरमध्ये होतो. सकाळी सहा वाजता रामेश्‍वर धुमाळ यांचा फोन आला : ‘झाला नाहीत का तयार अजून...? काय करूलालाव सर, काय बोलूचालाव सर...? आपल्याला निघायचं आहे.’
धुमाळ आपल्या लातुरी स्टाईलनं माझ्याशी बोलत होते. लातूरमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं काही सामाजिक व्यक्तींना आम्ही भेटणार होतो. धुमाळ म्हणजे उत्साही व्यक्तिमत्त्व. पुढच्या तासाभरात आम्ही भेटलो आणि जिथं जायचं ठरलं होतं तिकडे निघालो. जुन्या एमआयडीसीत एका बाजूला एक भली मोठी रांग लागली होती. या रांगेत असणारे आणि रांगेत असणाऱ्यांना भेटणारे लोक दीन-दुःखी, रडवेले दिसत होते. काहीजणांच्या चेहऱ्यावर कणव होती, माया होती.
नाना तऱ्हेची रूपं असणारी ही रांग होती.
‘‘ही रांग कशाची आहे?’’ सूरज पाटील आणि हर्षल भदाणे या दोन सहकाऱ्यांनी धुमाळ यांना विचारलं.
धुमाळ म्हणाले : ‘‘बाजूला व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि अनेक व्यसनांनी ग्रस्त असणारे राज्यभरातले लोक इथं असतात.
या लोकांना नातलगांनी भेटण्यासाठीचा आठवड्यातला एक दिवस ठरलेला असतो. आज तो दिवस आहे. त्यामुळे ही रांग लागलेली आहे.’’
एक रांग होती नातेवाइकांची आणि एक रांग होती ‘आम्हाला प्रवेश द्या’ अशी विनंती करणाऱ्यांची. बाजूला गाडी लावून आम्ही चौघंही त्या दृश्‍याकडे पाहत होतो. माणसं व्यसनात बुडून चांगल्या आयुष्याला का मुकतात? त्रास का करून घेतात? असे अनेक प्रश्‍न ती रांग पाहून मनात येत होते.

डोळ्यांभोवती काळजीची काळी वर्तुळं, चिंताग्रस्त मन, तोंडावरून अलगद फिरणारा लहान मुलांचा स्पर्श...असं सारं चित्र व्याकुळ करत होतं. धुमाळांनी दरवाजा उघडून आम्हाला आत नेलं.
‘तेरे नाम’मध्ये सलमान खान वठवत असलेल्या पात्राला वेड लागल्यावर जसं एका ठिकाणी ठेवतात, तसंच इथं आतलं चित्र होतं. खूप शहाणी, सज्जन, बुद्धिमान माणसं; पण व्यसनापायी जग त्यांना वेगळं दिसत होतं. काय करावं, कसं जगावं, यातून बाहेर कसं पडावं हे त्यांना सुचत नव्हतं. भेटायला आलेल्या आपल्या लहान मुलांना छातीशी लावून रडणारे ते डोळे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण करत होते.
आम्ही आत गेलो. हे व्यसनमुक्ती केंद्र आहे ‘जीवनरेखा प्रतिष्ठान’चं. त्याचे प्रमुख आहेत विजयकुमार यादव (९३७२३४६४७६). यादवसर आणि धुमाळ यांची चांगली ओळख आहे. धुमाळ यांनी आम्हा सर्वांची यादवसरांशी ओळख करून दिली.

यादवसरांनी सुरवातीपासून ते आतापर्यंतचा सगळा प्रवास आमच्याशी बोलताना उलगडला. कुठल्याही पुरस्कार-सन्मानाशिवाय ते हे जे काम करत आहेत त्या कामाचं मोल नक्कीच खूप मोठं आहे.
हजारो लोकांना व्यसनाच्या खाईतून सुखरूपपणे परत आणण्यात यादवसरांना यश आलं आहे. आपल्या एका नातेवाइकाचा धुळीला मिळालेला संसार आणि गेलेला जीव, त्याला कारण असलेलं व्यसन...यातूनच यादवसरांना व्यसनमुक्ती केंद्र काढावंसं वाटलं. व्यसनग्रस्त माणसं व्यसनमुक्त करावीत असं त्यांना तीव्रतेनं वाटू लागलं आणि इथं हे काम सुरू झालं.

यादवसरांनी या कामात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं आहे. सकाळी आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत ते या व्यसनग्रस्त लोकांची सेवा टीममधल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं करतात. एखाद्या व्यक्तीची परिस्थिती, त्याला जडलेलं व्यसन या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन यादवसर त्यांना आपल्या केंद्रात प्रवेश देतात. ठरवून दिलेल्या कालावधीत ठीक होऊन लोक आपापल्या घरी परतात.
व्यसनमुक्त मंडळींनी तिथल्या नोंदवहीत लिहिलेल्या भावना वाचून मी भारावून गेलो.
अनेक रुग्ण इथं मोफत राहतात. त्यांच्या खाण्याची, औषधपाण्याची व्यवस्था केंद्रातर्फे केली जाते, असं मला कळलं. यादव यांनी अनेक किस्से सांगितले. वरच्या मजल्यावरच्या कार्यालयातून आम्ही खाली आलो. जेवणाची खूप मोठी पंगत बसली होती.
यादव सर म्हणाले : ‘‘आपण थोडं थोडं जेवू या.’’
आम्ही जेवायला बसलो. गरमागरम पदार्थांचं ताट समोर आलं.
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे।
जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।
कुणीतरी जोरात श्लो‍क म्हणायला सुरवात केली...

ताटातली भाकरी, वांग्याची भाजी, कांदा-मेथीची भाजी, भरीत, ठेचा, दही हे सगळं बघून माझं काही श्‍लोक म्हणण्यात मन लागेना. श्लोक एकदाचा संपला आणि मी ताटावर तुटून पडलो. ताटातलं संपल्यावर लक्षात आलं की आता कुठं शेजारच्यांचं जेवण सुरू झालं आहे.
‘‘मला चार-पाच लोकांशी बोलायचं आहे,’’ असं मी यादवसरांना म्हणालो.
यादवसर तयार झाले. एका खोलीत त्यांनी एकेकाला बोलावलं.
***

पाथर्डी (जिल्हा : नगर) इथला सुरेश पाचपुते आपली दारू सुटावी म्हणून इथं अनेक महिन्यांपासून उपचार घेत आहे. सुरेश ३४ वर्षांचा आहे. १२ वर्षांपूर्वी मित्रांसोबत ता. ३१ डिसेंबरला सुरेशनं एंजॉयमेंट म्हणून दारूचा ग्लास पहिल्यांदा ओठांना लावला. तेव्हापासून ते आतापर्यंत त्या एका ग्लासनं सुरेशचा सत्यानाश केला आहे.
‘‘२४ तास पोटात दारू नसेल तर पोटात सुरा खुपसून घ्यावासा वाटतो. घरची ७० एकर जमीन आहे, वडील वकील आहेत, घरी नोकर-चाकर आहेत. वडिलांचा सगळा सज्ज असा ‘सेटअप’ आहे. मला काही करायची गरज नाही; पण या व्यसनानं मला इतकं जखडून ठेवलं आहे की काय करावं हेच मला सुचत नाही. दारूमुळे चुकीचं घडतंय, वाईट होतंय, सत्यानाश होतोय हे मला कळतंय; पण त्यातून बाहेर पडायचं कसं?’’ आपली समस्या सांगताना सुरेश रडवेला झाला.
बाहेर सुरेशची पत्नी मुलींसह त्याला भेटायला आली होती.
‘‘बाहेर तुम्ही ज्यांच्याशी बोलत होतात, खेळत होतात त्या दोन मुली तुमच्याच का?’’ असं विचारल्यावर सुरेशच्या भावनांचा बांध फुटला. तो सांगू लागला : ‘‘या दोन्ही मुलींना माझ्या अंगावर झोपल्याशिवाय झोप लागत नाही. मी मातीत कितीही मळलेला असेन, दारूच्या नशेत असेन तरीही मुली माझ्या अंगाला येऊन चिकटतात.
मी इकडं दाखल झाल्यानंतर तिकडं सुरवातीचा एक महिना मुली जेवत नव्हत्या, असं मला बायकोनं सांगितलं. मग त्या दर आठवड्याला मला भेटायला येऊ लागल्या. तिकडं गेलं की मुली पुन्हा रडतात...मग पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणं आणि पुन्हा रडणं...’’
***

दुसरा कोल्हापूरचा सचिन माळी.
तो सांगू लागला :‘‘सातवीत असतानाच मित्रांसोबत दारू प्यायची सवय मला जडली. घरी सोन्या-चांदीचं दुकान, मोठं ऐश्‍वर्य. सगळ्या सुखसोई; पण माझ्या व्यसनामुळे सगळं घर विचलित झालं. दहावीला नापास झालो आणि वडिलांचा व्यवसाय करायचा म्हणून दुकानात बसू लागलो. व्यवसायाचं नव्हे तर, डोक्‍यात सतत एकच चक्र फिरायचं... दारू केव्हा मिळेल? दारू पिणारे, विकणारे मित्र, चोरून दारू पुरवणारे मित्र अशा सगळ्यांची एक गॅंग तयार झाली आणि ‘आपलं आयुष्य यांच्यासाठीच आहे’ अशा आविर्भावात मी जगू लागलो. आयुष्याचा एकच उद्देश व तो म्हणजे दारू, गांजा, गुटखा हे आपल्या पोटात सतत असणं! मला सांगून-समजावून निराश झालेल्या माझ्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा मला सगळ्यात मोठा धक्का बसला. काय करावं ते सुचेना. मी व्यसनाच्या इतका आहारी गेलो की व्यसनाशिवाय दुसरा कुठलाच विचार मनात नसायचा. वडिलांचा व्यवसाय बंद पडला. आई सतत आजारी पडू लागली. माझ्या व्यसनाला कंटाळलेली बायको सहा वर्षांच्या मुलीला आमच्याकडंच ठेवून घर सोडून निघून गेली. मी अनेकदा आईच्या डोळ्यांत माझ्या काळजीनं तिचा मृत्यू पाहिला होता. मला आईला गमवायचं नव्हतं, म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून इथं येऊन गांभीर्यानं उपचार घेत आहे. मला माझं शरीर साथ देत नाहीय; पण मनाची खंबीर तयारी असल्यानं अनेक वेळा मनापुढं शरीराला माघार घ्यावी लागते.’’
निराश झालेल्या सचिनच्या हातावर मी हात ठेवला. त्याचे काळजीत बुडालेले डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते.
***

यानंतर मी भेटलो संगम जोशी याला.
संगम जोशी हा पुण्यातल्या शिवाजीनगरचा. त्याची कहाणी मन हेलावून टाकणारी होती.
संगमनं सांगितल्यानुसार, तिघे भाऊ सोबत बसूनच दारू प्यायचे. संगम हा धाकटा. दोन्ही भाऊ दारूमुळे अनेक आजार होऊन मृत्युमुखी पडले. एकत्रित बसून दारू प्यायची सवय त्यांना वडिलांनीच लावलेली होती. त्यात पहिला बळी गेला तो वडिलांचा. घरात आई कॅन्सरच्या आजारानं त्रस्त आहे. संगमच्या दोन्ही भावांच्या बायका आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेल्या आणि त्यांनी दुसरं लग्नही केलं. संगमची बायकोही त्याला सोडून गेली. संगमला १० वर्षांची मुलगी आहे. विकून विकून थोडीशी राहिलेली संपत्ती त्यानं मुलीच्या नावावर केली आणि व्यसनमुक्त होण्यासाठी विजयकुमार यादव यांच्या या केंद्रात तो दाखल झाला. दुसरं लग्न करून संसार थाटावा असा विचार संगमच्या मनात गेल्या तीन वर्षांपासून येत आहे. मात्र, त्याला कुणी मुलगी देत नाही. आपल्या मुलीसाठी, आईसाठी संगमनं अखेरचा निर्णय म्हणून लातूरचं हे व्यसनमुक्ती केंद्र गाठलं. तिथलं वेळापत्रक आणि नियमावली यामुळे संगमचं व्यसन बऱ्यापैकी सुटलं आहे. मात्र, हाता-पायांना थरथरी भरते. एकीकडे दारूची बाटलीही त्याच्या डोळ्यासमोर येते; तर दुसरीकडे आपल्या लहान मुलीचा आणि आईचा चेहरा दिसतो. गेल्या तीन महिन्यांत आपण आईला आणि मुलीला प्राधान्य दिल्याचं तो सांगतो.
***

उस्मानाबादच्या माकणी इथला सतीश लोखंडे म्हणाला : ‘‘भावानं माझ्याही शेतावर कब्जा केला. भांडणं वाढत राहिली. भाऊ कुणाचं ऐकेना. आपलं पद गेलं, प्रतिष्ठा गेली...घरात सतत बायकोची किरकिर या सगळ्यामुळे वयाच्या पंचेचाळिशीनंतर मी दारू प्यायला सुरवात केली. ‘दारू प्यायल्यावर सगळं टेन्शन दूर होईल’ असं मित्रांनी सांगितलं आणि तेच मनात घेऊन मी दारू प्यायला सुरवात केली. दारू प्यायल्यानं काही काळासाठी टेन्शन दूर होतं; मात्र आपल्या हातून नशेत जे घडतं ते भरून निघण्यासारखं नसतं. मुलाचं, मुलीचं लग्नं कसं झालं, नातवंडं कशी मोठी झाली हे दारूच्या नशेत, भावाच्या तिरस्कारात कधीच कळलं नाही. गावातल्या ज्या मंदिरातल्या देवावर माझी श्रद्धा होती, त्या मंदिरातल्या देवाच्या पायावर डोकं ठेवून दारू सोडण्याची शपथही मी घेतली. मी ‘ती’ला सोडायचा प्रयत्न अनेक वेळा केला; पण ‘ती’चं नसणं माझ्या हाता-पायांना, माझ्या शरीराला मंजूर नव्हतं. ‘ती’ मला सोडायला तयार नव्हती. आता इथं येऊन दोन महिने झाले आहेत. मी उभं राहायचा प्रयत्न करत आहे, यशही मिळत आहे.’’
***

या लोकांशी माझा संवाद सुरू असताना अनेक प्रश्‍न पडत होते... व्यसन माणसाला किती घट्ट पकडतं याची अनेक उदाहरणं मी या केंद्रात पाहिली. अनेकांना भेटलो. अनेकांशी बोललो. प्रत्येकाची कहाणी चित्रपटात शोभावी अशी.
कुणी एंजॉयमेंट म्हणून सुरवात करतं, कुणी मित्राच्या आग्रहास्तव सुरवात करतं...प्रत्येकाची वेगवेगळी कारणं. व्यसनातून बाहेर पडण्यात या मंडळींना यश किती मिळालंय हे काही काळानंतर कळेल; पण त्या दिशेनं सुरवात मात्र इथल्या प्रत्येकानं केली आहे.
दारू पिणं चुकीचं आहे, तिचे दुष्परिणाम होतात, कदाचित त्यातच अंतही होऊ शकतो...हे सगळं कळत असूनही ही मंडळी व्यसनाकडं ओढली जातातच. मग ‘ती’ त्यांना काही केल्या सोडतच नाही, अशी एक वेळ येते. ही वेळ येऊ द्यायची नसेल तर ‘ती’च्या अर्थात दारूच्या आसपासही फिरकायचं नाही, असा निश्चयच करायला हवा.
मात्र, तरीही जे या फेऱ्यात दुर्दैवानं अडकलेले आहेत आणि व्यसनातून बाहेर पडायची ज्यांची तीव्र इच्छा आहे अशांसाठी विजयकुमार यादव यांच्यासारखा पासवर्ड आहेच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com