दोन ध्रुव (संगीता शेंडे-कदम)

sangita shende
sangita shende

मी विचार करू लागले...किती दुर्दैवी ही मुलं, ज्यांना एकही भावंड नाही खेळायला, भांडायला, प्रेम करायला, आपला आनंद-दुःख वाटून घ्यायला, रुसायला. आई-बापांनंतर या विशाल जगात त्यांचं स्वतःचं असं रक्ताच्या नात्याचं एकही माणूस नसणार. माझं हृदय खंतावलं.

पूजा आटोपून मी घड्याळाकडे नजर टाकली. सकाळचे नऊ वाजून गेले होते.
‘‘चला, आटोपायला हवं... दहा वाजता लेडीज्‌ मीटिंगला जायचंय
अन्‌ ही कुसुम आजही आली नाही कामाला. भैया...भैया, जरा बोलावून आण तिला,’’ मी म्हणाले.
मी आवरून आले तर कुसुम कडेवर तान्हीला घेऊन उभी होती.
‘‘मॅडम, माझ्या बाळीला बघाया कुनी न्हाई. मी काम सोडतीया.’’
‘‘छान...! सारख्या सुट्या घेतेस तरीही मी तुला काढलं नाही आणि आता उलट तूच काम सोडतेस?’’ मी रागानं म्हटलं.
‘‘आवं, नवऱ्यानं भांडान काहाढून मला मारहान केली. शिव्या बी दिल्या आन्‌ वरनं दिराकडं राहायला गेलाया. सासू बी त्येच्यासंगट गेलीया. झालं आता त्येला बी आठ दिस. म्या आज तुम्हाला बैजवार सांगतीया. आता ही तीन पोरं कुनाच्या भरोशावर सोडू? या ल्हानीला बघायाला कोन नाय वं, मधव्या पोराचा पाय सायकलमंदी अडकून कापला गेलाया. त्ये बी पडलंय एक्या जागेवर. मंग तुमीच सांगा, कशी यिऊ कामावर?’’
‘‘अगं, पण काम नाही करणार तर खाणार काय?’’
‘‘गेलं दोन म्हैनं नवरा आजारी हाय म्हून घरीच पडून व्हता. म्हन्लं, ‘काम म्या करते. तू फकस्त लेकरांवर नदर ठेव.’ तर त्ये बी न्हाई करत. दारू पिऊन तंडत बसायचा. सासू बी चिथवायची त्याला. माझी आय आली तं तिला बी दिली हाकलून. मी बी कावून म्हन्लं, ‘माझं मी बगते.’ ’’
‘‘अगं, पण कशी बघणार? काम सोडून? अन्‌ खायला काय घालणार त्यांना? तुझ्या नवऱ्याची जबाबदारी आहे पोरांकडे बघण्याची. परत बोलावून घे त्याला.’’
‘‘आवं, त्याला काय बी फरक पडत न्हाई. चूक नसतानी माफी बी मागितली म्या; पर त्येला लोढनं नगं हाय आमचं.’’
मला तिची कीव आली अन्‌ आठवलं...मधलं पोर वर्षाचं होतंय तोच तिसऱ्यांदा गरोदर राहिली ती.
‘‘तीन मुलांना जन्माला घालण्याअगोदर कळल नाही का तुला हे! एक-दोननं पुरे होत नाही तुम्हाला. तीन-चार मुलं पाहिजेत. घरदार नाही. कामधंद्याचा भरोसा नाही. वरून नवरा दारुडा. अगं, तुम्ही मुलांचं संगोपन करू शकत नसाल तर कशाला वाढवता हा व्याप?’’ मी सात्त्विक संतापानं ऐकवलंच.
काय म्हणावं या मानसिकतेला? हिची एकटीची नाही तर अशा आर्थिक स्तरातल्या अनेकांची हीच कथा आहे.
‘‘आवं, सासू म्हन्ली, मी संभळीन म्हून मंग व्हऊं दिलं तिसरं बी पोर!’’
‘‘आता बघ, तुझ्या नवऱ्याला घेऊन गेली ती तिच्याबरोबर अन्‌ तू एकटीच या जबाबदारीचं ओझं ओढत बस...’’ मी त्राग्यानं म्हटलं. आणि ‘दुसरी कुणीतरी मला कामाला शोधून दे’ असं तिला सांगून मी माझ्या आवराआवरीला लागले.
***

‘‘गुड मॉर्निंग, मिसेस महाजन’’ सीतारानं हसत हसत अभिवादन केलं.
‘‘हाय सितारा, कशी आहेस?’’ मी प्रतिसाद दिला.
इतक्‍यात नेहा अन्‌ प्रियांका याही आल्या. अनघा-रीता होत्याच हजर.
‘‘यार, आय हॅड टू गेट अप अर्ली ड्यू टू धिस मीटिंग’’ तक्रार करत प्रियांका म्हणाली.
‘‘मी टू. आय गेट अप ॲट इलेवन’’ सीतारानं दुजोरा दिला.
‘‘हाऊ आर युवर ट्विन डॉगीज्‌?’’ अनघानं तिला तिच्या कुत्र्यांविषयी काळजीनं विचारलं!
‘‘रॉजर हॅज अपसेट स्टमक बट ही इज फाईन नाऊ, यू नो. गोलूने तो फूड को टच ही नही किया यार,’’ सीतारानं कौतुकानं सांगितलं आणि ‘‘आय फेल्ट सो बॅड...माय पुअर बेबीज् आर स्टार्व्हिंग,’’ अशी चिंताही व्यक्त केली!
‘‘अरे, कुत्ते पालना ठीक है अपनी जगह...लेकिन खुद के बच्चे के बारे में भी सोचेगी या नही?’’ मी विचारलं.
लग्नाला सहा वर्षं होऊनही मूल जन्माला घालण्याचा सिताराचा विचार नव्हता.
‘‘आय जस्ट हेट बेबीज्...बडा झमेला होता है,’’ सीतारानं म्हटलं.
‘‘राईट! रोते रहते है! अँड सच अ रिस्पॉन्सिबिलिटी इट इज!’’ विनीतानंही दुजोरा दिला. तिला एकच मुलगी होती तरी ती नेहमीच त्रासलेली असे तिचं करता करता. ‘शुचिताचा होमवर्क करायचाय... तिला पीकअप करायचंय...डॉक्टरांकडे न्यायचंय...’ वगैरे
‘‘मिसेस महाजन, तुमची तर दोन्ही मुलं मोठी आहेत. कसं करता इतकं सगळं? लिहिताही, पेंटिंगही करता, जॉबही करताय शाळेत...’’ तिनं अचंब्यानं विचारलं.
‘‘केल्यावर सगळं होतं. फक्त इच्छा हवी,’’ मी म्हटलं.
‘‘अगं, तू संक्रान्तीचा वाण-वसा केलास का नाही?’’ मी प्रियांकाला विचारलं.
‘‘मी तसलं काही करत नाही...रीतेशलाही नाही आवडत ते जुनाट
रीती-रिवाज.’’
‘‘अगं, त्याला पुरणपोळी तर आवडत असेलच की...ती तरी केलीस का?’’
‘‘नाही बाई, कोण करणार? किती तो पसारा असतो. मी सरळ काकूकडे जाते खायला. चिंचवडला. ती करते पुरणपोळी’’ हे सांगताना प्रियांकाच्या चेहऱ्यावर कसलीही खंत नव्हती.
‘‘अगं, पण किती दिवस? पुढं तुझ्या मुलांना कोण घालणार करून?’’
‘‘म्हणूनच तर मी अजूनही मूल होऊ दिलेलं नाही!’’ ती मोठ्या अभिमानानं म्हणाली!
तिच्या बुद्धीची कीव येऊन मी म्हटलं : ‘‘अगं, आपली संस्कृती,
सण-वार आपण जपायला-जोपासायला नकोत का?’’
तिनं नाक उडवत माझ्या म्हणण्याकडं दुर्लक्ष केलं.
माझे कळकळीचे बोल तिला निरर्थक वाटले.
‘‘हाय गर्ल्स’’ आरोहीनं प्रवेश केला. हीसुद्धा एक नमुनाच होती! सदान्‌कदा ऑनलाईन ऑर्डर देत राही काहीबाही.
‘‘हाऊ वॉज युवर ॲनिव्हर्सरी, बेब?’’ साऱ्यांनी रहस्य विचारावं तसं तिला विचारलं.
‘‘इट वॉज जस्ट फॅंटॅस्टिक...यू नो, आय फायनली गॉड दॅट नेकपीस वीच आय वॉज आईंग सो लाँग...’’ काहीतरी जिंकल्याच्या आविर्भावात ती म्हणाली : ‘‘यार, मयंकनं अठरा हजारांचा इअर फोन घेऊन दिला मला. अगोदरचाही भारी कंपनीचाच होता. तो माझ्याकडून हरवला नं. बट ही वॉज कूल. एक डिझायनर साडी आणि दॅट इलिगंट नेकपीस अँड ऑफकोर्स बडे होटल में कॅंडल लाईट डिनर.’’ ती खिदळली.
‘‘हाऊ रोमॅंटिक,’’ सगळ्या जणी सुस्कारल्या.
मी त्यांचा संवाद ऐकत होते.
मनात म्हटलं, ‘म्हणजे नवऱ्याला चांगलंच खर्चात पाडलं हिनं.’
‘‘यार, आजकल हबीज् बहोत लेट आने लगे है लंच के लिए.’’
‘‘येस. आय कान्ट टॉलरेट हंगर. स्वैपाकाला येणारी बाई स्वैपाक तयार करते. मी जेवून घेते. यायचं तेव्हा येऊ दे,’’ अनघा.
‘‘अगं, मग तो आल्यावर जेवायला तरी वाढतेस ना त्याला?’’ मी विचारलं.
‘‘नाही, त्याचा तोच घेऊन खातो. टेबलवर सगळं ठेवलेलं असतं. लग्नाअगोदरही असाच खात होता ना?’’ ती म्हणाली.
‘‘अगं, पण लग्न झाल्यावर बायकोचं काम नाही का काळजीनं जेवायला घालायचं?’’ मी विचारलं.
‘‘बच्चा नाहीय तो अन्‌ मी नाही बाई आदर्श भारतीय पत्नी तुमच्यासारखी!’’ ती मोठ्या तोऱ्यानं म्हणाली.
काय या आजच्या पोरी? नवरा राबराबून पैसे कमावतो अन्‌ या दोन वेळचं जेवणही प्रेमानं खायला घालत नाहीत त्याला. उलट शॉपिंग, पार्टीज्‌, हॉटेल यांवरच त्याचा पैसा उधळतात.
‘‘माझा नवरा तर गेले दोन महिने एमटेकच्या एन्ट्रन्सची तयारी करतोय, यार. नो आऊटिंग सिन्स. हाऊ बोअरिंग! आय कन्ट टेक इट एनी मोर.’’ नेहानं म्हटलं.
‘‘यार, एके ठिकाणी एक्झिबिशन लागलं आहे. आपण सगळ्या मिळून जाऊ या. लेट अस हॅव फन,’’ अनघा म्हणाली.
‘‘येस...लेट अस‌ डू इट’’ सीताराला टाळी देत नेहा म्हणाली.
हे सगळं ऐकून मी उठलेच तिथून उद्वेगानं.
***

‘‘मिसेस रामन, कशी आहे तुमची मुलगी?’’ मी विचारलं.
‘‘मस्त! सेटल झालीय छानपैकी होस्टेलमध्ये,’’ रामन म्हणाल्या.
त्यांच्या मुलीला मेडिकलला ॲडमिशन मिळालं होतं, तर मिसेस मायराची मुलगी होस्टेलवर लॉ करायला गेली होती. दोघींना एकेकच मुलगी होती.
‘‘एकटं एकटं वाटेत असेल नाही, तुम्हाला?’’ मी विचारलं.
‘‘नॉट रिअली. टूक अ साय ऑफ रिलिफ नाऊ!’’ मायरा म्हणाली.
काय या आजच्या आया! माझ्या मनात आलं. बहुतेक जणींना एकेकच अपत्य. दहावीपर्यंत यांची भिस्त घरातल्या नोकरचाकरांवरच. नंतर होस्टेलवर रवानगी झाली अपत्यांची की या मोकळ्या आपले छंद पूर्ण करायला.
मी विचार करू लागले...किती दुर्दैवी ही मुलं, ज्यांना एकही भावंड नाही खेळायला, भांडायला, प्रेम करायला. आपला आनंद-दुःख वाटून घ्यायला, रुसायला. आई-बापांनंतर या विशाल जगात त्यांचं स्वतःचं असं रक्ताच्या नात्याचं एकही माणूस नसणार. माझं हृदय खंतावलं.
या उच्चभ्रू, उच्चशिक्षित आई-बापांच्या मात्र हे गावीही नसतं. आपल्या मुलाला एक भावंड असावं असं यांना वाटतच नसावं का? त्यांना एक निकोप आनंदी जीवन देण्यात ते अपयशी ठरतात...मला आपलं वाटून गेलं.
ही एकुलती एक मुलं पुढं एकलकोंडी, अप्पलपोटी, निराशाग्रस्त होत नसतील तर नवल. या देशाचं भविष्य म्हणून कसली पिढी घडतेय ही?
आधुनिकतेच्या नावाखाली हे काय चाललंय? उच्चभ्रू समाजातल्या महिला आपल्या ऐषारामी जीवनासाठी तडजोड करायला तयार नाहीत. एक कौटुंबिक, सामाजिक जबाबदारी त्या झुगारून देत आहेत. हाय-फाय पार्ट्या, कपडेलत्ते, ज्वेलरी, देश-विदेशात फिरणं अशी जीवनशैली जगण्यात त्या धन्यता मानत आहेत... एक दिखाऊ, खोटं जीवन जगत आहेत...ज्यात साफल्य नाही, समाधान नाही. माझ्या मनात विशाद दाटून आला.
कुसुमसारखी अडाणी स्त्री तीन मुलांना जन्म देते. त्यांच्यासाठी राबते. आणि प्रतिष्ठा, संपन्नता असलेल्या या सुशिक्षित (की अर्धशिक्षित म्हणायचं?) महिला आपल्या व्यक्तिगत सुखासाठी मूलच जन्माला घालू इच्छित नाहीत.
उद्विग्न अवस्थेत मी घरी आले. पाहते तर काय, एका दुपट्यावर तान्हुलीला झोपवून कुसुमनं सगळी कामं आटोपलीही होती.
‘‘तुमचं बराबर हाय मॅडम. म्या काम नाय केलं तं माझ्या पोरान्ला कसं मोठं करणार म्या...?’’ मला बघताच ती म्हणाली.
कुसुम पुन्हा कामाला आली याचा तर मला आनंद झालाच...पण ही अशिक्षित आई आपल्या मुलांचा किती दूरदर्शीपणे विचार करत आहे हा विचार मनात येऊन मला गलबलूनही आलं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com