पात्रतेचा गोल अवघड! (संजय घारपुरे)

sanjay gharpure
sanjay gharpure

विश्वकरंडक पात्रता फुटबॉलची मोहीम भारतासाठी सातत्यानं अवघडच होत आहे. ‘चांगले परदेशी खेळाडू भारतातील व्यावसायिक स्पर्धेत खेळण्यास सुरवात झाल्यावर चित्र बदलेल... भारतीय खेळाडूंची प्रगती होईल... चांगले मार्गदर्शक हे चित्र बदलतील...’ असं जरी सांगितलंगेलं तरी अखेर ती आश्वासनंच राहतात. स्टीफन कॉन्स्टंटाईन मार्गदर्शक असताना विश्वकरंडक पात्रतेपासून भारत वंचित राहिला; पण पात्रता स्पर्धेतील काही सामने शिल्लक असतानाच आशियाई पात्रता निश्चित झाली होती. या वेळचं चित्र आशियाई स्पर्धेतही थेट प्रवेश मिळेल याची हमी देणारं नाही. खेळाडूंना ओळख मिळाली, मानधनात वाढ झाली, चांगले परदेशी मार्गदर्शकही आले; पण मूळचं दुखणं काही संपायला तयार नाही.

ओमानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय फुटबॉल संघ मायदेशात परतला होता. भारतीय खेळाडू पुन्हा आपापल्या आय लीग संघात दाखल झाले होते. याच आयएलएलमधील एका सामन्यास भारतीय मार्गदर्शक इगॉर स्टिमॅच उपस्थित होते. विश्वकरंडक पात्रतेचा प्राथमिक अडथळा भारत पार करणार नाही याच्यावर चर्चा होणं स्वाभाविकच होतं. स्टिमॅच यांचं उत्तर जणू भारतीय फुटबॉलचं नेमकं दुखणं काय हे सांगणारं होतं.

ते म्हणाले होते :‘या आयएसएलमध्ये गोल करणारे भारतीय खेळाडू दाखवा...तुम्ही मला एकाचं तरी नाव सांगू शकता? सुनील छेत्री सोडून तुम्ही कुणाचंही नाव सांगू शकत नाही. एकही प्रमुख भारतीय खेळाडू या स्पर्धेत अव्वल आक्रमक म्हणून खेळत नाही. ते भारतातील स्पर्धेत गोल करू शकत नाहीत, त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल होतील ही अपेक्षा तरी कशी बाळगणार? या खेळाडूंबरोबर मी सामन्यापूर्वी पाच दिवस असतो, त्यातही गोल करण्याच्या संधी जास्त निर्माण होत आहेत. आम्ही केवळ बचाव करत नाही, बिनधास्त खेळत आहोत...’
सुनील छेत्री याची कारकीर्द आता अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या गोलच्या आशा त्याच्यावर असतात, त्याची कोंडी केल्यावर काम साधतं हे प्रतिस्पर्धी जाणून असतात; पण या परिस्थितीत काही वेगळे करण्याची तयारी असावी लागते. मात्र, भारतीय आक्रमणातच भेदकता नाही. विश्वकरंडक स्पर्धेतील पात्रतेच्या पाच सामन्यांत भारतानं तीन गोल केले आहेत. त्यातील ओमानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या गोलनं दिलेली आघाडी सोडल्यास अन्य दोन गोल झाले ते अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध. ते गोल झाले ते भारत हरणारच असं वाटत असताना. याचाच अर्थ सुरवातीचा गोल सोडल्यास भारतानं कधीही प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणलं नाही.

भारताच्या गटात आशियाई विजेते कतार आणि भारतापेक्षा २२ क्रमांकानी सरस असलेले ओमान हे देश आहेत. त्यांच्याविरुद्ध तीन लढती झाल्या. कतारला आपण त्यांच्या देशात गोलशून्य रोखलं, तर ओमानविरुद्ध निसटती हार झाली. मात्र, नेहमीच निकाल कामगिरीचं खरं चित्र दाखवतो असंही नाही. ओमानविरुद्धच्या परतीच्या लढतीतील ०-१ पराभव याबाबत कौतुक नक्कीच करायला नको. भारतीय बचावातील चुकांचा फायदा घेतल्यावर ओमाननं स्वतःला फारसं न थकवता भारतीयांकडून सहज चेंडू मिळत होता आणि तो मिळाल्यावर आक्रमण करायची ओमानची योजना होती. त्यातच आपला बचाव भारतीय आक्रमक भेदू शकणार नाहीत याची जणू ओमानला खात्री होती. त्यामुळेच तर चेंडूवर ५१ टक्के वर्चस्व राखल्यावरही भारताला ओमानच्या गोलरक्षकाचा एकदाही पूर्ण कस पाहता आला नाही.
विश्वकरंडक पात्रतेच्या स्पर्धेत आव्हान पणाला लागलेलं असताना एखाद्या संघानं गोलरक्षकाचा एकदाही पूर्णपणे कस न पाहणं धक्कादायक होतं. त्यातही चेंडूवर जास्त वर्चस्व असताना हे घडणं जास्त चिंताजनक आहे. आता संघाचा एखादा दिवस खराब असू शकतो, त्या दिवशी हे असं विपरीत घडू शकतं; पण बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दुबळ्या संघांविरुद्ध कसाबसा एक गोल होत असेल तर ओमानविरुद्ध फार अपेक्षा कशा बाळगणार?

स्टिमॅच हे मार्गदर्शक असताना भारतीयांनी एकूण दहा गोल केले आहेत. त्यातील सात गोल डेड बॉलवर झाले आहेत. डेड बॉल म्हणजे, कॉर्नर किंवा फ्री किक मिळालेली असतानाच हे गोल झाले आहेत. याचाच अर्थ तीन गोल केवळ रचलेलं आक्रमण पूर्ण सत्कारणी लावत झाले आहेत. चेंडू आपल्या ताब्यात जास्तीत जास्त ठेवल्यावर सामन्यावर वर्चस्व ठेवता येतं, गोल करता येतात, या मार्गदर्शक स्टिमॅच यांच्या व्यूहरचनेलाच हे छेद देणारं आहे. स्टिमॅच हे भारताचे मार्गदर्शक असतानाच हे घडलं नाही, तर ते क्रोएशियाचे मार्गदर्शक असतानाही हे घडलं आहे. ते मार्गदर्शक असताना क्रोएशियानं सेट पीसेसवर गोल केले किंवा प्रतिआक्रमण रचताना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त वेगाने चाल करत केले. मात्र, त्यांनी क्वचितच स्वतः रचलेलं आक्रमण सत्कारणी लालं असेल. चेंडूवर कमालीची एकतर्फी हुकमत राखल्यावरही हे त्यांना साध्य झालं नव्हतं. स्टिमॅच हे मार्गदर्शक असताना क्रोएशियानं विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत सुरवातीला यश मिळवलं होतं, तरीही त्यांच्यावर टीका केली जात होती. स्टिमॅच यांनी मार्गदर्शकपदासाठी अर्ज सादर केला. त्यांना मुलाखतीसाठी निमंत्रित केलं, त्या वेळी भारतातील काही फुटबॉलतज्ज्ञ या गोष्टीकडे लक्ष वेधत होते; पण तरीही त्यांची नियुक्ती झाली.

क्रोएशियाच्या आणि भारतीय फुटबॉलपटूंच्या दर्जात कमालीची तफावत आहे. विश्वकरंडक - सतरा वर्षांखालील - स्पर्धेपूर्वी भारताच्या नवोदित फुटबॉलपटूंना आशियाई पात्रतेसारख्या काही स्पर्धा सोडल्यास आंतरराष्ट्रीय लढतींचा अनुभवच नव्हता. आता त्यातून आलेले खेळाडू किती तग धरणार? आता हे विश्वकरंडक - सतरा वर्षांखालील - खेळाडू भारतीय संघात दाखल होत आहेत; पण खडतर आंतरराष्ट्रीय लढतीसाठी तयार होण्यास, संघाची धुरा वाहण्यास त्यांना वेळ लागेल. आता तोपर्यंत स्टिमॅच यांनी सूत्रं स्वीकारल्यापासूनच्या दहापैकी एकच सामना आपण जिंकलो, चार बरोबरीत सोडवले यावर समाधान मानावं लागतं; पण या दहा सामन्यांत मिळून दहाच गोल झाले. भारतानं दोन गोल केवळ दोन सामन्यांत केले, पण त्यातही किमान दोन गोलच्या फरकानं पराजित झालो हे विसरता येत नाही. भारतानं या सामन्यात १८ गोल स्वीकारले आहेत. आशियाई विजेत्या कतारविरुद्धची अविश्वसनीय बरोबरी सोडली तर प्रत्येक लढतीमागं सरासरी दोन गोल स्वीकारले आहेत.

स्टीफन कॉन्स्टंटाईन हे मार्गदर्शक असताना आशिया कपमधील कामगिरीपेक्षा आता कामगिरी उंचावल्याचा स्टिमॅच यांचा दावा आहे. स्टिमॅच त्यांच्या मार्गदर्शनाखालील प्रगती दाखवण्यासाठी देत असलेली आकडेवारी बघा...आशिया कपमध्ये आपले सरासरी पास २४२ होते, तर ते आता ४०० आहेत. पासिंगमधील अचूकता आशिया स्पर्धेत ६७ टक्के होती तर आता ८२ टक्के आहे. लाँग रेंज पास २५ वरून १५ टक्क्यांवर आले आहेत. आपण सामन्यात एक चांगला टेम्पो निर्माण करत आहोत. आपण संयम बाळगला, आपल्याकडील खेळाचा विकास होण्यासाठी प्रतीक्षा केली तर नक्कीच प्रगती होईल, असाही विश्वास ते देतात.

आकडेवारी कशी फसवी असू शकते याचंच हे उदाहरण. भारतीयाचं पासिंग उंचावलं असेलही, पण त्यात प्रभावीपणा किती आला आहे? आता हे प्रतिस्पर्ध्यांची चाल अपयशी ठरल्यावर गोलक्षेत्राच्या जवळपास जाईपर्यंत उंचावलेलं आहे; पण त्यात काही योजना असल्याचं क्वचितच दिसतं. आता ओमानचंच पाहा...त्यांनी मध्यरेषेच्या आसपास भारतीयांकडून चेंडूचा ताबा मिळवण्याचं ठरवलं होतं. आता या परिस्थितीत मध्यरेषेपर्यंत आपल्या पासिंगमध्ये चूक झाली तरच त्याचा फायदा घ्यायचा हा त्यांचा इरादा होता. आता पासिंग सुधारलं; पण फुटबॉलमध्ये स्क्वेअर पासिंग महत्त्वाचं असतं. त्याद्वारेच आक्रमक आणि मध्यरक्षक आक्रमकांसाठी फीडर होतात; पण याचीच उणीव आहे. आता आपल्याच खेळाडूंना कोणत्याही प्रतिस्पर्ध्याचा अडथळा असताना चेंडू अचूक पास करून आकडेवारी वाढत असेल; पण प्रतिस्पर्धी जास्त असताना आपल्याच खेळाडूकडे चेंडू पास करण्याची किंवा सहकारी चेंडू नेमका कुठं मारेल हे ओळखून तिथं चेंडू स्वीकारण्याची अचूकता अजूनही साधलेली नाही, त्यामुळेच तर भारतीयांचा ‘गोलदुष्काळ’ कायम आहे आणि गोल स्वीकारलेच जात आहेत.

भारतीय बचावपटू-मध्यरक्षक, तसेच आक्रमकातील ही पासिंगची उणीव ओमाननंच दाखवली नाही तर बांगलादेश, तसेच अफगाणिस्ताननंही अधोरेखित केली होती. ओमानविरुद्ध गोलसाठी एकही प्रयत्न झाला नाही, ही बाब चिंताजनक आहे, त्याचा विचार करायचा की आपल्यापेक्षा २२ क्रमांकानं सरस असलेल्या ओमानला एकच गोल करू दिला याचं कौतुक करायचं हा प्रश्न आहे. आता
स्टिमॅच हे लाँग पासेसना विरोध करतात; पण या पात्रतेतील केवळ एकाच सामन्यात भारतीय आक्रमक काहीसे प्रभावी दिसले होते ते अफगाणिस्तानविरुद्धच्या उत्तरार्धात. त्या वेळी पासिंगवर, चेंडू राखण्यावर भर देण्याऐवजी थेट वेगवान आक्रमण करण्यावर भर जास्त दिला गेला होता. या यशामुळे ओमानविरुद्ध संघही याच प्रकारचा निवडला गेला; पण पुन्हा एकदा चेंडू जास्तीत जास्त ताब्यात ठेवत हळूहळू आक्रमण करण्याची योजनाच अमलात आणली गेली. आता भारतीयांनी ओमानविरुद्ध लाँग पासेसचा प्रयोग करून पाहिला; पण ओमान आणि अफगाणिस्तान यांच्यात कमालीची तफावत आहे याची जाणीव भारतीयांना झाली.

चेंडूवर कमालीचा ताबा ठेवत, मैदानाचा काही भाग पार करत आक्रमण करण्याची पद्धत अनेक युरोपीय देश वापरतात आणि यशस्वीही होतात; पण त्यासाठी उच्च दर्जाचे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. आता सुनील छेत्री भारतीय फुटबॉलचा चेहरा आहे. तोच मैदानात कुठं आहे हे शोधावं लागत असेल तर व्यूहरचनाच चुकत आहे असंच म्हणावे लागेल. अर्थात स्टिमॅच यांचं गणित भक्कम बचावावर अवलंबून आहे. मात्र, बचावपटूंच्या दुखापतींचं सत्र गेल्या काही महिन्यांपासून थांबलेलं नाही. भारतातील क्लबही युरोपातील क्लबप्रमाणे आपले खेळाडू लवकर सोडण्यास तयार नसतात. आता ही पीछेहाट सुरू राहिली तर आशियापात्रताही स्वप्नवत्‌ ठरेल. ते भारतातील फुटबॉल क्लबनाही नको असेल. कित्येक महिने हाताशी असताना आंतरराष्ट्रीय लढतीचे योग्य प्रकारे नियोजन होत नसेल, तर ती नक्कीच चिंतेची बाब आहे.
भारतीय फुटबॉल हा ‘स्लिपिग जायंट’ आहे असं काही वर्षापूर्वी म्हटलं जात होतं. तो आता जागा होत आहे असं भारतीय फुटबॉलचे पदाधिकारी अनेक कार्यक्रमांत सांगतात. प्रत्यक्षात तो जागा होत असल्याचा भास तर होत नाही ना, असंच विचारायला हवं.
***
आशियाई पात्रताही आता अवघड
विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत पहिल्या पाच सामन्यांत एकही विजय न मिळवलेल्या भारतासाठी विश्वकरंडक पात्रतेच्या आशा आता जवळपास संपल्याच आहेत. आता तर आशियाई पात्रताही अवघड आहे. भारत सध्या गटात तीन गुणांसह चौथा आहे. कतार तेरा गुणांसह अव्वल आहे, तर ओमान १२ गुणांसह दुसरा. अफगाणिस्तानचे चार गुण आहेत, तर बांगलादेशचा एक गुण. खेळातील अनिश्चितता कितीही लक्षात घेतली तरी भारताला नक्कीच कतारला मागं टाकता येणार नाही. अगदी तीन सामन्यांत तीनही गुण मिळवले आणि ओमाननं आगामी तिन्ही लढती गमावल्या तरच भारत आणि ओमानचे गुण समान होतील. आता आशियाई विजेत्या कतारविरुद्धची मायदेशातील लढत शिल्लक आहे. त्यांच्याविरुद्ध विजय जवळपास अशक्य आहे. या परिस्थितीत अफगाणिस्तानला मायदेशात आणि बांगलादेशला त्यांच्या भूमीत हरवून गटात तिसरं स्थान मिळवून आशियाई पात्रता साधता येईल; पण सध्याची कामगिरी पाहता एक वेळ अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशातील विजय साध्य होईल; पण बांगलादेशला त्यांच्या देशात हरवणं कितपत जमेल?
आता समजा ही सामना न जिंकण्याची कटू मालिका सुरूच राहिली तर आणि बांगलादेशानं किंवा अफगाणिस्ताननं एखादी लढत जिंकली तर जास्तीत जास्त चौथा क्रमांक मिळेल. हे घडल्यास आशियाई कप पात्रता प्ले ऑफ लढतीवर अवलंबून असेल. आता विश्वकरंडक पात्रतेसाठी नव्हे तर आशिया कप पात्रतेसाठी तरी सामने जिंकायला सुरवात करायला हवी.

स्टिमॅच यांनी सूत्रं स्वीकारल्यापासून
भारत वि. कुराकाओ १-३
वि. थायलंड १-०
वि. ताजिकिस्तान २-४*
वि. उत्तर कोरिया २-५*
वि. सीरिया १-१*
वि. ओमान १-२*
वि. कतार ०-०
वि. बांगलादेश १-१*
वि. अफगाणिस्तान १-१
भारत वि. ओमान ०-१
* लढती मायदेशात

तुलना कॉन्स्टंटाईन आणि स्टिमॅच यांच्या कालावधीतील (सन २०१६ पासून).
- कॉन्स्टंटाईन मार्गदर्शक असताना १० पैकी ४ सामन्यात विजय, एक बरोबरी आणि पाच पराभव.
- स्टिमॅच मार्गदर्शक असताना दहापैकी एका सामन्यात विजय, चार बरोबरी आणि पाच पराभव.
- कॉन्स्टंटाईन असताना सामन्यामागील गोलची सरासरी १.७०, तर स्टिमॅच असताना १.००.
- कॉन्स्टंटाईन असताना स्वीकारलेल्या गोलची सरासरी १.००, तर स्टिमॅच यांच्या कालावधीत १.८०.
- गोलच्या निर्माण केलेल्या संधी - कॉन्स्टंटाईन असताना ७.९०, तर स्टिमॅच यांच्या कालावधीत ७.००.
- गोलच्या दिलेल्या संधी - कॉन्स्टंटाईन असताना सरासरी १४.००, तर स्टिमॅच असताना १५.२०.
- यशाची टक्केवारी कॉन्स्टंटाईन यांच्या कालावधीत ०.४०, तर स्टिमॅच असताना ०.१०.
- कॉन्स्टंटाईन यांच्या कालावधीत सामना केलेल्या प्रतिस्पर्ध्यांचे सरासरी मानांकन १३८३, तर स्टिमॅच यांच्या कालावधीत १४४३.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com