जग हे बंदिशाळा (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

त्या तिथं मंदिरासमोर खूपच मोठी रांग होती. जवळजवळ सर्वच वयाची माणसं रांगेत मनोभावे उभी होती. आजूबाजूला काही एजंट फिरत होते. ते जरा सुखवस्तू दिसणाऱ्या माणसांजवळ जाऊन ‘लवकर दर्शन पाहिजे का,’ असं कुजबुजत विचारात होते. अधीर भक्त हाताला लागले, की व्यवहार ठरे आणि तो ‘एजंट’ नावाचा गृहस्थ वेगळ्या मार्गानं भक्ताची तत्काळ देवाशी गाठ घालून देई. त्या तिथं पलीकडं व्हीआयपी गेट होतं. आपल्या देशात ‘महत्त्वाचे’, ‘अतिमहत्त्वाचे’ असे मानवनिर्मित गट पडल्यानं तिथंही फारच गर्दी होती. व्हीआयपी आत जाताना ‘सामान्य’ रांगेकडं तालेवारपणे पाहत होते. पलीकडं फुलांच्या दुकानातही चांगली गर्दी होती. तिथं मोठमोठाले हार होते. देवाच्या कृपेनं ते कधीच संपणारे नव्हते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं भिक्षेकरी कारुण्याभिनय करत शिस्तीनं भीक मागत बसले होते. असं काही आजूबाजूला पाहताना रांग पुढं सरकत गेली आणि दर्शनाला तब्बल चार तास लागले. गाभाऱ्यात पुजाऱ्यांचीही चांगलीच वर्दळ होती. बाहेर पडलो, तर दहा-बारा रिक्षावाले अंगावर धावून आले. त्यातली एक रिक्षा पकडून बसस्थानकावर आलो, तर तिथंही तोबा गर्दी! समोर दिसणाऱ्या रेल्वेस्थानकावरही गर्दीचा महापूर! मनात विचार आला, कुणी न सांगता माणसांची ही गर्दी कशी बरोब्बर विभागली जाते. देवाच्या मंदिरातसुद्धा नकळत एक व्यवस्था निर्माण झाली आहे. ज्याला-त्याला वेगळ्या भूमिका, वेगळी कामं यावर तर जगरहाटी व्यवस्थित सुरू आहे.

त्या तिथं परमिट रूमच्या बाहेर गाड्यांची रेलचेल आहे. आत बसलेले लोक मदहोश आहेत. मद्य पोटात गेलं, की अनेकांचं दु;ख पाण्यामधल्या ट्यूबसारखं तरंगून वर येतं. लोक म्हणतात दारु पिणारे हॉटेलमध्ये किती गर्दी करतात. त्यांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. प्रत्येक मनुष्य सुख-दुःखाचा हिशेब मांडायला मंदिरात गेला, तर अतोनात गर्दी होईल. त्यापेक्षा ते हॉटेलात गर्दी करतात. तुम्ही दर्शन घेऊन बाहेर पडताना तुम्हाला मिळतं तेवढंच समाधान त्यांना हॉटेलमधून बाहेर पडताना मिळत असेल. त्या भिक्षेकऱ्यांना आपण नावं ठेवतो. अहो कुणीतरी भिक्षेकरी असल्याशिवाय श्रीमंतांना श्रीमंत असल्याचा आनंद मिळत नाही. सारेच श्रीमंत झाले, तर ‘श्रीमंत’ शब्द किती गरीब वाटेल!

आता या इथं तासापासून उभा राहिलो, तेव्हा मला बस गाडी मिळाली. त्या तिकडं रेल्वेसाठी प्रवाशांनी गर्दी केली, म्हणून तर मला गाडी मिळू शकली. आपण प्रवास करतोय तेव्हा अनेक लोक घरात आराम करत असतील, काही कामात व्यस्त असतील म्हणून बरं. साऱ्यांनी एकदमच प्रवास करायचं ठरवलं तर कसं होईल? एकाच माणसाला सारंच काही जमत नाही आणि सारीच माणसं एकाच ठिकाणी गर्दी करत नाहीत. माणसानं ठरवलेल्या व्यवस्थेच्या पलीकडं हे सारं काही घडवणारी अनामिक अदृश्य शक्ती हे व्यवस्थापन करत असावी. त्या कुणी शरीर दिलं. शरीराचं नियमन करायला मेंदू दिला. माणसाला भावनेचा ‘भाता’ दिला. त्या भात्यात प्रेम, द्वेष, तिरस्कार, असूया, माया, ममता, क्रोध, हळवेपणा, संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, कोरडेपणा, प्रज्ञा, प्रतिभा, प्रामाणिकपणा, मुजोरी असे शेकडो बाण दिले. सारी माणसं आपापल्या परीनं वेगवेगळे बाण वापरून जगतात. प्रेम, माया, ममता, स्नेह आहे म्हणून जग चालतं. द्वेष, तिरस्कार, असूया, मुजोरी, लबाडी आहे म्हणून पोलिस दल आहे. कोर्ट आहे. न्यायनिवाडा आहे. ‘सर्वांनी प्रेमानं, मायेनं वागा,’ असं पोलिस, न्यायाधीश सांगू लागले आणि अखिल मानवजातीनं ते तंतोतंत पाळले, तर पोलिसांच्या नौकऱ्या धोक्यात येतील. कोर्टाची गरज पडणार नाही. सारेच विद्यार्थी प्रज्ञावंत निघाले, तर शिक्षकाची गरज पडणार नाही. वर्गातली सारीच मुलं सारखीच हुशार असतील, तर पुढं कसं होणार? हुशारांनी अधिकारी व्हावं, मध्यमांनी कर्मचारी व्हावं आणि इतरांनी शारीरिक श्रम करावेत. कुणीतरी इंजिनिअर झाला, दुसरा गवंडी झाला, तिसरा बिगारी झाला तरच घर बांधून होईल. नाही तर कोट्यवधी रुपये असूनही घर कुणी बांधावं हा प्रश्न निर्माण होईल. वेगवेगळी कामं करणारी ही माणसं ‘तू अमुक हो मी तमुक होतो’ असं ठरवून झाली नाहीत. भले कितीही मोठा अधिकारी असो, त्यालासुद्धा घराचं ड्रेनेज चेंबर तुंबलं, तर ते मोकळं करणाऱ्या कामगारांवरच अवलंबून राहावं लागतं.

निर्मात्याला दिग्दर्शनाची कला नसते, दिग्दर्शक अभिनय करवून घेतो, अभिनेते, कथा, पटकथा, संवादलेखक, कॅमेरामन, एडिटर, मेकअपमन, वितरक, थिएटरवाला या सर्वांच्या सामूहिक कामानं चित्रपट प्रेक्षकापर्यंत पोचतो. लेखक लिहितो, प्रकाशक छापतो, वितरक वितरण करतो, वाचक वाचतो हे असं परस्परांवरचं अवलंबित्व तर माणसांना एकमेकांशी बांधून ठेवतं. म्हणून जगातली कुठलीच गोष्ट अस्थानी किवा विनाकारण निर्माण झालेली नाही. क्षुल्लक वाटणारा स्क्रू पडला, तरी गाडी किंवा मोठमोठ्या मशिनरी बंद पडतात. तशा जगात क्षुल्लक अथवा नकोशा वाटणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्या नसल्या, तर जगरहाटीला बाधा येऊ शकते. कित्येकांना राजकारणाचा वीट येतो; पण राजकीय वृत्ती असणाऱ्या माणसांना खेळायला लोकशाहीचं मैदान आहे म्हणून बरं. त्यांना आरोप करायला विरोधक आहेत, फोडाफोडीला पक्ष आहेत. राजकारण नसतं, तर त्यांनी कुटुंबातच कुणावरही आरोप केले असते, पक्ष फोडावे तशी कुटुंबं फोडली असती. समाजात येनकेन प्रकारे धार्मिक उन्माद पसरवला असता. त्यांच्या वृत्तीचा निचरा व्हायला राजकारणाचा आखाडा आहे म्हणून कुटुंबाला, सर्वसामान्य माणसांना त्यांच्या या वृत्तीचा उपद्रव होत नाही. उलट कुटुंबाला तर पुढं कित्येक युगं फायदाच होतो. एकंदर निसर्गानं सर्वांना कशी वाटून वाटून बुद्धी, कला, प्रतिभा दिली आहे. साऱ्यांनाच निर्मितीची कला देऊन जमले असते का? इतरांच्या कलेचा आस्वाद घेणारं कुणीतरी पाहिजेत ना. सारेच लिहू लागले, तर आमचं तरी कोण वाचील हो???

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com