esakal | इकास म्हंजी काय रं भाऊ...? (संजय कळमकर)
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay kalamkar

इकास म्हंजी काय रं भाऊ...? (संजय कळमकर)

sakal_logo
By
संजय कळमकर sanjaykalmakar009@gmail.com

राखुंडीनं दात घासून धोंडीभाऊनं फुटक्या कप-बशीतला चहा भुरके मारत संपवला. पार्वतीनं पहाटेच उठून भाकरी थापल्या होत्या. त्यावर लाल मिरचीचा भेळा घालत तिनं फडक्यात दोघांचं जेवण बांधून घेतलं. भाकरीचं गाठोडं घमेल्यात ठेवलं आणि घाईनं ते रानाकडं निघाले. गावचा चौक ओलांडताना त्यांना एकदम तड तड असा फटाक्यांचा आवाज आला. लांबलचक लडीचा तो आवाज बराच वेळ सुरू राहिला. नंतर चौकात अचानक गर्दी जमली. गर्दीनं काही घोषणा दिल्या. नंतर एक कार्यकर्ता पारावर चढून तावातावानं बोलू लागला. धोंडीभाऊ उत्सुकतेनं थांबला.
पार्वती म्हणाली :‘‘कुनीतरी रिकामटेकडे दिसत्यात. असले भाष्नं ऐकून कुडं प्वाट भरतंय व्हय? चला, उशीर व्हईल आपल्याला.’’
‘‘आगं, थांब की जरा,’’ म्हणत धोंडीभाऊ तसाच चिकटून उभा राहिला. कार्यकर्ता आता जोमानं बोलू लागला : ‘‘मित्रांनो, काश्मीरमधलं ३७० वं कलम आता हटवण्यात आलं आहे. आता तिथल्या लोकांचा विकास होईल. आपल्याला तिथल्या जमिनी घेता येतील...’’

समोर जमलेल्या लोकांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या.
‘‘झालं त्येचं भाषान...चला आता’’ असं म्हणून पार्वतीनं धोंडीभाऊला डिवचलं. दोघं रानाच्या रस्त्याला लागले. धोंडीभाऊ म्हणाला : ‘‘मी बी मस सातवीपरेंत शिकलुया. मला बी ह्येतलं थोडं थोडं समजंतं.
काश्मीरचा मला बी आनंद झालाया. आता तिकाडल्या जिमिनी आपल्याला घेता येत्याल. आपल्याला म्हंजी पैसंवाल्या लोकान्ला. तिथं धंदा बी टाकता यील. म्हंजी पैसंवाल्या लोकान्ला. पर काश्मीरच्या लोकांचा आता जोरात इकास व्हनार हे ऐकल्यापासून मातर मला लई हसू येतंया. आम्ही इतके दिस स्वातंत्र्यात असून बी आम्हीच अजून फाटके, तर तिकाडल्या लोकांचा इकास कसा काय व्हनार ब्वॉ...’’ रान येईपर्यंत धोंडीभाऊ बडबडत होता. ते दोघं बांध ओलांडून बाभळीखाली येऊन थांबले. जमिनीतून वर आलेल्या ज्वारीच्या कोवळ्या रोपांनी मान टाकली होती.
पार्वती म्हणाली : ‘‘पाऊस कसा असा रुसल्यावानी दडून बसलाया? अजून आठ दिस नाही आला तं सोन्यावानी पिकाची माती व्हईल वं.’’
तिनं डोळ्याला पदर लावलेला पाहून धोंडीभाऊ म्हणाला : ‘‘आज आनंदाचा दिस हाये. रडू नगं.’’
***

संध्याकाळी भाकर-तुकडा खाऊन दोघं घरासमोर मातीच्या ओट्यावर बसले. धोंडीभाऊ काळजीच्या सुरात म्हणाला:‘‘आपल्या सुरेखाला व्हस्टेलाची फी भरायची हाय. कालच निरोप आलाया तिचा. पाऊस नाय आला तर दुबार पेरनी करावा लागंल. पैशाची तर बोंबाबोंब हाय.’’
तो हे बोलत असतानाच समोरून वाजत-गाजत मिरवणूक आली. ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्य गुलाल अंगावर घेऊन सर्वांना हात जोडत गर्दीच्या मधोमध चालत होते. त्यांच्या समोर काही तरुणांचं टोळकं बेफामपणे नाचत होतं. ते पाहून पार्वती म्हणाली : ‘‘कसे बेडकावानी पाय हलवीत नाचंतेत बघा. आगं बयो...आपला श्याम्या बी हाय की तेंच्यात.’’
धोंडीभाऊ म्हणाला :‘‘प्येलाबिला तं नसल ना गं त्यो?’’
हे बोलत असतानाच श्याम्या साऱ्या मेम्बरांना घराजवळ घेऊन आला. हात जोडत नवीन सरपंच म्हणाले : ‘‘आशीर्वाद द्यावा. आता बघा गावचा विकास कसा करतो ते. बजाव रे जोर से.’’
मिरवणूक निघून गेल्यावर धोंडीभाऊ म्हणाला : ‘‘गेल्या पन्नास वर्षांमदी मी धा-बारा सरपंच बघितल्यात. समदे असंच म्हनत आले हायेत पर आजून बी गाव जसं हाय तसंच हाय.’’
पार्वती अंधारात पाहत म्हणाली : ‘‘सातवीपत्तोर शिकून बी तुमाला कळत न्हाय व्हय! आता काश्मिरातल्या समद्या गावांचा इकास व्हनार हाय, तेच्या बरूबर आपल्या बी गावाचा व्हईल.’’
***

सकाळीच मराठी शाळेत मोठा कार्यक्रम होता. चौकात उभा असलेला धोंडीभाऊ गर्दी पाहून तसाच शाळेकडं निघाला. त्यांच्याच गावचा एक तरुण कुठली तरी परीक्षा पास होऊन मोठा साहेब झाला होता. गावानं त्या तरुणाचा सत्कार ठेवला होता. सर्वांनी मिळून त्याला भला मोठा हार घातला. तो भाषणात म्हणाला : ‘‘आता मला या समाजाची, देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी ग्रामीण भागाच्या विकासाला योगदान देईन. गरिबांना विसरणार नाही.’’
त्याचं भाषण सुरू असताना शेजारी बसलेला शिरपा म्हणाला :
‘‘चल रं धोंडीभाऊ, रान वाट बघंतंय आपली. इकास झाला तं ह्येंचाच व्हतो. बाकी समदं तसंच ऱ्हातंय ह्ये काय आपल्याला ठावं न्हाय व्हय?’’
***

घरात अंधार होता. कंदिलाची वात वाऱ्यानं पालीच्या जिभेसारखी लवलवत होती. होस्टेलची फी नेण्यासाठी आलेली सुरेखा आईच्या शेजारी झोपली होती. शाम्या ओट्यावर घोरत पडला होता. धोंडीभाऊ मनाशी विचार करत होता : ‘मिरवनुका निघत्यात, मानसं निवडून येत्यात, लई हुशार मानसं अधिकारपदावं जात्यात. देशात काय तरी घटना घडून समदे तावातावात येत्यात; पर लाखो झोपड्यांमधला अंधार काय सरत नाय. गरिबी हटली तं या देशातल्या लोकशाहीला काय भांडवलच ऱ्हायाचं न्हाय बहुतेक...भाष्नांन्ला काय विषय बी ऱ्हायाचं न्हाईत...त्यामुळं हायेत त्या अडचनी तशाच ऱ्हायाला पायजेत असं तं वाटत न्हाई काही लोकान्ला? आजपत्तोर हज्जारो मिरवनुका निघाल्या, शेकडो मानसं निवडून आली, परीक्षा दिऊन हज्जारो मानसं साह्येब झाली पर शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय थांबाया तयार न्हाईत, त्योच महापूर पुन्यांदा पुन्यांदा येतो. तीच पिकं सुकून मातीत मिळत्यात. ह्ये बी पुन्यांदा पुन्यांदा घडतंय...मंग येवढी मानसं नेमकी करत्यात तरी काय..? फकस्त फसवाफसवी...!’

तो उठून बसला तशी पार्वती म्हणाली :‘‘काय झाल वं?’’
तो म्हणाला :‘‘झोप येत न्हाय.’’
ती म्हणाली : ‘‘सातवीपरेंत जाऊन बी तुमास्नी येवढं बी कळत न्हाय व्हय? तिकडं काश्मिरातली लोकं कशी शांत झोपली असत्याल. तुम्ही बी झोपा.’’
पार्वतीचं बोलणं ऐकून धोंडीभाऊ स्वतःशीच अर्थपूर्ण हसला
अन् त्यानं गोधडी तोंडावर घेतली. आत सारा गुडुप्प अंधार...प्रकाशाचा ठिपकाही दिसत नव्हता.

loading image
go to top