कशात काय अन् फाटक्यात पाय...! (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalmakar009@gmail.com
रविवार, 8 सप्टेंबर 2019

त्या भव्य मॉलमध्ये फिरताना मी कपड्यांच्या दालनात गेलो. तिथं हॅंगरला लटकवलेले कपडे पाहत तरुण मुलं-मुली फिरत होत्या. एका मोठ्या खोक्यात चुरगळलेले टी-शर्ट ढिगानं पडलेले होते. कुणीतरी कंटाळून ते फेकून दिले असावेत किंवा मॉलच्या मालकानं अथवा मुलानं वापरून ते खोक्यात टाकून दिले असावेत असं वाटत होतं! मी जवळच उभा राहून माझ्या हालचाली आशेनं निरखणाऱ्या सेल्समनला त्या टी-शर्टांची किंमत विचारली. तो म्हणाला : ‘हे सारे टी-शर्ट तीन हजारांच्या पुढंच आहेत.’

त्या भव्य मॉलमध्ये फिरताना मी कपड्यांच्या दालनात गेलो. तिथं हॅंगरला लटकवलेले कपडे पाहत तरुण मुलं-मुली फिरत होत्या. एका मोठ्या खोक्यात चुरगळलेले टी-शर्ट ढिगानं पडलेले होते. कुणीतरी कंटाळून ते फेकून दिले असावेत किंवा मॉलच्या मालकानं अथवा मुलानं वापरून ते खोक्यात टाकून दिले असावेत असं वाटत होतं! मी जवळच उभा राहून माझ्या हालचाली आशेनं निरखणाऱ्या सेल्समनला त्या टी-शर्टांची किंमत विचारली. तो म्हणाला : ‘हे सारे टी-शर्ट तीन हजारांच्या पुढंच आहेत.’

‘पडूनच आहेत, घेऊन जा’ असं म्हणण्याच्या लायकीच्या त्या
टी-शर्टांची किंमत ऐकून मी हबकून गेलो. शेजारी जीन्सच्या
काही अर्ध्यामुर्ध्या मळकट पॅंट लटकत होत्या. कुणीतरी घाईघाईनं अस्ताव्यस्तपणे कापल्याप्रमाणे त्यांचे धागे लोंबत होते. मला मॉलवाल्यांचं कौतुक वाटलं. भिकाऱ्यांसाठी त्यांनी ते स्वतंत्र दालन उघडलं आहे की काय असा विचार माझ्या मनात येऊन गेला. त्या दालनात माझं फिरणं फारसं विसंगत नव्हतं!
आता त्या पोराला काही विचारण्यापेक्षा त्या पॅंटला लावलेलं लेबल मीच पाहिलं. त्यावर साडेचार हजार अशी किंमत पाहून त्या पॅंटमध्ये दडलेलं काहीतरी चावल्यासारखं वाटून मी पटकन हात बाजूला घेतला. किती बेरकी लोक निघालेत पाहा ना! म्हणजे, यांनी आधी कुठून तरी जुनी पॅंट आणली असेल...ती जागोजागी दगडानं घासली असेल... मातीत चांगली पिठासारखी मळली असेल...नंतर घाईनं ती एखाद्या टेलरकडून कापून एकाचे दोन भाग करून इथं विकायला ठेवली असेल! वा रे वा...आम्हाला फसवायला निघाले काय! मी असा विचार करत असतानाच तिथं एक तरुण मुलगा आणि काही मुली आल्या. त्यांनी जास्तीत जास्त फाटक्या पॅंट्स निवडून बरोबर आणलेल्या ट्रॉलीत त्या ठेवल्या. ‘हा भिकार मनुष्य इथं काय करत असावा बरं’ या अर्थानं त्या मुलींनी माझ्याकडं पाहिलं आणि मराठी-इंग्लिश मिक्स्ड् असं मिंग्लिश बोलत त्या निघून गेल्या. ते कपडे जुने नसून आधुनिकीकरणाच्या तडाख्यानं फाटल्यासारखे दिसत होते हे लक्षात येताच मी सर्द झालो. पूर्वी कपड्याचा एकही धागा निघालेला माणसांना सहन होत नसे. मग ते फाटणं तर दूरच! ‘शरीर ही संपत्ती आहे, निसर्गानं दिलेली देणगी आहे आणि माझ्या देहावर माझं पूर्ण स्वामित्व आहे,’ अशा सुसंस्कृत ताठ्यानं माणसं वावरायची. अगदी शाळेचा गणवेश कुठं फाटलेला, उसवलेलाही चालत नसे. तसं काही दिसलं तर आई त्या ठिकाणी बारीक सुईनं रफू करायची. आपल्या मुला-मुलीचे कपडे कुठं फाटलेले दिसले तर इतर मुलं हसतील, त्यांची चेष्टा करतील अशी भीती तिला वाटायची. माझी शाळेची खाकी हाफपॅंट दिवसाआड शिवणं हा तर आईला उद्योगच होऊन बसला होता. मी अंगापिंडानं चांगलाच बाळसेदार होतो. रेडीमेड खाकी पॅंट तर मला टिकतच नसे. शेवटी आईनं शक्कल लढवली. दौंडला आमचे थोरले मामा एसआरपीत जमादार होते. ते व्यायामाला वापरत असत तशी एक ढगळी खाकी पॅंट मला आईनं शाळेसाठी आणली. ती मी आठवी ते दहावीपर्यंत वापरत होतो. काही मुलांच्या विजारीला टीव्हीसारखं चौकोनी ठिगळ असायचं. गरीब मुलं शाळेत जाता-येता दफ्तरानं ते ठिगळ झाकू पाहायचे. लाज राखण्याचे असे आटोकाट प्रयत्न अगदी लहानपणीसुद्धा केले जायचे. त्या वेळी आमची कपडेखरेदी मोठी मजेशीर असायची. कॉलेजला असताना मोठ्या दुकानात कपडे घ्यायला जायचो. आमच्या पसंतीचे कपडे पहिल्याच जिन्याच्या खोक्यात ठेवलेले असत. ताग्यातून उरलेले ते कटपीस स्वस्त मिळत. शहरात शिलाई जास्त म्हणून गावाकडंच कपडे शिवून घ्यावे लागत. वडिलांनी गल्लीतल्या एका टेलरकडून नवे दोन ड्रेस शिवून घेतले होते असं आठवतंय. हा टेलर ‘पायजमा स्पेशालिस्ट’ असल्यामुळे त्या पॅंटला त्यानं फक्त नाडी तेवढी लावली नव्हती! मॅनिले तर त्यानं नेहरू शर्टसारखे लांबलचक शिवून दिले होते. एका मॅनिल्याचा खांदा पार खाली ओघळलेला. आता ही ओघळलेली चूक सुधारायची म्हणून दुसऱ्या मॅनिल्याचा खांदा वर ओढून पार कॉलरजवळ आणलेला. त्या काळी रोख शिलाई द्यायची पद्धत नव्हती. कपडे ‘बेमाप’ शिवले म्हणून वडिलांनीही त्याला चांगल्या ज्वारीऐवजी पावसात भिजलेली ज्वारी (जिच्या भाकरी लाल रंगाच्या व्हायच्या) दिलेली मला आठवते. मुली अंगभर पोलकं-परकर घालायच्या. स्त्रिया नऊवारी साडी नेसून अंगभर पदर घ्यायच्या. मुलांचा अगदीच आधुनिक पोशाख म्हणजे बेलबॉटम पॅंट अन् मॅनिला. मुलींचा आधुनिक पोशाख म्हणजे पायघोळ (वनपीस) मॅक्सी. मात्र, कपडे कोणत्याही फॅशनचे असोत, पूर्ण शरीर झाकलं जाईल असेच ते असायचे. कुठल्याही परिस्थितीत शारीरिक प्रदर्शन न करता आपण आपली लाज राखलीच पाहिजे असं कुटुंबाचं, समाजाचं नैतिक दडपण साऱ्यांवर असायचं.
***

आता फाटक्या-तुटक्या फॅशनचे कपडे पाहून मन फाटल्यासारखं होतं. पूर्वी कपडे फाटले की कुटुंबाची प्रतिष्ठा जाण्याची भीती वाटायची. आता कपडे जितके फाटके तितकी प्रतिष्ठा जास्त असा फाटका काळ सुरू झाला आहे. चांगली पॅंट एक हजार रुपयांना आहे, तर जागोजागी फाटलेली दोन हजार रुपयांना आहे. सलग शिवलेल्या कपड्यांपेक्षा लक्तरं लोंबलेले कपडे महाग कसे याचा विचार करता करता मेंदूची लक्तरं लोंबतात; पण उत्तर सापडत नाही. कपडे कसे आणि कुठले घालावेत हा ज्याचा त्याचा खासगी प्रश्न असला तरी ते घालून सार्वजनिक ठिकाणी वावरावं लागतं तेव्हा ती खासगी बाब सार्वजनिक होऊन जाते. सुमार व्यक्तिमत्त्व जसं चांगल्या कपड्यांनी खुलून दिसतं तसं चांगलं व्यक्तिमत्त्व विचित्र कपड्यांनी सुमार दिसू लागतं. त्यापेक्षा आपल्याला शोभेल असा आणि आपल्या आई-बाबांना रुचेल असा पेहराव केलेला उत्तम! एका प्रश्नाचं उत्तर मात्र मला सापडत नाही. तुम्हाला सापडलं तर पाहा. कपडे घालण्याचा मनुष्याचा नेमका हेतू कुठला? लज्जारक्षण की लज्जादर्शन?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sanjay kalamkar write halaka fulaka article