पूर्णविरामाचं हसणं...! (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalmakar009@gmail.com
रविवार, 15 सप्टेंबर 2019

विनोदाची दुकानं असती तर तो विकत घेण्यासाठी माणसांनी गर्दी केली असती. माणूस आज हसण्यासाठी भुकेला आहे; पण त्याला निर्मळ हास्य कुठं सापडत नाही. त्याचं मूळ आजच्या स्वच्छंद व वेगवान जीवनशैलीत दडलेलं आहे. माणूस नुसता पळतोच आहे. पोटासाठी पळतो म्हणावं तर पोट भरल्यावरही अजून वेगानं पळतो आहे. स्वतःच्या वागण्यानं तो सुख मिळवू शकतो; पण समाधान नाही. जास्तीची हाव हे त्याच्या दु:खाचं कारण आहे. पायी चालणाऱ्याला वाटतं, मला निदान सायकल हवी. सायकलवाला मोटारसायकल पाहून दु:खी होतो. मोटारसायकलवाला म्हणतो, चारचाकी असती तर ऊन्ह, वारा, पावसापासून माझा बचाव झाला असता.

विनोदाची दुकानं असती तर तो विकत घेण्यासाठी माणसांनी गर्दी केली असती. माणूस आज हसण्यासाठी भुकेला आहे; पण त्याला निर्मळ हास्य कुठं सापडत नाही. त्याचं मूळ आजच्या स्वच्छंद व वेगवान जीवनशैलीत दडलेलं आहे. माणूस नुसता पळतोच आहे. पोटासाठी पळतो म्हणावं तर पोट भरल्यावरही अजून वेगानं पळतो आहे. स्वतःच्या वागण्यानं तो सुख मिळवू शकतो; पण समाधान नाही. जास्तीची हाव हे त्याच्या दु:खाचं कारण आहे. पायी चालणाऱ्याला वाटतं, मला निदान सायकल हवी. सायकलवाला मोटारसायकल पाहून दु:खी होतो. मोटारसायकलवाला म्हणतो, चारचाकी असती तर ऊन्ह, वारा, पावसापासून माझा बचाव झाला असता. चाराचाकीवाल्याला वाटतं, गाडी ऑटोमॅटिक असती तर क्लच दाबून आपला पाय दुखला नसता. यापेक्षा भारी कंपनीची गाडी हवी होती.

राजकारणात तर कुणीच समाधानी नसतं. सरपंचाला वाटतं, निदान पंचायत समितीचं अथवा जिल्हा परिषदेचं सदस्य तरी झालं पाहिजे. सदस्याला वाटतं, आमदार तरी व्हावं. आमदाराला वाटतं, मंत्रिपद मिळालं तर जीवनाचं सार्थक होईल. मंत्रिपद मिळालेलेही, त्यामानानं दुय्यम खातं मिळालं म्हणून नाराज असतात. काहींना तर मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा असते. एकंदर, राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा खेळ आहे. असं कुठलंही स्वस्थ-अस्वस्थ क्षेत्र असो, त्यावर विनोद आणि त्यातून फुलणारं हास्य हा रामबाण उपाय आहे. आपण खळखळून हसावं असं सर्वांनाच वाटत असतं; परंतु काहींची प्रतिमा आडवी येते. चेहरा गंभीर ठेवला तर आपण विद्वान दिसतो असा अनेकांचा गैरसमज असतो. खऱ्या विद्वानाला जीवनाचं मर्म समजलेलं असतं. त्यांना विनोद, खेळकरपणा आवडतो; परंतु समाजात विचारवंत, विद्वान, समीक्षक म्हणून मान्यता पावलेल्या लोकांना इच्छा असूनही खळखळून हसता येत नाही. नोकरापुढं मालक, शिक्षकापुढं मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांपुढं अधिकारी, अधिकाऱ्यांपुढं पुढारी कधी मोकळेपणानं हसत नाहीत. त्यातून आपलं प्रतिमाभंजन होईल अशी निरर्थक भीती त्यांना वाटत असते. अर्थात गांभीर्य आणि शिस्त यांचा काहीही संबंध नसतो. रसिकता जपून हसत-खेळत अनेक माणसं कौशल्यानं कामं करून घेताना दिसतात. विनोदाचं वावडं असणारी माणसं मनानं रुक्ष असतात. हसणारी माणसं उथळ असतात असं त्यांना वाटतं. आपण हसू नये, एवढंच काय जगात कुणीही हसू नये असंच त्यांचं मत असतं; परंतु हसण्यामागं कारुण्य लपलेलं असतं. ते लपवून हसत जगणारी माणसं खूप विशाल मनाची असतात. ते स्वतःचं दु:ख लपवून इतरांना आनंद देतात. विनोद सांगून इतरांना आनंद देणारी माणसंही कमी नाहीत. विनोद सांगणं ही कला आहे. सांगणाऱ्याला चेहरा गंभीर ठेवावा लागतो तरच ऐकणारे हसतात. विनोद सांगणाराच हसू लागला तर त्याचाच विनोद होऊन जातो. विनोदातली जागा समजणं हीही एक कलाच आहे. काही माणसं विनोद झाल्यावर हसतात, नंतर गंभीर चेहऱ्यानं विचारतात, ‘पुढं काय झालं?’ त्याच्याकडून नकळत झालेल्या विनोदावर पुन्हा सारे हसून घेतात. पुढारी, शिक्षक, बायका, कवी यांच्यावर सर्वांत जास्त विनोद होतात. उदाहरणार्थ : कुणी भेटलं की दोन्ही हात जोडून स्वतःचं नाव सांगण्याची सवय पुढाऱ्यांना जडलेली असते. सखाराम पाटील अशाच सवयीचे गुलाम होते. ते एके ठिकाणी कार्यक्रमाला गेले तेव्हा त्यांच्या ड्रायव्हरनं घाईनं खाली उतरून त्यांच्या बाजूचं गाडीचं दार उघडलं. तसे पाटील खाली उतरताना ड्रायव्हरलाच हात जोडत म्हणाले : ‘नमस्कार, मी सखाराम पाटील!’

पुढाऱ्यांचे असे खरे-खोटे किस्से मसाला लावून जितके सांगितले जातात तितकेच ते आवडीनं ऐकले जातात. तरुण मुलं एकत्र आली की प्रासंगिक विनोदांचा पाऊस पडतो. उगीच एखाद्या मुलीवरून मित्राला चिडवून त्याची खिल्ली उडवतात. काही ना काही विनोद करून ते मनसोक्त हसत असतात, हास्याच्या महापुरात स्वतःला विसरून जातात. कुणाचा उपदेश ऐकण्याच्या मन:स्थितीत ही युवा पिढी नाही. त्यांना हसता-हसवता भानावर आणणं गरजेचं आहे. त्यामुळे विनोदाची किनार जोडून बेतलेली व्याख्यानंच लोकप्रिय होताना दिसतात. त्यातल्या त्यात आजकाल तरुणांनाच नव्हे तर मोबाईल वापरणाऱ्या सर्वांनाच समाजमाध्यमातून व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अनेकांच्या प्रतिभेला बहर आला आहे. अनेक ग्रूपवर विनोदाची मुक्त उधळण होताना दिसते. या विनोदाचा मूळ निर्माता मात्र गायब केला जातो. निव्वळ विनोदाला वाहिलेल्या काही ग्रूपवर हसऱ्या चेहऱ्याच्या इमोजी सर्वत्र संचारताना दिसतात. यावरून माणूस हसण्यासाठी किती भुकेला आहे ते समजतं. एक खरं की विनोदाच्या फार खोलात गेलं की निर्भेळ आनंद मिळत नाही. उत्तम विनोद निव्वळ हसवत नाही, नकळत कशावर तरी भाष्य करतो. विनोद खूप मोठी गोष्ट थोडक्यात सांगून जातो. मध्यंतरी एक व्यंग्यचित्र पाहण्यात आलं. त्याचा गर्भितार्थ सध्याची राजकीय परिस्थिती दाखवणारा होता. आत एका राजकीय पक्षाची बैठक सुरू आहे आणि काही कार्यकर्ते हतबल चेहऱ्यानं बाहेर बसून आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरून असा अर्थ निघत होता की आम्ही या पक्षाचे पहिल्यापासून निष्ठावान कार्यकर्ते आहोत; परंतु इतर पक्षाचे लोक त्यात घुसल्यानं आता आम्हालाच आत जागा राहिली नाही.
***

स्पर्धा, आजार, दारिद्र्य, बेकारी, दुष्काळ, महापूर, विभक्त कुटुंबपद्धती, आपल्या क्षमतेबाहेरचं स्वप्न पाहणं अशा अनेक गोष्टींमुळे आजचा समाज अस्वस्थ आहे. मन स्वस्थ केल्याशिवाय अडचणीतून सुटण्याचे मार्ग सापडत नाहीत. त्यासाठी सकस विनोद मदत करू शकतो. हसण्यानं अंतरंग पाऊस पडून गेलेल्या आभाळासारखं स्वच्छ होतं. कुठं तरी समाधान मानायला शिकलं पाहिजे. अर्थात, समाधान हे पूर्णविराम नसलेलं वाक्य आहे. ते कधीच संपत नाही. तो पूर्णविराम आपणच द्यायचा असतो. त्या पूर्णविरामात विनोदाला थोडीशी जागा दिली तर तो अजून सुसह्य होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sanjay kalamkar write halaka fulaka article