
सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे. सौरवची ही अत्यंत महत्त्वाची दुसरी इनिंग भले दहा महिन्यांची असेल; पण तिचं मोल मोठं आहे. कर्णधार म्हणून असो वा संयोजक म्हणून, सौरवला काम करून घेण्याची कला अवगत आहे. बीसीसीआयचा कारभार चालवताना याच गुणांचा उपयोग सौरवला नक्कीच होणार आहे. कोणाकडून कशा प्रकारे गोड बोलून किंवा सुनावून कोणतं काम पूर्ण करून घ्यायचं हे सौरव बरोबर करेल.
सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे. सौरवची ही अत्यंत महत्त्वाची दुसरी इनिंग भले दहा महिन्यांची असेल; पण तिचं मोल मोठं आहे. कर्णधार म्हणून असो वा संयोजक म्हणून, सौरवला काम करून घेण्याची कला अवगत आहे. बीसीसीआयचा कारभार चालवताना याच गुणांचा उपयोग सौरवला नक्कीच होणार आहे. कोणाकडून कशा प्रकारे गोड बोलून किंवा सुनावून कोणतं काम पूर्ण करून घ्यायचं हे सौरव बरोबर करेल.
झाला झाला झाला. सौरव गांगुलीचा ‘राज्याभिषेक’ झाला. सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष झाला. बीसीसीआयचा कारभार सुधारण्याकरता लोढा समितीनं बरेच बदल सुचवले. सर्वोच्च न्यायालयानं विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कारभारावर नियंत्रण ठेवलं. जवळपास अडीच वर्षांच्या कालखंडानंतर बीसीसीआय परत एकदा मूळ पदावर येऊन कारभार करायच्या बेतात असल्यानं सौरवची ही अत्यंत महत्त्वाची दुसरी इनिंग भले दहा महिन्यांची असेल; पण तिचं मोल मोठं आहे.
सौरव गांगुली म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला आलेला माणूस आहे, हे त्याच्या घरी गेल्यावर समजतं. कोलकात्याच्या बिहाला भागातल्या एका गल्लीत दोन मोठ्या इमारती आहेत, ज्यात संपूर्ण गांगुली कुटुंब एकत्र राहतं. गांगुली कुटुंबाच्या कार टकाटक राहाव्यात म्हणून एक गॅरेज तयार केलं होतं. सौरव आणि त्याचा भाऊ स्नेहाशिष खेळायचे, तेव्हा वडील चंडी गांगुली यांनी दोन इमारतींच्या मध्यभागी चक्क क्रिकेट विकेट बनवून त्याला जाळी लावून सरावाची चोख व्यवस्था केली होती. गांगुली कुटुंबाचा पिढीजात अत्याधुनिक छपाईचा मोठा व्यवसाय होता. सौरवनं त्या व्यवसायात कधी उडी घेतली नाही. तो नेहमीच स्वत:हून आखलेल्या मार्गावरून चालत राहिला.
सन १९९६ मध्ये सौरवनं कसोटी पदार्पण केलं. ज्या मैदानावर आयुष्यात एकदा सामना खेळायची तमाम क्रिकेटप्रेमी खेळाडू स्वप्न बघतात त्या लाँर्ड्स मैदानावर सौरवनं नुसतं कसोटी पदार्पण केलं नाही, तर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं. ‘‘तुला मी सांगीन. ती गंमत वाटेल; पण माझ्या घरच्यांना माझ्या पहिल्या शतकाचा आनंद घेता आला नव्हता, हे सत्य आहे. आमच्या कोलकात्याच्या राहत्या घरी लाइट गेले होते. त्यामुळं घरच्यांना टीव्हीवर माझ्या खेळीतल्या शतकी टप्प्याचा आनंद घेता आला नाही. माझे काका लंडनला राहतात. त्यांनी माझं शतक पूर्ण झाल्यानंतर घरी अभिनंदन करायला फोन केला. तेव्हा माझ्या आई-वडिलांना समजलं, की माझं कसोटी पदार्पणात शतक झालं...,’’ सौरव मजेदार कहाणी सांगून गेला.
भारतीय संघात जम बसवायला सौरवला वेळ लागला नाही. सचिन तेंडुलकरला फलंदाज म्हणून भरपूर यश मिळालं, तसं अपेक्षित यश कर्णधार म्हणून मिळालं नाही. सन २००१ मध्ये सचिननं कर्णधारपद सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचा निर्णय घेताना निवड समितीला कर्णधारपदाचा संभाव्य उमेदवार म्हणून सौरवचं नाव सुचवलं होतं. सन २००१ मध्ये स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. या संघानं एकामागोमाग एक कसोटी सामना जिंकण्याचा सपाटा लावला होता. स्टीव्ह वॉच्या संघाचा विजयी अश्वमेध सौरवच्या संघानं रोखला- तिथून कर्णधार म्हणून सौरवच्या कारकिर्दीला खरी सुरवात झाली.
भारतीय संघ घडवताना सौरवला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची भक्कम साथ होती. त्याच्या सोबतीला सौरव गांगुलीनं झहीर खान, वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग आणि युवराजसिंग याच चार होतकरू खेळाडूंना संपूर्ण पाठिंबा दिला. संघात जागा देताना या चार खेळाडूंना मनमोकळा खेळ करायचा भरवसा दिला. या कृतीनं भारतीय संघ खऱ्या अर्थानं परिपूर्ण झाला, बांधला गेला. सौरवच्या नेतृत्वगुणांबद्दल बोलताना सेहवाग म्हणाला : ‘‘दादानं मला एकदा बोलावून स्पष्ट सांगितलं, की मला सातत्यानं कसोटी संघात खेळायचं असेल, तर मला सलामीला जाण्यावाचून पर्याय नाही. मी दादाला सांगितलं, की ‘मी सलामीला गेलेलो नाही. कसोटी सामन्यात मला कसं जमेल?’ त्यावर सौरव म्हणाला : ‘हे बघ मधली फळी भरलेली आहे. तसंच मला तुझ्यासारख्या खेळाडूला संघात न घेता बाहेर बसवणं पसंत नाही. मी तुला दोन भरवसे देतो. पहिलं म्हणजे तुला तुझ्या शैलीत बदल करायची गरज नाही. तू नैसर्गिक आक्रमक फलंदाजी करू शकतोस. आणि दुसरं म्हणजे मी तुला कसोटी सामने खेळायची सलग संधी देतो- ज्यानं तुला जम बसवायला बरं पडेल आणि दडपण न घेता फलंदाजी करता येईल.’ सौरव नुसतं बोलला नाही, तर त्यानं ते करून दाखवलं. मला कसोटी सामन्यात सलामीला जाऊन जे यश मिळालं, त्यात कर्णधार म्हणून सौरवच्या निर्णयाचा मोठा वाटा आहे,’’ असं सेहवाग कौतुक करताना सांगत होता.
काम करून घेणं
कर्णधार म्हणून असो वा संयोजक म्हणून, सौरवला काम करून घेण्याची कला अवगत आहे. दोन उदाहरणं देतो. सन २००३ मध्ये भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धा खेळायला दक्षिण आफ्रिकेत गेला असताना संघातल्या सर्व खेळाडूंना आपल्यावर संघाची जबाबदारी आहे असं वाटावं म्हणून सौरव आणि प्रशिक्षक जॉन राइट यांनी मिळून एक शक्कल लढवली. ही युक्ती होती संघात सौरव सोडून सहा कर्णधार नेमायची. होय सन २००३ च्या भारतीय संघात सौरव धरून सात कर्णधार होते आणि तरीही कोणी हेवेदावे करत नव्हते. कारण फलंदाजीचे कर्णधार सचिन तेंडुलकर- राहुल द्रविड होते, गोलंदाजीचे कर्णधार जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे होते आणि फिल्डिंगचे कर्णधार युवराजसिंग आणि महंमद कैफ होते. या निर्णयानं जबाबदारी विभागली गेली आणि सगळ्यांना संघाकरता काहीतरी कमाल करून दाखवायची संधी मिळाली. एक गुगली टाकून सौरवनं काम विभागून दिलं आणि बरोबर करूनही घेतलं.
दुसरं उदाहरण थोडं घरगुती; पण गंमतीदार आहे. सन २००६ मध्ये भारतीय संघानं कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर पाकिस्तानी संघाला कसोटी सामन्यात पराभूत केलं. त्या दिवशी माझं नशीब फळफळलं- कारण सौरवनं इडन गार्डनवरून त्याच्या गाडीत बसवून थेट मला त्याच्या घरी नेलं होतं. घरात गेल्यावर सौरवला त्याच्या आईनं रीतसर ओवाळून घरात घेतलं होते. हात-पाय, तोंड धुवून जरा ताजंतवानं झाल्यावर मग घरातले सगळे लोक एकत्र बसले. संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली होती, म्हणून नोकरांनी मग पहिल्यांदा सगळ्यांना सूप सर्व्ह केलं. इतक्यात घराची बेल वाजली. बेल वाजल्यावर गांगुली कुटुंबातलं कोणीही दार उघडायला तसूभर हललं नाही. मग नोकरांनी मस्तस ‘स्टार्टर्स’ स्नॅक्स वाढले. जवळपास सात-आठ मिनिटं होऊन गेली, तरी कोणी दार उघडायला जात नव्हतं म्हटल्यावर मलाच चुळबुळायला झालं. सगळ्यांना ताज्या माशाचे भाजलेले तुकडे आणि हराभरा कबाब देऊन झाल्यावर मग एका नोकरानं शांतपणे दार उघडलं. गंमतीची गोष्ट अशी, की दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीही बेल वाजवून किती वेळ झाला, दार उघडायला इतका उशीर का झाला वगैरे कावलेल्या नव्हत्या. यातून मला इतकं समजलं, की सौरवला कोणतं काम आपण करायचं आणि कोणतं काम दुसऱ्यांकडून करून घ्यायचं याचं बाळकडू घरातून मिळालेलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा कारभार चालवताना याच गुणांचा उपयोग सौरवला नक्कीच होणार आहे. कोणाकडून कोणतं काम कशा प्रकारे गोड बोलून किंवा धारेवर धरून पूर्ण करून घ्यायचं हे सौरव गांगुली बरोबर करेल.
बिकट वाट
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा कारभार चालवणं हा मान असला, तरी तो एक काटेरी मुकुटही आहे. एका बाजूला आपापल्या राज्य संघटनांमधून मंडळात दाखल होणाऱ्या व्यक्तींमध्ये क्रिकेट संयोजनाचा अनुभव असलेल्या; तसंच जबरदस्त राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तींचा समावेश असतो. सौरवबरोबर अमित शहा यांचा मुलगा जय सचिव म्हणून, तर अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुणसिंह धुमल खजिनदार म्हणून बीसीसीआयच्या कारभारात काम करणार आहे. एका बाजूला बीसीसीआयचं अर्थकारण फारच वेगळ्या स्तराला जाऊन पोचलं आहे, तर दुसरीकडं सरकारपासून ते अंतर्गत विरोधकांपर्यंत सगळेजण बीसीसीआयचे कारभारी चूक कधी करतात, हे तपासायला टपून बसलेले दिसतात. याच्या सोबतीला एक चर्चा ऐकायला मिळते आहेच, की सौरवच्या डोक्यावर मानाचा मुकुट ठेवताना त्याला मुख्य होकार दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांचा आहे. याच्या बदल्यात तेच सत्ताधारी सौरवच्या लोकप्रियतेचा वापर ममता बॅनर्जींना शह देण्याकरता करून घेतील. आत्ताच्या घडीला सौरव त्या चर्चेला पूर्णविराम देत असला, तरी भविष्यात समीकरणं बदलू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाचे मुद्दे
आयसीसीआयमध्ये बीसीसीआयचा प्रतिनिधी म्हणून कोण व्यक्ती जाणार हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्याचबरोबर परस्पर हितसंबंधांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण त्यात मूलभूत बदल केला नाही, तर खरे दर्जेदार माजी खेळाडू निवड समिती किंवा क्रिकेट सल्लागार समितीपासून लांब राहतील. इतकंच काय, जर परस्परहितसंबंधांचा नियम बदलला नाही, तर राहुल द्रविडसुद्धा आत्ताच्या घडीला करत असलेलं मोलाचं काम सोडून देईल, ही भीती आहे. सौरवनं प्राधान्य देऊन परस्परहितसंबंधांचा नियम बदलायचा विचार बोलून दाखवला आहे. याच्या सोबतीला सौरव मुत्सद्देगिरी वापरून महेंद्रसिंह धोनीबाबतचा निर्णय योग्य वेळी घेईल. धोनी महान खेळाडू आहे आणि त्याचा आदर राखला जाईल, हे ठासून सांगणारा सौरव योग्य वेळी धोनीला तुझ्या डोक्यात काय विचार आहे हे बोलायला भाग पाडेल.
अजून एक गोष्ट सौरव गांगुली नक्की करेल, असं मला वाटतं ती म्हणजे पहिल्या भेटीत विराट कोहली आणि रवी शास्त्रीला हे तो हळूच जाणवून देईल, की ‘बाळांनो, आता बीसीसीआयचा बॉस मी आहे.’
सारासार विचार करता सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष होणं ही चांगली गोष्ट म्हणता येईल. ज्याला मराठीत ‘खमक्या’ स्वभावाचा म्हणतात तसा सौरव गांगुली आहे. बीसीसीआयचा कारभार भ्रष्टाचारमुक्त असावा आणि प्रशासनात सुसूत्रता यावी याकरता सौरव बरोबर काम करेल याची मला खात्री वाटते.