आवाज सांभाळावाच लागतो! (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

आवाज हा कंठसंगीताच्या साधकांचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गायक शास्त्रीय संगीत गातो आहे की नाट्यगीत, चित्रपटगीत की लोकगीत हा नंतरचा भाग आहे. कंठसंगीत ऐकताना श्रोत्याला सर्वप्रथम मोहिनी घालतो तो गायकाचा आवाज.

‘आज शास्त्रीय संगीताची मैफल ऐकायचीच,’ असं मनाशी ठरवून नेहा जरा उशिराच सभागृहात शिरली. फुलांनी सजलेला तो रंगमंच, दोन तंबोऱ्यांच्या मध्ये बसलेला व हातातलं स्वरमंडल छेडत प्रसन्न मुद्रेनं गात असलेला कलाकार, स्वरसाथ करणारे दोन शिष्य, एका बाजूला गायकाचं तंतोतंत अनुसरण करणारा हार्मोनिअमवादक आणि दुसऱ्या बाजूला तालाशी खेळत लय ताब्यात ठेवणारा तबलजी...सर्वजण एका अलौकिक आनंदाची अनुभूती घेत होते आणि समोरचे रसिकप्रेक्षक त्या सादरीकरणाला मनापासून दाद देत होते. अगदी मोहक दृश्य होतं ते.
खरंच! कलाकार कुठलाही असो, आपल्या कलेत रममाण असताना अत्यंत मोहक दिसतो. एक अलौकिक तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत असतं. त्या दृश्यानं भारावून गेलेली नेहा टाळ्यांच्या कडकडाटानं भानावर आली.
‘दृश्यरूपात अडकून मैफलीचा आस्वाद कसा घेणार? आता फक्त संगीताचा आनंद घ्यायचा’ असं ठरवून नेहानं डोळे मिटले. तंबोऱ्याच्या सुरात मिसळणारा गोड स्वर, कधी नाजूकपणे, तर कधी थेट काळजाला भिडणाऱ्या स्वरलहरी, सर्व स्वरांमध्ये लीलया फिरणारा आवाज डोळे मिटून ऐकताना अधिकच आकर्षक वाटत होता. संगीताविषयी अनभिज्ञ असलेल्या श्रोत्यालासुद्धा खिळवून ठेवण्याची ताकद त्या आवाजात होती हे नक्की.

आवाज हा कंठसंगीताच्या साधकांचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गायक शास्त्रीय संगीत गातो आहे की नाट्यगीत, चित्रपटगीत की लोकगीत हा नंतरचा भाग आहे. कंठसंगीत ऐकताना श्रोत्याला
सर्वप्रथम मोहिनी घालतो तो गायकाचा आवाज. पूर्वी असा समज होता की सुगम संगीत गाणाऱ्यांचे आवाज गोड आणि चांगले असायला हवेत; पण शास्त्रीय संगीताला चांगला आवाज नसला तरी चालतो, कारण शास्त्रीय संगीत ऐकणारे लोक सांगीतिक विचार ऐकतात, राग ऐकतात, मांडणी ऐकतात, रचनात्मक सौंदर्य पाहतात...याच कारणामुळे खास आवाज नसलेलीसुद्धा अनेक गायकमंडळी लोकप्रिय झाली; पण काळानुरूप आज हे चित्र बदललं आहे.

बहुतेक सगळ्याच स्त्री-पुरुषांना निसर्गानं जन्मजातच चांगला आवाज दिलेला असतो, म्हणूनच लहान वयात कुठल्याही बाळाचं रडणंसुद्धा गोड वाटतं. पुढं बाळाच्या वाढत्या वयाबरोबर या आवाजावर
आई-वडिलांचे, मित्र-मैत्रिणींचे आणि आजूबाजूला असलेल्या लोकांचे संस्कार होतात आणि आवाज बदलत जातो. सतत ऐकत असलेल्या आवाजाचं आपण अनुकरण करत असतो म्हणूनच अनेक वेळा फोनवर ऐकणाऱ्याला, आई आणि मुलीचा किंवा वडील आणि मुलाचा आवाज खूप सारखा वाटतो.
संगीत ही गुरुमुखी विद्या असल्यानं शिष्यावर नेहमीच गुरूंच्या आवाजाचा प्रभाव असतो. संगीत शिकत असताना एक वेळ अशी येते की गुरू आणि शिष्य यांच्या आवाजात खूप साधर्म्य वाटतं. आवाजाच्या दृष्टीनं हे घातक असलं तरी प्रत्येक शिष्याला यातून मार्ग काढावा लागतो आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी लागते.

ज्याप्रमाणे चित्रकारासाठी रंग, वादकासाठी वाद्य हे त्याच्या कलेचं माध्यम असतं, त्याप्रमाणे गायकासाठी त्याचा आवाज हे कलेचं माध्यम असतं. हे माध्यम तळहाताच्या फोडासारखं जपावं लागतं. आवाज सांभाळणं ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी गानकलाकाराला आयुष्यभर पार पाडावी लागते. आपापल्या प्रकृतीनुसार कुणाला आंबट पदार्थांचा त्रास होतो, तर कुणाला थंड, कुणाला तेलकट चालत नाही, कुणाला तिखट चालत नाही, तर कुणाला वासाचा त्रास होतो, तर कुणाला हवेचा. कुठल्याच गोष्टीचा काहीही त्रास न होणारेही काही भाग्यवान कलाकार असतात. उदाहरणार्थ : भीमसेन जोशी. त्यांच्या जेवणात कायम मिरचीचा ठेचा आणि दही-भाताचा समावेश असे. छोटा गंधर्व हे अतिशय आवडीनं तेलकट, तिखट आणि मसालेदार तर्री खात; मग ती मिसळीची असो किंवा तांबड्या रश्शाची. गायककलाकार शक्यतो कार्यक्रमापूर्वी किंवा कार्यक्रमादरम्यान कोमट किंवा साधं पाणी पितात; पण बालगंधर्वांनी अशी बंधनं पाळली नाहीत. ते नेहमी बर्फाचंच पाणी पीत; किंबहुना ज्या गावात त्यांचा नाट्यप्रयोग असे तिथं रेल्वेनं बर्फाची लादी आणून थंड गार पाण्याची सोय केली जायची.

याउलट जसराज यांनी त्यांच्या आवाजासाठी आणि त्यांच्या एकमेवाद्वितीय आवाजाचा पोत एकसारखा राखण्यासाठी आयुष्यभर अनेक पथ्यं एखाद्या व्रतासारखी सांभाळली. अनेक चमचमीत, कुपथ्यकारक पदार्थ त्यांनी कायमचे वर्ज्य केले. जसराज काय किंवा भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी काय, या सर्व कलाकारांनी बोलण्याच्या बाबतीतही पथ्य सांभाळलं. विशेषकरून कार्यक्रमाच्या दिवशी ते अत्यंत कमी बोलत आणि ती सगळी ऊर्जा ते रंगमंचावर वापरत. अशा सगळ्या गोष्टी सांभाळल्या तरी रंगमंचावर काय घडेल हे मात्र कुठलाही कलाकार ठामपणे सांगू शकत नाही.

भीमसेन जोशी यांची एकदा सकाळच्या वेळची मैफल होती. ऐकायला समोर दिग्गज मंडळी स्थानापन्न झाली. तानपुरे जुळले आणि पंडितजींनी तोडीचे स्वर आळवायला सुरवात केली; पण काही केल्या षड्ज (सा) लागेना. आवाज तापेपर्यंत थोडा वेळ गेला. समोरच्या तज्ज्ञ मंडळींमध्ये चुळबुळ सुरू झाली; पण पंडितजी शांतपणे त्या षड्जाची मनधरणी करत राहिले. दहा...वीस...पंचवीस मिनिटं गेली आणि मग पंडितजींना षड्ज अखेर लागला आणि तो असा लागला की समोरच्या प्रत्येकाला जणू त्यांच्या स्वरातून त्या दिवशी विश्वरूपदर्शनच झालं. आवाज कितीही ताब्यात असला तरी मैफलीच्या दिवशीची तब्येत, मानसिक अवस्था, वाद्य, सहकलाकार, श्रोते अशा असंख्य गोष्टींवर मैफल अवलंबून असते.
पंडितजींची अशीच एक सकाळची मैफल होती. चहापाणी झालं. आतल्या खोलीत तानपुरे जुळले आणि पंडितजींनी एक फर्मान सोडलं : ‘मैफलीच्या आधी एक झणझणीत भेळ आणावी.’
संयोजक चक्रावले; पण आदेश ऐकणं क्रमप्राप्त होतं. एकदम झणझणीत तिखट भेळ पंडितजींनी खाल्ली आणि त्या मैफलीत ते असं काही गायले की श्रोत्यांचे कान तृप्त झाले.

आपापल्या प्रकृतीप्रमाणे, अनुभवाप्रमाणे किंवा श्रद्धेप्रमाणे आवाज या माध्यमाविषयी गायकांचे अनेक मतप्रवाह असतात. ते म्हणजे,
आवाज हा रियाजानं आणि योग्य त्या काळजीनं खुलतो...
आवाज हवा तसा लागण्यासाठी आवाजाविषयी शरणागतीचा भाव असावा...योग्य रियाज असल्यास आवाजाला काही होत नाही...इत्यादी.
सांगीतिक कारकीर्दीत ज्यांच्या आवाजाला त्रास झाला असेही अनेक गायक होऊन गेले. उस्ताद अल्लादिया खाँ यांना अतिरियाजामुळे आवाजाचा त्रास झाला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या आवाजाला शोभेल अशी गायकी प्रस्थापित केली. अंजनीबाई मालपेकर फिरोज दस्तूर, किशोरीताई आमोणकर यांच्यासारख्या अनेक गायकांना आवाजाचा त्रास झाला अशी नोंद आहे. आज गायक आपल्या आवाजाबद्दल अधिक दक्ष होत असलेले दिसतात. आवाजाला त्रास होऊ नये आणि तो जास्तीत जास्त काळ टिकावा याबाबत ते अधिक जागरूक होत आहेत.
पुढच्या लेखात आपण गीतप्रकारांबद्दल जाणून घेऊ या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com