थाटपद्धती (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

थाटपद्धतीमुळे शास्त्रीय संगीत मौखिक परंपरेतून बाहेर येऊन त्याचं विस्तृत दस्तावेजीकरण झालं. थाटाला रागाची जननी असं म्हटलं जातं. कारण, या थाटात राग उत्पन्न करण्याची क्षमता असते; पण वास्तविक रागनिर्मिती प्रथम झाली व नंतर दहा थाटांत वर्गीकरण केलं गेलं.

भारतीय संगीतात रागसंगीताची कल्पना रुजल्यानंतर अनेक अभ्यासकांच्या, शास्त्रकारांच्या, रचनाकारांच्या कल्पकतेतून, प्रतिभेतून बदलत्या अभिरुचीनुसार रागांच्या संख्येत सतत भर पडत गेली. आजसुद्धा नवीन रागांची निर्मिती होत आहे. रागांच्या संख्येचं प्रमाण आणि त्यांचा वाढता आलेख बघता त्यांच्या वर्गीकरणाची गरज निर्माण झाली. वर्गीकरण म्हणजे समान तत्त्व असलेल्या गोष्टींच्या निकषांवर रागांची विभागणी (क्लासिफिकेशन ) करणं. रागांमधल्या स्वरांची संख्या, त्यांचं राग-अंग, त्यामधून निर्माण होणारे रस, रागसमय, वेगवेगळे कालखंड अशा अनेक निकषांवर रागांचं वर्गीकरण केलं गेलं. सुरुवातीच्या काळात हे वर्गीकरण ‘राग-रागिण्या पद्धत’ म्हणून अस्तित्वात होतं. प्राचीन रागसंगीतात मूळ सहा पुरुषराग, त्यांच्या रागिण्या, त्यांचे पुत्रराग, पुत्रवधूराग असं वर्गीकरण होतं; परंतु या रागवर्गीकरणात तसे काही विशेष नियम किंवा शास्त्र नव्हतं. काळाच्या ओघात ही पद्धत पूर्णपणे नष्ट झाली.

विष्णू नारायण भातखंडे यांनी संगीतावर फार मौलिक संशोधन करून संगीतावर प्रचंड ग्रंथलेखन केलं. दहा थाटांत शेकडो रागांचं वर्गीकरण करण्याचं अत्यंत सुलभ व महत्त्वाचं संशोधन त्यांच्याकडून झालं. त्यांच्या ‘लक्ष्यसंगीत’ या ग्रंथात दहा थाटांचा उल्लेख आढळतो. आजही हीच पद्धती प्रचलित आहे. थाट या पद्धतीचा जन्म रागांच्या वर्गीकरणासाठी झाला, त्यामुळे थाटांचं गायन अथवा वादन होत नाही. त्यांत रंजन करण्याची क्षमता नसते. थाट म्हणजे स्वरांचा सांगाडा. थाट याचा शब्दश: अर्थ - ज्यात राग उत्पन्न करण्याची क्षमता आहे अशा सात स्वरांचा समूह.

यामध्ये स्वरांचा चढता क्रम असतो. प्रत्येक थाटात सात स्वर असतातच. या दहा थाटांना त्या थाटातल्या लोकप्रिय रागांची नावं असतात. एका थाटापासून अनेक राग उत्पन्न होऊ शकतात. उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानी संगीत हे थाटरचनेवर आधारित आहे, त्यांची नावं आणि संख्या मात्र वेगळी आहे. थाटांवर इतर अनेक संस्कार होऊन (उदाहरणार्थ : वादी-संवादी, आरोह-अवरोह वगैरे) त्यातून रागगायनाला किंवा वादनाला योग्य असे राग निर्माण होतात. थाटातले काही निवडक स्वर घेऊन रंगतदार राग निर्माण होतात; परंतु खुद्द थाट हा रंगतदार नसतो. थाट हा स्वरांचा फक्त एक सांगाडा आहे. हिंदुस्थानी संगीतात दहा थाट आहेत. ते असे : बिलावल, खमाज, काफी, आसावरी, भैरवी, कल्याण, मारवा, पूर्वी, तोडी, भैरव.

उत्तर भारतीय संगीतात भातखंडे यांची थाटवर्गीकरण पद्धती मानली जाते, तसेच दक्षिण भारतीय संगीतात व्यंकटमखी यांनी संशोधन केलेली ७२ थाटवर्गीकरण पद्धती मानली जाते. वास्तविक, रागांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म वर्गीकरणासाठी व्यंकटमखी यांची थाटपद्धती जास्त उपयुक्त आहे; परंतु भातखंडे यांनी दहा थाटांचं संशोधन करून थाटवर्गीकरण पद्धती अधिक सुलभ केली. संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ती अधिक उपयुक्त ठरली. असं असलं तरीसुद्धा शेकडो रागांचं दहा थाटांत वर्गीकरण करताना अनेक अडचणी येतात. कारण, थाटसंख्या केवळ दहाच असल्यानं सर्व राग त्यात सामावू शकत नाहीत, त्यामुळे काही राग ओढून-ताणून थाटात कोंबल्यासारखे वाटतात, तसेच काही समान स्वररचनेचे राग वेगवेगळ्या थाटांत गेलेले दिसतात. यादृष्टीनं ७२ थाटवर्गीकरण पद्धती जास्त उपयुक्त ठरत असावी.

थाट व राग यांमधला फरक असा :

थाटाला सात स्वरांची आवश्यकता असते.
रागामध्ये कमीत कमी पाच स्वर असावे लागतात.

थाटाला फक्त आरोही क्रम असतो.
रागाला आरोहाबरोबरच अवरोही क्रम असतो.

थाट रंजक नसतो.
रंजकता हा रागाचा मुख्य गुणधर्म आहे.

थाटाला इतर कोणतेही नियम नसतात.
वादी-संवादी, वर्ज्यावर्ज्य, पकड वगैरे नियम रागाला बंधनकारक असतात.

थाटाचं गायन-वादन होत नाही.
गायन-वादनासाठीच थाटातून रागनिर्मिती झालेली आहे.

दहा थाट आणि त्यांतून निर्माण झालेले शेकडो राग असं आपण आज अभ्यासत असलो तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिति तशी नाही. राग हे काही हजार वर्षांपासून जन्माला आले आहेत आणि राग निर्माण होताना थाटाचा वगैरे विचार होत नव्हता. ज्याप्रमाणे या जगात लाखो प्राणी आहेत, जमिनीवरचे प्राणी...पाण्यातले प्राणी...सरपटणारे प्राणी वगैरे. मात्र, आपल्या सोईसाठी आपण त्यांचं वर्गीकरण केलं आहे, त्याप्रमाणेच थाट-राग वर्गीकरणाचंही आहे. थाटपद्धतीमुळे शास्त्रीय संगीत मौखिक परंपरेतून बाहेर येऊन त्याचं विस्तृत दस्तावेजीकरण झालं. थाटाला रागाची जननी असं म्हटलं जातं. कारण, या थाटात राग उत्पन्न करण्याची क्षमता असते; पण वास्तविक रागनिर्मिती प्रथम झाली व नंतर दहा थाटांत वर्गीकरण केलं गेलं.

दहा थाट व त्यातले राग पुढीलप्रमाणे :-

थाट : बिलावल
राग : अल्हैया बिलावल, सरपरदा बिलावल, कूकुभ बिलावल, यमनी बिलावल, सुखिया बिलावल

थाट : खमाज
राग : खमाज, झिंझोटी, तिलंग, मांड, खंबावती इत्यादी.

थाट : काफी
राग : काफी, सिंदूरा, आनंद भैरवी इत्यादी.

थाट : आसावरी
राग : आसावरी, जौनपुरी, देसी इत्यादी.

थाट : भैरवी
राग : भैरवी, मालकंस, भूपाल, सिंध भैरवी इत्यादी.

थाट : कल्याण
राग : कल्याण, भूप, यमन, पहाडी
इत्यादी.

थाट : मारवा
राग : मारवा, भटियार, पूरिया, सोहोनी इत्यादी.

थाट : तोडी
राग : तोडी, मुलतानी, गुजरी तोडी इत्यादी.

थाट : भैरव
राग : भैरव, कालिंगडा, जोगिया, गौरी, रामकली, बैरागी इत्यादी.

पुढच्या लेखात आपण थाटावर आधारित असलेल्या रागांचा आढावा घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com