sayali panse
sayali panse

भारतीय संगीतातली घराणी (सायली पानसे-शेल्लीकेरी)

भारतीय संगीतात घराण्यांना एक वेगळं महत्त्व आहे. ‘शास्त्रीय गायन' हा या सगळ्या घराण्यांमधला समान धागा असला तरी प्रत्येक घराण्याची म्हणून काही गानवैशिष्ट्यं आहेत. या घराण्यांविषयी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी...

‘अमुक एक गायक या घराण्याचे व तमुक गायकाची गायकी तमुक घराण्याची’ असं अनेक वेळा अनेक मैफलींतून ऐकायला मिळतं. थोडंफार गाणं ऐकलेल्यांना दोन-चार घराण्यांची नावंदेखील माहीत असतात; पण घराणं म्हणजे नेमकं काय याबद्दल फारसं माहीत नसतं. भारतीय संगीतात ज्या काही संकल्पना आहेत त्यांत ‘घराणं’ ही प्रमुख संकल्पना आहे. धृपद, ख्याल, ठुमरी यांसारखे गायनप्रकार असोत, सतार, तबला आदी वाद्यं असोत किंवा नृत्यकला असो, भारतीय संगीतात घराणी आहेतच.

जेव्हा एक सिद्ध कलाकार संगीताची एखादी सुंदर कलाकृती निर्माण करतो तेव्हा त्यावर चिंतन-मनन होतं. त्यात हवे ते बदल केले जातात. नको असलेल्या गोष्टी काढून हवं ते समाविष्ट केलं जातं. कलाविष्कार रसिकांसमोर प्रस्तुत करण्यायोग्य जास्तीत जास्त सुंदर केला जातो. त्यासंबंधी कलाकाराच्या मनात विश्वास निर्माण झाला की कला शिष्यांकडे सुपूर्द केली जाते किंवा रसिकांसमोर सादर केली जाते. रसिकांना त्या कलाविष्कारातून आनंद मिळाला की कलाकारालाही समाधान मिळतं. ही गायकी शिष्यांमार्फत पुढच्या पिढीकडे सुपूर्द केली जाते. शिष्य-प्रशिष्यांमार्फत एका विशिष्ट गायकीचं एक कुटुंब संगीतक्षेत्रात वावरू लागतं. पूर्वीच्या काळी अनेक वेगवेगळ्या गायकांनी आपली स्वतःची अशी खास गायकी विकसित केली. त्यांची गायनपद्धती, तिच्यातले विचार, मर्यादा, नियम, तिच्यातली शिस्त असं सर्व काही त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवलं. अशा एका गायनपद्धतीच्या गायकांचा एक परिवार तयार झाला. त्यालाच घराणं असं नाव पडलं. हे गायक ज्या मूळ ठिकाणाहून आले त्या ठिकाणावरून त्या गायकीला ‘विशिष्ट घराण्याचं गाणं’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. घराण्याच्या गायकीचा प्रसार आणि हस्तांतरण मुख्यत: हे गुरू-शिष्य परंपरेतून पुढं होत राहिलं आहे.
घराणं या शब्दाला वेगवेगळी नावं असली तरी त्याचा अर्थ व उद्देश एकच : उत्तम शिक्षण देऊन चांगले शिष्य घडवणं व शिष्यांमार्फत आपल्या घराण्याचा प्रचार व प्रसार करणं.
वंश, रीती, पद्धती, संप्रदाय, खानदान, स्कूल ही घराण्याची विविध नावं. संगीतातल्या घराण्यांची काही वैशिष्ट्यं आहेत.
घराणं अस्तित्वात येण्यासाठी काही पिढ्या त्यामध्ये समाविष्ट असाव्या लागतात. घराण्याचे स्वतःचे काही आचार-विचार व नियम असतात. त्याचा स्वतःचा असा एक आराखडा असतो व तो रसिकमान्य असतो.
घराणं स्थापन व्हायला एखादा आद्यप्रवर्तक असावा लागतो.
प्रत्येक घराण्याचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, ज्यामुळे ते दुसऱ्यापासून वेगळं दिसतं.
प्रत्येक गायकाला आपल्या घराण्याचा अभिमान असतो व घराण्याच्या प्रचारासाठी तो प्रयत्नशील असतो.
ख्यालगायकीत अनेक घराणी प्रचलित आहेत. त्यातल्या ‘ग्वाल्हेर’, ‘आग्रा’, ‘किराणा’, ‘जयपूर’ आणि ‘पतियाळा’ या घराण्यांच्या गायकीचा प्रभाव सर्वत्र दिसतो. याव्यतिरिक्त अजूनही अनेक घराणी आहेत. उदाहरणार्थ : ‘मेवाती’ , ‘भेंडीबझार’, ‘बनारस’, ‘दिल्ली’, ‘रामपूर-सहस्वान.’ मात्र, वरील पाच घराणी संपूर्ण संगीतक्षेत्रावर अनेक काळ आपला प्रभाव टिकवून आहेत. या पाच घराण्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ.

* * *

ग्वाल्हेर घराणं : ग्वाल्हेर घराणं म्हणजे आधुनिक संगीताचं व्यासपीठ मानलं जातं. ख्यालगायकीचं हे आद्य आणि परिपूर्ण घराणं समजलं जातं. विष्णू दिगंबर पलुस्कर, निसार हुसैन खाँ, रामकृष्णबुवा वझे आदी हे घराण्याचे प्रसिद्ध गायक आहेत.

घराण्याची वैशिष्ट्यं :

* ध्रुपद अंगाचे ख्याल.
* जोरदार आणि खुली गायकी.
* झुमरा, तिलवाडा, तीनताल, एकताल, झपताल वगैरे तालांचा उपयोग.
* बंदिशींना खूप महत्त्व.
* विलंबित लय फार विलंबित गायली जात नाही.

* * *

आग्रा घराणं : आग्रा आणि ग्वाल्हेर या घराण्यांमध्ये बरंच साम्य आहे. फ़ैयाज खाँ हे या घराण्याचे सर्वश्रेष्ठ कलाकार मानले जातात.

घराण्याची वैशिष्ट्यं :

* खुला पण जव्हारीयुक्त आवाजाचा वापर.
* नोम तोम शब्द वापरून आलापी.
* विस्तार करताना बंदिशीतल्या शब्दांचा वापर.
* बंदिशींना महत्त्व.
* लय-तालावर विशेष प्रभुत्व.

* * *

जयपूर घराणं : भास्करबुवा बखले, केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर हे या घराण्याचे प्रसिद्ध गायक.

घराण्याची वैशिष्ट्यं :

* स्वरसौंदर्यावर विशेष भर.
* बुद्धिमत्तापूर्ण व पेचदार गायकी.
* अप्रचलित रागांची गायकी.
* अतिविलंबित लयीत गायन.
* एकेका स्वराची बढत.
* विलंबित तीनतालात अधिक प्रमाणात गायन.

* * *

किराणा घराणं : या घराण्यानं अनेक सुप्रसिद्ध गायक दिले. सुरेशबाबू माने, रामभाऊ कुंदगोळकर, हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगळ, भीमसेन जोशी इत्यादी.

घराण्याची वैशिष्ट्यं :

* आलापप्रधान गायकी.
* अतिविलंबित गायकी.
* वेगवेगळ्या तालांचा उपयोग कमी.
* गायनात सौंदर्यदृष्टीचा प्रभाव.

* * *

पतियाळा घराणं : या घराण्याची स्थापना अली बक्श व फत्ते अली या दोन भावांनी केली. वास्तविक, त्यांनी जयपूर आणि दिल्ली घराण्याची तालीम घेतली; परंतु त्यांनी आपल्या प्रतिभेनं नवीन शैली प्रस्थापित केली व तीच ‘पतियाळा घराणं’ या नावानं ओळखली जाते.

घराण्याची वैशिष्ट्यं :

* कलापूर्ण बंदिशी.
* संक्षिप्त ख्याल.
* आलंकारिक, वक्र, फिरतयुक्त ताना.
* द्रुत आणि अतिद्रुत ताना.
* चमत्कृतिपूर्ण विस्तार.
* गळ्याची विशेष तयारी.

यापुढच्या लेखात आपण घराण्यांचा प्रवास कसा झाला याबद्दल माहिती घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com