प्रत्यक्ष मैफल (सायली पानसे-शेल्लीकेरी)

सायली पानसे-शेल्लीकेरी
Sunday, 7 June 2020

मैफल गाजवणाऱ्या कलाकारांना जवळून बघता यावं, अशी निनादची खूप इच्छा होती; पण सरांना विचारायची त्याची हिंमत होत नसे. मात्र, एके दिवशी सगळा धीर एकवटून त्यानं सरांना विचारलंच. विद्यार्थ्याची तळमळ बघून सरांनाही ‘नाही' म्हणवेना. ‘जाऊ या’ असे त्यांचे शब्द कानावर पडताच निनादचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मैफल गाजवणाऱ्या कलाकारांना जवळून बघता यावं, अशी निनादची खूप इच्छा होती; पण सरांना विचारायची त्याची हिंमत होत नसे. मात्र, एके दिवशी सगळा धीर एकवटून त्यानं सरांना विचारलंच. विद्यार्थ्याची तळमळ बघून सरांनाही ‘नाही' म्हणवेना. ‘जाऊ या’ असे त्यांचे शब्द कानावर पडताच निनादचा आनंद गगनात मावेनासा झाला.

निनाद गेले अनेक महिने सरांकडे हार्मोनिअम शिकत होता. संगीताची प्रचंड आवड त्याला शांत बसू देत नसे. वेळ मिळाला की तो घरी रियाज करे, मैफली ऐके, गुरुबंधूंबरोबर एकत्र रियाज करे, सरांकडे जाऊन हार्मोनिअमविषयी चर्चा करे. रंगमंचावर सरांना साथ करताना बघून तोही त्या मैफलीचा भाग होऊन जात असे. गायकाचे लडिवाळ सूर ऐकले की नकळत त्याचीही बोटं मांडीवर फिरू लागत. ‘या सगळ्या कलाकारांना जवळून बघता यावं,’ असं प्रत्येक मैफलीत त्याच्या मनात येई; पण सरांना विचारायची त्याची हिंमत होत नसे; पण शेवटी एक दिवस उजाडला आणि सगळा धीर एकवटून त्यानं सरांना विचारलंच. विद्यार्थ्याची तळमळ बघून सरांनाही ‘नाही' म्हणवेना. ‘जाऊ या’ असे त्यांचे शब्द कानावर पडताच निनादचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपण आता कलाकारांना जवळून बघणार या कल्पनेनं त्याला आकाश ठेंगणं झालं. सरांच्या पाया पडून तो निघाला आणि तेव्हापासून शनिवार उजाडण्याकडे त्याचे डोळे लागले. उस्तादजींसारख्या मोठ्या कलाकाराला तो पहिल्यांदाच जवळून बघणार होता.

शनिवारी सहा वाजता ‘मित्रमंडळ नाट्यगृहा’त उस्तादजींचं गाणं होतं. बरोबर साडेचार वाजता नाट्यगृहात सरांबरोबर निनाद पोहोचला. उस्तादजीही नुकतेच तिथं पोहोचले होते. एरवी कायम झब्ब्यात दिसणारे उस्तादजी पँट-शर्टमध्ये वेगळेच दिसत होते. ‘हे कायम झब्बा घालत नाहीत तर!’ निनादनं मनातच म्हटलं. आपल्या मनात कलाकाराची प्रतिमा असलेली व्यक्तीदेखील एरवी सर्वसामान्य व्यक्तीसारखीच असते हे त्याच्या लवकर पचनी पडलं नाही.
उस्तादजींनी सरांना बघून कडकडून मिठी मारली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तेवढ्यात चहा-नाश्ता आला. तिथल्या प्रसिद्ध बटाटेवड्यांवर सर्व कलाकारांनी ताव मारला. प्रत्येकाच्या आवाजाला हे मानवतंच असं नाही; पण उस्तादजींना सगळं चालत होतं.

एव्हाना बाहेर श्रोते जमू लागले होते. फुलांनी सजलेला रंगमंच सज्ज होता. विंगेत फुलांचे बुके, शाली, श्रीफळ...अशी सगळी जय्यत तयारी झाली होती. प्रकाशयोजनेच्या तांत्रिक बाबी जुळत होत्या. साउंड सिस्टिम लागत होती. संयोजक निवेदकाला वेगवेगळ्या सूचना करत होते आणि निवेदक लगोलग त्यांची कागदावर नोंद घेत होते. काही उत्साही रसिक हे कलाकारांना भेटण्याविषयीची विनंती करत होते आणि कार्यक्रमाचे स्वयंसेवक मात्र गोड बोलून त्यांना सभागृहाच्या दिशेनं वाटे लावण्याच्या मागं होते.
आत तंबोरे जुळले. वाद्य लागली. चहाचा कप हातात घेऊन उस्तादजी काय गायचं याची यादी करत होते. मैफलीची सुरवात ‘पूरिया कल्याण’नं होणार होती. विलंबित, मध्य आणि द्रुत अशा तिन्ही बंदिशी उस्तादजींनी संगतकारांना ऐकवल्या आणि ते 'पूरिया’चे स्वर आळवत बसले. तेवढ्यात साउंड चेक करायला उस्तादजींना रंगमंचावर बोलावणं आलं. ‘पुढं काय काय गायचं ते श्रोते बघून ठरवू,’ असं म्हणत उस्तादजी रंगमंचाकडे गेले.

‘बाप रे! इतकी उत्स्फूर्तता!’ गणेशोत्सवात बोटावर मोजण्याइतक्या श्रोत्यांसमोर हार्मोनिअम वाजवायची वेळ आली तरी तीन महिने रोज रियाज करणारा निनाद उस्तादजींचे शब्द ऐकून स्तब्धच झाला.
तेवढ्यात संपूर्ण सभागृहात उस्तादजींचा आवाज भरून गेला. निनाद धावत विंगेकडे आला. उस्तादजी एकटे तानपुऱ्यावर गात होते. समोर ठेवलेल्या माॅनिटरमध्ये आपल्या आवाजाच्या लेव्हल हव्या तशा कमी-जास्त करून घेत होते. त्यानंतर हार्मोनिअमचा साउंड चेक झाला व मागोमाग तबल्याचा. आपले आवाज श्रोत्यांपर्यंत मनासारखे पोहोचत आहेत याची खात्री करून घेतल्यावर सर्व गायकांचा आणि वाद्यांचा एकत्र साउंड चेक झाला. रंगमंचावरचा सगळ्यांचा एकत्रित आवाज आणि सभागृहातला आवाज यात बराच फरक जाणवत होता. रंगमंचावरचा आवाज हा एकमेकांना नीट ऐकू यावा यासाठी केवळ थोडा वाढवलेला मूळ आवाजच होता, तर सभागृहात येणारा आवाज हा Reverb, Bass, Treble, Echo वगैरे देऊन प्रक्रिया केलेला आवाज होता. बाहेरचा आवाज हा अधिक सुंदर आणि गोड होता. साउंड सिस्टिम लावणारा तंत्रज्ञ किती महत्त्वाचा असतो हे त्या दिवशी निनादच्या लक्षात आलं. साउंड चेक झाला आणि कलाकार परत ग्रीन रूममध्ये आले. एव्हाना श्रोते स्थानापन्न होऊ लागले होते. कलाकारही झब्बे घालून सादरीकरणासाठी सज्ज झाले.

‘आज विंगेतूनच कार्यक्रम ऐकायचा,’ असं ठरवून निनाद तिकडेच एक खुर्ची ओढून बसला. सुरुवातीचं निवेदन, स्वागत, सत्कार, दीपप्रज्वलन वगैरे उरकल्यावर मैफलीला प्रारंभ झाला. आत गायलेला ‘पूरिया कल्याण’ तिथंच राहिला आणि उस्तादजींनी दोन तास ‘यमन’ रागात सर्व श्रोत्यांना यथेच्छ विहार करून आणलं. ऐकणाऱ्या प्रत्येकाची जणू समाधीच लागली होती. मध्यंतर झालं तसे सगळे भानावर आले. चहा-पाणी, ‘यमन’नं भारावलेलं वातावरण, पुढच्या रागाची उत्सुकता, भेटायला येणारे लोक यांत पंधरा मिनिटं गेल्याचं कळलंही नाही आणि निवेदकानं कलाकारांना रंगमंचावर पाचारण केलं. पुढचा राग सुरू झाला. परत एकदा सगळे त्यात न्हाऊन निघाले आणि मध्यंतराची वेळ संपली. आजची मैफल वेगळीच होती. दर्दी श्रोते, उत्तम संगतकार, उस्तादजींची लागलेली तंद्री...एकूणच मैफल जमून आली होती. मैफलीनंतर मंचावर उस्तादजींना भेटायला रसिकांनी एकच गर्दी केली. काही स्वयंसेवक आवराआवरीत गुंतले होते, काहीजण गर्दी नियंत्रित करत होते. काहीजण वाद्यं उचलत होते, तर काहीजण उस्तादजींना गर्दीमधून बाहेर काढायच्या प्रयत्नात होते. अवघ्या अर्ध्या तासात रंगमंचाचा कायापालट झाला. संयोजक उस्तादजींना घेऊन बाहेर पडेपर्यंत रंगमंचावरचं मैफलीचं चित्र पूर्णपणे पालटलं. काही वेळानं होणार असलेल्या नाटकाचं नेपथ्य तिथं आकार घेऊ लागलं होतं. आधीच्या कलाकृतीचा मागमूसही तिथं आता नव्हता; पण निनादच्या मनात अजूनही ती संध्याकाळ ताजीतवानी होती. ते स्वर, ती मैफल, त्या अनुभवातून बाहेर पडून वास्तवात येण्याची इच्छा त्याला होत नव्हती. ते सगळं घेऊन तो तिथून बाहेर पडला ते पुढच्या मैफलीचे वेध मनात घेऊनच...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sayali panse write gandhar article