esakal | तऱ्हेतऱ्हेचे श्रोते! (सायली-पानसे-शेल्लीकेरी)
sakal

बोलून बातमी शोधा

sayali panse

विविध प्रकारच्या श्रोत्यांमधला शेवटचा प्रकार म्हणजे खरा श्रोता. हे श्रोते फक्त मैफल ऐकायला येतात, आनंद घ्यायला येतात. काम-धंद्यातून वेळ काढून आलेले, दमलेले-भागलेले; पण गाणं ऐकून ताजंतवानं होऊन जातात. ‘काहीतरी कला असायला हवी होती अंगात, मग या नोकरी-धंद्यातून सुटका मिळाली असती,’ असं यांना वाटत असतं.

तऱ्हेतऱ्हेचे श्रोते! (सायली-पानसे-शेल्लीकेरी)

sakal_logo
By
सायली-पानसे-शेल्लीकेरी

विविध प्रकारच्या श्रोत्यांमधला शेवटचा प्रकार म्हणजे खरा श्रोता. हे श्रोते फक्त मैफल ऐकायला येतात, आनंद घ्यायला येतात. काम-धंद्यातून वेळ काढून आलेले, दमलेले-भागलेले; पण गाणं ऐकून ताजंतवानं होऊन जातात. ‘काहीतरी कला असायला हवी होती अंगात, मग या नोकरी-धंद्यातून सुटका मिळाली असती,’ असं यांना वाटत असतं. त्यांचं कलाकारांवर मनापासून प्रेम असतं. गाणं आवडलं तर ते खुली दाद देतात. गाणं मनाला स्पर्शून गेलं तर त्यांचे डोळे पाणावतात. कलाकाराला भेटायला मिळालं तर ‘काय बोलू, काय नको’ असं त्यांना होऊन जातं. प्रसंगी गडबडूनही जातात; पण त्यांच्यात सच्चेपणा असतो, जो सर्वांना भावतो. असे श्रोते प्रत्येक कलाकाराला हवेहवेसे वाटतात.

भारतीय शास्त्रीय संगीताचा श्रोता जगभर विखुरलेला आहे. शास्त्रीय संगीताचं कुतूहल बाहेरच्या देशांत खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. त्यांना संगीताबद्दल वाटणारी उत्सुकता, श्रवणातून मिळणारा आनंद आणि वाटणारी जिज्ञासा ही अचंबित करणारी आहे. आज अनेक परकीय विद्यार्थी भारतात येऊन शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहेत. जे संगीत बाहेरच्या लोकांना आकर्षून घेतं त्या संगीताला भारतातही प्रचंड प्रेम मिळत आहे हे संगीतमहोत्सवांना येणाऱ्या श्रोत्यांच्या संख्येवरून सहज लक्षात येतं.

शास्त्रीय संगीत हे महासागरासारखं अथांग आहे. ते केवळ जाता जाता कानावर पडणं आणि आवडू लागणं पुरेसं नसतं, तर त्यात पुढं शिकायला कायमच वाव असतो. त्यामुळे नवशिका विद्यार्थी असो किंवा उस्ताद असो, प्रत्येकाला रोज नवीन काहीतरी शिकण्यासारखं असतंच. प्रत्येकानं शिकून अगदी मैफल जरी गाजवली नाही तरी एक उत्तम कानसेन तयार होतो आणि संगीतातला आनंद बारकाव्यांनिशी प्रत्येकाला घेता येतो. गायकालाही उत्तम श्रोता हवाच असतो. जशी एखादी पाककृती केल्यावर खवैया हवा, तसंच मेहनत, रियाज आणि घराण्याच्या परंपरेतून तयार झालेलं संगीत ऐकायला जाणकार श्रोताही हवाच की! याच कारणामुळे मैफलीत पहिल्या रांगेत कोण कोण गुणिजन बसले आहेत हे बघूनच अनेकदा गायकाची कळी खुलते. हे तज्ज्ञ लोक जशी चुकांची नोंद घेतात तशीच गायकानं केलेल्या नवीन प्रयोगांना मनापासून दादही देतात. या देवाण-घेवाणीतून मैफल अधिक जिवंत होऊन रंगत जाते.

प्रत्येक श्रोत्याला मैफलीचा आनंद किती प्रमाणात घेता येईल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. गायक, त्याचं प्रस्तुतीकरण, ध्वनिव्यवस्था, श्रोत्याची संगीतातली जाण वगैरे. ज्याची जेवढी जाण तेवढा आनंद अधिक. श्रोत्यांमध्ये आस्वाद घेणाऱ्यांचे वेगवेगळे प्रकार दिसतात. काहीजण थोडंफार शिकलेले आणि तेवढ्यावरच हुशारी दाखवणारे...काहीजण थोडंफार शिकून किंवा न शिकता टीका करणारे...तर काहीजण मैफल ऐकून शिकणारे...काहीजण तज्ज्ञ, तर काहीजण समीक्षक...काहीजण गंमत म्हणून आलेले, तर काहीजण नियमित मैफली ऐकतो याचीच फुशारकी मारणारे...काही श्रोते तिकीट काढून मैफलीला येणारे आणि गप्पा मारत बसणारे, बोलायला कुणी नसेलच तर मोबाईल बघत बसणारे... शांतपणे फोन बघत बसण्यातही त्यांचं समाधान होत नाही, तर अनेक वेळा त्यांचा फोन वाजतोही! हे लोक शांतपणे घरीच मोबाईल का बरं बघत बसत नाहीत असा अनेकांना प्रश्न पडतो. असे लोक स्वतः तर आनंद घेत नाहीतच; पण इतरांचाही रसभंग करतात...काहीजण खानदानी शास्त्रीय संगीत श्रोते असतात. वर्षानुवर्षं मैफलींना येणारे. सभागृहातली त्यांची पुढची जागा ठरलेली असते. गाण्यांच्या मधल्या वेळेत ‘आज ‘यमन’ तेवढा जमला नाही... अमुक वर्षी ऐकलेला तमक्यांचा यमन अजून जसाच्या तसा स्मरणात आहे’ वगैरे चर्चा करणारे...संगीतातला कुठलाही नवीन प्रकार या श्रोत्यांना पटकन् रुचत नाही. सध्याच्या पिढीपेक्षा पूर्वीचे कलाकार कसे श्रेष्ठ होते आणि आपण त्यांचं गायन ऐकल्यामुळे आपण कसे वरच्या दर्जाचे श्रोते आहोत हे मिरवणारा हा श्रोतृवर्ग असतो. त्यांच्याकडे अनेक मैफलींमधली गाणी असतात. अनेक मोठमोठ्या गवयांचं गायन त्यांनी प्रत्यक्ष ऐकलेलं असतं आणि त्याचा त्यांना खूप अभिमान असतो. मैफल म्हणजे आजकालच्या भाषेत एक ‘हॅपनिंग’ ठिकाण असतं. केशवराव भोळे यांच्या ‘अस्ताई’ या पुस्तकातला त्यासंदर्भातला हा किस्सा फारच मार्मिक आहे, तो असा :‘एक कमालीच्या उतावीळ वृत्तीचे रसिक डॉक्टर होते. त्यांनी वैद्यकीय ग्रंथांबरोबर संगीतावरील सर्व ग्रंथ पालथे घातले होते. आपल्या पुस्तकी ज्ञानाची चुणूक ते आजूबाजूच्या श्रोत्यांना नेहमी दाखवत असत. एकदा एका सकाळच्या मैफलीत अकराच्या सुमारास गायक ‘सुघराई कानडा’ आळवत होते. आपल्या तथाकथित विद्वत्तेच्या तिकिटावर प्रवेश मिळवून, कुणाच्या पायावर पाय देत, ठेचकाळत गायकाच्या समोर ते एकदाचे येऊन बसले. येऊन स्थानापन्न होईपर्यंत ‘हा लंकाधन सारंग’ म्हणून त्यांनी रागनिदान वर्तवले. शेजारी एक खमंग श्रोता होता. ‘डॉक्टरसाहेब, लंकादहन होऊन हजार वर्षं झाली, हा सुघराई कानडा,’ असं म्हणून त्यानं डॉक्टरांची मिजास उतरवली. हा राग संपल्यावर समयोचित अशा ‘शुद्ध सारंग’ची गायकानं सुरुवात केली, तोच डॉक्टरांनी लगेच ‘श्यामकल्याण’ म्हणून रागाचं तत्काळ निदान केलं. शेजारचा खमंग श्रोता म्हणाला, ‘आता मात्र कमाल केलीत डॉक्टर! श्यामकल्याण हा रात्रीचा राग भरदुपारी बारा वाजता कोणता गायक गाईल हो? निदान काळ-वेळ बघून तरी राग ओळखा. इतक्या उतावीळपणे रोग्याचं निदान केलं तर रोगी गेलाच म्हणून समजा!’

काही लोक म्हणजे शास्त्रीय संगीताची एक टक्का आवड नसूनही ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून मैफलीला हजेरी लावणारे असतात. ‘आम्ही कायमच मैफली ऐकतो,’ याचा वृथा अभिमान असणारे श्रोते. मस्त नवेकोरे, कडक इस्त्रीचे कपडे घालून, जोरदार पर्फ्यूम मारून मैफलीत सारखं इकडे तिकडे मिरवणारे ते हेच लोक. संगीत कळो न कळो, महागातलं महाग तिकीट काढून पुढं बसणं, सतत मान हलवून दाद देणं आणि दर दोन आवर्तनांनंतर ‘क्या बात है’, ‘ओहोहो’ असे उद्गार काढणं हे त्यांचं काम. सतत मैफली ऐकून त्यांना समही कळते व हवेत हात उंच करून ते अतिशय आत्मविश्वासानं सम दाखवूही शकतात, हे मात्र नक्कीच कौतुकास्पद असतं.

मैफलीतले अजून एक मासलेवाईक श्रोते म्हणजे, सतत फोन हातात घेऊन रेकॉर्डिंग करणारे किंवा फेसबुक लाईव्ह करणारे श्रोते. आता मैफलीला आल्यावर गाण्याचा छानपैकी आस्वाद घ्यावा, तर ते सोडून हे मात्र व्हिडिओ तयार करण्याच्याच मागं असतात. गाणं कसं झालं यापेक्षा ते नीट ‘रेकाॅर्ड’ झालं आहे की नाही याचीच चिंता त्यांना जास्त असते!

रेकॉर्डिंगमध्ये डिस्टर्ब होऊ नये म्हणू हे केवळ मान हलवूनच दाद देतात. आजूबाजूच्या श्रोत्यानं एखाद्या जागेला ‘क्या बात है’ वगैरेसारखी दाद दिली तर मात्र त्याच्याकडे ‘खाऊ की गिळू’ अशा नजरेनं हे पाहतात...पण एक मात्र नक्की की अशा श्रोत्यांमुळे कलाकृती अनेक लोकांपर्यंत पोहोचते. घरी गेल्यावर यूट्यूबवरही व्हिडिओ टाकायची तसदी ते घेतात, त्यामुळे असे श्रोते कलाकारांना नक्कीच आवडतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा श्रोत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
काही श्रोते मैफलीला फक्त फुकटची हजेरी लावणारे. वेळ झाली की निघून जाणारे. गाणं आवडलं तर उत्तम, नाही आवडलं तरी खेद नसलेले. असे लोक असून नसून सारखेच. गाणं रंगल्याचं सुख नाही आणि पडल्याचं दुःख नाही. ना ते दाद देतात, ना नावं ठेवतात. फक्त वेळ घालवायला म्हणून येणारे.

या सर्वांमधला शेवटचा प्रकार म्हणजे खरा श्रोता. हे फक्त मैफल ऐकायला येतात, आनंद घ्यायला येतात. हे काम-धंद्यातून वेळ काढून आलेले, दमलेले-भागलेले असतात; पण गाणं ऐकून ताजंतवानं होतात. ‘काहीतरी कला असायला हवी होती अंगात, मग या नोकरी-धंद्यातून सुटका मिळाली असती,’ असं त्यांना वाटत असतं. त्यांचं कलाकारांवर मनापासून प्रेम असतं. गाणं आवडलं तर खुली दाद ते देतात. मनाला स्पर्शून गेलं तर त्यांचे डोळे पाणावतात. कलाकाराला भेटायला मिळालं तर, ‘काय बोलू, काय नको’ असं त्यांना होऊन जातं. प्रसंगी गडबडूनही जातात; पण त्यांच्यात सच्चेपणा असतो, जो सर्वांना भावतो. असे श्रोते मात्र प्रत्येक कलाकाराला हवेहवेसे वाटतात.

मैफलीतल्या सौंदर्यस्थळांबद्दल जाणून घेऊ या पुढच्या लेखात.

loading image
go to top