prashant barsing
prashant barsing

श्रीलंकेची पुन्हा भरारी (प्रशांत बारसिंग)

एके काळी दहशतवादाच्या हादऱ्यानं सतत कोलमडणारा श्रीलंका हा देश आता सावरू लागला आहे. श्रीलंकेच्या लष्करानं ‘एलटीटीई’चा पाडाव केल्यानंतर एप्रिलमध्ये ईस्टर ॲटॅकनं या देशाला पुन्हा हादरा दिला. मात्र, त्यातूनही हा देश आता सावरला आहे. तिथलं पर्यटन पुन्हा फुलायला लागलं आहे. या देशातली सुरक्षाव्यवस्था आणि पर्यटनाची स्थिती कशी आहे याचं दर्शन घडवण्यासाठी श्रीलंका सरकारनं काही माध्यम प्रतिनिधींना नुकतंच आमंत्रित केलं होतं. त्या भेटीवर आधारित निरीक्षणं.

निसर्गानं दिलेलं भरभरून सौंदर्य, अत्यंत कमी भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेनं प्रचंड दहशतवाद सोसला. किमान चार दशकं लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलमचा (एलटीटीई) दहशतवाद या देशानं सहन केला. ‘एलटीटीई’चा पाडाव केल्यानंतर या वर्षी ईस्टर ॲटॅकनं पुन्हा हादरलेला श्रीलंका अत्यंत कमी कालावधीतच सावरला असून, गरूड भरावी घेण्यास सज्ज झाला आहे. संकटातून सावरल्यानंतर श्रीलंकेची चोख सुरक्षाव्यवस्था आणि परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करणाऱ्या श्रीलंका सरकारनं भारतातल्या मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना नुकतंच आमंत्रित केलं होतं. त्यावेळी तिथल्या सुरक्षाव्यवस्थेची चुणूक दिसून आली.

सन २००९ मध्ये श्रीलंकेच्या लष्करानं एलटीटीईचा म्होरक्‍या व्ही. प्रभाकरन याला जाफनाजवळच्या जंगलात मारलं आणि सुमारे चाळीस वर्षांपासूनचा एलटीटीईचा उच्छाद कायमचा संपवला. मात्र, गेल्या एप्रिलमध्ये श्रीलंकेत २७ वर्षांतला सर्वांत भयंकर दहशतवादी हल्ला झाला. एप्रिलमध्ये ईस्टरच्या दिवशी हा हल्ला झाला. सुमारे सहा तासांत राजधानी कोलंबो, नेगोम्बा आणि बट्टिकालोवात आठ स्फोट झाले. अतिरेक्‍यांनी तीन चर्च आणि तीन पंचतारांकित हॉटेल्सना लक्ष्य केले. अन्य एक स्फोट निवासी इमारतीत तर दुसरा मंगल कार्यालयात झाला. स्फोटांच्या या मालिकेत शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत तेरा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर मात्र श्रीलंका सरकारनं नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेबाबत मोठी खबरदारी घेतली आहे. सेंट अँथनी चर्चला भेट दिली असता काही महिन्यांपूर्वी तिथं अशी भीषण घडल्यासारखं अजिबात वाटलं नाही. कारण तीनच आठवड्यांत श्रीलंका नौदलानं चर्चचं बांधकाम जसंच्या तसं पूर्ण करून दिलं. सध्या नौदालाचा बंदोबस्त असला, तरी पूर्वीसारखीच तिथं दररोज प्रार्थना होत असल्याचं तिथले धर्मगुरू सांगतात.

कॅथलिक धर्मात इटलीमध्ये व्हॅटिकनच्या धर्तीवर बौद्ध धर्मात कॅंडी इथलं टूथ रेलीक टेंपल आहे. बुद्धांचा दात ठेवलेल्या देवळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरातले बौद्धधर्मीय या ठिकाणी आवर्जून भेट देतात. हे ठिकाणही शांत असल्याचं जाणवलं. पर्यटकांचा आणि आस्थावान लोकांचाही उत्साह कायम दिसला.
श्रीलंकेत हत्तीला मोठं महत्त्व आहे. पिन्नावला एलिफन्ट अभयारण्यात ऑर्फनेज आहे. सन १८७५ मध्ये प्रथमच जंगलात काही कारणांमुळं आईपासून दुरावलेल्या हत्तीच्या पिलांना ऑर्फनेजमध्ये संगोपनासाठी आणलं गेलं होतं. ही जागा अद्याप तशीच आहे. इथं दररोज अनाथ पिल्लं आणि जखमी हत्तींना सकस आहार देण्यात येतो. लहानांचं व्यवस्थित संगोपन केलं जातं. दिवसातून तीन वेळा सर्व हत्तींना तिथल्या ओया नदीवर आणलं जातं. भोंगा वाजल्यावर जागेवरून रांगेत रस्ता पार करून ते नदीवर येतात. नंतर पुन्हा भोंगा झाल्यावर नदीतून बाहेर येतात. दोन ते तीन हत्तींच्या गटांना रांगेतून दूध देण्यात येतं. नंतर हिरव्या चाऱ्यावर त्यांना सोडलं जातं. नंतर ते आपल्या मूळ ठिकाणी परतात. जगात फक्‍त श्रीलंकेतच अशा प्रकारचं संगोपन केंद्र असल्याचा दावा वनविभागाचे अधिकारी करतात.

रामायणातली ठिकाणं
समुद्रसपाटीपासून १८६४ मीटर उंचीवर ‘नुवारा एलिया’ हे एक डोंगराळ शहर आहे. १४ वर्षातून एकदाच उमलणाऱ्या ‘नेल्लू’च्या नावावरून या जागेचं नाव नुवारा एलिया पडलं. बारा महिने इथं पाऊस आणि ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळतो. रामायणातलं अशोकवन म्हणजे ते हेच नुआरा एलिया...तिथंच रांबोडा गाव आहे. रामायणातल्या उल्लेखानुसार, रावणानं सीतेला याच ठिकाणी ठेवलं होतं. इथं सीतामातेचं जुनं आणि नवं मंदिर आहे. बाजूलाच राम लक्ष्मण सीता यांचं एक मंदिर आहे. मागच्या बाजूनं नदी वाहते, सीतामाई इथं स्नान करत होत्या, अशी इथल्या लोकांची धारणा आहे. हनुमानानं इथंच सीतामाईंचा शोध लावल्याचं मानलं जातं. त्या नदीपलीकडं मोठ्या खडकावर मोठी खळगी आहेत. ती म्हणजे हनुमानाची पावलं असल्याचं मानलं जातं. स्थानिकांच्या धारणेनुसार, हनुमानानं लंका जाळल्याची साक्ष म्हणजे डोंगरावर काही ठिकाणी दिसणारी काळी माती. भारतीय पर्यटकांना डोळ्यांसमोर ठेवून या विलक्षण ठिकाणाचा कायापालट करण्याचा श्रीलंका सरकारचा मानस आहे. रामायणात श्रीलंकेतल्या ज्या ठिकाणांचा उल्लेख येतो, त्या ऐतिहासिक ठिकाणांच्या भेटी घडवून आणण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून श्रीलंका पर्यटन विभागातर्फे ‘रामायण ट्रेल’चं आयोजन करण्यात येतं. यात अशोक वाटिका, मंदोदरी महाल, सीता मंदिर, रावण लेणी; तसंच रावण धबधबा, उस्सनगोडा इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. या ट्रेलला भारतीयांकडून चांगला प्रतिसादही मिळत असल्याचं श्रीलंकेचे पर्यटनमंत्री जॉन अमरतुंगा यांनी सांगितलं.

‘सिलोन रेडिओ’च्या सुश्राव्य आठवणी
भारतीयांच्या दृष्टीनं सर्वांच्या जुन्या आठवणीचं ठिकाण म्हणजे ‘सिलोन रेडिओ.’ अमिन सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रम इथूनच प्रसारित व्हायचा. भारतात हेच रेडिओ स्टेशन ऐकायला मिळायचं. श्रीलंकेच्या राजधानीत कोलंबोत सिलोन रेडियो स्टेशन जसंच्या तसं आहे. लता मंगेशकर यांच्यासह अन्य जुन्या गायकांच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्‌स‌ अजूनही आहेत. सुमारे तीन लाख रेकॉर्ड्‌सचं जतन करण्यासाठी डिजिटायझेशनचं काम सुरू आहे. इथले ग्रंथपाल सुभाषिनी डिसिल्वा या रेकॉर्डचं जतन करत आहेत. कोलंबोतल्या या ठिकाणी भेट दिल्यावर जुन्या आठवणींना आपसूकच उजाळा मिळतो. अमिन सयानी यांचं सध्या वय ८६ वर्षं असून, ते वास्तव्यास मुंबईत आहेत. बिनाका गीतमालेच्या निमित्तानं श्रीलंका आणि भारत यांच्यात निर्माण झालेल्या संबंधांना उजाळा देण्यासाठी अमिन यांच्यासोबत मुंबईत एखादा कार्यक्रम आयोजित करण्याचा श्रीलंका सरकारचा मानस आहे. या कार्यक्रमाचं लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याचं श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्‍त चेंबरी रॉड्रिगो यांनी सांगितलं.

लुनुगंगा गार्डनला प्रतिसाद
बेंटोटा इथलं लुनुगंगा गार्डन म्हणजे जाफ्री बावा यांचं निवासस्थान लक्षवेधी आहे. आशिया खंडातले नामवंत वास्तुविशारद म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची पर्यावरणपूरक स्केच जगप्रसिद्ध आहेत. जाफ्री बावा यांच्या निधनानंतर लुनुगंगा गार्डनची देखभाल त्याच नावाच्या ट्रस्टकडून केली जाते. सध्या श्रीलंकेचं नवीन संसद भवन आणि कोलंबोतल्या काही पंचतारांकित हॉटेल्सचं बांधकाम जाफ्री बावांच्या स्केचनुसार करण्यात आलं आहे. या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे जगभरातले विद्यार्थी इथं आवर्जून भेट घेतात. विद्यार्थी म्हणून अनुभव घेण्याच्या दृष्टीनं ज्ञानात भर टाकण्यासाठी हे ठिकाण महत्त्वाचं असल्याचं तिथं आलेल्या पर्यटकांनी सांगितलं.

निळाशार समुद्र, हिरवाईनं नटलेले डोंगराळ प्रदेश, खोल दऱ्या असलेला श्रीलंका हे आशियातलं सुंदर ठिकाण आहे. संपूर्ण देशातले चकाचक रस्ते, स्वच्छतेबाबत कमालीची जनजागृती असलेल्या या देशातलं साक्षरतेचं प्रमाण ९७ टक्‍के इतकं आहे. प्रत्येक नागरिक स्वत:  कचरा होऊ देत नसल्यानं स्थानिक प्रशासनाला कचरा उचलण्याचं कामच शिल्लक नसल्याचं इथले नागरिक सांगतात. एकूणच, भारतीय हिंदू साहित्यानुसार रामायणातला रावण हा लंकेचा राजा असल्याचा लौकिक आणि त्याचबरोबर श्रीलंकेत बौद्ध धर्म आणि संस्कृतीचा प्रचार- प्रसार सुरू असल्यानं आणि या सगळ्याला निसर्गसौंदर्याची आणि उत्तम व्यवस्थेची जोड मिळत असल्यानं भारतीयांच्या दृष्टिकोनातून श्रीलंका हे एक धार्मिक आणि पर्यटन डेस्टिनेशन म्हणून आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. दहशतवादाचे हादरे या देशाला यापूर्वी खूप बसले आहेत आणि ईस्टर ॲटॅकसारखी एखादी घटना सगळं वातावरण ढवळून टाकत असली, तरी तिथल्या लोकांनी त्या दहशतीला झुगारून दिल्याचं दिसतं. एखाद्या पाचूसारखं या देशाला आता सुरक्षेचं आणि तिथल्या लोकांच्या आत्मीयतेचंसुद्धा कोंदण लाभलं आहे.

श्रीलंकेची थोडक्यात ओळख
: भाषा : सिंहली आणि तमीळ

: जुनं नाव : सिलोन
: श्रीलंका आणि भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ किलोमीटर रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्‍चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर आणि पूर्वेकडं बंगालची खाडी आणि दक्षिणेकडं हिंदी महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत.
क्षेत्रफळ : ६५,६१० किलोमीटर
: लोकसंख्या : अंदाजे २ कोटी १० लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com