आवर्त (सुधीर सेवेकर)

sudhir sevekar
sudhir sevekar

बूट काढून, पाय धुऊन सुहासनं मंदिरात प्रवेश केला. नंदादीपाच्या मंद प्रकाशात नागेश्‍वराचे डोळे लुकलुकत होते. जणू सुहासच्या येण्यानं नागेश्वराला आनंद झाला होता! नागेश्‍वराच्या शिळेला नमस्कार करून सुहास तिथंच बसून राहिला. मंत्रमुग्ध झाल्यासारखा...

शासनानं नव्यानेच बांधलेली पाण्याची उंच टाकी लांबूनच दिसू लागली आणि नवं देवखेड गाव जवळ येत चालल्याचं सुहासच्या लक्षात आलं. नव्या देवखेडला जाण्यासाठी डांबरी सडक झाली आहे.
आता परिस्थिती बदलली आहे हे दुतर्फा बहरलेल्या ऊसबागायतीवरून समजत होतं. एकेकाळी जेमतेम पाऊस पडणारा देवखेडचा परिसर धरणामुळं आता हिरव्यागार ऊसबागायतीनं फुललेला होता. केवळ पीकपरिस्थितीच नव्हे तर एकूणच सगळा परिसर गेल्या चाळीस वर्षांत अनेक संदर्भांत पार बदलून गेला आहे.
सुहासला आठवलं, त्याच्या लहानपणी देवखेड आणि पंचक्रोशीत बाजरीचंच पीक प्रामुख्यानं घेतलं जाई. त्याची कारणं म्हणजे, बाजरीला पाणी फार कमी लागतं आणि सत्तर-ऐंशी दिवसांत पीक हाती येतं. त्यामुळे गरीब शेतकऱ्याचं आवडीचं पीक म्हणजे बाजरी हेच होतं.

‘सर्वाधिक बाजरी पिकवणारा जिल्हा’ अशीच त्याच्या जिल्ह्याची राज्यात एकेकाळी ओळख होती. मात्र, चाळीस वर्षांपूर्वी धरण झालं, कालवे काढले गेले आणि बघता बघता देवखेडचा जिरायती परिसर ऊस आणि अन्य फळपिकांच्या बागायतीनं बहरून गेला. हे सगळं घडलं ते गोदामाईवर बांधलेल्या त्या मोठ्या धरणामुळे. गोदामाईवर मोठं धरण झालं. शेकडो गावं, वाड्या-वस्त्या, देवळं, आमराया आणि हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली गेलं. नकाशावरून कायमचं पुसलं गेलं. वाहत्या, खळाळत्या गोदामाईचं रूपांतर एका फार मोठ्या जलाशयात झालं. धरणाचा हा पाणपसारा शेकडो चौरस किलोमीटर पसरलेला आहे.

बालपणी याच वाहत्या खळाळत्या गोदामाईच्या प्रवाहात सुहासला त्याच्या आजोबांनी पोहायला शिकवलं होतं. त्या आठवणी; विशेषतः गोदामाईच्या आणि आजोबांच्या आठवणी, म्हणजे सुहासच्या आयुष्यातला सर्वात मोलाचा ठेवा आहेत. आजोबा देवखेडचे दीर्घ काळ सरपंच होते. पंचक्रोशीत त्यांना मोठा मान होता. गोदामाईवर धरण बांधण्याचा निर्णय झाल्यावर सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची वर्दळ परिसरात वाढली. देवखेडपासून काही किलोमीटरवरच त्या धरणाचं काम चालणार होतं. परिणामी, बऱ्याचशा सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा राबता सुहासच्या वाड्यावरच असे. शासकीय यंत्रणा जोरात कामाला लागली होती. धरणामुळे शेकडो गावं, हजारो लोक विस्थापित होणार होते. मोजमाप करून जमिनी ताब्यात घेणं, त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना देणं, जागा रिकाम्या करून घेणं, ज्या गावांत पुनर्वसन करायचं आहे त्यासाठी योग्य अशी जागा शोधणं, ती विकसित करणं अशी अनेक कामं एकाच वेळी सुरू झाली आणि एरवी शांत-निवांत असलेल्या देवखेडमध्ये एकच धामधूम सुरू झाली.

बालपणी जवळून पाहिलेली ती धामधूम सुहासला आत्ता जशीच्या तशी आठवली आणि त्याला आठवला दाम्या! दाम्या साधारणतः त्याचाच वयाचा. त्याचे वाडवडील सुहासच्या शेतीवर सालगडी म्हणून राबायचे. शेतावरच वस्तीला असायचे. दाम्यावर आजोबांचा फार जीव. त्यानं शिकावं म्हणून आजोबांनी त्याला शाळेतही घातलं होतं; पण दाम्यानं दोन-चार वर्षं कशीबशी शाळेत काढली; पण पठ्ठ्या पुढं फार काही शिकला नाही तो नाहीच.

शेतीकामात मात्र दाम्या वाघ होता; विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा गोदामाईचं पाणी कमी होई तेव्हा गोदामाईच्या उघड्या पडलेल्या वाळवंटी पात्रात खरबूज-टरबुजाचे वेल लावून त्यांचं उत्पन्न काढण्यात दाम्या मोठा वाकबगार होता. नदीपात्रातल्या खरबूज-टरबुजाच्या शेतीला ‘वाडी’ म्हणतात. आजोबांना दाम्याचं भारी कौतुक.
वाड्याच्या ओट्यावर उभं राहून आजोबांनी ‘दाम्याऽऽ’ अशी खणखणीत आवाजात हाळी दिली की दाम्या असेल तिथून तीरासारखा आजोबांच्या समोर येऊन उभा राही. सुहासच्या आजोबांनी वा त्यांच्या पूर्वजांनी कधीही दाम्याला वा त्याच्या कुटुंबीयांना सालगड्यासारखं वागवलं नाही. दर पोळ्याला सगळ्या कुटुंबाला आजोबा पोशाखाचे दोन दोन जोड देत असत. इतर शेतमालकांपेक्षा आजोबा त्यांना शेतमालात वाटाही जास्त देत. आजोबांचा करारी; परंतु परोपकारी स्वभाव देवखेडच्या पंचक्रोशीत सगळ्यांना माहीत होता. त्यामुळं त्यांना सर्वत्र मान असे. त्यांनी निवडणूक लढवावी असं अनेक राजकीय पक्ष त्यांना सुचवत; परंतु निवडणुका, त्यानिमित्तानं पडणारे गट-तट, जातीयतेचं विषारी वातावरण या सगळ्यापासून आजोबा जाणीवपूर्वक चार हात लांब राहिले ते शेवटपर्यंत. मात्र, देवखेडचे ग्रामस्थ त्यांना बिनविरोध सरपंच करत म्हणून ती जबाबदारी तेवढी त्यांनी अनेक वर्षं चोखपणे पार पाडली.
वडिलांचं आणि आजोबांचं मात्र एकमेकांशी फार सख्य नव्हतं हेही सुहासला आठवलं. हे सख्य नसण्याचं मुख्य कारणही ते होऊ घातलेलं धरण हेच होतं. या धरणप्रकल्पामुळे शेतजमिनीचे, वाड्याचे, जमीनजुमल्याचे जे पैसे मिळतील ते घेऊन आपण सगळ्यांनी आता शहरात जावं असं सुहासच्या वडिलांचं मत होतं. आजोबा मात्र असं करायला बिलकूल तयार नव्हते.
शेवटी एके दिवशी या वादाचा स्फोट झालाच.
‘‘मी माझ्या कुटुंबासह शहरात जायचं ठरवलंय,’’ सुहासच्या वडिलांनी एके दिवशी धीर करून आजोबांना म्हटलं. आजोबा नागेश्‍वराच्या देवळात पूजा करून नुकतेच वाड्यावर परतले होते. नागेश्‍वर हे सुहासच्या कुटुंबाचं कुलदैवत. त्या काळी गोदामाईच्या काठावर अनेक टुमदार, हेमाडपंती प्राचीन शिवमंदिरं होती. मुक्तेश्‍वर, सोमेश्‍वर, नागेश्‍वर अशी...त्यात नागेश्‍वराचं देऊळ काहीसं वेगळं होतं. कारण, इथं शंकराची पिंडी, नंदी हे काही नव्हतं. होती एक साडेतीन फूट उंचीची काळीकुळकुळीत शिळा आणि फणा काढलेली उभ्या स्थितीतली नागाची मूर्ती त्या शिळेवर कोरलेली होती. नागेश्वराच्या फण्यावरचे डोळे लुकलुकत आहेत...ते डोळे आपल्याकडे पाहत आहेत असंच सुहासला बालपणी वाटे. नागेश्‍वरासमोर पद्मासन घालून ध्यानधारणा करताना त्यानं आजोबांना अनेकदा पाहिलं होतं.

वडिलांच्या वाक्‍यावर आजोबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही; पण त्यांना हा निर्णय आवडलेला नाही हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होतं.
‘‘नाहीतरी देवखेड आता पाण्याखालीच जाणार आहे. अनेक जण गाव सोडून जात आहेत. मीही जातोय...तिकडं शहरात मला नोकरीही मिळाली आहे. सुहास आत्ताशी कुठं शाळेत जायला लागला आहे, तेव्हा आत्ताच शिफ्ट होणं कधीही चांगलं, म्हणून मी तसं ठरवलंय!’’
वडिलांनी त्यांची बाजू मांडली.
आजोबा शांतपणे ऐकत होते.
‘‘आपल्या कुलदैवताच्या - नागेश्‍वराच्या - कुलाचारांचं काय?’’ आजोबांनी थोड्या वेळानंतर धीरगंभीर आवाजात वडिलांना प्रश्‍न केला. त्यांचा हा प्रश्‍न वडिलांना बहुधा अनपेक्षित असावा.
‘‘अहो पण, आता नागेश्‍वर राहणारच कुठाय? सगळा गाव पाण्याखाली जातोय. देवळं पाण्याखाली जात आहेत. नागेश्‍वरही पाण्याखाली जाईल. आपल्या हातात काही आहे का?’’
आजोबांना उत्तरादाखल वडिलांनी प्रतिप्रश्‍न केला.
त्यावर मात्र आजोबांचा चेहरा रागानं लालेलाल झाला होता हेही सुहासला आठवलं.
‘‘मी नागेश्‍वराला पाण्याखाली जाऊ देणार नाही!’’ आजोबांनी कणखर स्वरात उत्तर दिलं.
ते म्हणाले : ‘‘मी नागेश्‍वराला पुनर्वसित देवखेडमध्ये नेईन. तिथं त्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करेन आणि या देहात प्राण असेपर्यंत मी नागेश्‍वराची सेवा करण्यात घालवीन. पेशवे सरकारांनी आपल्या पूर्वजांना देवखेडमधल्या सगळ्या देवळांच्या रक्षणाची जबाबदारी दिलेली आहे. गोदामाईच्या पलीकडे निजामी राजवट होती. तीपासून देवखेडचं रक्षण करण्यासाठी आपल्या शूरवीर पूर्वजांना पेशवे सरकारांनी मोठ्या विश्‍वासानं इथं पाठवलं. ती जबाबदारी पूर्वजांनी चोखपणे पार पाडली, मीही तीत खंड पडू देणार नाही!’’

आजोबांनी त्यांचा निर्धार व्यक्त केला आणि शेवटपर्यंत त्यांनी तो पारही पाडला. सुहासचे वडील सुहाससह शहरात स्थलांतरित झाले ते कायमचेच. बालपणीचं गोदामाईकाठचं देवखेड, आजोबा, नागेश्‍वर हे सगळं सुहासच्या डोळ्यांसमोर एखाद्या सिनेमासारखं उभं राहिलं.
‘श्रीक्षेत्र देवखेड (पुर्नवसित) आपलं सहर्ष स्वागत करत आहे’
एका मोठ्या कमानीवरच्या अक्षरांनी सुहासचं लक्ष वेधलं गेलं. त्यानं गाडी कमानीतून आत घातली. नागेश्‍वराच्या देवळाचं शिखर आता त्याला दिसू लागलं. आजोबांनी खरोखरच नागेश्‍वराला नवीन गावात आणलं होतं. आता त्याचं एका मोठ्या मंदिरात, भक्तनिवास वगैरेमध्ये रूपांतर झालं होतं. ग्रामस्थांनी मंदिरानजीक आजोबांची समाधीही मोठ्या श्रद्धेनं बांधली होती. कशी कोण जाणे पण ‘मूल-बाळ नसणाऱ्यांना मूल देणारा देव’ म्हणून या नागेश्‍वराची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्यामुळे इथं भक्तांची गर्दी वाढली होती, ओघानंच देवस्थानचं उत्पन्नही वाढलं होतं. त्यातून अनेक सेवा-सुविधाही तिथं उभ्या केल्या गेल्या होत्या. बूट काढून, पाय धुऊन सुहासनं मंदिरात प्रवेश केला. नंदादीपाच्या मंद प्रकाशात नागेश्‍वराचे डोळे लुकलुकत होते. जणू सुहासच्या येण्यानं नागेश्वराला आनंद झाला होता! नागेश्‍वराच्या शिळेला नमस्कार करून सुहास तिथंच बसला. मंदिराच्या गाभाऱ्याच्या कानाकोपऱ्यातून आपले सगळे पूर्वज आपल्याला पाहत आहेत असा त्याला भास झाला! ते डोळे नागेश्‍वराचे नाहीत, ते आपल्या आजोबांचे आहेत...खापरपणजोबांचे आहेत...समस्त पूर्वजांचे आहेत असं सुहासला वाटू लागलं! या सर्व पूर्वजांनी नागेश्‍वराची सेवा करत करत याच भूमीत आपला देह ठेवला. त्यांची राख याच मातीत मिसळलेली आहे. आपली नाळही याच भूमीत पुरलेली आहे. नागेश्‍वर आपल्याला साद घालतोय...म्हणतोय : ‘वत्सा, हीच तुझी भूमी. इथंच तुला मुक्ती मिळणार आहे. या भूमीशी पुन्हा एकदा स्वतःला जोडून घे. तुला जीवनाची कृतार्थता उमगेल. इथल्या झाड-झडोऱ्यातून, पिकातून, पाना-फुलांतून तुझेच पूर्वज पुनःपुन्हा जन्म घेत आहेत. नागेश्‍वराची सेवा करत आहेत. त्या सगळ्यांचे कृपाशीर्वाद हवे असतील तर तू पुन्हा एकदा स्वतःला या भूमीशी जोडून घे!’ अशा एक ना दोन कितीतरी विचारांनी, कल्पनांनी सुहासच्या भारावलेल्या डोक्‍यात, मनात पिंगा घालायला सुरवात केली होती. कितीतरी वेळ सुहास त्याच अवस्थेत गाभाऱ्यात नागेश्‍वरासमोर मंत्रमुग्ध झाल्यासारखा बसून होता. शेवटी, त्यानं मनाशी पक्कं केलं....‘होय, इथंच माझ्या जीवनाची कृतार्थता आहे. मी या भूमीशी मला जोडून घेतलं पाहिजे.’

सुहासनं हा विचार पक्का केला आणि त्याला खूप खूप शांत, सुखी-समाधानी, तृप्त झाल्यासारखं वाटू लागलं. मनातला आवर्त आता निवळला होता. कल्लोळ-कोलाहल शांत झाला होता...आणि, आणि नागेश्‍वर मंदपणे हसत होता...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com