esakal | ‘आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास’ (सुनंदन लेले)
sakal

बोलून बातमी शोधा

sunandan lele

कोरोनाच्या साथीमुळे लहान मुलं मैदानावर जाण्यापासून वंचित आहेत. विशेषतः शहरी पालकांची मानसिकता बघता परिस्थिती ‘आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास’ अशी झाली आहे. एकीकडे ही स्थिती असताना वेगवेगळ्या खेळाडूंनी आणि संबंधित यंत्रणांनी त्यावर मार्ग काढायला सुरवात केली आहे.

‘आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास’ (सुनंदन लेले)

sakal_logo
By
सुनंदन लेले

कोरोनाच्या साथीमुळे लहान मुलं मैदानावर जाण्यापासून वंचित आहेत. विशेषतः शहरी पालकांची मानसिकता बघता परिस्थिती ‘आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास’ अशी झाली आहे. एकीकडे ही स्थिती असताना वेगवेगळ्या खेळाडूंनी आणि संबंधित यंत्रणांनी त्यावर मार्ग काढायला सुरवात केली आहे.

‘आय अ‍ॅम सो डिप्रेस्ड यार... वी लॉस्ट यस्टर्डे अँन्ड बीकॉज ऑफ दॅट वी आर गोईंग टू बी नंबर २ टू रियाल यार... धिस इज नॉट ऑन... ’ हा संवाद माझ्या कानावर आला आणि मी चपापलो. बार्सिलोना फुटबॉल क्लब स्पॅनिश लीग स्पर्धेतील सामना हरले आणि लियो मेस्सी फॅन्सना निराशेनं घेरलं. मनात विचार आला, की पेठेत राहणारी मुलं टपरीवर चहा पिताना जर हे संवाद करू लागली, तर गोष्ट चांगली आहे का गंभीर तुम्हीच सांगा. तेव्हाच मला एक मार्मिक कार्टून आठवलं- ज्यात तो छोटा मुलगा नेमका तोच धक्का त्याच्या वडिलांना देतो. त्याच्या दृष्टीनं लहानपणापासून ऑलिंपिकचं स्वप्न फक्त चांगलं खेळून देशातर्फे नव्हे, तर प्रेक्षक म्हणून जाऊन बघण्यापुरतं मर्यादित असतं.

एकदिवसीय क्रिकेट सामने बघताना भारतात कुठंही गेलं, तरी मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं असतं. तीच गोष्ट आयपीएलच्या सर्व सामन्यांची असते. प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा या स्पर्धेला मिळतो. म्हणजेच भारत खेळप्रेमी देश नक्कीच आहे. खटकणारी बाब इतकीच, की हे प्रेम खेळ बघण्यापुरतं जास्त आहे आणि प्रत्यक्ष खेळण्यापुरतं कमी. एक जमाना असा होता, की शाळकरी मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीची आतुरतेनं वाट बघायची. विविध खेळांची मैदानं चिमुकल्यांनी भरून जायची. सर्व पोहण्याचे तलाव नव्यानं पोहणं शिकणार्‍या मुला-मुलींनी भरून वाहू लागायचे. गावाकडच्या लेकरांकरता असले लाड नसले, तरी त्यांचं त्याच्यावाचून काही अडायचं नाही. त्यांना उड्या मारायला तलाव नसला तरी विहिरी होत्या. मैदानं नसली, तरी मोकळी ढाकळी माळरानं होती. आधुनिकीकरणाच्या नावाखाली यातले काही आनंद आपण उगाच हिरावून बसलो आहोत, याचं वाईट वाटतं.

अभ्यासातल्या तीव्र स्पर्धेमुळे खासकरून शहरातले पालक आपापल्या मुला-मुलींना मनसोक्त खेळू देत नाहीत. परिणामी शहरांतली बरीच शाळकरी मुलंही चांगलीच आळशी बनत चालली आहेत. चालताना त्यांचे पाय फताडे पडतात आणि अगदी लहान वयात ढेरी डोकावू लागते. काही महान पालक ‘आमची मुलं खात्यापित्या घरची दिसायला नकोत का’, असं म्हणत तंदुरुस्तीला लागलेल्या सुरुंगाकडे दुर्लक्ष करतात तेव्हा हबकायला होते. कोविड१९ महासाथीनं तर परिस्थिती ‘आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास’ अशी करून टाकली आहे- कारण खेळांची मैदानं ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीतच बंद ठेवावी लागली आहेत. अगोदरच शहरांतले पालक मुलांची गरज नसताना जास्त काळजी घेतात. मग कोविड१९चं भय त्यांना अजून कोषात ढकलत आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. राज्याचं किंवा देशाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू मार्ग काढून सरावाला लागले आहेत. प्रश्न उरतो लहान लहान मुला-मुलींचा. त्यांच्या खेळ प्रेमाचं काय होणार याचं काहीसं भय वाटत आहे.

सामान्य जनतेला खेळाच्या मैदानापासून लांब राहावं लागत असताना भारतातले दर्जेदार खेळाडू काय करत आहेत आणि खेळाच्या जगताला हळूहळू जाग कशी येत आहे याच्याकडे नजर टाकली की मनातली निराशा किंवा मरगळ दूर होते.

नवीन तारखा जाहीर
टोकियो ऑलिंपिक्सच्या नवीन तारखा घाबरत घाबरत जाहीर झाल्या. आता २३ जुलै २०२१ला टोकियो शहरात ऑलिंपिक्स चालू होणार असं सांगितलं गेलं आहे. साहजिकच जगातल्या तमाम खेळाडूंना नव्यानं सर्वांत मोठ्या स्पर्धांचे वेध लागले. परदेशात बहुतांशी खेळाडूंनी आपापली तयारी नेटानं परत सुरू केली. ‘भारतीय खेळाडूंनाही सरावापासून रोखणं योग्य होणार नाही...त्यांना खेळू दिलं पाहिजे’, अशी घोषणा करून क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी योग्य पवित्रा घेतला.
सन २०१८ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची भरारी मारणार्‍या टेबलटेनिस स्टार मनिका बत्रानं पुण्यात जोरदार सराव चालू ठेवला आहे. सन २०२१ मध्ये होणार्‍या टोकियो ऑलिंपिक्स स्पर्धेत मनिकाला सुधारीत कामगिरी करून रियो ऑलिंपिक्सच्या स्मृती पुसायच्या आहेत. पी. व्ही. सिंधूला अजून गोपीचंद अकादमीत जाऊन बॅडमिंटनचा सराव करता येत नाहीये. घरी उभारलेल्या संकुलात जास्तीतजास्त व्यायाम करून तंदुरुस्तीची पातळी वरच्या स्तरावर घेऊन जायला सिंधू झटत असल्याचं समजलं. तिकडे मेरी कोम आपल्या नेहमीच्या पद्धतीनं मणिपूरच्या इंफाळ गावी तयारीला लागली आहे.

टारगेट ऑलिंपिक्स पोडियम स्कीम
भारतीय क्रीडा प्राधिकरणानं खूप अभ्यास करून गेली काही वर्षं टारगेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (टॉप्स योजना) जाहीर करून ऑलिंपिक स्पर्धेत पदक कमावू शकणार्‍या संभाव्य खेळाडूंची यादी पक्की करून त्यांना सर्वतोपरी साह्य करायला सुरुवात केली. या गुणवान खेळाडूंना सराव किंवा प्रशिक्षणाबरोबर आहार, व्यायाम वगैरे कोणत्याच प्रांतात साह्य मिळवायला कष्ट पडून नयेत आणि त्यांना आपलं लक्ष खेळातल्या सुधारणेवर केंद्रित करता यावं हा या योजनेमागचा उद्देश आहे.
टॉप्स नावानं जाणल्या जाणार्‍या या योजनेत भारतातले सगळे दर्जेदार खेळाडू सामील केले आहेतच वर पॅरा अ‍ॅथलीट्सकरताही हीच योजना लागू करण्यात आली आहे, हे कौतुकास्पद आहे. इतकंच नाही तर भविष्याकडे नजर कायम ठेवताना क्रीडा प्राधिकरणानं ८५ होतकरू अ‍ॅथलिट्सना टॉप्स डेव्हलपमेंट गटात सामावून घेतलं आहे. थोडक्यात नुसतीच २०२१ टोकियो ऑलिंपिक्स स्पर्धेकडे क्रीडा प्राधिकरणानं नजर ठेवलेली नाही, तर २०२४ ऑलिंपिक्स स्पर्धांवरची नजर अजून पक्की केली आहे. क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी संदीप प्रधान नेटाने ध्येयाकडे वाटचाल करताना दिसत असल्यानं विश्वास वाढतो आहे.

आयपीएलचे पडघम
महासाथीच्या विळख्यानं २०२० या वर्षात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवणं अशक्य आहे हे स्पष्ट कळत असताना खूप आढेवेढे घेऊन आयसीसीनं शेवटी २०२०चा टी-२० वर्ल्डकप पुढे ढकलण्याची अधिकृत घोषणा केली. यात वाइटातून चांगलं असं होताना दिसत आहे, की २०२० ची आयपीएल स्पर्धा भरवण्याकडे बीसीसीआयने ठोस पावलं उचलली आहेत. अगोदर मुंबई हे एकच सेंटर कायम करून चार मैदानांवर आयपीएल स्पर्धा भरवण्याचा विचार केला गेला. मुंबईतली वानखेडे- बे्रबॉर्न, नवी मुंबईचं
डी. वाय. पाटील स्टेडियम आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचं स्टेडियम अशी चार मैदानं पक्की करून ८ संघाच्या राहण्याचा सुरक्षेचा आणि कमीतकमी कराव्या लागणार्‍या प्रवासाचा विचार केला गेला. मुंबई, पुण्यातल्या कोविड १९ परिस्थितीत कोणतीच सुधारणा होताना दिसली नाही म्हणल्यावर तो विचार मागं पडला.

ज्या शहरांत आयपीएल संघ आहेत त्यापैकी मुंबई, चेन्नई, बेंगलोर, दिल्ली आणि कोलकाता या चार शहरातील कोरोना साथीची परिस्थिती भयानक असल्यानं बीसीसीआयसमोर २०२० वर्षातली आयपीएल स्पर्धा भारताबाहेर भरवण्यावाचून पर्याय उरला नाही. बीसीसीआयने भारत सरकारकडे २०२० आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये भरवण्याकरता रीतसर परवानगी मागितली आहे. दुसरीकडे स्पर्धेच्या तारखांवरून स्टार स्पोर्टस् कंपनीनं नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयला स्पर्धा संपवून भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पाठवण्याची घाई करावी लागत आहे- कारण ऑस्ट्रेलियात पोचल्यावर संघाला १४ दिवस विलगीकरत घालवावे लागणार आहेत. स्टार स्पोर्ट्सला कसंही करून २०२०ची आयपीएल स्पर्धा दिवाळीपर्यंत ताणायची आहे. या हट्टामागे मुख्य उद्देश जास्ती जास्त जाहिराती गोळा करून महासाथीत झालेलं अर्थकारणाचं नुकसान भरून काढणं हा आहे. तसं बघायला गेलं, तर प्रचंड पैसा गुंतवणार्‍या स्टार स्पोर्ट्स कंपनीला न्याय मिळायला हवा असंही वाटतं- कारण त्यांना प्रत्येक आयपीएल सामन्यामागे ५५ कोटी रुपये द्यावे लागतात. म्हणजे प्रत्येक चेंडूमागे २३ लाख रुपये भरावे लागले आहेत. जर इतका प्रचंड पैसा कोणी गुंतवत असेल, तर त्याची भरपाई करण्याचा मार्ग स्टार स्पोर्ट्सनं बीसीसीआयकडे मागितला तर त्यात गैर काही वाटत नाही.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला एक आठवडा उशिरानं गेला, तर आयपीएल स्पर्धा दिवाळीपर्यंत ताणली जाऊ शकते. याला दोन मार्ग आहेत. एकतर ऑस्ट्रेलियातला पहिला सामना एका आठवड्यानं पुढं ढकलणं किंवा तोपर्यंत कोरोनाचं संकट आटोक्यात आलं, तर क्वारंटाईन करण्याचा अवधी १४ दिवसांवरून ७ दिवसांवर आणण्यात यावा. बीसीसीआय, स्टार स्पोर्टस् आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया तिघं मिळून या समस्येवर मार्ग काढायला धडपडत आहेत.

आयपीएल संघमालक आपापल्या संघांसाठी तयार करायला वेगवेगळ्या उपाय योजना करत आहेत. मुंबई इंडियन्स संघातल्या खेळाडूंनी जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर असलेल्या भव्य रिलायन्स संकुलातल्या हिरव्यागार मैदानावर क्षेत्ररक्षणाचा सराव ५-५ खेळाडूंना गोळा करून कधीच चालू केला असल्याचंही समजतं. थोडक्यात नामांकित क्रीडा स्पर्धा चालू होण्याअगोदरची ही शांतता आहे असं वाटतं. जगभरात हळूहळू खेळाचे सामने सर्व शक्य सुरक्षा पाळून चालू झाले आहेत. इंग्लंड वि. वेस्ट इंडीज कसोटी मालिकेतून संयोजक आणि खेळाडू बरेच काही शिकत आहेत- ज्याचा फायदा नव्यानं चालू होणार्‍या स्पर्धांना होणार आहे. खेळप्रेमी आपल्या लाडक्या खेळाचा आस्वाद घ्यायला आतुरले आहेत- कारण हा विरह कोणालाही सहन होत नाहीये.