निरीक्षणं देहबोलीची (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

खेळाडूंच्या देहबोलीचा अभ्यास अनेकदा खेळावर परिणाम करू शकतो. छोट्या शारीरिक हालचाली, सवयी यांतून खेळाडूंना त्यांचं धोरण ठरवता येतं. अगदी बारीकसारीक निरीक्षणं खूप मोठा परिणाम साधू शकतात. केन विल्यम्सनपासून जावेद मियॉंदाद यांच्यापर्यंतच्या अनेक खेळाडूंच्या देहबोलीशी संबंधित किस्से आणि चर्चा.

खेळाडूंच्या देहबोलीचा अभ्यास अनेकदा खेळावर परिणाम करू शकतो. छोट्या शारीरिक हालचाली, सवयी यांतून खेळाडूंना त्यांचं धोरण ठरवता येतं. अगदी बारीकसारीक निरीक्षणं खूप मोठा परिणाम साधू शकतात. केन विल्यम्सनपासून जावेद मियॉंदाद यांच्यापर्यंतच्या अनेक खेळाडूंच्या देहबोलीशी संबंधित किस्से आणि चर्चा.

न्यूझीलंड दौऱ्यावर आल्यापासून त्यांचा कर्णधार केन विल्यमसनची फलंदाजी बघणं, त्याचं निरीक्षण करणं याचा जणू मला छंद लागला आहे. जगात विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, ज्यो रूट यांच्या बरोबरीनं दादा फलंदाज म्हणून केन विल्यम्सनचं नाव आदरानं घेतलं जातं. मैदानावर आक्रमक खेळ करणार्‍या केन विल्यम्सनची मैदानावरची आणि मैदानाबाहेरची वागणूक नेहमीच आदर्शवत ठरली आहे. त्या अर्थानं तो वर नमूद केलेल्या चार खेळाडूंपेक्षा वेगळा आहे.

सरावादरम्यान बघितलं असता केन विल्यम्सन विराट कोहलीप्रमाणं स्टान्स घेण्याअगोदर बॅट हातात गरकन फिरवतो. ती त्याची लकब आहे. सरावादरम्यान लांबून पळणं सुरू करून मग गोलंदाजी करण्याच्या तयारीत असणाऱ्या वेगवान गोलंदाजाच्या चेंडूचा सामना करायला उभा राहिल्यावरही केन विल्यम्सन बॅट हातात मनगटानं फिरवताना दिसला, तेव्हा गंमत; तसंच आश्चर्य वाटलं.

सरावानंतर त्याला अनौपचारिकपणे भेटलो तेव्हा, ‘‘हाय मेट, हाऊ आर यू डुईंग,’’ केन म्हणाला. मग बोलण्यादरम्यान, स्टान्स घेतल्यावर आणि गोलंदाजानं पळणं सुरू केल्यावरही तो हातात बॅट फिरवत असल्याचं मी सांगितलं तेव्हा तो चकित झाला. ‘‘ओह माय गॉड...इज इट? मी प्रत्येक चेंडूला करतो का तसं?’’ असं विल्यम्सननं विचारलं, तेव्हा मला कळलं, की गोलंदाजानं पळणं सुरू केल्यावरही आपण बॅट अशी फिरवतो हे त्याला कळत नव्हतं. ‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना खास करून मिचेल स्टार्कचा सामना करताना तू अशी बॅट फिरवत होतास,’ असं निरीक्षण नोंदवलं, तेव्हा त्यानं आश्चर्यानं मान हलवली आणि म्हणाला : ‘‘थँक गॉड, चुकून बॅट उलटी असताना मी चेंडू खेळलो नाही.’’ त्यानंतर परत सरावानंतर केन विल्यम्सन भेटला, तेव्हा त्यानं अजून तो प्रकार सुरू आहे का असं विचारलं.

बोलण्यातून इतकंच समजलं, की सर्वोच्च स्तरावर खेळताना खेळाडू इतके दडपणाखाली म्हणा किंवा तंद्रीत असतात, की काही लकबी आपल्या अंगात घुसल्या आहेत हे त्यांना कळत पण नाही. एका अर्थानं ही विचारप्रक्रिया किंवा एकाग्रता राखण्याकरता केलेली गोष्ट असते. खेळाच्या भाषेत याला बॉडी लँग्वेज किंवा देहबोली म्हणू शकतो. मग एका मागोमाग एक असे देहबोलीचे किस्से आठवायला लागले. एक पत्रकार म्हणून जाणवलं, की देहबोलीतून खूप गोष्टींचा अंदाज येतो. बरेच खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूच्या देहबोलीचा अंदाज घेत सापळेही रचतात.
वेस्ट इंडीजचा महान माजी वेगवान गोलंदाज मार्शल ‘चेंज ऑफ पेस’ म्हणून आजच्या जमान्यातल्या गोलंदाजांप्रमाणं हळू चेंडू टाकायचा नाही. मार्शल उलट त्याच्या नेहमीच्या वेगापेक्षा वीस टक्के अधिक जोरात चेंडू टाकायचा. तीन-चार रपारप आखूड टप्प्याच्या चेंडूंचा अंगभेदी मारा केल्यावर मार्शल हा चेंडू टाकायचा आणि तोसुद्धा मुद्दाम पुढं टप्पा टाकायचा. अगोदरच्या तीन-चार चेंडूंवर जीव वाचवल्यानंतर पुढ्यात पडलेल्या वेगवान चेंडूला पाय पुढं टाकून खेळणं फलंदाजाला कठीण जायचं आणि तो पायचित किंवा बोल्ड व्हायचा. विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी मार्शलचं खूप निरीक्षण करून मग त्याची लकब हेरली होती.

एकदा कसोटी सामन्यात गावसकर आणि मोहिंदर अमरनाथ फलंदाजी करत असताना गावसकर यांनी मार्शल रनअप सुरू करत असताना मोहिंदरला सांगितलं : ‘‘जिमी, अगली गेंद खास तेज होगी.’’ आणि खरंच मार्शलचा पुढचा चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी होता- जो मोहिंदरनं बरोबर पाय पुढं काढून खेळला- जे मार्शलला अपेक्षित नव्हतं. असं अजून तीन वेळा घडलं, की गावसकरांनी चेंडू टाकायच्या अगोदर अमरनाथला सांगितलं तसाच पुढचा चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी असायचा. मार्शलला अपेक्षित यश त्या चेंडूनं दिले नाही. मालिका संपल्यावर मार्शल गावसकर आणि मोहिंदर अमरनाथबरोबर निवांत गप्पा मारत बसला असताना मोहिंदरनं गावसकर आपल्याला चेंडूअगोदर सूचित करायचे ती गोष्ट सांगितली. मग मार्शल गावसकरांना म्हणाला : ‘‘सनी...नाऊ वी आर नॉट प्लेइंग अगेन इन निअर फ्युचर... टेल मी हाऊ यू पीक्ड इट?’’ मग गावसकरांनी सांगितलं, की रनअप चालू करताना मार्शल पुढचा चेंडू वेगवान टाकायचा असला, की डाव्या हातानं आपलीच पँट किंचित वर ओढायचा आणि मग पळणं सुरू करायचा. जसं आपण बाह्या सरसावून भांडायला तयार होतो तसे. निरीक्षण करून गावसकरांनी ही गोष्ट जाणली होती. गंमतीचा भाग असा, की स्वत: मार्शलला आपण असं करतो आहोत आणि असा संदेश जणू काही स्वत:ला- दुसऱ्याला देत आहोत, हे माहीतच नव्हतं. गावसकर यांनी मार्शलच्या देहबोलीचं बरोबर निरीक्षण करून मोठ्या समस्येवर तोडगा काढला होता; तसंच आपल्या सहकाऱ्याला योग्यवेळी सूचना दिली होती.

जावेदच्या माकडउड्या
देहबोलीत सर्वांना चकवा देणाऱ्या अवलिया फलंदाज जावेद मियाँदादची अशीच एक कहाणी मला विकेटकीपर किरण मोरेनं सांगितली होती. सन १९९२ची विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात सुरू असताना भारत विरुद्ध पाकिस्तान लढत रंगात आली होती. जावेद मियाँदाद फलंदाजीला मैदानात आला, तेव्हा पाकिस्तानचे काही फलंदाज बाद झाले होते आणि दडपण वाढलं होतं. भारताचे फिरकी गोलंदाज खूपच मस्त गोलंदाजी करत होते. फिरकीला सहजी तोंड देणारा मियाँदाद दोन-तीन वेळा खेळताना साफ चकला होता. एकदा किरण मोरेनं पायचितचं अपील केलं असता, मियाँदादनं माकडउड्या मारून मोरेची चेष्टा केली होती. त्या वेळेबद्दल बोलताना किरण मोरे म्हणाला : ‘‘क्षेत्ररक्षण करताना नेहमी बडबड करून समोरच्या संघातल्या फलंदाजांचं लक्ष विचलित करणं जावेदला आवडायचं. त्या दिवशी तो स्वत: दडपणाखाली होता. मग त्यानं माझ्याशी बोलणं सुरू केलं तेव्हा मी ठरवलं, की आज त्याच्या कोणत्याच बोलण्याला प्रतिसाद द्यायचा नाही. त्याला कारण असं होतं, की दडपणाचं ओझं कमी करायला जावेद बोलायचा. मी मुद्दाम गप्प राहिलो- ज्यामुळं तो वैतागला. माकडउड्या मारूनही मी काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणल्यावर तो अजून चिडला. दडपण आणि सुंदर गोलंदाजीचा संगम घडला आणि थोड्याच वेळात जावेद बाद झाला. या प्रसंगातून मला इतकंच शिकायला मिळालं, की देहबोलीतून काय अर्थ काढायचा आणि कसं वागायचं ते.’’

फलंदाजाला वेगानं चेंडू टाकून शेकटवला, की वेगवान गोलंदाजाला मजा वाटते. क्रिकेट बॉल म्हणजे दगडापेक्षा कमी लागत नसल्यानं आघात होतो, तेव्हा कळ मस्तकात जाते; पण बरेचसे फलंदाज काहीच झालं नसल्याचं दाखवत उभे राहतात. या देहबोलीमागचे विचार काय असतात, असं मी अजिंक्य रहाणेला विचारलं. ‘‘मला डर्बनचा कसोटी सामना आठवतो- जेव्हा डेल स्टेन जबरदस्त मारा करत होता. अप्रतिम स्विंग करण्यासोबत डेल स्टेन मधूनच रपकन् आखूड टप्प्याचा चेंडू टाकायचा- ज्यामुळं अगोदर ठरवून पाय पुढं टाकून खेळणं अशक्य होतं. एकदा त्याचा जास्त आखूड टप्प्यावर न टाकलेला चेंडू नुसताच अपेक्षेपेक्षा उडाला नाही, तर टप्पा पडल्यावर झपकन् आत आला आणि माझ्या डाव्या बरगडीत आदळला. अगदी खरं सांगतो तुला, एक सेकंद चेंडू लागल्याच्या वेदनेनं माझा श्वास रोखला गेला; पण लहानपणापासून असं शिकलोय, की आघात नक्की कुठं आणि किती झाला आहे, ते प्रतिस्पर्ध्याला काही केल्या समजता कामा नये. तो चेंडू जोरदार बरगडीत बसला, तेव्हा वेदनेची कळ डोक्यात गेली; पण मी नुसताच ग्लोव्हज् नीट केल्याचं दाखवत त्याच्याकडे बघत उभा राहिलो. त्यानं डेल स्टेन वैतागला. त्याला बहुतेक मी विव्हळणं अपेक्षित होतं. मला येऊन तो म्हणाला : ‘मला कल्पना आहे, की तू दाखवत नसलास तरी हा चेंडू तुला जोरात लागला आहे. माझी पाठ वळल्यावर चोळलंस तरी चालेल.’ मी त्याचं बोलणं मनावर घेतलं नाही आणि आघाताकडं संपूर्णपणे दुर्लक्ष केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असताना कोणी कोणाला दयामाया दाखवत नसतो. झालेला आघात पचवून पुढं चांगला खेळ करायची हिंमत ठेवावीच लागते. एकही शब्द न बोलताही सकारात्मक देहबोलीतून खूप काही सिग्नल समोरच्या संघाला देता येतात,’’ अशी अजिंक्य रहाणेनं त्याची देहबोलीची कथा सांगितली.

आमच्याकडे अभिनय करतात
फक्त मैदानी खेळांमध्येच देहबोली दिसून येते, असं तुम्हाला वाटत असेल तर चूक आहे. कारण देहबोलीची सर्वांत कमाल कहाणी मला बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनं सांगितली होती. मी आनंदला विचारलं होतं, की मोठ्या सामन्यात तू समोरच्या खेळाडूच्या देहबोलीचं निरीक्षण करतोस का? आनंद म्हणाला : ‘‘देहबोलीतून काय अर्थ काढायचा, हे आमच्या खेळात जरा जिकिरीचं असतं. त्याचं कारण असं, की समोरचा खेळाडू कितीही अडचणीत असला, तरी तो वरून काहीच झालं नाही असं दाखवतो. तसंच खूप चांगल्या स्थितीत असताना उगाच अस्वस्थ असल्याचं दाखवू शकतो. म्हणजेच थोडक्यात आमच्या खेळातले खेळाडू अभिनय बेमालूम करू शकतात. दिसतं त्यावर गेलं, तर मोठी फसगत होऊ शकते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या खेळावर होऊ शकतो. कोणाला सांगू नकोस; पण मी फक्त देहबोलीच्या निरीक्षणावर विश्वास ठेवणं पसंत करत नाही. शक्य असलं, तर मी समोरच्या खेळाडूच्या श्वासोच्छ्वासावर हळूच लक्ष ठेवतो. मनातली घालमेल मला श्वासाच्या लयीतून समजते. त्यावर मला किंचित अंदाज करता येऊ शकतो.’’

या किस्से, कहाण्यांतून इतकाच बोध घेतला जाऊ शकतो, की रोजच्या जीवनात आपल्या देहबोलीतून समोरच्या माणसाला आपला खरा अंदाज कसा लागत असेल, याचा आपण विचार करावा. तसंच समोरच्या माणसाच्या देहबोलीतून काय अर्थ काढायचा हा अभ्यासण्याचा मला जणू छंद लागला आहे. मोठमोठ्या बाता मारणारा समोरचा माणूस प्रत्यक्षात खूप अडचणीत असू शकतो. आपली अडचण लपवायला तो आपण किती सुखात आहोत हे दाखवू शकतो. तसंच साधा लेंगा, बनियन घातलेल्या आणि देहबोलीनं अगदीच सामान्य दिसणाऱ्या माणसाच्या घरात छोटं गोदरेजचं कपाट भरून फिक्स्ड डिपॉझिट रिसिट आणि शेअर सर्टिफिकेटची थप्पी मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली आहे. तेव्हा देहबोली अभ्यासण्याची मजा तुम्हीपण लुटा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sunandan lele write cricket article