खेळाडूंचं वेगळेपण त्यांच्या दृष्टिकोनात (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

बहुतांशी वेळेला आपण सगळे कुणीतरी आपल्याला प्रोत्साहन देईल याच्या अपेक्षेत किंवा प्रतीक्षेत असतो. महान खेळाडूंचं नेमकं उलट असतं. ते स्वयंप्रेरित असतात. खेळाडूंना आपण करत असलेल्या परिश्रमातून काय मिळू शकतं याचा अंदाज असतो. मोलाची बाब म्हणजे फलप्राप्ती किंवा यश मिळायला विलंब झाला, तरी ते योजनाबद्ध मेहनतीत कसूर करत नाहीत. खूप प्रदीर्घ काळ मेहनत करत राहायची त्यांची मानसिक आणि शारीरिक तयारी असते. खेळाडू प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून प्रवास करतात. त्यांना परिणामांची चिंता नसते.

तुमच्या माझ्यासारख्या साध्या माणसांमध्ये आणि उच्च कोटीच्या खेळाडूंमध्ये नेमकं वेगळेपण काय असतं याचा शोध घेतला, तर दोन मुख्य गुण स्पष्ट दिसतात. एक म्हणजे आपल्या आणि महान खेळाडूंच्या विचारांत फरक असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे त्यांचं मन ठरवतं, ते त्यांचं शरीर बरोबर ऐकतं. अमेरिकेतल्या ओहायो विद्यापीठानं या विषयावर भरपूर अभ्यास आणि संशोधन केलं आहे. प्राध्यापक जॅक लिसिक यांनी मोठा शोधनिबंध लिहिला- ज्यात त्यांनी महान खेळाडूंच्या कामगिरीचं रहस्य नऊ वैचारिक गुणांत दडलं असल्याचं मांडलं आहे. तो शोधनिबंध वाचत असताना त्यांनी मांडलेले मुद्दे आणि खेळाचं वार्तांकन करताना डोळ्यासमोर आलेली उदाहरणं यांची माळ आपोआप गुंफली गेली.

१) दृष्टिकोन
ज्याला इंग्रजी भाषेत ‘अ‍ॅटिट्युड’ म्हटलं जातं, तो फार गंमतशीर प्रकार आहे. यशस्वी खेळाडूच्या ॲटिट्युडचं कौतुक होतं, तर अपयशी खेळाडूच्या ॲटिट्युडला शिव्यांची लाखोली मिळते. खेळाडूकडे हा दृष्टिकोन प्रकार काही जात्याच असतो, तर बहुतांशी वेळेला तो अनुभवानं आलेला असतो किंवा अंगीकारलेला असतो. खेळाडू सर्वोत्तम बनण्याकरता झटत असताना मी चूक करणारच नाही किंवा माझं प्रशिक्षकांनी चूक करू नये असा अट्टाहास धरत नाहीत. खेळातलं यश-अपयश आणि नेहमीचं जीवन यात योग्य अंतर कसं राखायचं याचं भान त्यांना असतं.
वेगळा दृष्टिकोन म्हणजे काय असतो याचं मजेदार उदाहरण मला आठवतं. मी एकदा वीरेंद्र सेहवागला प्रश्न विचारला होता, की समोर तगडी गोलंदाजी असते आणि सामन्याचं महत्त्व खूप मोठं असतं, तेव्हा फलंदाजीला जाताना तुला दडपण येत नाही का? क्षणभरही विचार न करता सेहवाग म्हणाला : ‘‘कमाल करते हो आप भी.... टेन्शन लेने की नही देनेकी बात होती हैं मेरे लिये... मुझे क्यूँ टेन्शन आयेगा की सामने कौन बोलिंग कर रहा है... टेन्शन तो उनको आना चाहिये की सेहवागको बोलिंग कैसे करे.’’ याला म्हणतात वेगळा दृष्टिकोन.

२) प्रोत्साहन
बहुतांशी वेळेला आपण सगळे कुणीतरी आपल्याला प्रोत्साहन देईल याच्या अपेक्षेत किंवा प्रतीक्षेत असतो. महान खेळाडूंचं नेमकं उलट असतं. ते स्वयंप्रेरित असतात. खेळाडूंना आपण करत असलेल्या परिश्रमातून काय मिळू शकतं याचा अंदाज असतो. मोलाची बाब म्हणजे फलप्राप्ती किंवा यश मिळायला विलंब झाला, तरी ते योजनाबद्ध मेहनतीत कसूर करत नाहीत. खूप प्रदीर्घ काळ मेहनत करत राहायची त्यांची मानसिक आणि शारीरिक तयारी असते. खेळाडू प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून प्रवास करतात. त्यांना परिणामांची चिंता नसते... यशाची नाही आणि अपयशाचीही नाही.
एकदा मोहिंदर अमरनाथ मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पळण्याचा सराव करत होता. इतक्यात त्याचा मित्र तिथं आला आणि त्यानं सांगितलं, की निवड समितीनं मोहिंदरला भारतीय संघातून वगळलं आहे. बातमी कानावर पडल्यावर मोहिंदरनं, ‘‘अच्छा. हो का?’’ इतकीच प्रतिक्रिया देत पळणं चालू ठेवलं. ठरल्याप्रमाणं चाळीस मिनिटं पळून झाल्यावर मग तो थांबला. त्यानं व्यायाम पूर्ण केला. मग त्यानं सविस्तर बातमी काय आहे, हे जाणून घेतलं. सांगण्याचा मतलब असा, की महान खेळाडू ठरलेल्या दिनक्रमात मेहनतीत काटकसर करत नाहीत, की चालढकल करत नाहीत.

३) ध्येयासक्त
खेळाडू नेहमी काही जवळचे आणि काही लांबचे गोल्स ठेवतात- ज्याला आपण ‘ध्येय’ म्हणतो. ध्येय मनात पक्कं करताना ते आपल्या क्षमतेला खरंच गाठता येण्यासारखं असल्याचं त्यांना माहीत असतं. ध्येय गाठण्याकरता करायला लागणाऱ्या कष्टात ते मागं पडत नाहीत, की कितीही अडचणी आल्या तरी ध्येय डोळ्यासमोरून हलू देत नाहीत.
थॉमस मस्टर नावाचा ऑस्ट्रियाचा टेनिसपटू होता. सन १९८९ मध्ये त्याची कारकीर्द ऐन भरात असताना त्याला भयानक कार अपघाताला सामोरं जावं लागलं. अपघात इतका भयानक होता, की थॉमस मस्टरच्या डाव्या पायाचा चेंदामेंदा झाला. मोठं ऑपरेशन केलं गेलं, तेव्हा डॉक्टरांनी थॉमसला परत पूर्वीसारखं चालता येईल का नाही अशी शंका व्यक्त केली. पायाला प्लॅस्टर घातलेल्या अवस्थेत थॉमस मस्टरनं टेनिसचा सराव चालू ठेवला तो एकाच कारणानं- तो म्हणजे त्याला हाताचा सराव घालवायचा नव्हता आणि टेनिसपासून दूर राहणं त्याला शक्य नव्हतं. दोन वर्षांत अचाट मेहनत करून थॉमस मस्टर परत टेनिस कोर्टवर नुसता उतरला नाही, तर त्यानं नंतर सन १९९५ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. इतकंच नाही, तर सन १९९६ मध्ये थॉमस मस्टर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला.

४) माणसं हाताळण्याचे कौशल्य
चांगल्या खेळाडूला माणसं हाताळण्याचं कौशल्य असणं नितांत गरजेचं आहे. तुम्ही सांघिक खेळात असला, तर त्याचं महत्त्व शतपटीनं वाढतं. परंतु जरी तुम्ही एकेरी खेळ करत असला, तरी प्रशिक्षक, मार्गदर्शक यांच्या सोबतीनं घरातल्या लोकांना कसं विश्वासात ठेवायचं हे खेळाडूंना माहीत असतं. यात अजून एक गुण कळतो तो म्हणजे चांगले खेळाडू ऐकून घेणारे असतात. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ असंच ते वागत असतीलही; पण ऐकताना ते बोलणाऱ्याला पूर्ण मान देतात. तसंच कधीकधी माणसं हाताळताना जोखीम पत्करतात.
यात एक मजेदार उदाहरण इयान चॅपेलचं आहे. एकदा अ‍ॅशेस कसोटी सामना निर्णायक अवस्थेत पोचला असताना ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली कर्णधार इयान चॅपेलला भेटायला गेला आणि हात पुढं करून हस्तांदोलन करायच्या इच्छेनं म्हणाला : ‘‘कॅप्टन, मला वाटतं माझं शरीर आता थकलं आहे... आघातांनी, इजांनी संपत चाललं आहे. या कसोटी सामन्यानंतर मी कसोटी क्रिकेट सोडून देणार आहे.’’ इयान चॅपेलनं डेनिस लिलीशी हस्तांदोलन करायला नकार देताना कडवट टोमणा मारला : ‘‘आय डोन्ट शेक हँड विथ लूजर्स.’’ झाल्या अपमानातून लिली इतका भडकला आणि म्हणाला : ‘‘कोण लूजर आहे आणि कोण महान उद्या दाखवतो तुला.’’ दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांना लिलीनं सळो का पळो करून सोडलं आणि सामना जिंकून दिला. इयान चॅपेलनं जाणूनबुजून डेनिस लिलीला डिवचलं आणि सामना जिंकण्याचा स्वार्थ कर्णधार म्हणून बरोबर साधून घेतला.

५) स्वत:शी संवाद
चांगले खेळाडू स्वत:शी संवाद साधण्यात पटाईत असतात. तसं बघायला गेलं, तर आपण सगळेच स्वतःशी बोलत असतो. फरक इतकाच असतो, की आपण स्वत:शी बोलताना त्यात नकारात्मकता जास्त असते. आपण अपयशाचा विचार करतो. स्वत:लाच किंवा नशिबाला दूषणं देत संवाद साधतो. या उलट खेळाडू एखाद्या चांगल्या मित्राशी संवाद साधावा, तसा संवाद स्वत:शी साधू शकतात. या संवादात कमालीची सकारात्मकता असते.

६) संकट आणि संधी
तुम्हाला कल्पना आहे, की आपण सगळे जशी दिवास्वप्नं बघत असतो, तशीच भलीमोठी स्वप्नं खेळाडू नेहमी बघत असतात. काही खेळाडू मोठ्या सामन्यात आपण कसा खेळ करू याचं चलत्‌चित्र जणू मनात बघत असतात. फरक इतकाच असतो, की ते स्वप्न सत्यात उतरावं म्हणून सातत्यानं काबाडकष्ट करतात. सचिन तेंडुलकर म्हणतो : ‘‘खरा मोठा महत्त्वाचा सामना म्हणजे वेगळं समीकरण असतं. तुम्ही योग्य प्रकारे तयारी केली नसली, तर तो सामना म्हणजे खेळाडूला संकट वाटतं; पण जर तयारी परिपूर्ण केली असली तर जगाचं लक्ष लागून राहिलेल्या सामन्यात सर्वोत्तम खेळ करून संघाला जिंकून देण्याची संधी असते. हिरो बनायची संधी.’’

७) हुरहुरीवर नियंत्रण
आपल्याकरता मोठं काम अथवा निर्णयाचा दिवस असो वा खेळाडूकरता मोठा सामना- हुरहूर लागलेली असतेच! विराट कोहली म्हणतो, की मोठ्या सामन्याअगोदरच नव्हे, तर मला प्रत्येक सामन्यातच पोटात गुरगूर होते. मनात फुलपाखरं नाच करत असतात, की आज काय होणार. ही हुरहूर नसली, तर चुकल्यासारखं वाटेल मला.’’ खेळाडू वेगळं इतकंच करतात, की लवकरच ते हुरहुरीवर नियंत्रण आणून काय करायचं आहे त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करतात. संपूर्ण प्रक्रियेत ते निकाल काय लागेल याचा विचार करत नाहीत, तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि समोरचे लोक आपला डाव उधळून लावायला काय योजना आखतील याचा अंदाज घेत दमदार पावलं टाकत मार्ग आखतात.

८) कमाल कामगिरी
सर्वसामान्य माणसांना छोटी गोष्ट केली, तरी खूप अभिमान आणि समाधान वाटतं. भरून पावल्याची भावना खूप लवकर मनात येते. खेळाडूंसमोर महानतेची उदाहरणं फार वेगळ्या पातळीची असतात. लेह- लडाख भागात ५५५ किलोमीटरची शर्यत पूर्ण करणारा आशिष कासोदेकर यानं मस्त कहाणी सांगितली. शून्य ते १८३८० फुटांचा टप्पा मोटारसायकलवरून गाठताना आशिष कासोदेकरनं भटकंतीचा आनंद लुटला. त्याच प्रवासात समाधानाची भावना कशी मोडून पडली हे सांगताना आशिष म्हणाला : ‘‘आम्हाला दोन पर्यटक भेटले- ज्यांनी खरं शून्य ते सर्वोच्च स्थान अनुभवलं होतं. म्हणजे काय, तर त्या दोघांनी मृत समुद्रात डुबकी मारून तळाला हात लावला. मग सायकल काढून हिमालयाचा पायथा गाठला. मग त्या दोघांनी एव्हरेस्ट शिखरावर म्हणजे २९०२९ फुटांवर स्वारी केली. खाली उतरून सायकल घेऊन दोघं परतले ते मृत समुद्रापाशी आणि परत दोघांनी डुबकी मारून तळाला हात लावला. याला खरं म्हणतात शून्य ते सर्वोच्च आणि परत शून्य.’’ ही कहाणी ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा आला होता.

९) एकाग्रता
खेळाडूंची एकाग्रता राखण्याची क्षमता अचाट असते. लक्ष विचलित होत असल्याचं त्यांना जाणवतं. मग विचारांवर नियंत्रण आणून परत एकाग्रतेचा मार्ग ते बरोबर पकडतात. बहुतांश वेळेला आपण लोक भलत्याच विचारात गुंतत जातो- ज्यामुळं एकाग्रता राखणं कठीण होतं. कधी गत यशाचा विचार मनात डोकावतो, तर कधी अपयशाचा. मग त्या यश-अपयशाचा संदर्भ वर्तमानाशी लावून आपण एकाग्रता गमावून बसतो. खेळाडू नेमकं विरुद्ध करतात. ते फक्त वर्तमानात जगायला स्वत:ला मोठ्या कष्टानं शिकवतात.
भारताचं एकमेव ऑलिंपिक सुवर्णपदक पटकावणारा अभिनव बिंद्रा म्हणतो : ‘‘आम्हां नेमबाजांना एकाग्रता राखायला फक्त त्या क्षणावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करावा लागतो. मागच्या गोळी मारण्यात मोठं यश आलं किंवा नेम साफ चुकला, तरी तो क्षण लगेच मागं टाकून सर्व विसरून जावं लागतं. हे सहज शक्य नसतं. ती अवस्था साध्य करायला खूप तयारी करावी लागते. आम्हाला स्व:ला शिकवावं लागतं, की कोणत्याही परिस्थितीत प्रतिक्रिया द्यायची नाही. चांगली नाही आणि वाईटही नाही- कारण पुढचा शॉट घेताना नेम नव्यानं धरताना मन कोऱ्या‍ पाटीसारखं साफ असणं गरजेचं असतं. त्यामुळंच- यश मिळो वा अपयश आम्ही आमचे शॉट घेणं पूर्ण झाल्यावर काही काळानंतर प्रतिक्रिया देतो. मी ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकल्यावरही मला प्रतिक्रिया द्यायला क्षणभर वेळ लागला, तो त्यातलाच प्रकार होता.’’
मला वाटतं- जो मार्ग चोखाळून महान खेळाडू यशाचं शिखर गाठतात; तसंच अपयशाचं विष पचवतात ते वाचून, अभ्यासून आणि प्रयत्नांनी अंगीकारून आपल्यालाही खूप काही शिकायला मिळतं. म्हणूनच या लेखातून हे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com