"आत्मा-मन-शरीर यांत समन्वय हवा' (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

मुंबईतले डॉ. श्रीपाद खेडेकर यांची सर्बिया देशाच्या ऑलिंपिक समितीनं त्यांच्या खेळाडूंची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता अधिकृत सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. या निमित्तानं डॉ. खेडेकर यांच्याशी साधलेला संवाद.

कोविड 19 महासाथीच्या धक्‍क्‍यातून सावरून काही देश सावधता बाळगत हळूहळू कामकाजाला सुरुवात करत आहेत. अमेरिकेसारखे काही देश समस्या गंभीर असूनही महासाथीला कमी लेखत कामाला सुरुवात करताना अर्थव्यवस्थेला गती देण्याचा विचार पुढे रेटत आहेत. या सगळ्या गदारोळात युरोपमध्ये खेळ स्पर्धांना पुन्हा प्रारंभ करायच्या योजना आखत आहेत. महासाथीनं टोकियो ऑलिंपिक्‍सला खो दिला असला, तरी काही देश कधी ना कधी ऑलिंपिक्‍स होणार हे जाणून तयारीला सुरुवात करायला धडपडत आहेत.

तुम्ही म्हणाल, ही सर्व माहिती तुम्हाला अगोदरच आहे...काही तरी नवीन सांगा. मग ऐका. सर्बिया देशानं ऑलिंपिक्‍सच्या तयारीला दिशा द्यायला पावलं उचलली आहेत. इतकंच नाही तर आपल्या खेळाडूंची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता एका खास तज्ज्ञ डॉक्‍टरची नेमणूक केली. तरीही तुम्ही म्हणाल, होय ठीक आहे- त्यात खास काय? मग पुढे ऐका. नेमणूक झालेल्या डॉक्‍टरांचं नाव आहे श्रीपाद खेडेकर. बसला ना सुखद धक्का? होय! मुंबईचे निष्णात होमिओपॅथी डॉक्‍टर श्रीपाद खेडेकर यांची सर्बिया देशाच्या ऑलिंपिक समितीनं त्यांच्या खेळाडूंची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता अधिकृत सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. याच डॉ. खेडेकर यांच्याशी गप्पा रंगल्या.

शिक्षण आणि सुरुवात
डॉ. खेडेकर : मी पक्का दादरचा मुंबईकर. माझं होमिओपॅथीचं शिक्षण बेळगावच्या शिक्षण संस्थेतून झालं. सन 2004 मध्ये मी एमडी झालो. दरम्यानच्या काळात मी शोधनिबंध लिहिले आणि त्यातून जन्म झाला माझ्या पहिल्या पुस्तकाचा- ज्याचं नाव होतं ऍक्‍सोट्रॉम. याच पुस्तकानं मला युरोपमध्ये पोचवलं. मग मला तिथून लेक्‍चर द्यायला यायची निमंत्रणं मिळाली- ज्यानं माझा सततचा प्रवास अभ्यास चालू झाला.
तसं बघायला गेलं, तर होमिओपॅथी हे 250 पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचं शास्त्र आहे. पदवीकरता अभ्यास करत असताना मला माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा नेहमी विचार यायचा. कशानं तयार होतं व्यक्तिमत्त्व हा प्रश्न पडायचा. त्यातून मी शोधनिबंध लिहिला- जो 800पेक्षा जास्त पानांचा झाला. पुस्तकाचा जन्म त्याच पानांमधून झाला- ज्यानं मला जगाची दारं उघडली.

खेळाच्या जगतात प्रवेश
डॉ. खेडेकर : मला वाटतं, की काही गोष्टी विधिलिखित असतात. त्या आपण करत नाहीत- त्या होतात. आमचं शास्त्र म्हणतं, की आवडीच्या क्षेत्रावर प्रेम करत काम करा. मला लहानपणापासून खेळाची जाम आवड होती. बुद्धिबळापासून ते टेबल टेनिस, क्रिकेटपर्यंत सगळे खेळ मी मनापासून खेळलो. याच आवडीनं काम करत असताना माझ्या संपर्कात खेळाडू आले. टेनिसपटू, फुटबॉलपटू, बास्केटबॉल असे खेळाडू संपर्कात आल्यानं काम कधी चालू झाले खेळ जगतात ते समजलंच नाही.
साधी गोष्ट बघा, की जेव्हा कोणत्याही व्यक्तीला कोणताही आजार होतो, तेव्हा त्याचा समतोल कुठेतरी डगमगलेला असतो. होमिओपॅथीमधे आत्मा-मन-शरीर यांच्यातल्या समतोलाला सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं आहे. यात मनाचा तोल हवा तसाच शरीराचा हवा आणि त्याला जोड हवी अंतर्मनातील सकारात्मक विचारांची. जेव्हा या तीन गोष्टीत योग्य समतोल असतो तेव्हा आजाराला आपण दूर ठेवू शकतो. रोग हवेत असतातच, मग ते सगळ्यांना का होत नाहीत याचा विचार करायला पाहिजे. माझा भर आजार होऊच नये यावर असतो. कारण आजार झाल्यावर तुमचे पर्याय एकदम कमी होतात.
याकरता आम्ही प्रयत्न करतो, की माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल. त्याच्या शरीर-मन-आत्मा यातला तोल कसा साधला जाईल. जागतिक स्तरावर कोणीही खेळाडू जेव्हा पराकोटीच्या स्पर्धेला सामोरा जातो तेव्हा तंदुरुस्त सगळेच असतात; पण तुमच्या शरीरातला 2 टक्के फरक सुवर्ण आणि रौप्यपदाचा फरक करून जातो. सेकंदाच्या शंभराव्या भागाचा फरक खेळाडूला विजयी किंवा पराभूत करू शकतो.
सर्वोच्च स्तरावर स्पर्धेत उतरताना 90 टक्के मनाचा आणि 10 टक्के शरीराचा भाग काम करतो, असं म्हणतात- कारण शारीरिक तयारी सगळ्यांची उच्च असते. मग फरक राहतो तो मनाचा विचारांचा. मन शरीराला काय कर आणि काय नको याच्या सूचना देत असतं. विचार करून बघा, की जन्म होतानाही 99 टक्के बाळांचं पहिलं डोकं बाहेर येतं आणि मग बाकीचं शरीर. याचाच अर्थ डोक्‍याचा भाग किती मोलाचा आहे. आपला मेंदू शरीराच्या सर्वांत वरच्या भागात एका द्रवात तरंगत असतो- ज्याचं वजन साधारणपणे दीड किलो असते. म्हणूनच बरेच लोक त्यात विचार करताना समतोल राखण्याकरता आता नव्या जोमानं प्रयत्न करू लागले आहेत. सर्व तयारीनंतर मन शांत आणि स्थिर असलं, तर शरीर त्याला साथ देतं.

कोणाबरोबर काम सुरू आहे?
डॉ. खेडेकर : गायन कला क्षेत्रातल्या लेपा ब्रेना नावाच्या खूपच लोकप्रिय कलाकारासोबत मी गेले दहापेक्षा जास्त वर्षं काम करतो आहे. ती कमाल गायक आहे, म्हणून एक वेगळा उत्साह जाणवतो तिच्याबरोबर काम करताना. इतकंच काय तर युरोपमधल्या कित्येक डॉक्‍टर्सबरोबर माझं काम सतत चालू असतं. तिकडचे डॉक्‍टर्स खूप खुलेपणानं साधकबाधक चर्चा करताना मुद्दे पुढे आणतात. आम्हाला पूर्ण कल्पना असते, की काही गोष्टी होमिओपॅथी करू शकत नाही, तसंच इतकं संशोधन आणि प्रगती होऊनही ऍलोपॅथीलाही काही मर्यादा आहेत.
युरोप म्हणल्यावर फुटबॉल आलेच. मला अजॅक्‍स, इंटर मिलान किंवा मॅंन्चेस्टर युनायटेडसारख्या खूप प्रथितयश क्‍लब्जबरोबर काम करायला मिळाल्यानं भरपूर फुटबॉलपटूंसोबत वेळ घालवता आला आहे. त्याचबरोबर अमेरिकेतल्या नामांकित एनबीए स्पर्धेत खेळणाऱ्या काही खास बास्केटबॉलपटूंबरोबरही काम करता आलं आहे. सांगून आश्‍चर्य वाटेल; पण इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ गेली काही दशकं फक्त होमिओपॅथीवर विश्वास ठेवत आल्या आहेत. त्या माझ्या पेशंट नाहीत; पण इतर युरोपीय देशांतल्या राजघराण्यातल्या काही व्यक्तींबरोबर मी गेली काही वर्षं काम करतो आहे आणि ते माझे पेशंट्‌स आहेत.
सरतेशेवटी मला सांगायला समाधान वाटतं, की महान टेनिसपटू नोवाक जोकोविचबरोबर गेली सातपेक्षा जास्त वर्षं मी काम करतो आहे. दम्याच्या विकारामुळे नोवाकला श्वसनाला त्रास व्हायचा. तो दूर करायला जे प्रयत्न केले गेले त्यात मी सहभागी होतो. मला आठवतं, की नोवाक चक्क माझ्याशी वेळ पक्की करून भेटायला आला. त्याच्या येण्यात कोणताही बडेजाव नव्हता. अत्यंत शांतपणे समस्या सांगून मग आम्ही विचारपूर्वक ट्रीटमेंट चालू केली. त्याचा परिणाम काय झाला, हे त्याच्या कारकिर्दीवरून समजतं. मी वेगळं सांगायची खरच गरज नाही.
यात मी इतकं म्हणीन, की कोणताही खेळाडू सर्वोत्तम खेळण्यापासून कोणत्याही कारणानं दूर राहत असला, तर त्याला मदत करताना आम्हाला हेच समजून घ्यायला लागतं, की डॉक्‍टर त्याच्या शरीरात असतो. आम्हाला फक्त योग्य प्रक्रिया करून त्याला कार्यान्वित करावं लागतं. ते जमलं, की बेस कॅंम्पला अडकलेला खेळाडू सरसर चढत जात एव्हरेस्टवर पोचतो. तसं झालं, की मिळणारा आनंद, समाधान बरंच काही देऊन जातं.

आत्ताच्या समस्येवर उत्तर काय?
डॉ. खेडेकर : कोविड 19 महासाथ कोणताही देश, प्रांत, खंड याची मर्यादा ओलांडून संपूर्ण जगभर पसरली आहे. ही समस्या संपणाऱ्यातली नाही. मला खेळातलं उदाहरण देत मुद्दा सांगायला आवडेल. असं बघा, की समजा एका फलंदाजाला सातत्यानं सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, तर त्याला त्याच्या सर्वांगीण विकासावर सर्वांगीण तंत्रावर काम करावं लागेल आणि ते पण अव्याहतपणे. एक फटका सतत खेळून तो सातत्यानं यशस्वी होणार नाही. आपली रोगप्रतिकारक शक्ती तशीच आहे. कारण एका आजारावर एक लस किंवा एक औषध शोधलं जातं. ते लागू पण पडतं; मात्र सर्व आजारांवर ते लागू पडत नाही हे सत्य आहे. एक आजार एक औषधाचा मारा करून बरा करालही; पण त्यानं दुसऱ्या आजाराच्या शक्‍यता वाढत जातात. मग सगळे येऊन ठेपतं ते आत्मा-मन-शरीर यातल्या समतोलावर, समन्वयावर.

सरतेशेवटी मी इतकंच मांडीन, की आपण बाह्य सौंदर्यावर अनावश्‍यक भर देतो. बाह्य त्वचेचा रंग बदलायला, ती चकचकीत करायला धडपडतो. अरे समजून घ्या, की कातडी फक्त एक सुरक्षा कवच आहे शरीराचं. त्याचं महत्त्व जास्त असतं, तर कातडी कवटीच्या आत नसती का? किती विविध क्रीम्स लावून आपण त्वचा सुंदर करायच्या नादात त्याची छिद्र बंद करतो. मग रोगप्रतिकारक शक्ती वाढणार कशी? आपण सर्वांनी प्रयत्न हा करायला हवा, की आत्मा-मन-शरीर यातला समन्वय, समतोल कसा साधला जाईल. बाह्य सौंदर्यापेक्षा आतलं सौंदर्य वाढवण्यावर आपण लक्ष दिलं, तर बाकीच्या गोष्टी आपोआप मार्गी लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com