गर्जा जयजयकार तयांचा (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

वेळ पहाटेचे साडेचार. काही जण भारतीय तिरंग्याला वंदन करत मोठ्या अभिमानानं राष्ट्रगीत गाऊन दिवसाची सुरवात करतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निग्रही भाव असतात.
वेळ दुपारची साडेचारची. तीच माणसं तिरंग्याला वंदन करत असताना, भारताचं राष्ट्रगीत वाजवलं जात असताना त्यांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळत असतात.
पहाटेच्या साडेचारचं दृश्य हैदराबादच्या गच्चीबावली भागातल्या गोपीचंद अकादमीचं असतं. दुपारच्या साडेचारचं दृश्यं स्वित्झर्लंडमधल्या बेसील गावचं असतं.
दोन्ही प्रसंगातली माणसं तीच असतात... पुलेला गोपीचंद आणि पी.व्ही. सिंधू.

कमाल रविवार
खेळावर प्रेम करणाऱ्या लोकांकरता २५ ऑगस्टचा रविवार म्हणजे पर्वणी होती. पहिल्यांदा सगळ्यांचे डोळे टीव्हीला चिकटले- कारण वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप स्पर्धेत आपली सिंधू अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूचा फडशा पाडताना बघायला मिळाली. संध्याकाळी अ‍ॅशेस मालिकेतील बेन स्टोक्सनं रचलेली अशक्य शतकी खेळी आणि इंग्लंडच्या विजयाचा चमत्कार बघायला मिळाला. मग प्रदीर्घ काळानंतर अजिंक्य रहाणेनं कसोटी सामन्यात झळकावलेलं शतक बघायला मिळालं आणि मध्यरात्रीनंतर भारताचा अँटीग्वा कसोटीतला बहारदार विजय अनुभवायला मिळाला.
वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याकरता पी.व्ही. सिंधूचे प्रयत्न सन २०१३ पासून सुरू झाले. सिंधूला ब्राँन्झ पदकावर समाधान मानावं लागलं तेव्हा. पुढं २०१४ मध्ये परत ब्राँन्झपदक आणि २०१७ -२०१८ मध्ये पाठोपाठ अंतिम सामन्यात धडक मारूनही सिंधूला रजत पदकावर समाधान मानावं लागलं. तसं बघायला गेलं, तर वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप स्पर्धेत इतकं सातत्य बाकी कोणीच दाखवलं नव्हतं. मात्र, काही लोकांनी सिंधूला अंतिम सामन्यात खेळायची धमक किंवा मानसिकता नसल्याची टिप्पणी केली. महान खेळाडू टीकाकारांना तोंडानं नाही, तर मैदानावरच्या कामगिरीनं उत्तर देतात हे पुलेला गोपीचंदनं सिंधूला समजावलं होतं.
सिंधूनं सन २०१७ मध्ये आपलं व्यायामाचं तंत्र बदललं. श्रीकांत वर्मा नावाच्या निष्णात ट्रेनरचा सल्ला घेऊन सिंधूनं तंदुरुस्तीकडे बारकाईनं लक्ष दिलं. श्रीकांत वर्मा शिस्तप्रिय होता. त्यानं सिंधूला व्यायामाकरता त्याच्या अकादमीत बोलावलं. हैदराबादच्या वेड लावणाऱ्या ट्रॅफीकमधून प्रवास करत सिंधू श्रीकांत वर्माच्या सुचित्रा अकादमीत जायला लागली. ‘‘सिंधूचे पाय नेहमीच मजबूत होते. प्रश्न होता त्याच पायात थोडी स्प्रिंग आणायचा आणि खांद्यात मजबुती आणायचा. उंच उडी मारून स्मॅश केल्यावर पायाचं लँडिंग बरोबर करणं आणि मग त्याच झटक्यात पुढं सरसावत नेटजवळ जाऊन फटका मारणं हे बदल व्यायामातून करायचे होते. चपळता आणि ताकद याचा योग्य संगम साधणं हे उद्दिष्ट होतं आमचं. एक गोष्ट मान्य करायला लागेल, की सिंधूनं कधीही मेहनत करायला काचकूच केली नाही. उलट ती हसतहसत सांगितलेले कठीण व्यायाम करायची. इतकंच काय, गेल्या काही महिन्यांत सिंधूनं मोबाईल फोनकडं पाठ फिरवली आहे. वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप स्पर्धेत मिळवलेलं यश हे तिच्या मेहनतीचं फळ आहे. गोपीचंदनं सिंधूच्या खेळाच्या तंत्रावर केलेल्या मेहनतीला मी थोडा हातभार लावला इतकंच,’’ श्रीकांत वर्मानं विनम्रपणे सांगितलं.

मेहनतीचे फळ
वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप स्पर्धेत चांगला खेळ करताना दोन ब्राँन्झ आणि दोन रजतपदकं हाती असून अंतिम ध्येयापासून आपण लांब आहोत याची जाणीव सिंधूला होत होती. दोन वर्षं अथक परिश्रम करून तंदुरुस्तीतल्या उणिवा दूर केल्यानं सिंधूला वेगळा आत्मविश्वास जाणवत होता. उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूनं ताय झू यिंगला आणि उपांत्य सामन्यात चेन यू फीला पराभूत करताना केलेला खेळ लक्षणीय होता. तिच्या चांगल्या फॉर्मची ती झलक होती. अंतिम सामन्यात उतरण्यापूर्वी गोपीचंद आणि किम या दोन प्रशिक्षकांनी सिंधूला खेळाच्या सुरवातीपासून आक्रमक धोरण अवलंबायचा सल्ला दिला होता. सन २०१७ मध्ये ओकुहाराने लांबलचक सामन्यात सिंधूचा पराभव केला होता. ओकुहारा रॅली करून गुण जिंकण्यात पटाईत असल्यानं तिला संधी न देण्याकरता आक्रमक खेळ करायची योजना आखली गेली.
अंतिम सामन्यात सिंधूनं नेमकं तेच केलं. पहिल्यापासून सिंधूनं आक्रमक धोरणानं खेळ केला. उंच उडी करून स्मॅश केल्यावर त्याच लयीत झटक्यात पुढं सरसावत पुढचा फटका मारायचं तंत्र व्यायामानं अवगत केल्यानं अंतिम सामन्यात फायदा झाला. काही कळायच्या आत पहिली गेम सिंधूनं २१-७ जिंकली. दुसऱ्या गेममध्येही संपूर्ण वर्चस्व सिंधूचं होतं. ओकुहारासारख्या निष्णात खेळाडूला नेस्तनाबूत करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. महान माजी खेळाडू नंदू नाटेकरांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले : ‘‘स्वप्नवत खेळ केला सिंधूनं. खरंच परिपूर्ण. मी अगदी संपूर्ण सामना टीव्हीवर नजर ठेवून होतो. किती कमी चुका आणि किती वेगवान ताकदवान फटके! आहाहा. कमाल होती खरंच. मी म्हणीन, की असा खेळ तिला परत जमेल का याची मला उगाच शंका येते- इतका सुंदर, समग्र खेळ आणि तोसुद्धा कुठं तर वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात सिंधूनं केला.’’

खरं श्रेय गोपीचंदचं
सिंधूनं वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याचं खरं श्रेय गोपीचंदलाही द्यायलाच हवं. सन २००१ मध्ये गोपीचंदनं ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकली म्हणून राज्य सरकारनं गोपीचंदला पाच एकर जमीन अगदी कमी भावानं ४५ वर्षांकरता दिली. गोपीचंदला त्याच जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन अकादमी सुरू करायची होती. प्रकल्प मोठा होता. भांडवल उभं करायला गोपीचंदला त्याच्या दूरचे नातेवाईक नीमगड्डा प्रसाद यांनी मदत केली. पाच वर्षं प्रयत्नांची पराकाष्ठा करून गोपीचंदनं २००८ मध्ये अकादमीचं उद्‍घाटन केलं. आठ बॅडमिंटन कोर्टस्, स्विमिंग पूल, व्यायामशाळेबरोबर विश्रांतीची जागा अकादमीत होती.
कमाल म्हणजे गोपीचंद अकादमीचा कारभार जास्त करून गोपीचंदची आई सुब्बारावम्मा बघतात. त्या म्हणाल्या : ‘‘गंमतीची गोष्ट अशी, की सिंधू अकादमीत दाखल झाली, तेव्हा तीसुद्धा इतर खेळाडूंप्रमाणं साधी होती. फरक इतकाच होता, की सिंधूचे दोन्ही पालक चांगले खेळाडू होते. त्यामुळं तिच्या रक्तात खेळ होता. सिंधूचे वडील रामन्ना भारतीय संघाकडून व्हॉलीबॉल खेळले होते. मोठी बहीणही चांगली खेळाडू होती. तेव्हा कोणाला वाटलं नव्हतं, की सिंधू एक दिवस विश्वविजेती होईल; पण बघा, आता जी सिंधू २००९ मध्ये सब ज्युनियर गटात आशियाई स्पर्धेत खेळून ब्राँन्झपदक मिळवून आली, तीच सिंधू आता सरळ विश्वविजेती झाली. दहा वर्षांचा कठीण काळ हा गोपीचंद आणि सिंधूनं एकत्र मेहनत करून पार केला,’’ सुब्बारावम्मा हसतहसत म्हणाल्या.

सातत्याची नोंद घेऊ
सन २००८ मध्ये गोपीचंदनं अकादमी सुरू केली आणि आज साईना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू सर्वोच्च स्तरावर उच्च खेळ करत आहेत. पुरुषांच्या गटात श्रीकांत किंदंबी, पारुपल्ली कश्यप, प्रणॉय कुमार, समीर वर्मा आणि साई प्रणीत असे पाच खेळाडू भन्नाट खेळ सातत्यानं करून विश्वस्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. अजून एक मोठा मुद्दा असा, की वर नमूद केलेले सगळे खेळाडू एकेरीत खेळतात. टेनिसच्या खेळातही भारतीय खेळाडू प्रगती करताना दिसत असले, तरी बहुतांशी खेळाडू लवकरच आपलं लक्ष फक्त दुहेरीवर केंद्रित करतात हे विसरून चालणार नाही.
गोपीचंदच्या यशाचं रहस्य असं आहे, की तो अकादमी चालवण्याच्या बाबतीत कमालीचा काटेकोर आहे. रोज पहाटे साडेचार वाजता गोपीचंद राष्ट्रगीत गाऊन पहिलं शटल मारतो आणि प्रशिक्षण सुरू करतो. दुसरी बाब म्हणजे गोपीचंदनं अत्यंत विचारपूर्वक आपल्या अकादमीत जगातल्या काही सर्वोत्तम प्रशिक्षकांना पाचारण केलं आहे. अगदी आत्ताचं उदाहरण घेतलं, तर गोपीचंदनं माजी कोरियन खेळाडू किम यांना सिंधूसोबत काम करायला बोलावलं. ‘‘मला यात काही वेगळं वाटत नाही. प्रशिक्षणात वैविध्य हवं...नवे विचार, नवी कार्यपद्धती हव्यात असं मला नेहमी वाटत आलं आहे...मला त्याच कोणाशी स्पर्धा करण्याचा किंवा असुरक्षित वाटण्याचा भाग जाणवत नाही. किम आल्यानं बराच फरक पडला सिंधूच्या खेळात. खेळातली आक्रमकता आणि काही फटक्यांतली ताकद वाढवण्यावर किमनं भर दिला- ज्याचा फरक पडलेला दिसला. मी एकटा सगळ्या चांगल्या खेळाडूंकडं आणि त्याचबरोबर उदयोन्मुख खेळाडूंकडं एकावेळी कसा लक्ष देऊ शकीन? मला वाटतं, की अकादमीच्या चांगल्या कामगिरीत सगळ्या प्रशिक्षकांचा तेवढाच मोलाचा हातभार आहे,’’ खूप साधेपणानं गोपीचंद सांगतो.

सरतेशेवटी मी इतकंच म्हणीन, की टेनिसच्या जगतात नोवाक जोकोविचनं व्यायाम, आहार पद्धतीची शिस्त वेगळ्याच स्तरावर पाळून तंदुरुस्तीची अशक्यप्राय पातळी गाठली आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला, तीच गोष्ट बॅडमिंटनच्या खेळात दिसून यायला लागली आहे. सिंधूनं फिटनेसवर घेतलेल्या मेहनतीचा परिणाम वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिपदरम्यान स्पष्ट दिसून आला. भारतातले इतर खेळाडू यातून शिकून व्यायाम- आहाराच्या बाबतीत वेगळा प्रगतीचा रस्ता पकडतील इतकं हे सगळं प्रेरणादायी आहे.
म्हणून गोपीचंद आणि सिंधूकरता परत म्हणावंसं वाटतं...गर्जा जयजयकार तयांचा...गर्जा जयजयकार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com