कबड्डीचा ‘हुतुतू’ (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

‘‘तगड्या संघाला स्पर्धेत शेवटीच भिडण्याकरता असे सामने अगोदरही गमावले गेले आहेत. कबड्डीच्या खेळात याला ‘रणनीती’ म्हटलं जातं. खरी मेख तर पुढंच आहे. केरळसमोरचा सामना समजून उमजून ८ गुणांनी गमावल्यावर महाराष्ट्र संघाचे काही हितचिंतक पळत आले आणि त्यांनी ‘‘तुम्ही हा काय वेडेपणा केलात?....सामना का गमावलात,’’ असं विचारलं. कारण राजस्थान विरुद्ध केरळमधला जो सामना केरळनं जिंकला असा संदेश स्वत: महाराष्ट्राच्या दोन जबाबदार लोकांनी दिला- तोच चुकीचा होता. प्रत्यक्षात सामना केरळनं नव्हे, तर राजस्थाननं जिंकला होता. परिणामी अंतिम गुणफरकात महाराष्ट्राच्या खात्यात ४ गुण कमी होते आणि त्यामुळंच महाराष्ट्राचा संघ साखळी स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.’’

विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही. वेताळाचा शोध घेत तो रानोमाळ भटकत होता. गेल्या दोन वेळेला वेताळ क्रिकेट मैदानाच्या आसपास सापडला होता, त्याचा विचार करून विक्रमादित्य भारतातली एक एक मैदानं पिंजून काढत होता. परंतु काही केल्या वेताळाचा शोध लागत नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून विक्रमादित्यानं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे इथल्या मैदानावरही चक्कर मारली; पण त्याला रिकाम्या हातानं परतावं लागलं. गहुंजेहून परतत असताना विक्रमादित्यानं उजवीकडे सहज बघितलं, तर त्याला धक्का बसला- कारण वेताळ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दिसला. तो एका झाडाला उलटा लटकलेला दिसला. बालेवाडी संकुलात क्रिकेट सुरू झालं की काय अशी शंका विक्रमादित्याला आली. मांजराच्या पावलानं विक्रमादित्य त्या झाडाजवळ पोचला. नंतरचं दृश्‍य बघून विक्रमादित्य चकित झाला- कारण वेताळ प्रो-कबड्डी स्पर्धेचा आनंद घ्यायला तिथं पोचला होता. झाडाला दाणकन्‌ हिसका दिल्यावर तंद्रीत लटकलेला वेताळ खाली पडला. तीच संधी साधून वेताळानं त्याच्यावर झडप टाकली आणि पाठीवर त्याला बसवून विक्रमादित्यानं जंगलाचा रस्ता पकडला.
आपण पकडले गेलो या रागात वेताळ विक्रमादित्याशी बोलत नव्हता. पुणे शहर मागं पडलं आणि मुळशीजवळचं जंगल लागल्यावर वेताळाला गप्प बसवेना.
वेताळ : ‘‘पकडलंस मला परत. केलंस जेरबंद... अरे राजा, मला मस्तपैकी प्रो-कबड्डी लीगचे सामने बघायचा आनंद लुटायचा होता...सोड मला सोड मी १९ सप्टेंबरपर्यंत सामने बघतो....दर्जेदार कबड्डीचा आनंद घेतो आणि मग तुला शरण येतो...’’
विक्रमादित्य : ‘‘दिलेला शब्द पाळला आहेस का तू कधी वेताळा? नेहमी मला चकवा देतोस... पण मला आश्‍चर्य याचं वाटत आहे, की क्रिकेट सोडून तुला कबड्डीचं वेड लागलं तरी कधी?’’
वेताळ : ‘‘क्रिकेटचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. गेल्याच आठवड्यात मी ऍशेस मालिकेतला चौथा कसोटी सामना बघून आलो. इतकंच नाही, तर परतीच्या प्रवासात अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करून काय पराक्रम केला त्याचाही आनंद लुटला. आता मला भारतात परतणं बरोबर वाटलं- कारण आता भारतीय क्रिकेट संघ मायदेशातच भरपूर सामने खेळणार आहे. मध्ये एकदा मी झाडावर लटकलो असताना समोरच्या घरातल्या टीव्हीवर मला प्रो-कबड्डी लीगचे सामने बघायला मिळाले- जे मला प्रचंड रोमांचक वाटले. मग मला प्रो-कबड्डी लीगचे सामने बघायची जणू चटकच लागली.’’
विक्रमादित्य : ‘‘खरं की काय वेताळा? मग क्रिकेट सामने बघायला जसा तू वेगवेगळ्या गावी जातोस, तसा कबड्डीचे सामने बघायलाही भटकलास की काय?’’
वेताळ : ‘‘नाही तर काय सांगतो आहे तुला राजा...त्याच मस्त कबड्डी खेळाच्या ओढीनं मी पाटणाला गेलो होतो. मला पाटणा संघाच्या परदीप नरवालचा खेळ बघायचा होता. शोधत गेलो एका संकुलात जिथं कबड्डीचे सामने चालू होते. बघतो काय तर तिथं कबड्डीचे सामने सुरू होते ...फरक इतकाच होता, की तिथं प्रो-कबड्डी लीग नव्हे, तर महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सुरू होत्या.’’
विक्रमादित्य : ‘‘ओहो... आता मला आठवलं. त्याबद्दलची एक खराब बातमी मी नुकतीच वर्तमानपत्रातून वाचली... आमच्या महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाची स्पर्धेत वाताहत झाल्याचं समजलं... कबड्डीचा वारसा असलेल्या महाराष्ट्राच्या संघाला साखळी स्पर्धेतूनच गारद व्हावं लागलं, हे मला झेपलंच नाही...तू गेला होतास ना मग नक्की काय झाले ते सांग ना वेताळा...मला उत्सुकता लागून राहिली आहे.’’
वेताळ : ‘‘किती रे राजा तुला महाराष्ट्राचं कौतुक!... पण एक सांगतो महाराष्ट्राच्या महिला संघाची वाताहत कोणा तगड्या प्रतिस्पर्धी संघानं केली नाही, तर तो आपणहून विळीवर पाय आपटण्याचा प्रकार होता इतकंच सांगेन मी.’’
विक्रमादित्य : ‘‘उगाच कोड्यात बोलू नकोस वेताळा...मला नीट सांग नक्की काय झालं...’’
वेताळ (दात विचकत हसत) : ‘‘विक्रमादित्या तू माझ्याशी वाईट वागलास, मला जेरबंद केलंस तरी मी चांगलंच वागणार तुझ्याशी. ऐक, मी जे बघितलं ते सांगतो.’’ (असं म्हणून वेताळ पाटणा गावी महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत काय झालं त्याची कहाणी सांगू लागला)
वेताळ : ‘‘विक्रमादित्या मला समजलं असं, की महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघानं राष्ट्रीय स्पर्धेत चमकण्याकरता भरपूर तयारी केली होती. चांगल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भक्कम सराव केला होता. संघात देशाचं प्रतिनिधित्व केलेल्या अनुभवी खेळाडू होत्या- तसंच ताज्या दमाच्या गुणवान खेळाडूही होत्या. पाटणाला झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या गटात मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळचे संघ होते. पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी मध्य प्रदेश संघाला ४४-२० फरकानं आरामात पराभूत केलं. नवख्या खेळाडूंना संधी देऊनही राजस्थान संघाला पराभूत करताना घाम फोडावा लागला नाही महाराष्ट्राच्या महिला संघाला.’’
विक्रमादित्य : ‘‘मग सगळं सुरळीत सुरू असताना माशी शिंकली कुठं?’’
वेताळ : ‘‘किती उतावळा आहेस तू राजा?...जरा धीर धर सांगतो पुढे काय झालं... दुसरीकडे खरं कट कारस्थान राजस्थान विरुद्ध केरळ सामन्यादरम्यान झालं. तो सामना संपला तेव्हा काय स्कोअर झाला हे समजत नव्हतं- कारण महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सुरू असूनही संकुलात स्कोअरबोर्ड मला दिसला नाही. महाराष्ट्राच्या संघ व्यवस्थापनानं सामन्यात काय झालं याची चौकशी करायला एका जबाबदार व्यक्तीला पाठवलं- जिनं सांगितलं, की स्कोअर ३३-३७ झाला आणि केरळ संघ जिंकला. तरीही परत एकदा शहानिशा करावी म्हणून संघ व्यवस्थापनातल्या अजून एका अजून जबाबदार व्यक्तीला पाठवलं- जिनेही सामना केरळ संघानं जिंकल्याचं सांगितलं.
‘‘महाराष्ट्राच्या संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे दरवाजे किलकिले झाले होते. आता उरलेल्या सामन्यात काय करायचा याचा विचार चालू होता. नेमकी याच वेळी खेळाडूंना विनाशकाले विपरीत बुद्धी झाली. अव्वल क्रमांकानं बाद फेरीत गेलं, तर स्पर्धेतल्या सर्वांत तगड्या रेल्वे संघाशी उपांत्यपूर्व फेरीतच सामना करावा लागणार होता. म्हणून अनुभवी खेळाडूंनी विचार केला, की केरळसमोरचा सामना गमावला, तर महाराष्ट्राचा संघ दुसऱ्या क्रमांकानं बाद फेरीत जाईल आणि मग रेल्वे संघाशी अंतिम सामन्यात दोन हात करावे लागतील- कारण हिमाचल आणि हरियाना संघाला जोमानं खेळ करून पराभूत करायचा विश्‍वास मुलींना जाणवत होता.’’
विक्रमादित्य : ‘‘समजून उमजून कमजोर खेळ करत सामना गमावण्याचा विचार चुकीचा होता वेताळा...’’
वेताळ : ‘‘अर्थातच चुकीचा होता. शंकाच नाही त्यात. फक्त राजा हे लक्षात घे, की कोणी मान्य करो वा न करो- भूतकाळात असा प्रकार घडला आहे. तगड्या संघाला स्पर्धेत शेवटीच भिडण्याकरता असे सामने अगोदरही गमावले गेले आहेत. कबड्डीच्या खेळात याला ‘रणनीती’ म्हटलं जातं. खरी मेख तर पुढंच आहे. केरळसमोरचा सामना समजून उमजून ८ गुणांनी गमावल्यावर महाराष्ट्र संघाचे काही हितचिंतक पळत आले आणि त्यांनी ‘‘तुम्ही हा काय वेडेपणा केलात?....सामना का गमावलात,’’ असं विचारलं. कारण राजस्थान विरुद्ध केरळमधला जो सामना केरळनं जिंकला असा संदेश स्वत: महाराष्ट्राच्या दोन जबाबदार लोकांनी दिला- तोच चुकीचा होता. प्रत्यक्षात सामना केरळनं नव्हे, तर राजस्थाननं जिंकला होता. परिणामी अंतिम गुणफरकात महाराष्ट्राच्या खात्यात ४ गुण कमी होते आणि त्यामुळंच महाराष्ट्राचा संघ साखळी स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.’’
विक्रमादित्य : ‘‘म्हणून मला प्रशिक्षक आणि तीन खेळाडूंवर निलंबनाची बातमी वाचायला मिळाली. काय भयानक आहे सगळा प्रकार वेताळा! छे!!’’
वेताळ : ‘‘चुकतो आहेस राजा... निलंबनाची कारवाई झालेली नाही... झाल्या प्रकाराचं सत्यशोधन करायला शिस्तपालन समिती नेमली गेली. त्यांचा तो ‘गोपनीय अहवाल’ होता जो बातमी म्हणून वाचायला मिळाला. अजून त्या अहवालावर मुख्य कार्यकारिणी समितीचा निर्णय होणं बाकी आहे.’’
विक्रमादित्य : ‘‘म्हणजे काय अजून कारवाई झाली नाहीये? मग तो अहवाल गोपनीय होता, तर तो इतका सहजी पत्रकारांपर्यंत पोचवला तरी कोणी? खेळाडूंची किती निंदा नालस्ती झाली एका बातमीतून?’’
वेताळ : ‘‘राजा, तू किती भोळा आहेस रे... हे सगळं कमालीचं राजकारण आहे कबड्डीच्या खेळातलं. कबड्डी संघटनेच्या मुख्य निवडणुका तोंडावर आल्या आहेत- ज्यामुळं शह काटशह दिले जात आहेत. महाराष्ट्र कबड्डी संघटनेचं अध्यक्षपद मिळवण्याकरता मोठ्या नेत्यांनी कंबर कसली आहे. खेळाडूंनी चुका केल्या यात शंका नाही आणि त्याकरता शिक्षा व्हायलाच हवी; पण असं करताना किती आणि काय शिक्षा द्यावी याचा विचार व्हायला हवा- नाहीतर खेळाडूंची कारकीर्द खलास होईल.’’
विक्रमादित्य : ‘‘धन्य आहे हे सगळा प्रकार...’’
असं म्हणत असताना विक्रमादित्यानं हात जोडले...न कळत त्याची वेताळावरची पकड क्षणभराकरता ढिली झाली... आणि त्याचाच फायदा घेत वेताळानं टुणकन उडी मारली आणि तो पळून गेला आणि समोरच्या उंच झाडावर जाऊन लटकू लागला...दात विचकत हसू लागला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com